Android app on Google Play

 

अध्यात्म

 

ईश्वराला संपूर्ण शरणागती हा धर्माचा पाया असल्यामुळे, जरी अधिकृत धर्मनेत्यांनी दैनंदिन ऐहिक जीवनाचे ईश्वरप्रणीत नियम सांगितले आणि हे नियम पाळल्याने कियामतीच्या दिवशी स्वर्गसुखाचे वाटेकरी होण्याची आशा निर्माण केली, तरी अनेक विचारवंतांना विरक्तीची ओढ असे. धर्म आणि राजकारण यांची अभेद्य सांगड घातल्यामुळे राजकीय सत्ताधाऱ्यानी काहीही केले, तरी त्यांना त्यासाठी धर्माचा काही ना काही तरी अधिकार सांगता येई. खलीफा अलीच्या खुनानंतर उमय्या घराण्यातील खलीफांनी अनन्वित अत्याचार केले. त्यामुळे अनेक विचारवंतांना चीड आली. त्यांनी धर्मग्रंथांचा दाखला देऊन सांगितले, की या अत्याचारांमुळे परमेश्वर त्यांना कियामतदिनी नरकवासाची सजा देईल. उलट सत्ताधाऱ्यांच्या पुरस्कर्त्यांनी दावा केला, की ज्या काही गोष्टी घडल्या त्या परमेश्वरी इच्छेमुळे. मानवाला आपल्या कोणत्याही कर्माबाबत स्वातंत्र्य नाही. त्याच्या हातून जे घडते, ते ईश्वरेच्छेचाच परिणाम आहे. उलट पहिल्या विचारवंतांनी दावा केला, की परमेश्वराने मानवाला विवेक स्वातंत्र्य दिले आहे. आणी सारासारविवेक न करता मन मानेल तसे अत्याचार करण्याने ईश्वरी कोपच होईल. या विचारवंतांना ‘जब्री ’ हे नाव पडले आणि सत्तेच्या पाठीराख्यांना ‘मूर्जी ’ हे नाव प्राप्त झाले. उमय्या खलीफांच्या कारकीर्दीत जब्रींचा खूप छळ झाला. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हे जाणून अनेकांनी विरक्ती आणि अध्यात्माचा आश्रय घेतला. प्रत्येक राजवटीत सत्ताधाऱ्यांच्या जुलुमाला कंटाळून अनेक मंडळी विरक्तिमार्गाकडे वळली.