Android app on Google Play

 

इस्लामी संघटना

 

मुहंमद स्वत: धर्मसंस्थापक, धर्मप्रमुख, शासक आणि सरसेनापतीही होते. त्यांच्यानंतरच्या खलीफांनी वेगळे सरसेनापती नेमले. साम्राज्य उभे राहिल्यावर गव्हर्नर किंवा राज्यपाल नेमण्यास सुरुवात झाली. त्यांच्या वेळोवेळी बदल्याही होत. साम्राज्यात ठिकठिकाणी सेनादल ठेवले जाई. गव्हर्नर खलीफांप्रमाणे स्थानिक धर्मप्रमुखही असत. त्यांच्या मदतीला ठिकठिकाणी ‘कुर्रा’ किंवा ‘कुराणपाठक’ नेमले जात. ते कुराण म्हणून दाखवीत आणि धर्माची माहिती देत. गव्हर्नर शुक्रवारच्या प्रार्थनेचे नेते असत तसेच नागरी, मुलकी आणि फौजदारी या तिन्ही क्षेत्रांतील न्यायदानाचे काम करीत. पुढे त्यांची जागा]काजींनी घेतली. धर्मशास्त्राप्रमाणे न्यायदान करणे आणि स्थानिक राज्यकारभार चालविणे ही त्यांची कामे असत. काजींना मार्गदर्शन करण्यासाठी विद्वान धर्मपंडितांची ‘मुफ्ती’ म्हणून नेमणूक करण्याची पद्धत सुरू झाल्यावर निरनिराळ्या प्रश्नांवर हे ]मुफ्ती काजींना आपली मते सांगत. ही मते किंवा फतवे समजावून घेऊन त्याप्रमाणे काजी न्यायदान करीत. या सर्व फतव्यांचे संकलन करूनच हिदायत तयार करता आले.इस्लामच्या दुसऱ्या शतकात प्रथम खलीफांनी वजीर किंवा मुख्य प्रधान नेमण्यास सुरुवात केली. त्यांच्या जोडीला ‘साहिब अल्-बारीद’ हे वित्तमंत्री, पोस्टमास्टर जनरल आणि प्रमुख काजी म्हणून कामकाज पाहू लागले. अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ‘साहिब अल्-शुर्ताह’ हे नवीन मंत्री नेमले गेले. इस्लामच्या  तिसऱ्या शतकापासून ‘मुहतसिब’ नेमण्यास सुरूवात झाली. इस्लामचे धार्मिक आणि सामाजिक आचरण प्रत्येकजण कसोशीने करीत आहे की नाही, ते पाहण्याची जबाबदारी मुहतसिबांवर सोपविण्यात आली. खलीफांची सत्ता कमकुवत झाल्यानंतर ठिकठिकाणचे स्थानिक लष्करी अधिकारी सुलतानपद धारण करून स्वतंत्र राज्यकारभार करू लागले. त्यांनी धार्मिक बाबतीत सल्ला देण्यासाठी ‘शेख-उल्- इस्लाम’ यांची नेमणूक करण्याचा प्रघात सुरू केला. ठिकठिकाणच्या काजींच्या नेमणुका करण्याचे काम शेख-उल्-इस्लाम यांच्यावर सोपविण्यात आले. सुलतानांच्या कारकीर्दीत खलीफांचे राज्यपाल नाहीसे झाले. सुलतानांनी राज्यपालांच्या जागी ‘इक्तेदार’ नेमण्यास सुरुवात केली. हे इक्तेदार जमीनमहसूल गोळा करीत आणि सैन्यभरतीही करीत असत. सुलतान स्वत:सरसेनापतीही असत. जरूर पडल्यास इक्तेदारांच्या फौजा मदतीला बोलावून घेत. या सर्व पदांसाठी व त्या त्या खात्याच्या कनिष्ठ स्थानिक पदांसाठी नेमणुका होत व त्यांचे पगार सरकारी खजिन्यातून दिले जात.ठिकठिकाणी श्रीमंत लोकांनी स्थापन केलेल्या विश्वस्त निधींचा कारभार पाहण्यासाठी‘वक्फ’ मंडळे नेमली जात. त्यांचा प्रमुख ‘मुतवल्ली’ असे. मशिदी, हमामबारे, सराया यांसाठी समित्या नेमल्या जात. दर्ग्याची व्यवस्था मूळ संतांचे वंशज (पीर) किंवा ‘मुजावर’ पाहत. अद्यापही स्थानिक समित्या, मशिदी, दर्गे, हमामखाने आणि वक्फ यांची व्यवस्था हीच मंडळी पाहतात.भारतात काजींची नेमणूक सरकारमार्फत होते. मशिदींची व्यवस्था प्रत्येक मशिदीची समिती पाहते. खाजगी संस्था मशिदीत किंवा इतरत्र धार्मिक शाळा (मदरसा) चालवितात. त्यांत शिक्षण घेतलेल्यांची नेमणूक काजी म्हणून केली जाते. निरनिराळ्या पंथांचे आणि शाखांचे वेगवेगळे काजी असतात.