Android app on Google Play

 

आचारविचार आणि व्यावहारिक सामाजिक नियम

 

प्रत्येक मुसलमानाने धार्मिक जीवन व्यतीत केले  पाहिजे, अशी इस्लामची अपेक्षा असते. आवश्यक धार्मिक आचरणात पुढील बाबींचा समावेश होतो :

(१) कलमा अल्लाहो अकबर (परमेश्वर श्रेष्ठतर आहे) आणि वर सांगितल्याप्रमाणे ‘लाइलह इल्ल’ ल्लह मुहंमद-उर्-रसूल ‘ल्लह’ ब्रीदवाक्याचा जाहीर उच्चार

(२) ६ ते ८ वर्षांपर्यंतच्या मुलांची सुंता.

(३) पाच वेळा प्रार्थना (सलात किंवा नमाज).

(४) दर शुक्रवारी मशिदीतील सार्वजनिक प्रार्थनेच्या वेळी उपस्थिती. या सामूहिक प्रार्थनेला उपस्थित राहण्याचा स्त्रियांना हक्क नाही.

(५) रमझान या चांद्रमासात कुरण प्रकट झाले, त्यानिमित्त दर वर्षी रमझान महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्जली उपवास (रोझे).

(६) रमझानच्या शेवटी प्राप्तीच्या अडीच टक्के इतका दानधर्म.

(७) आयुष्यातून एकदा तरी मक्केची यात्रा.

मुसलमानांच्या सर्व प्रार्थना मक्केकडे तोंड करून केल्या जातात.परवानगीशिवाय कोणाच्याही घरात प्रवेश न करणे; स्त्रियांनी गोषात (पडदानशीन) राहणे; कोणतीही गोष्ट करावयाची असे ठरविताना ‘इन्शा अल्ला’म्हणजे ‘अल्लाची मर्जी असेल तर’ असे शब्द उच्चारणे; मोठ्याने किंवा कठोर भाषेत न बोलणे; वृथाभिमान न बाळगणे; धनसंचय न करता दानधर्म करीत राहणे;व्यापारात खोटी वजने-मापे न वापरणे; दुसऱ्याने आपली चीजवस्तू सुरक्षित ठेवण्यास दिली असता, नंतर ती जशीच्या तशी परत करणे; व्याज घेऊन सावकारी न करणे; कर्ज घेतल्यास वेळेवर परत करणे; ज्याला कर्ज दिले त्याची हलाखीची परिस्थिती असल्यास परतफेडीस मुदतवाढ देणे; मद्य, अफू, डुकराचे मांस व जुगार यांपासून दूर राहणे; फक्त अल्लाच्या नावे कापलेल्या जनावराचे मांस सेवन करणे;जोपर्यंत पित्याने इस्लामचा त्याग केला नसेल तोपर्यंत पित्याच्या आज्ञेत राहणे; मानवी चित्रे आणि पुतळे तयार न करणे इ. आचार विषयक नियम इस्लामने विहित मानले आहेत.