Get it on Google Play
Download on the App Store

पंथोपपंथ

मुहंमदांचा ज्येष्ठ जावई खलीफा उस्मान याच्या कारकीर्दीत राजकीय कारणांसाठी पहिला इस्लामी धर्मपंथ उदयास आला. उस्मानच्या कारकीर्दीत त्याच्या अनेक सगेसोयऱ्यांना मोठ्या जागा दिल्या गेल्या होत्या. ईजिप्तचा राज्यपाल अमर इब्‍न अल्-आस याला पदच्युत करून त्याच्या जागी उस्मानच्या बांधवाला नेमल्यामुळे बंडाळी झाली. बंडखोरांनी शेवटी खलीफाचा वध केला. त्याच्यानंतरचा खलीफा अली याने उस्मानच्या नातेवाईकांना काढून टाकण्यास सुरुवात केली; परंतु त्यांनी बंड केल्यामुळे हा प्रश्न लवादाकडे सोपविण्याचे मान्य केले. त्यामुळे उस्मानविरुद्ध बंड केलेल्यांनी स्वतंत्र पंथ स्थापन केला. हे खारिजपंथीय लोक अत्यंत कर्मठ होते आणि खलीफाची निवडणूक सर्व मुसलमानांचे मत घेऊन केली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. अलीच्या खुनानंतर अलीविरुद्ध बंड केलेल्या मुआवियाने स्वत:स खलीफा म्हणून जाहीर केले. मुहंमदांच्याच वंशजांकडे खिलाफत राहिली पाहिजे, हसन आणि हुसेन हे अलीचे पुत्र मुहंमदांचे नातू होते, त्यांना खलीफा नेमावे म्हणून मुआवियाविरुद्ध बंडे झाली. या बंडातून ]शिया पंथ उदयास आला. पुढे त्यांच्या वंशजांमधील भाऊबंदकीने, शियांमध्येही अनेक उपपंथ निघाले. अशा रीतीने राजकीय कारणांसाठी बाहेर पडलेल्यांनी आपल्या स्वत:च्या वेगवेगळ्या धार्मिक तत्त्वज्ञानाची उभारणी केली. पुढे इस्लामी साम्राज्याचा अफाट विस्तार झाल्यावर, उत्तर आफ्रिकेच्या जनतेने इस्लाम धर्म स्वीकारला;परंतु आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी खारिजींच्या तत्त्वज्ञानास पाठिंबा दिला. इस्लामी साम्राज्याच्या स्थापनेपासूनच अरब आणि इराणी यांच्यात तीव्र स्पर्धा सुरू झाली. इराणी जनता जरी मुसलमान झाली होती, तरी अरबांबरोबरच्या संघर्षात तिने शिया पंथाला उचलून धरले.अरबस्तानात खिलाफतीच्या संघर्षात शियांचा आणि खारिजींचा पराभव झाला आणि उमय्या घराण्याकडे खिलाफत आली. उमय्या खलीफांनी अत्यंत कठोरपणाने राज्यकारभार चालविला होता. त्यामुळे उमय्या अत्याचारांविरुद्ध पापभीरू विचारवंतांनी कादिरी पंथ स्थापन केला. उमय्यांच्या पापांचा समाचार परमेश्वर कियामतदिनी अवश्य घेईल, असे मत त्यांनी मांडले. उलट उमय्यांच्या पाठीराख्यांनी मानवाचे प्रत्येक कृत्य ईश्वरी इच्छेने होते, त्यामुळे परमेश्वर उमय्यांना शिक्षा करणार नाही, असे उत्तर दिले. या वादातून मानवाला स्वतंत्र बुद्धी असते, की त्याची सर्व कृत्ये परमेश्वरी इच्छेने होतात, हा तात्त्विक मतभेद निर्माण झाला. उमय्यांच्या पाठीराख्यांना ‘मूर्जी’ हे नाव मिळाले. कादिरी पथाचे लोक मानवाला आचारस्वातंत्र्य आहे, असे मानीत आणि उमय्यांच्या अत्याचारांचा निषेध करीत. शेवटी राजसत्तेच्या विजयाबरोबर मूर्जी तत्त्वाचाही वरचष्मा झाला. कादिरी पंथाच्या विचारवंत अनुयायांनी पुढे ]मुताझिला पंथ स्थापन केला. त्यांच्या मते मानवाला सारासारविवेकशक्ती नसती, तर परमेश्वराने कुराणात दुष्कृत्यांसाठी शिक्षा सांगितलीच नसती. मूर्जी पंडित खलीफांच्या सर्वंकष सत्तेचे समर्थन करणाऱ्या मुहंमदांच्या तथाकथित वचनांचा आधार घेत. ही वचने बनावट आहेत, कारण ती तर्काला पटण्यासारखी नाहीत, असे प्रत्युत्तर मुताझिलांनी दिले. मानवी जीवनात परमेश्वरी मार्गदर्शनाइतकेच तर्क आणि सारासारविवेक यांना महत्त्व आहे. या मताच्या समर्थनार्थ त्यांनी कुराण आणि मुहंमदांची वचने यांचा पुरावा दिला. परंतु हे दोन्ही प्रकारचे पुरावे त्यानंतरच्या आयतांनी आणि उक्तींनी रद्द किंवा ‘मन्सूख’ झाले, असे मूर्जींनी तर्कट लढविले. तेव्हा मुताझिलांनी‘मन्सूख’ कल्पनाच चुकीची आहे, कुराण परमेश्वराचे संपूर्ण मार्गदर्शन आहे, त्यातल्या कांही आज्ञा आणि मार्गदर्शन आता रद्द झाले, असे सांगण्याचा अधिकार कोणत्याही मानवाला असू शकणार नाही, असा बिनतोड जबाब दिला. परंतु सत्तेपुढे त्यांचे काही चालले नाही.इस्लाममधील बहुतेक सर्व पंथोपपंथ राजकीय संघर्षातून निर्माण झाले. धर्म आणि शासन यांचा संपूर्ण मिलाफ झाल्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धी धार्मिक प्रतिस्पर्धीही झाले आणि प्रत्येकाने आपापले वेगवेगळे धर्मशास्त्र निर्माण केले