Android app on Google Play

 

आहुती - अशोक दादा पाटील

 

(मूळ दंतकथेवर आधारलेली एक ऐतिहासिक सत्यकथा)

हसन गंगू बहामनी यांने स्थापन केलेल्या बहामनी राज्यांत ‘कंगणगांव’ नावाचे एक गांव होते. बहामनी राज्याचे पंच छकले पडल्यानंतर विजापूरच्या आदिलशहा यांचेकडे त्या कंगणगांवचा ताबा आला आणि त्या गावाचे वतनदार बिरादर  पाटील हे विजापूर बादशहाचे वतनदार मांडलिक बनले.

या पूर्वीच्या बिरादर पाटलांचे कार्य व दबदबा सर्व भागांतील जनतेला आणि सरकारी दरबारी असलेने हुशारी, प्रामाणिकपणा आणि कर्तबगारी यामुळे अदिलशाहीच्या राज्याने या पाटलावरच त्या सभोवतालच्या भागाचा कारभार सोपविला. अर्थात बहामनी काळापासून जिन पूजक घराण्याला महत्व होते. आणि तो समाज अहिंसक, सत्य पालक व प्रामाणिक असलेने अदिलशाहीतही वतनदार पाटलांना महत्व प्राप्त झाले.

बिरादार घराणे शेती व्यवसायात निपुण. त्यामुळे त्यांच्या अखत्यारीत असलेल्या गांवात शेती व्यवसाय भरभराटीस आला होता. गांवात बारा बलुतेदार कार्यरत होते. पाटलांचा भव्य वाडा. विपुल शेती. शेकडो लोकांचा राबता पाटलांच्या घरी नित्य असायचा. सुतार, लोहार, तेली, कुंभार, हेळवी, दळवी, गुरव असे अनेक व्यवसायिक आपापले कार्य निर्वेधपणे करीत असत. त्यांच्या कामाच्या मोबदल्यात वर्षभर घरी लागणारे धान्य पाटील घराणे व त्यांचे भाऊबंद बलुतेदार व कामगारांना मळणीजागीच खळ्यावर बिदागी म्हणून बहाल करीत.

पाटीलकी असलेल्या वस्तीला तटबंदी असायची. प्रसंगी अतिक्रमण - आक्रमण, चोरी, दरोड्यापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी पाटलांच्या दारी सशस्त्र दल असायचे. धान्य कोठारे, शस्त्रे सर्व काही बाळगून असलेले पाटील म्हणजे स्वयंभू राज्याचे एक प्रतीकच असायचे. मात्र वार्षिक खंडणी अदिलशाहाच्या दरबारी न चुकता भरली जात असे. दुष्काळ, अवर्षण वगैरे प्रसंगी बादशहाच्या दरबारी आपले गा-हाणे मांडून खंडणीत सूट मागून घेणें वगैरे दरबारी कामें पाटील मोठया चातुर्याने करीत असलेने सर्व प्रजा पाटलांच्या कारभारावर खूष होती.

पुढे कांही वर्षे सर्व काही सुरळीतपणे सुरु होते. पण पावसाअभावी सलग बारा वर्षे मोठा दुष्काळ पडला. लांबच्या प्रदेशातून बैलांवर ओझे लादून धान्याचा पुरवठा आपल्या प्रजेला करता करता पाटील थकून गेले. धान्य कसेही आणू शकतील पण पाण्याचे काय करणार? मोठी समस्या पाटलासमोर उभी राहिली. रांजणी, मडके, भांडीकुंडीतून साठविलेले पाणीही संपून गेले. अशा परिस्थितीत हतबल झालेले पाटील विहीर, तळी आटून गेल्यामुळे अधिकच गांगरून गेले. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनल्याचे स्पष्ट झाल्याने प्रजा गांव सोडून इतरत्र जाण्याच्या तयारीला लागली. पाटील मोठया चिंचेत पडले. प्रजेच्या रक्षणाची जबाबदारी ते टाळू शकत नव्हते. प्रजेला अन्न पाणी पुरवून अभय देणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्याला अनुसरून पाटलांनी अनेक उपाय करूनही परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली; तेंव्हा हिंमत करून पाटलांनी एक मोठी विहीर खणून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे ठरविले. गांवातील सर्व थरातील लोकांचे सहकार्यही त्यांना लाभले. प्रजेच्या हितासाठी आणि वतनदारीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी पाटलांनी घेतलेला धाडसी निर्णय सर्वांनाच आवडला.

विहिरीच्या कामाला वेग आला तसे लोकांना काम मिळाले. काळ्याकभिन्न दगडांत विहीर दिवसेंदिवस खोल खोल दिसत होती. कितीही खोली वाढली तरी पाण्याचा टिपूसही दिसत नव्हता... पाटलांच्या मनाला निराशेने घेरून टाकले. पाटील हताश झाले. चिंतेने ग्रासून गेले. रात्रभर त्यांना नीट झोपही लागेना. एकदा मनांत आले कोणा जोतीषाला विचारून पहावे. त्याप्रमाणे ते सकाळी लवकर उठून आपल्या गांव शेजारील जोतीषाकडे गेले व आपल्या येण्यामागील कारणासह सर्व हकीकत त्यांनी जोतीषांना सांगितली.

जोतीषांच्या कथनानुसार पाटलांच्या मनाला तीव्र धक्का लागला. परिणामी पाटलांनी अंथरून धरले, खाणे पिणे वर्ज्य झाले. ही गोष्ट त्यांच्या एकुलत्या एक मुलीला कळल्यावर ती धावतच माहेरी आली आणि तिने आपल्या वडिलांना कारण विचारले... तेंव्हा हो ना करतां - करतां  पाटलांनी आपल्या लाडक्या मुलीला जोतीषाने सांगितलेला उपाय सांगितला तेंव्हा क्षणभर तिलाही धक्काच बसला. मुलीने विचार केला आणि आपल्या बापाला समाधानाचे चार शब्द सांगून ती तडक जोतीषाकडे धावली. तिने जोतीषाला अन्य मार्ग विचारले पण त्यांनी दुसरा पर्याय नसल्याचे सांगताच मुलगी म्हणाली, ‘मोठया मुला ऐवजी मोठया सुनेने ते कार्य पार पाडले तर चालेल का?’ तिचे विचार लक्षपूर्वक ऐकत व खूप विचार करून त्या मुलीच्या मताला जोतीषाने संमती दर्शविली व प्रजेच्या हितासाठी, घराच्या इभ्रतीसाठी मोठया मुलाऐवजी मोठी सून ही जबाबदारी घेऊ शकते आणि आपले कार्य यशस्वी होऊ शकते हे विचार अनेक उदाहरणे देऊन आपल्या पित्याचे गळी उतरविले.

पाटलांचे मन विषण्ण झाले. मुलगा अथवा सून यांत त्यांना भेद वाटत नव्हता. आणि आपल्या पूर्वापार रिवाजानुसार हे कृत्य त्यांना मान्यही नव्हते; तरीही जनतेचे हाल त्यांना पाहवत नव्हते हो ना करतां अखेर पाटलांनी जोतिषाच्या विधीस मान्यता दिली. नाइलाज हा ही एक इलाजच असतो.

ठरलेल्या कार्यक्रमाची वेळ आणि दिवस याचा कुणालाच पत्ता नव्हता. परंतु घरांत होत असलेल्या तयारीवरून आणि धांदलीवरून घरांत एखादे मोठे कार्य होणार आहे एवढे मात्र सर्वांना कळून चुकले होते. काढलेल्या कोरड्या विहिरीला पाणी लागावे म्हणून मोठया सुनेकरवी महायज्ञ करायचे निश्चित झाल्यापासून घरातील धामधूम वाढली होती. आणि गांवकरीही पाटलांच्या सहाय्याला जय्यत तयार होते -

सदर पूजेचे वृत्त मोठया सुनेलाही माहित झाले होते. म्हणून ती चिंताक्रांत होती. परंतु येणा-या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचा तिने खंबीर निर्णय घेतला होता. सास-याच्या सेवेस सदा सज्ज असलेल्या सुनेने सास-यांच्या डोळ्यातील अश्रू न्याहाळले होते व त्यातून काय उमजायचे    ते उमजले होते.

म्हणून तिने आपल्या माहेरी जाऊन येण्याची अनुज्ञा मागितली. संध्याकाळपर्यंत परत सासरी येण्याच्या अटीवर तिला माहेरी जाण्याची परवानगी मिळाली; पाटलांचा सुनेच्या शब्दावर विश्वास होता. नणंद साशंक होती. पद्मावतीचा नवरा दिग्मूढ होता. सासरा हताश होता. सर्वत्र सूर्यप्रकाश असूनही अंधार सर्वाना भिववित पुढे पुढे येत होता.

पद्मावती एका रक्षकाबरोबर झपाझप पावले टाकीत दोन कोसावर असलेल्या आपल्या माहेरी पोहचली. आई, बाप, बहिण, भाऊ इत्यादी सर्वाना भेटली. तिचे पाण्याने डबडबलेले डोळे पाहून सर्वांनी कारण विचारले पण तिने कशाचाही थांगपत्ता लागू न देता सर्वांचा निरोप घेऊन सास-यांना दिलेल्या वचनाप्रमाणे दिवस मावळण्यापूर्वी आपल्या सासरकडे  निघाली. वारंवार ती आपलं माहेर न्याहाळीत होती. पोटातलं दु:ख ओठावर दाबीत ती सासरकडे निघाली आणि दिलेल्या वचनाप्रमाणे घरी आली. सर्व गडी, माणसे, घोडे गाड्या, केलेला स्वयंपाक, पूजेचे साहित्य व नैवद्य घेऊन मांत्रिक तांत्रिकसह सर्व मंडळी रात्र झाल्यावर विहिरीच्या पूजेसाठी बाहेर पडली.

विहिर मोठी ऐसपैस परंतु पाण्याचा एक थेंबही त्यांत नव्हता पौर्णिमेनंतर उगवणारा चंद्र आकाशात शांत मुद्रेने चांदण्याची उधळण करीत स्थिरावला होता. त्या विहिरीच्या तळाशी सर्व सरंजाम उतरले मांत्रिकांच्या मंत्रोपचारांत पूजा विधीस प्रारंभ झाला. सर्वत्र गंभीर आणि भयप्रद शांतता व्यापून उरली. रात किड्यांच्या कर्कश आवाजाने त्या भयाण अंधारात गुढ्मय वातावरण सर्वत्र व्यापून गेले. दीप धूप आणि होम हवन यांच्या मिश्र हवेने आसमंत व्यापून गेल्याने सगळ्यांची मने एका विचित्र आभासामुळे बधीर झाली.

पूजा विधी नंतर मांत्रिकाने एका चांदीच्या वाटीतील पाण्यात चंद्रबिंब पाहून आपला मंत्रोपचार पूर्ण करीत पूजा विधी संपल्याचे जाहीर केले.

विहिरीतील सर्व मंडळी पूजाविधीसाठी नेलेले सर्व सामान घेऊन विहिरीवर आली. पाटील व त्यांचे चिरंजीव सून लेक सर्व मंडळी घराकडे परतण्यासाठी गाडीत चढली. तेवढ्यात पाटलांची लेक म्हणाली - ‘विहिरीत चांदीची वाटी राहिली’ पाटील उदासपणे ऐकत होते. कोणी ती चांदीची वाटी आणण्यासाठी जाण्यास तयार नव्हते; कोणालाही भयापोटी त्या अंधारलेल्या वेळी खोल विहिरीत उतरून वाटी आणणेस नको होते.

पाटलाच्या मुलीला हे सर्व माहित होते. पाटलांचा कंठ ही दाटून आला होता. परंतु पाटलांच्या लेकीला ते काम आपल्या भावाच्या पत्नीवर टाकायचे होते ही गोष्ट पद्मावतीस माहित होती.

‘मामाजी मी आणते वाटी’ असे म्हणून पद्मावती गाडीतून खाली उतरली. सर्व जन स्तब्ध झाले. ती झपाझप पावले उचलीत नव्या कोरड्या ढणढणीत विहिरीकडे निघाली. बिनधास्तपणे ती विहिरीत उतरली.

एव्हाना पाटलांच्या घरची सर्व मंडळी आपल्या गाडी, घोडा आणि आप्त स्वकीय मंडळीसह घराकडे प्रस्थान केलेच होते कारण जाणून बुजून केलेला तो एक ‘बलिदानाचा कट’ होता ही गोष्ट पद्मावती जाणून होती. आणि या सर्व गोष्टी जाणून आपल्या मनाची पूर्ण तयारी तिने केली होती. माहेरी आई बापाची शेवटची भेट देखील याच कारणासाठी तिने घेऊन सासर गाठले होते.

सर्व पाय-या उतरून तळाला पोचल्यावर तिने सभोवार न्याहाळून पाहिले विस्तीर्ण तळात मांडलेला होम कुंड पूजेचे साहित्य जसेच्या तसे होते. माथ्यावर शांतपणे किरणांचा वर्षाव करणा-या चंद्राचे प्रतिबिंब चांदीच्या वाटीतील पाण्यात पडलेले तिने पहिले. भक्तीभावाने आणि निश्चयपूर्वक त्या वाटीला तिने नमस्कार केला व त्या वाटीस हात लावून ती आपल्या तळव्यावर घेतली त्याबरोबर सर्व बाजूने विजेचा चकमकाट आणि ढगांचा प्रचंड गडगडाट आसमंतात घुमू लागला. ती आचंबित झाली. क्षणभर गंगारुनही गेली. सर्वत्र तिने दृष्टी टाकली काळोख पसरला होता. चंद्र दिसेनासा झाला होता. प्रचंड वा-याच्या वेगाने झाडे झुडपे घुसळून निघाली होती. ती धैर्याने तशा अंधारातही वर येऊ लागली.

काही क्षणातच पाण्याचा खळखळाट कानी पडला. चांदीच्या वाटीच्या तळापर्यंत विहिरीत पाणी आले तो अर्ध्या अधिक पाण्यात उभी होती तिने निश्चय केला कोणत्याही परिस्थितीत वर जायचेच...

वाटी घट्ट पकडून ती क्रमाक्रमाने पाय-या चढत ती वर येऊ लागली तसतसे पाणीही वाट चढतच आले... तिच्या मनात अनेक विचार आणि भीतीचे काहूर माजले  होते... आपले घराणे बारा वर्षाचा दुष्काळ... जनतेचे पाण्याविणा झालेले हाल. लोकांना पडलेले कष्ट. आपल्या सास-याने जनतेच्या सोयीसाठी विहीर काढण्याचा केलेला निर्धार आणि घराण्याची प्रतिष्ठा या सर्वच्या सर्व गोष्टी तिच्या मनात डोकावून गेल्या... आता पावेतो विहिरीचे पाणी तिच्या नाकापर्यंत आले होते. अखेरचा क्षण जवळ आला होता हे तिनेही ओळखले, बळी जाण्यापूर्वी पाण्याचे दुर्भिक्षितही हरावे म्हणून निर्धाराने ती वाटी तिने असेल नसेल ती शक्ती एकवटून विहिरीबाहेर उंच उंच फेकून दिली.

त्याच क्षणी विहीर काठोकाठ भरून वाहू लागली. पद्मावती त्या विहिरीच्या पाण्यात अदृश्य होऊन गेली. क्षणभर विहिरीतले पाणी ढवळून निघाले. त्या खळबळत्या पाण्यात चंद्रबिंब अनेक तुकड्यात विखुरलेला गेला असावं असा भास होत होता. त्यानंतर काही वेळांतच शांतता पसरली. झाडे झुडपे मुग्धपणे अश्रू ढाळावेत तसे झाडावरून ओघळणारे पावसाचे थेंब टपाटप जमिनीवर ओघळत होते. सर्वत्र हुडहुडी भरवणारा गारठा पसरला... सृष्टी शांत होती पृथ्वीही शांत होती सारे आसमंतही शांत शांत होते जणू अनेक वर्षाच्या धगधगीने त्रस्त झालेले चराचर शांतपणे निद्राधीन झाले होते.

दुस-या दिवशी आपल्या सुनेवरील मायेपोटी पाटील आपल्या घरातून पहाटे लवकर उठून शेताकडे निघाले वाटेत पावसामुळे चिखल पसरला होता... तो तसाच तुडवीत शेतावर आले. पाहतात तो विहीर पाण्याने तुडुंब भरून काठावरून पाणी वहात जात असलेले त्यांना दिसले. आपल्या सुनेचा आपण दिलेला बळी त्यांच्या मनाला डिवचत होता. आपल्या घराण्यासाठी आणि आम जनतेसाठी पद्मावतीने केलेल्या बलिदानाने त्यांची मान नतमस्तक झाली. डोळ्यातून अश्रू उभे राहिले. त्यांनी हताश मनाने आपल्या सुनेस हाक दिली - ‘पद्मावती’

विहिरीच्या तळातून आर्त परंतु निश्चययुक्त आवाज आला - ‘काय मामंजी’

पाटील विव्हळ होऊन म्हणाले - ‘पोरी क्षमाकर’

पद्मावतीचा आवाज आला - ‘पुनर्विवाहित स्त्रीचे मला वावडे आहे आणि घरच्या मुलींना मी विश्वासू समजणार नाही... त्यांनाही माझे दर्शन वर्ज ठेवा...’

पद्मावती पुढे म्हणाली - ‘घराणे व घराण्याची इभ्रत जपणा-यांना माझा आशीर्वाद सांगा...’

असे म्हणून पद्मावतीचा आवाज लुप्त झाला.

सुन्न मनाने विहिरीच्या काठावर पडलेली चांदीची वाटी व त्यातील पाणी घेऊन पाटील घरी परतले. घरात ती वाटी देवघरात ठेवली ती ज्येष्ठ पौर्णिमा होती.

कांही दिवसातच त्या भागाचा दुष्काळ हटला. पाटलांनी विहीर दगडाने बांधून काढली. तिला ‘पद्मावती खन्नेरी’ विहीर म्हणून नांव देऊन टाकले... परंतु अपराधी मन खंगत गेले. मृत्युपूर्वी आपल्या मुलांना जवळ बोलावून घेतले व आग्रहाने सांगितले - ‘प्रतिवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणा-या प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी रात्री कुलदैवत व गृहदैवत म्हणून ‘पद्मावती खन्नेरी’ ची पूजा करा... विहिरीत केलेल्या विधानाप्रमाणे सर्व विधी व्हावा पण बली देण्याचे प्रकार करू नका; असा तिने शाप दिला.

पाटलांच्या मृत्युनंतर पाटील घराण्यात ही पुजेची प्रथा चालू राहिली. गांव सुखी झाले... संपन्न झाले... परंतु आसपासचे कांही वतनदारांना अदिलशहाच्या दरबारातील पाटलांचे वर्चस्व डोळ्यात खुपत होते. पाटलांची भरभराट त्यांना पाहवत नव्हती... त्यांना त्या पाटील घराण्याला बदनाम करावयाचे होते. त्याचं समयी योगायोगाने माळरानावर गुरे राखणा-या पांच मुलांची मुंडकी कापून नेऊन धड टाकल्याचे सरकार दरबारी वर्दी गेली. कोणी तरी तिखट मीठ लावून बादशहाचे कान भरवून पाटलांचेवर ही आळ आणली. बादशहाने ताबडतोब आपल्या शिपायांना आदेश देऊन चौकशी सुरु केली.

दिवस उगवण्यापूर्वी पहाटे सैनिक पाटलांच्या घरी पोहचले... पाटलांच्या घराची तपासणी करण्यासाठी त्या चुगलखोर सरदारासही बरोबर घेतले होते, शिपायांनी सर्व घर तपासले... ‘खन्नेरी’ ची पूजा केलेल्या जागेस जाणेस पाटलांनी मज्जाव जेंव्हा केला - तेंव्हा सैनिक व त्या चुगलखोर सरदाराचा संशय वाढला... त्यांनी बळजबरीने पूजा लावलेल्या खोलीत प्रवेश केला. तेथे भाताचे पाच गोळे माणसाच्या तोंडाच्या आकाराचे करण्यात आलेले गुलालाने माखून काढलेले त्यांना आढळून आले.

सैनिक व तो चुगलखोर सरदार परत बादशहाकडे गेले त्यांनी ती सर्व हकीकत बादशहाला सांगितली. त्यामुळे पाटील निर्दोष असल्याचे बादशहाला पटले.

परंतु श्रद्धाळू लोकांना मात्र देवी खन्नेरी पद्मावतीच्या कृपेनेच मुंडक्यांचे रुपांतर भाताच्या उंडीत झाल्याचे वाटू लागले त्यामुळे ‘पद्मावती खन्नेरी’ देवीवरील भक्ती दिवसेंदिवस वाढत गेली आणि प्रतिवर्षी पाटील घराण्यात ज्येष्ठ शुद्ध पक्षात ही पूजा प्रथा कायम स्वरूपी पाळली जाऊ लागली. काही दिवसांनी विजापूर बादशहाचा उपद्रव वाढल्याने भीतीपोटी पाटलांचे घराणे विचारात पडले आपली जनता व समाज तसेच बारा बलुतेदारांसह त्यांच्या रक्षणाकरिता निसर्ग व दैवी आपत्तीमधून सुटका व्हावी म्हणून ते पाटील घराणे विजापूरपासून साठ - सत्तर मैल दूर अशा ठिकाणी स्थायिक झाले आणि आपल्या परंपरेनुसार आपले जीवन चालविले....
 

अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६

अभिषेक ठमके
Chapters
संपादकांचे मनोगत
अतिथी संपादकिय
अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६
अणुक्रमणिका
BookStruck ई-पुरस्कार २०१६ स्पर्धेचा निकाल
आम्ही सोशल सोशल! - निमिष सोनार
सेक्स एज्युकेशन - मंगेश सकपाळ
शक संवत - डॉ. सुनील दादा पाटील
मराठीतील एक सर्वोत्तम कादंबरी: पुन्हा नव्याने सुरूवात - मंगेश विठ्ठल कोळी (ज्येष्ठ समीक्षक)
भारतीय रुपया - अनिल धुदाट (पाटील)
अमेरिकेतील शिक्षण पद्धत - गौरी ठमके
तत्त्वप्रकाश - प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य
शिक्षणाचा जिझिया कर! - अक्षर प्रभू देसाई
'श्रेय'स - अभिषेक ठमके
संभ्रम-ध्वनी - चैतन्य रासकर
एक अनुभव - एक धडा : राज धुदाट (पाटील)
नवरात्रोत्सव - नीलिमा भडसावळे ऐनापुरे
आहुती - अशोक दादा पाटील
गावाचे शिवार सरकार दरबारी...! - मयुर बागुल, अमळनेर
चवंडकं - अशोक भिमराव रास्ते
अशा दुर्दैवी जीवांना दया-मरण द्या - डॉ. भगवान नागापूरकर
माहुली गड - श्रीकांत शंकर डांगे
स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -वर्षा परब
वाचा थोडं ऍडजस्ट करूनच - सागर बिसेन
पूर्णेच्या परिसरांत ! - डॉ. भगवान नागापूरकर
बाल मजूर... - अदिती जहागिरदार
कविता - वैष्णवी पारसे
पाऊस - किरण झेंडे
कविता - सुरेश पुरोहित
ओळख - प्रशांत वंजारे
शंका..? - निलेश रजनी भास्कर कळसकर
कविता - स्नेहदर्शन
कविता - स्नेहदर्शन
कविता - संतोष बोंगाळे
कविता - संतोष बोंगाळे