Get it on Google Play
Download on the App Store

भारतीय रुपया - अनिल धुदाट (पाटील)

भारतीय रुपया (अनेकवचन: रुपये) हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात. सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व बँकेतर्फे बनविल्या जातात.भारतीय चलनासाठी युनिकोडमध्ये U+20B9 ही नियमावली ठरवण्यात आली आहे. रुपया हा शब्द संस्कृत मधील रूप्य (रुप्याचे नाणे) किंवा रौप्य (रुपे) या शब्दापासून आला आहे.(रुपे हा चांदी-रजत, या धातूपासून बनलेला एक मिश्र धातू आहे. रुप्यापासून बनविलेला तो रुपया-पूर्वीचे राजे चलनासाठी चांदीचे नाणे बनवीत असत.) इतिहास - बक्सरच्या लढाई नंतर सन १७६४-६५ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात मोगल बादशाह शाह आलमची नाणी पाडून देण्यास सुरुवात केली. त्यावेळची नाणी हाताने तयार करण्यात येत असत. त्यामुळे ती गोल, साचेबद्ध, एकसारखी नसत. पुढे १७९० मध्ये भारत देशात यासाठी मशीन मागविण्यात आले. त्याद्वारे तयार करण्यात आलेली नाणी बरीच सुबक झाली.

भारतात गोल, सुबक, सारख्या वजनाची, प्रमाणित नाणी (Uniform Coinage) तयार करण्याचा मान जेम्स प्रिन्सेप (James Princep) यांना जातो. जेम्स प्रिन्सेप यांना भारतीय नाणक शास्त्राचे (Numismatics) जनक मानले जाते. त्यांनी भारतीय नाण्यांचा सखोल अभ्यास करून भारतीय नाणी साचेबद्ध आणि सारख्या वजनाची असावीत म्हणून एक अहवाल तयार केला आणि लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याकडे पाठविला. तो अहवाल मंजूर झाला आणि प्रिन्सेप यांनी पाठविलेल्या सहा नमुन्यांपैकी एक मंजूर करण्यात आला. त्या पहिल्या नाण्यावर तत्कालीन ब्रिटिश राजे चौथे विल्यम यांची भावमुद्रा होती. तेव्हापासून भारतीय नाणी यंत्रांद्वारे तयार करण्यात येऊ लागली. प्रिन्सेप यांनीच भारतात वजन आणि मापे प्रमाणित असावीत (Standard Weights and Measures) म्हणून सरकार दरबारी पाठपुरावा केला. तोही अहवाल मंजूर होऊन भारतात वजन आणि मापे प्रमाणित झाली. या सोबतच कोणते नाणे कुठे तयार करण्यात आले ते समजण्यासाठी सर्व प्रकारच्या नाण्यांवर एक छोटी खूण (मिंट मार्क) करण्यात येऊ लागली. अशी खूण पाहून नाणी जमा करणे हा या छंदातला एक महत्त्वाचा भाग समजला जातो.

सन १८३३-३४ पासून विल्यम राजाच्या छापाची नाणी तयार व्हावयास सुरुवात झाली. त्यानंतर अनुक्रमे व्हिक्टोरिया राणी, आठवे एडवर्ड, पंचम जॉर्ज आणि सहावे जॉर्ज सहावे या राजांची मुद्रा असलेली नाणी सन १९४७ पर्यंत भारतात तयार करण्यात आली. या कामासाठी तत्कालीन भारताच्या तिन्ही म्हणजे (१) बंगाल, (२) मुंबई आणि (३) मद्रास या प्रांतात अनेक नवीन टांकसाळी तयार करण्यात आल्या. तांबे, चांदी आणि सोने वापरून नवीन नाणी तयार करण्यात आली. त्यासाठी नवा कायदाही अस्तित्वात आला.

सगळ्यात लहान नाणे म्हणजे १ पै, ३ पै चा १ पैसा, ४ पैसे मिळून १ आणा, १६ आण्यांचा १ रुपया, १५ रुपये म्हणजे १ मोहर (सोन्याचे नाणे) असे प्रमाण ठरविले गेले. त्यावर एका बाजूला राजा/राणीच्या भावमुद्रा (छाप = Obverse side) तर दुसऱ्या बाजूस (काटा = Reverse side) ईस्ट इंडिया कंपनी, नाण्याची किंमत वगैरे माहिती लिहिली जात असे. ब्रिटीश कालीन भारतीय नाणी दोन मुख्य प्रकारात मोडतात. पहिला काळ सन १८३३ पासून १८५७ पर्यंतचा. या काळातील नाण्यांवर ईस्ट इंडिया कंपनीचे नाव दिसून येते, तर दुसरा काळ सन १८५७ पासून १९४७ पर्यंतचा. १८५७ साली झालेल्या राष्ट्रीय उठावानंतर कंपनी सरकारचे अधिकार कमी करण्यात आले आणि राज्य सत्ता थेट ब्रिटिश राजघराण्याकडे गेली. त्यामुळे नवीन नाण्यांवरील ईस्ट इंडिया कंपनीचे नाव लुप्त झाले. तर व्हिक्टोरियाची नाणी व्हिक्टोरिया राणी (क्वीन) आणि व्हिक्टोरिया सम्राज्ञी (एम्प्रेस) अशा दोन मुख्य प्रकारांत निघाली. भारताच्या स्वातंत्र्य मिळण्याचे निश्चित झाल्यावर नाण्यांमध्ये थोडा बदल करण्यात आला. एकीकडे सहावे जॉर्ज यांची भावमुद्रा तशीच ठेवण्यात आली तर दुसऱ्या बाजूस भारताचे प्रतीक म्हणून सिंहाचे चित्र आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० पर्यंत ही नाणी सुरू रहिली. १९५० साली मात्र पूर्णपणे भारतीय नाणी तयार करण्यात आली. ही नवी नाणी चांदीची नव्हती पण त्यांचे रुपया हे नाव मात्र स्वीकारण्यात आले. ब्रिटिश राजे-राण्यांचे चित्र काढून टाकण्यात आले. आता त्याऐवजी चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र आले. १९५७ सालानंतर आणखी बदल करून एक रुपयाचे १०० पैसे असे प्रमाण ठरविण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत नाण्यांच्या धातू, वजन वगैरे मध्ये वेळोवेळी बदल होत गेले. मुख्य म्हणजे दर्शनी भागावर काहीही फरक झालेले नाहीत.

इतर भाषांत रुपयाचे शब्दप्रयोग - भारतात रुपयास प्रत्येक प्रांतात विविध स्थानिक नावांनी संबोधले जाते:

हिंदी भाषेत : रुपया, रुपय्या, रुपैया. अनेकवचन : रुपये (क्वचित्‌ रुपए)

गुजराती भाषेत (રૂપિયો) रुपियो. अनेकवचन रुपिया.

तेलुगू भाषेत (రూపాయి) रूपायि.

तुळू भाषेत (ರೂಪಾಯಿ) रूपायि.

कन्नड भाषेत (ರೂಪಾಯಿ)रूपायि.

तमिळ भाषेत (ரூபாய்) रूबाय.

मल्याळम भाषेत (രൂപ) रूपा.

मराठी भाषेत रुपया, रुपये (अनेकवचन).

संस्कृत भाषेत रूप्यकम्, रूप्यकाणि(बहुवचन).

ईशान्येकडील राज्ये वगळता उर्वरित भारतात रुपया / रुपये हे रोमनलिपीतील "Re / Rs" ह्या अक्षरांद्वारे दर्शवितात. मराठीत ‘रु’ हे लघुरूप वापरतात. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम, ओरिसा, आणि आसाम मध्ये रुपयाला टाका/टोका/तोका म्हणतात.

बंगाली भाषेत (টাকা) टाका.

आसामी भाषेत (টকা) तोका.

ओरिया भाषेत (ଟଙ୍କା) तनक.

आग्नेयेकडील राज्यांत रोमनलिपीतील अक्षर 'T' चा वापर करून रुपये दर्शविले जातात. नोटांवरही त्या भाषांतील मजकुरासाठी असेच छापतात. सध्या पाच रुपयांपासून १,००० रुपयांपर्यंतच्या नोटा चलनात आहेत. पूर्वी चलनात असलेल्या एक व दोन रुपयांच्या नोटा अजूनही ग्राह्य आहेत परंतु या किंमतींच्या नवीन नोटा छापल्या जात नाहीत.

अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६

अभिषेक ठमके
Chapters
संपादकांचे मनोगत अतिथी संपादकिय अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६ अणुक्रमणिका BookStruck ई-पुरस्कार २०१६ स्पर्धेचा निकाल आम्ही सोशल सोशल! - निमिष सोनार सेक्स एज्युकेशन - मंगेश सकपाळ शक संवत - डॉ. सुनील दादा पाटील मराठीतील एक सर्वोत्तम कादंबरी: पुन्हा नव्याने सुरूवात - मंगेश विठ्ठल कोळी (ज्येष्ठ समीक्षक) भारतीय रुपया - अनिल धुदाट (पाटील) अमेरिकेतील शिक्षण पद्धत - गौरी ठमके तत्त्वप्रकाश - प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य शिक्षणाचा जिझिया कर! - अक्षर प्रभू देसाई 'श्रेय'स - अभिषेक ठमके संभ्रम-ध्वनी - चैतन्य रासकर एक अनुभव - एक धडा : राज धुदाट (पाटील) नवरात्रोत्सव - नीलिमा भडसावळे ऐनापुरे आहुती - अशोक दादा पाटील गावाचे शिवार सरकार दरबारी...! - मयुर बागुल, अमळनेर चवंडकं - अशोक भिमराव रास्ते अशा दुर्दैवी जीवांना दया-मरण द्या - डॉ. भगवान नागापूरकर माहुली गड - श्रीकांत शंकर डांगे स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -वर्षा परब वाचा थोडं ऍडजस्ट करूनच - सागर बिसेन पूर्णेच्या परिसरांत ! - डॉ. भगवान नागापूरकर बाल मजूर... - अदिती जहागिरदार कविता - वैष्णवी पारसे पाऊस - किरण झेंडे कविता - सुरेश पुरोहित ओळख - प्रशांत वंजारे शंका..? - निलेश रजनी भास्कर कळसकर कविता - स्नेहदर्शन कविता - स्नेहदर्शन कविता - संतोष बोंगाळे कविता - संतोष बोंगाळे