Android app on Google Play

 

तत्त्वप्रकाश - प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य

 

जैन तत्त्वज्ञानाचा पाया रत्नत्रय आहे, रत्नत्रय म्हणजे सम्यक् दर्शन, सम्यक्[ज्ञान आणि सम्यक्[ चारित्र. सम्यक् दर्शन हा धर्माचा पाया आहे त्याअर्थी सम्यक् दर्शन म्हणजे काय ह्याची स्थूल कल्पना समजावून घेतली पाहिजे.

सम्यक्[दर्शन म्हणजे -

1.   शरीर आणि आत्मा ह्या भिन्न वस्तू आहेत अशी दृढ श्रद्धा.

2.   जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष अशी सात तत्वे आहेत. त्यावर समजपूर्वक श्रद्धा.

3.   खरे देव, खरे गुरु व खरे शास्त्र ह्यावर श्रद्धा. ह्याशिवाय अन्य वंद्य नाहीत अशी श्रद्धा.

वीतराग, सर्वज्ञ, हितोपदेशी असे अरिहंत भगवान आणि सिद्ध भगवान हे खरे देव.

अठ्ठावीस मूलगुणधारी निर्ग्रंथ मुनी हेच खरे गुरु, सिद्धांतशास्त्र म्हणजे जिनवाणी हेच खरे शास्त्र.

ह्याखेरीज रागद्वेषी देवदेवतांना भय, आशा, स्नेह, लोभ यांच्या आहारी जाऊन भजणे - पूजणे, त्यांची प्रशंसा करणे हे मिथ्यात्व होय, हे मिथ्यात्व चतुर्गतिभ्रमण व दुःखाचे मूळ कारण आहे. त्याउलट सम्यक्त्व हे मोक्षाचे मूळ कारण आहे म्हणून धर्माचरणाला सुरुवात करतांना प्रथम सम्यत्व धारण केले पाहिजे व मिथ्यात्वाचा त्याग केला पाहिजे. मिथ्यात्व त्याग करणा-या मुमुक्षु जीवाने कोणकोणत्या रागद्वेषी देवदेवतांना भजू-पुजू नये ह्याचा तपशील मोक्षमार्ग प्रकाशक ह्या ग्रंथात दिलेला आहे.

मिथ्या देवदेवतांना पुजण्यामुळे आपले दु:ख व संकटे नाहीशी होतात व ते आपणास सुख देऊ शकतात अशी ह्या जीवांची भ्रममूलक समजूत असते. पण ही समजूत खोटी आहे.

आपले सुखदु:ख आपल्याच पुण्य-पाप संचितावर अवलंबून असते. त्यांचा परिहार करावयाचा तर सुखदु:खात रागद्वेष न मानता पंचपरमेष्ठीचे ध्यान, भजन करून आपणाला देखील त्यांच्याप्रमाणेच शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून पुरुषार्थ करावयाचा असतो.

त्यांना काही मागण्यासाठी त्यांची भक्ती करायची नसते तर त्यांचा आदर्श आपल्या नजरेसमोर अखंड रहावा म्हणून करावयाची असते.

आपण सम्यक् दर्शनपूर्वक संयमाचा आधार घेतला तर आपणाला देखील, अरिहंत - सिद्धा प्रमाणे अनंत सुख, ज्ञान, दर्शन ह्यांची प्राप्ती होईल या प्रयत्नाला सुरुवात कोठून करावयाची हे शोधले पाहिजे.

मिथ्यात्व व रागद्वेष ह्यामुळे जीवात्मा कर्मबंधनात अडकतो, चतुर्गतिभ्रमणाचे दु:ख अनंत काळ भोगतो म्हणून प्रथम मिथ्यात्व सोडले पाहिजे, त्यानंतर रागद्वेषही मंद, मंदतर, मंदतम करीत नाहीसे करावयास पाहिजे कारण त्यामुळेच कर्मबंध होतो.

मन, वचन, शरीर ह्यांच्या हालचालीला योग म्हणतात. यांच्या प्रवृत्ती दोन प्रकारच्या असतात. एक शुभ व दुसरी अशुभ. शुभ प्रवृत्तीमुळे पुण्यबंध होतो तर अशुभ प्रवृत्तीमुळे पापबंध होतो. ह्या दोन्ही प्रवृत्तीमुळे कर्माचे बंधन घडते पण अशुभापेक्षा शुभ प्रवृत्ती एका अपेक्षेने बरी. ती अपेक्षा अशी की, पुण्यामुळे मोक्ष मार्गस्थ होण्यास अनुकूल अशी सामुग्री मिळते व त्याच्या आश्रयाने मोक्षमार्ग सुकर होतो. पण साक्षात मोक्षमार्गात ती अडगळ स्वरूपच होते म्हणूनच तिचाही त्याग करून हा आत्मा जेव्हा आपल्या आत्म्यात निर्विकल्पतेने म्हणजे शुद्धतेने तद्रूप होतो तेव्हा तो मुक्ती लाभ करून घेतो. आजपर्यंत जे भव्यात्मे मोक्षाला जाऊन शाश्वत सुखाचा लाभ घेत आहेत ते सगळे ह्या पद्धतीचा अवलंब करून गेले. आपणाला देखील ते शाश्वतसुख हवे आहे म्हणून प्रथम मन-वचन-कायेच्या माध्यमातून होणा-या अशुभ प्रवृत्ती थांबविल्या पाहिजेत.

मन-वचन-कायेच्या अशुभ प्रवृत्ती का घडून येतात याचा शोध घेतला म्हणजे त्यावरचा उपाय सापडेल.

शरीर-मन-वचन हे त्याला पोषण देणा-या व राग द्वेषाला कमी अधिक कारणीभूत असणा-या पदार्थावर अवलंबून रागद्वेषप्रवृत्ती करते हे आपण पाहतो.

जसे मद्य-मास-मधु खाणारा माणूस हा तामसी, उन्मत्त, तीव्र संतापी असा होतो. त्यामुळे त्याचे रागद्वेष तीव्र होतात. परिणामत: तीव्र कर्मबंध होतो, त्या पापाची फळे तीव्र दु:ख देतात व त्या दुःखाचे अनुभवन करतांना तो पुन्हा रागद्वेषरूप परिणमतो व पुन्हा तीव्र कर्मबंध करून घेतो. हे रहाटगाडगे संपायचे तरी कधी आणि कसे?

त्यावर एकच उपाय म्हणजे मिथ्यात्व सोडल्यावर हिंसा, असत्य, चौर्य, कुशील व परिग्रह ही पाच पापे सोडून राग द्वेषाची मंदता साधली पाहिजे. ह्या मंदतेच्या साधनेसाठी आपल्या स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा, रसनेंद्रिय म्हणजे जीभ, घ्राणेंद्रिय म्हणजे नाक, चक्षुरिंद्रिय म्हणजे डोळे आणि कर्णेद्रिय म्हणजे कान यांच्या स्वच्छंद प्रवृत्तीला लगाम घातला पाहिजे, बंधन घातले पाहिजे, त्यांच्या पोषणासाठी व शुभप्रवृत्तीसाठी कोणते खाद्यपेय त्यांना दयावे व कोणत्या खाद्यपेयापासून दूर ठेवावे हा विचार ओघानेच येतो. ही बंधने किंवा नियम म्हणजेच धर्मपालन किंवा संयमपालनाची सुरुवात समजावयाची आणि म्हणूनच त्यांना मूळगुण म्हणायचे.

ती आठ आहेत -

१) मद्य त्याग,

२) मास त्याग,

३) मधू त्याग (हे तीन मकार),

४) वड,

५) पिंपळ,

६) पाकर,

७) उंबर,

८) कटुंबर (अंजीर)

ह्यांना क्षिरीफळे असेही म्हणतात. पंच उदुंबर फळांचा त्याग.

तीन मकार व पंच उदुंबर फळांचा त्याग हा जैन कुलोत्पन्न प्रत्येक जीवाला प्रथम करावयाचा असतो.

मूल जन्माला येते व सव्वा महिन्यानंतर प्रथम मंदिरात नेले जाते तेव्हा त्याला हे अष्टमुलगुण धारण करवून जैनत्वाची पहिली दीक्षा दिली जाते. अर्थातच त्या जीवाला त्याची जाणीव असणे शक्य नसते म्हणून साधारण: आठ वर्षे वयाचा होईपर्यंत ते मूळगुण पालन करवण्याची जबाबदारी त्याच्या पालकावर असते. त्या पालकाने हे मूळगुण नीट पालन केले जात आहेत की नाही हे पहावयाचे असते. ह्यातील प्रमादाबद्दल पालक पापाचा धनी होतो म्हणून प्रत्येक जैन कुलोत्पन्न श्रावकाने आपल्या कर्तव्यात दक्ष असले पाहिजे.

शरीर, मन, वचन ह्यांच्या शुभ - अशुभ अशा प्रत्येक हालचालीचा ठसा आत्म्यावर उमटतो, त्याची जाणीव आपणास होवो अगर न होवो पण तसे झाल्याशिवाय राहत नाही. अजाणतेपणी का होईना जे कांही खानपान घडते त्याची प्रत्येक प्रतिक्रिया किंवा प्रतिबिंब आत्म्यावर उमटते व ते पुण्यपाप बंधाचे कारण ठरते म्हणून भाबडेपणाने त्याचे मूल्यमापन करण्यात कुचराई करणे हे त्या बालकावर अन्याय करण्यासारखे आहे. वयाला आठ वर्षे पूर्ण होई पर्यंत बालकाच्या अष्टमूळगुण धारणेत काही चूक तर होत नाही ना हे त्या पालकाने सावधपणे सांभाळले पाहिजे.

या प्रमाणे जैन तत्त्वज्ञांच्या आधारे धर्माचा पाया मिथ्यात्व त्यागानंतर दुस-या अनुक्रमाने येणा-या अष्टमूळगुणांच्या आवश्यकतेचे महत्व आपण पाहिले. ह्याच बरोबर सप्त व्यसन त्यागाचे महत्वही तेवढेच आहे.

 

अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६

अभिषेक ठमके
Chapters
संपादकांचे मनोगत
अतिथी संपादकिय
अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६
अणुक्रमणिका
BookStruck ई-पुरस्कार २०१६ स्पर्धेचा निकाल
आम्ही सोशल सोशल! - निमिष सोनार
सेक्स एज्युकेशन - मंगेश सकपाळ
शक संवत - डॉ. सुनील दादा पाटील
मराठीतील एक सर्वोत्तम कादंबरी: पुन्हा नव्याने सुरूवात - मंगेश विठ्ठल कोळी (ज्येष्ठ समीक्षक)
भारतीय रुपया - अनिल धुदाट (पाटील)
अमेरिकेतील शिक्षण पद्धत - गौरी ठमके
तत्त्वप्रकाश - प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य
शिक्षणाचा जिझिया कर! - अक्षर प्रभू देसाई
'श्रेय'स - अभिषेक ठमके
संभ्रम-ध्वनी - चैतन्य रासकर
एक अनुभव - एक धडा : राज धुदाट (पाटील)
नवरात्रोत्सव - नीलिमा भडसावळे ऐनापुरे
आहुती - अशोक दादा पाटील
गावाचे शिवार सरकार दरबारी...! - मयुर बागुल, अमळनेर
चवंडकं - अशोक भिमराव रास्ते
अशा दुर्दैवी जीवांना दया-मरण द्या - डॉ. भगवान नागापूरकर
माहुली गड - श्रीकांत शंकर डांगे
स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -वर्षा परब
वाचा थोडं ऍडजस्ट करूनच - सागर बिसेन
पूर्णेच्या परिसरांत ! - डॉ. भगवान नागापूरकर
बाल मजूर... - अदिती जहागिरदार
कविता - वैष्णवी पारसे
पाऊस - किरण झेंडे
कविता - सुरेश पुरोहित
ओळख - प्रशांत वंजारे
शंका..? - निलेश रजनी भास्कर कळसकर
कविता - स्नेहदर्शन
कविता - स्नेहदर्शन
कविता - संतोष बोंगाळे
कविता - संतोष बोंगाळे