Get it on Google Play
Download on the App Store

कामदेव

पौराणिक कथांनुसार कामदेवाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा पुत्र मानले जाते. त्याचा विवाह प्रेम आणि आकर्षणाची देवी समजली जाणाऱ्या रतीशी झाला आहे. काही कथांमध्ये असा देखील उल्लेख आहे की कामदेव स्वतः ब्रम्हदेवाचा पुत्र आहे आणि त्याचा संबंध भगवान शंकराशी देखील आहे. तो पोपटाच्या रथावर मकर (मासा) चिन्हाने अंकित असलेला लाल ध्वज लावून विहार करतो.
पौराणिक कथेनुसार एकदा ब्रम्हदेव प्रजा वृद्धीच्या कामनेने ध्यानमग्न होते. त्याच वेळी त्यांच्या अंशातून एक तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला आणि म्हणाला की मला काय आज्ञा आहे? तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले की मी सृष्टी उत्पन्न करण्यासाठी प्रजापतींना उत्पन्न केले होते परंतु ते सृष्टीच्या रचनेसाठी समर्थ नाहीत त्यासाठी मी तुला या कार्याची आज्ञा देतो. हे ऐकून कामदेव तिथून निरोप घेऊन अदृश्य झाला.
हे पाहून ब्रम्हदेव क्रोधीत झाले आणि त्यांनी शाप दिला की तू माझे वचन ऐकले नाहीस त्यामुळे लवकरच तुझा नाश होईल. शाप ऐकून कामदेव घाबरून गेला आणि हात जोडून ब्रम्हदेवाची क्षमा मागू लागला. कामदेवाचा विनय आणि अनुनायाने ब्रम्हदेव प्रसन्न झाले. त्यांनी सांगितले की मी तुला राहायला १२ स्थाने देतो - स्त्रियांचा कटाक्ष, केश संभार, जांघ, वक्ष, नाभि, जंघमूल, ओठ, कोकिळेची कुहूकुहू, चांदणी, वर्षा ऋतू, चैत्र आणि वैशाख महीना. असे बोलून ब्रम्हदेवाने कामदेवाला फुलांचा धनुष्य आणि ५ बाण देऊन त्याची पाठवणी केली.
ब्रम्हदेवाकडून मिळालेल्या वरदानाच्या सहाय्याने कामदेव तिन्ही लोकांत भ्रमण करू लागला आणि भूत, पिशाच्च, गंधर्व, यक्ष सर्वाना त्याने वश केले. मग माशाचा ध्वज लावून कामदेव आपली पत्नी रतीसोबत सृष्टीतील सर्व प्राण्यांना वश करू लागला. याच क्रमाने तो शंकराकडे पोचला. भगवान शंकर तेव्हा तपश्चर्येत लीन होते. तेव्हाच कामदेव एका छोट्या जंतूचे रूप घेऊन कानामार्गे भगवान शिवाच्या शरीरात प्रविष्ट झाला. त्यामुळे भगवान शंकराचे चित्त विचलित झाले.
त्यांनी एकाग्रतेने पहिले की कामदेव त्यांच्या शरीरात स्थित आहे. इतक्यात इच्छा शरीर धारण करणारा कामदेव भगवान शंकराच्या शरीरातून बाहेर आला आणि एका आंब्याच्या वृक्षाखाली जाऊन उभा राहिला. मग त्याने शंकरावर मोहन नावाचा बाण सोडला, जो शंकराच्या हृदयावर जाऊन लागला. त्यामुळे क्रोधीत होऊन शंकराने आपल्या तिसऱ्या नेत्राच्या ज्वालेने त्याला भस्म करून टाकले.
कामदेवाला जळताना पाहून त्याची पत्नी रती रडू लागली. तेवढ्यात आकाशवाणी झाली ज्यात रतीला दुःख करू नकोस आणि भगवान शंकराची आराधना कर असे सांगण्यात आले. मग रतीने पूर्ण श्रद्धेने भगवान शंकराची आराधना केली. रतीच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन शंकर म्हणाले की कामदेवाने माझे चित्त विचलित केले होते म्हणून मी त्याला भस्म केले. आता जर त्याने अशरीरी रुपात महाकाल वनात जाऊन शिवलिंगाची आराधना केली तर त्याचा उद्धार होईल.
तेव्हा कामदेव महाकाल वनात आला आणि त्याने पूर्ण भक्तिभावाने शिवलिंगाची उपासना केली. उपासनेचे फळ म्हणून शंकराने प्रसन्न होऊन सांगितले की तू अशरीरी राहून देखील समर्थ राहशील. कृष्णावताराच्या वेळी तू रुक्मिणीच्या गर्भातून जन्म घेशील आणि तुझे नाव प्रद्युम्न असेल.