Android app on Google Play

 

त्रिपुरासुर

असुर बालीची कृपा प्राप्त त्रिपुरासुर भयंकर असुर होता. महाभारताच्या कर्ण पर्वात त्रिपुरासुराच्या वधाची कथा विस्तृत स्वरुपात मिळते. भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध केल्यानंतर तारकासुराच्या तीन पुत्रांनी देवतांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली. तीनही पुत्र तप करण्यासाठी जंगलात निघून गेले आणि हजारो वर्ष अत्यंत कठीण तप करून ब्रम्हदेवाला प्रसन्न केले. तिघांनी ब्रम्हदेवाकडून अमर होण्याचे वरदान मागितले. ब्रम्हदेवाने त्यांना नकार दिला आणि सांगितले की एखादी अशी अट ठेवा जी अत्यंत कठीण असेल आणि ती अट पूर्ण झाल्यावरच तुमचा मृत्यू होईल. तिघांनी खूप विचार करून ब्रम्हदेवाकडे वरदान मागितले - प्रभू! तुम्ही आमच्यासाठी तीन पुरींची (नगरांची) निर्मिती करा आणि तीनही पुरी जेव्हा अभिजित नक्षत्रात एका ओळीत येतील आणि एखादा क्रोधजीत जेव्हा अत्यंत शांत अवस्थेत असंभव रथ आणि असंभव बाण यांचा सहारा घेऊन आम्हाला मारेल, तेव्हाच आमचा मृत्यू होऊदेत. ब्रम्हदेव म्हणाला - तथास्तु.
अटीनुसार त्यांना तीन पुरी (नगरे) प्रदान करण्यात आली. तारकाक्ष साठी सुवर्णपुरी, कमलाक्ष साठी रजतपुरी आणि विद्युन्मालीसाठी लोहपुरी यांची निर्मिती विश्वकर्माने केली. या तीन असुरांनाच त्रिपुरासुर म्हणत असत. या तीन भावांनी या तीन नगरांत राहून सातही लोकांत दहशत पसरवली. ते जिथेही जात, तिथे सर्व सत्पुरुषांना सतावत असत. एवढेच नव्हे तर त्यांनी देवतांना देखील देवलोकातून बाहेर केले.
सर्व देवतांनी मिळून आपले सर्व बळ पणाला लावले, परंतु ते त्रिपुरासुराचा प्रतिकार करू शकले नाहीत आणि सर्व देवतांना त्या तिघांपासून लपून बसावे लागले. शेवटी सर्वांना शंकराला शरण जावे लागले. भगवान शंकराने विचारले - तुम्ही सर्व मिळून प्रयत्न का करत नाही? देवतांनी सांगितले - आम्ही हे केले आहे. तेव्हा शंकर म्हणाला - मी माझे अर्धे बळ तुम्हाला देतो आणि मग तुम्ही प्रयत्न करून पहा, परंतु संपूर्ण देवता मिळून देखील सदाशिवाचे ते अर्धे बळ पेलू शकत नव्हते. तेव्हा शंकराने स्वतः त्रिपुरासुराला मारण्याचा संकल्प केला.
सर्व देवतांनी आपापले अर्धे अर्धे बळ शंकराला समर्पित केले. आता त्याच्यासाठी रथ आणि धनुष्य बाणाची तयारी होऊ लागली ज्यापासून रणांगणावर त्रिपुरासुराचा वध करता येईल. या असंभव रथाचे वर्णन पुराणांमध्ये विस्ताराने दिलेले आहे. भगवंतांनी पृथ्वीलाच रथ बनवले, सूर्य आणि चंद्र चाके झाले, सृष्टा सारथी बनले, विष्णू बाण, मेरू पर्वत धनुष्य आणि वासुकी बनला त्या धनुष्याची दोरी. अशा प्रकारे एक असंभव रथ आणि धनुष्य तयार झाले आणि संहाराची लीला रचण्यात आली. ज्या वेळी भगवंत त्या रथावर विराजमान झाले, तेव्हा सर्व देवतांनी सांभाळलेला तो रथ देखील डगमगू लागला. तेव्हा विष्णू भगवान वृषभ बनून त्या रथाला जाऊन जुंपले. भगवान शंकराने ते घोडे आणि वृषभ यांच्या पाठीवर स्वार होऊन त्या असुर नगरला पहिले आणि पाशुपत अस्त्राचे संधान करून तिन्ही पुरांना एकत्र येण्याचा संकल्प करू लागले.
त्या अमोघ बाणात विष्णू, वायू, अग्नी आणि यम चौघेही समाविष्ट होते. अभिजित नक्षत्रात ती तीन नगरे एकत्र होताच भगवान शंकराने आपल्या बाणाने पुरींना जाळून भस्म करून टाकले आणि तेव्हापासून भगवान शंकर त्रिपुरांतक बनले. त्रिपुरासुराला जाळून भस्म केल्यानंतर भोळ्या रुद्राचे हृदय द्रवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अश्रू जिथे पडले, तिथून रुद्राक्षाचे झाड उगवले. 'रुद्र' म्हणजे शिव आणि 'अक्ष' म्हणजे डोळे किंवा आत्मा आहे.