Get it on Google Play
Download on the App Store

रावण

एक दिवस कुबेर आपल्या माता पित्यासह विश्वेश्रवाना भेटायला आश्रमात आला तेव्हा कैकासीने कुबेराचे वैभव पाहून आपले पुत्र रावण, कुंभकर्ण आणि बिभीषणाला सांगितले की तुम्ही देखील आपल्या भावाप्रमाणे वैभवशाली बनले पाहिजे. त्यासाठी तुम्ही ब्रम्हदेवाची तपश्चर्या करा. मातेची आज्ञा मानून तीनही पुत्र ब्रम्हाची तपश्चर्या करण्यासाठी निघाले.
बिभीषण पहिल्यापासूनच धर्मात्मा होता. त्याने ५ हजार वर्ष एका पायावर उभे राहून घोर तपश्चर्या करून देवतांकडून आशीर्वाद प्राप्त केला. त्यानंतर ५ हजार वर्ष आपले मस्तक आणि एक हात वर करून तप केले ज्यामुळे ब्रम्हदेव प्रसन्न झाले. बिभीषणाने भगवंताकडून असीम भक्तीचा वर मागितला. बिभीषण श्रीरामाचा भक्त बनला आणि आजही तो अजरामर आहे.
कुंभकर्णाने इंद्र्पदाच्या अभिलाषेने आपल्या इंद्रियांना काबूत ठेवून १० हजार वर्षांपर्यंत कठोर तप केले. त्याच्या कठोर तपाने भयभीत होऊन इंद्रादी देवतांनी देवी सरस्वतीला प्रार्थना केली की कुंभकर्ण वर मागताना तुम्ही त्याच्या जिभेवर विराजमान होऊन देवतांची साथ द्या. तेव्हा वर मागताना देवी सरस्वती कुंभकर्णाच्या जिभेवर विराजमान झाली आणि त्याने इंद्रासन ऐवजी निद्रासन मागितले.
इकडे रावणाने आपल्या भावांपेक्षा सर्वाधिक कठोर तप केले. ऋषि विश्वेश्रवा यांनी रावणाला धर्म आणि पांडित्य यांचे शिक्षण दिले. तो प्रत्येक ११ व्या वर्षी आपले एक मस्तक भगवंताच्या चरणी अर्पण करत असे. अशा प्रकारे १० हजार वर्षांत त्याने आपली दहा मस्तके भगवंताला समर्पित केली. त्याच्या तपाने प्रसन्न होऊन भगवंताने त्याला वर मागण्यास सांगितले.
तेव्हा रावण म्हणाला की देव, दानव, दैत्य, राक्षस, गंधर्व, किन्नर, यक्ष इत्यादी सर्व दिव्य शक्तींना त्याचा वध करता येऊ नये. रावण मनुष्य आणि जनावरांना अगदी किडे - मुंग्यांसारखे तुच्छ समजत असे म्हणूनच वरदानात त्याने त्यांना वगळले. हेच कारण होते की भगवान विष्णूंना त्याचा वध करण्यासाठी मनुष्य अवतारात यावे लागले. रावणाने आपल्या शक्तीच्या बळावर शनी आणि यमराज यांना देखील हरवले होते.