परमज्ञानी अष्टवक्र
प्राचीन काळी कहोड नावाचा एक ब्राम्हण होता. त्याच्या पत्नीचे नाव सुजाता होते. कालांतराने सुजाता गर्भवती झाली. एकदा कहोड वेद पठण करत होता तेव्हा सुजाताच्या गर्भातून बाळाचा आवाज आला, पिताश्री, तुम्ही रात्रभर वेदपाठ करता परंतु ते नीट होत नाहीत. यावर ब्राम्हण खूप रागावला आणि पोटातल्या बाळाला म्हणाला की तू गर्भात असतानाच असे वेडेवाकडे बोलतोस, तुझे शरीर ८ ठिकाणी वाकडे होईल. या घटनेला काही दिवस लोटले. कहोड ब्राम्हण राजा जनक याच्याकडे धनाच्या इच्छेने गेला. तिथे बंदी नावाच्या विद्वानासोबत तो शास्त्रार्थामध्ये पराभूत झाला. नियमाप्रमाणे त्याला पाण्यात बुडवून टाकण्यात आले. काही दिवसांनी ब्राम्हणाच्या बालकाचा, अष्टवक्राचा जन्म झाला. परंतु त्याच्या आईने त्याला काहीही सांगितले नाही. जेव्हा अष्टवक्र १२ वर्षांचा झाला, तेव्हा एक दिवस त्याने आपल्या आईला आपल्या वडिलांबद्दल विचारले. तेव्हा आईने त्याला सर्व गोष्ट खरी खरी सांगितली. अष्टवक्र देखील राजा जनकाच्या दरबारात शास्त्रार्थ करण्यासाठी गेला. तिथे अष्टवक्र आणि बंदी यांच्यात शास्त्रार्थ झाला, ज्यामध्ये अष्टवक्र ने बंदीला पराभूत केले. अष्टवक्र ने राजाला सांगितले की नियमानुसार बंदीला देखील पाण्यात बुडवून टाकले पाहिजे. यावर बंदी म्हणाल की तो जलाचे स्वामी वरुणदेव यांचा पुत्र आहे. त्याने जेवढ्या विद्वानांना शास्त्रार्थात हरवून पाण्यात बुडवले आहे ते सर्व वरूण लोकात आहेत. त्याचवेळी पाण्यात बुडालेले सर्व विद्वान बाहेर आले. त्यामध्ये अष्टवक्र चे वडील कहोड हे देखील पाण्यातून बाहेर आले. आपल्या पुत्राच्या विषयी समजल्यानंतर कहोड खूप प्रसन्न झाले आणि त्यांच्या आशीर्वादाने अष्टवक्र चे शरीर सरळ झाले.