श्री करभेश्वर महादेव
अनेक वर्षांपूर्वी अयोध्येत वीरकेतू नावाचा राजा होता. एकदा तो वनात शिकार करण्यासाठी गेला. तिथे त्याने अनेक जंगली प्राण्यांची शिकार केली. मग त्याला कोणतेही प्राणी दिसले नाहीत. आणि अचानक त्याला एक उंट (करभ) दिसला आणि त्याने उंटाला बाण मारला. बाण लागल्यावर तो उंट तिथून पळून गेला. राजा त्याच्या मागून धावला. काही वेळानंतर तो उंट गायब झाला. राजा भटकत ऋषींच्या आश्रमात पोचला. ऋषींनी राजाला सांगितले कि खूप वर्षांपूर्वी धर्मध्वज नावाचा एक राजा होता. एकदा तो शिकार करायला जंगलात गेलेला असताना त्याने हरिणाचे कातडे नेसलेल्या ब्राम्हणाची खिल्ली उडवली. त्यावर ब्राम्हणाने राजाला शाप दिला कि तो करभ योनीत जाईल. राजाने दुःखी होऊन ब्राम्हणाची क्षमा मागितली आणि विनंती केली तेव्हा ब्राम्हणाने सांगितले कि अयोध्येचा राजा वीरकेतू याच्या बाणाने जखमी होऊन तू महाकाल वनातील शिवलिंगाचे दर्शन घे, त्यामुळे तुला उंट योनीतून मुक्ती मिळेल आणि तू शिवलोकात जाशील. तेव्हा राजा तो उंट महाकाल वनात गेला आहे, तेव्हा तू देखील तिथेच जा. त्या शिवलिंगाचे दर्शन घेतलेस तर तू चक्रवर्ती सम्राट होशील. राजा त्वरेने महाकाल वनात गेला. तिथे त्याने धर्मराजाला एका विमानातून शिवलोकाकडे जाताना पहिले. मग शिवलिंगाची पूजा करून राजा चक्रवर्ती सम्राट बनला. उंटाला मुक्ती मिळाल्याने हे शिवलिंग करभेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले. असे मानले जाते कि जो कोणी मनुष्य या शिवलिंगाचे दर्शन करतो तो धनवान होतो, त्याला कोणतीही व्याधी होत नाही. जर त्याचे कोणी पूर्वज पुश योनीत असतील तर त्यांना मुक्ती मिळते. शेवटी मनुष्य शिवालोकाला प्राप्त होतो. हे मंदिर भैरवगड इथे काळ भैरव मंदिराच्या समोर आहे.