श्री पुष्पदन्तेश्वर महादेव
खूप काळापूर्वी तिमी नावाचा एक ब्राम्हण होता. त्याला कोणी पुत्र नव्हते. त्याने अनेक प्रकारांनी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाल्यावर त्याने आणखी कठोर तपश्चर्येला प्रारंभ केला. अशा प्रकारे १२ वर्ष गुजरली. एक दिवस माता पार्वतीने भगवान शंकरांना सांगितले कि हा तिमी नावाचा ब्राम्हण अनेक वर्ष आपली तपश्चर्या करत आहे. त्याच्या तेजाने पर्वत प्रकाशमान झाला आहे. समुद्र सुकत आहे. आपण त्याची मनोकामना पूर्ण करावी. पार्वतीच्या बोलण्याला मान देऊन शंकराने आपल्या गणांना बोलावले आणि सांगितले कि तुमच्यापैकी कोणी तरी या ब्राम्हणाच्या घरी पुत्र म्हणून जन्म घ्यावा. यावर शिवाचा एक गण पुष्पदंत याने म्हटले कि प्रभू कुठे आम्ही पृथ्वीवर दुःख भोगायला जाऊ? आम्ही इथे तुमच्या जवळच चांगले आहोत. शंकराने क्रोधाने सांगितले कि तू माझी आज्ञा पाळली नाहीस, आता तूच पृथ्वीवर जायचे.
शंकराच्या शापामुळे पुष्पदंत पृथ्वीवर पडला. शंकराने दुसरा एक गण वीरक याला सांगितले कि तू ब्राम्हणाच्या घरात जन्म घे. मी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेन. पुत्र झाल्यामुळे ब्राम्हण प्रसन्न झाला. दुसरीकडे पुष्पदंत दुःख करत होता कि आपण शंकराची आज्ञा का पाळली नाही. तेव्हा पार्वतीने त्याला सांगितले कि पुष्पदंता तू महाकाल वनात उत्तरेला महादेव आहेत त्यांचे पूजन कर. शंकराने देखील पुष्पदंताला शिवलिंगाची उपासना करण्याची आज्ञा दिली. पुष्पदंत महाकाल वनात गेला. तिथे शिवलिंगाचे दर्शन घेऊन पूजा केली. त्याच्या पूजेने शंकर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आपल्या मांडीवर बसवले. उच्च स्थान प्रदान केले.
पुष्पदंताने पूजन केल्यामुळे हे शिवलिंग पुष्पदंतेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले.
असे मानले जाते कि जो कोणी मनुष्य पुष्पदंतेश्वर महादेवाचे दर्शन करेल त्याच्या सात कुळांचा उद्धार होईल. अंती तो शिवलोकाला जाईल. हे मंदिर तेलीच्या धर्मशाळेजवळ एका गल्लीत आहे.