Get it on Google Play
Download on the App Store

आम्ही हिंदू

आम्ही हिंदू, आम्ही हिंदू

विस्कटलेले अनेक बिंदू

कोणाकोणाला आम्ही वंदू

पोकळ सलोख्यातच नांदू


भव्य दिव्य कल्पक कथा

पुराणातील दाहक व्यथा

स्वयंघोषित परमपूज्य आस्था

शांतपणे कुठे टेकवू माथा


भेदरलेल्या संस्कृतीच्या वाटा

माणूसपणाला निव्वळ फाटा

भरकटलेल्या उत्सवांच्या लाटा

तुंबलेल्या दानपेटीतल्या नोटा


गर्जा जयजयकार तयांचा

गांव तेथे सम्राट ह्यांचा

अवडंबर मात्र धनिकांचा

विकलेल्या बाजारू धर्माचा


एकीचे नेकीचे दिव्य समीकरण

एकटेपणाचे वास्तव भीषण

बरबटलेल्या जातींचे ग्रहण

जावे कुठे कुठे शरण


अराजकतेच्या अखंड पसारा

अस्तित्वाच्या शोधात निवारा

निर्मिकाला चकचकीत गाभारा

दीनदुबळ्यांचा आशाळभूत सहारा


--- भूषण वर्धेकर

9-2-13

दौंड