विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17
६४. स्त्री व दास यांच्यानंतर वतनवाडीच्या परिग्रहाचा प्रश्न येतो. सगळ्या बायकांना स्वतंत्रता मिळाली, काळ्या-गोर्यांमध्यें भेद न रहातां सर्व मनुष्य समान हक्काचे झाले, पण जमीन व उत्पादनाचीं इतर साधनें खासगी मालकीचीं राहिलीं, तर बायकांची आणि दासदासींची स्वतंत्रता अल्पकाळहि टिकावयाची नाहीं. जमीनीवर मेहनत करून पोट भरणार्या सर्व कुळांचें जीवित जमीनदाराच्या हातांत रहाणार, व गिरणींत काम करणार्या मजुरांचें जीवन गिरणीच्या मालकाच्या हातांत रहाणार, हें उघडच आहे. असें न व्हावें, यासाठीं बोल्शेव्हिकांच्या म्हणण्याप्रमाणें जमीन, गीरण्या व त्यांना उपयोगी पडणारीं- ब्यांका, आगगाड्या वगैरे - सर्व सांधनें सामाजिक मालकीचीं केलीं पाहिजेत.
६५. बौद्धांचा व जैनांचा उपाय या बाबतींतहि निरुपयोगी ठरला आहे. पुष्कळ माणसांनी वतनवाडी सोडून संन्यास घेतला, तर त्यापासून सर्व समाजाचें व कालांतरानें अशा संन्यासी संघांचेंहि नुकसानच होतें. जमिनीची लागवड करणारे कोणी तरी पाहिजेतच. सर्व स्त्रीपुरुषांनी जमिनी सोडून संन्यास घेतला, तर लवकरच सर्वांवर उपाशी मरण्याची पाळी येईल. पोटापाण्याची तरतूद करण्यासाठीं या संन्यासी संघांना राजे लोकांकडून इनामें घ्यावीं लागलीं, व त्यायोगें त्यांचा अधःपात कसा झाला, हें दुसर्या आणि तिसर्या विभागांत विस्तारपूर्वक दाखविलेंच आहे. अर्थात् वतनवाडीचा त्याग केल्यानें हा अपरिग्रह सिद्धीला जाणें शक्य नाहीं. जर सर्वांनाच जगावयाचें असेल, तर सर्वांनीच मेहनत केली पाहिजे. राजानें आणि अमीरउमरावांनी भयंकर ऐषआरामांत व श्रमणब्राम्हणांनी ऐदीपणांत दिवस काढल्यानें श्रमजीवी समाजावर अतिशय ताण पडून त्याचा चुराडा होतो, व त्याचे दुष्परिणाम सर्वांना सारखेच भोगावे लागतात. तेव्हां वतनवाडीच्या परिग्रहाचा त्याग करावयाचा म्हणजे हा परिग्रह सामाजिक मालकीचा करावयाचा, हा जो समाजवाद्यांचा सिद्धान्त तोच मानवजातीच्या उन्नतीला हितकारक आहे.