विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6
२६. पोर्तुगाल व स्पेन या देशांतील लोक पोपच्या नादीं लागले आणि धर्मवेडे बनले; व त्यामुळें पूर्वेकडील व पश्चिमेकडील देशांतील आपलें वर्चस्व गमावून बसले. हालंड देश लहान असल्यामुळें इंग्लंडशीं स्पर्धा करतां येणें त्याला शक्य नव्हतें. फ्रान्सांत राजसत्ता बोकाळत गेली; व तिला कह्यांत आणण्यासाठीं मध्यमवर्गाला मोठीच क्रान्ति करावी लागली. एवंच युरोपांतील सर्व देश मागें पडून एक इंग्लंड देश तेवढा पुढें आला.
२७. पाश्चात्य संस्कृतीशीं आमचा संबंध इंग्रजांच्या द्वारें घडून आला, ह्यांत भवितव्यतेचा भाग फार कमी आहे. इंग्रजांनी जेव्हां हिंदुस्थानांत जिकडे तिकडे आपल्या वखारी उभारल्या, जेव्हां त्यांना उत्तरोत्तर पार्लमेंटाचें पाठबळ मिळत गेलें, आपल्या व्यापाराच्या संरक्षणासाठीं जेव्हां त्यांनी नाक्याचीं ठाणीं काबीज करून आपलें आरमार बळकट केलें, तेव्हांच एतद्देशीय राजेरजवाड्यांचा इतिहास माहित असलेल्या कोणी कार्ल मार्क्ससारख्या इतिहासज्ञानें भाकित केलें असतें कीं, शेंसव्वाशें वर्षाच्या आंत या सर्व राजेरजवाड्यांना जिंकून इंग्रज त्यांचे मालक होऊन बसतील!
२८. त्या वेळीं तसा कोणी इतिहासकार नव्हता. पण कार्ल मार्क्सनें व्यापारी क्रान्तीच्या पुढें सरदारी राजसत्ता टिकाव धरून राहूं शकत नाहीं, हें पूर्णपणें सिद्ध करून दाखविलें आहे. सरदारी सत्तेचा नाश मध्यमवर्गाकडून होणें, ही एक इतिहासांतली अपरिहार्य गोष्ट आहे. मध्यमवर्ग जेव्हां व्यापाराच्या साधनांवर आपला ताबा मिळवतो, तेव्हां तो सरदारांवर आपलें स्वामित्व स्थापन करण्यास समर्थ होतो. याचें उत्कृष्ट उदाहरण आमच्याच इतिहासांत सांपडतें. इंग्रज लोक सहा सात हजार मैलांवरून केवळ व्यापारासाठीं इकडे येतात, व कधीं या राजाचा तर कधीं त्या राजाचा पक्ष धरून आपणच मालक होऊन बसतात. आमचे राजे लोक ऐषआरामांत लोळत पडलेले! त्यांना स्वत:ची घमेंड म्हणजे कांहीं विचारूं नका. यत्किंचित् कारणासाठीं शेजार्यांशीं लढण्याला ते तयार असावयाचे! त्यांच्या सैन्याला वेळेवर पगार क्वचितच मिळावयाचा. याच्या उलट इंग्रजांचें धोरण. त्यांना लढाई नको, पण व्यापार पाहिजे. लढाई करावयाचीच तर ती व्यापार संभाळण्यासाठीं. त्यांना अभिमान तर मुळींच नव्हता. मोंगलांच्या दरबारांत काय, कीं पेशव्यांच्या दरबारांत काय, त्यांची जी टवाळी व्हायची ती कांहीं पुसूं नका. टवाळी, अपमान, एवढेंच नव्हे तर चाबकाचा मार देखील त्यांनी आपला व्यापार वाढवण्यासाठीं सहन केला आहे!१ व्यापारामुळें पैसा हातीं घोळत असल्यानें त्यांच्या सैन्याचा पगार कधींच तुंबून राहिला नाहीं; आणि सैन्यांतहि व्यापारांतल्याप्रमाणेंच उत्तम शिस्त असल्याकारणानें आमच्या राजांचा पराभव करणें त्यांना मुळींच कठिण गेलें नाहीं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ ‘Englishmen were flouted, robbed, arrested, even whipped in the streets.’ [mediaeval India p. 306].