विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41
फाहियनचा काळ
१८९. फाहियन् हा चिनी प्रवाशी दुसर्या चंद्रगुप्ताच्या वेळीं हिंदुस्थानांत आला. मथुरेच्या आसपासच्या प्रदेशाचें वर्णन करीत असतां तो म्हणतो, “ ह्या प्रदेशाला मथुरा म्हणतात. पुन्हा आम्ही यमुनेच्या कांठा-कांठानें चाललों. ह्या नदीच्या दोन्ही बाजूला वीस संघाराम आहेत, व त्यांत तीनेक हजार भिक्षु रहातात. बुद्धधर्माचा विकास व उत्कर्ष होत आहे.... ह्या देशांतील राजे बुद्धधर्मावर दृढ विश्वास ठेवणारे आहेत. ते भिक्षूंना दान देत असतांना आपल्या पगड्या काढून बाजूला ठेवतात. राजाच्या कुटुंबांतील मंडळी व सर्व मुख्य प्रधान स्वत:च्या हातांनी भिक्षूंना दान देतात. भिक्षूंचें जेवण संपल्यावर एका बाजूला सतरंजी पसरून ते तिच्यावर बसतात. भिक्षूंसमोर ते कधींहि उच्चासनावर बसूं शकत नाहींत. बुद्धाच्या वेळेपासून आजपर्यंत हे दानविधीचे नियम चालू आहेत...
१९०. “ह्या सर्व देशांत चांडाळांशिवाय दुसरे लोक प्राणिहिंसा करीत नाहींत व दारू पीत नाहींत; कांदा आणि लसूण कात नाहींत. चांडाळांना पापी म्हणतात, व ते गांवांबाहेर रहातात. जेव्हां ते शहरांत किंवा बाजारांत येतात, तेव्हां लोकांना सूचना देण्यासाठीं लाकडाचा ठोकळा लाकडी दांड्यानें वाजवजात. त्यामुळें इतर लोक त्यांना ओळखतात, व त्यांच्या स्पर्शापासून दूर रहातात. या देशांतील लोक डुकरें व कोंबडीं पाळीत नाहींत; आणि गुरें विकण्याचा धंदा करीत नाहींत. ते बाजारांत कसाईखाने व दारूचे गुत्ते ठेवीत नाहींत. विक्री-खरेदी-मध्यें ते कवड्या वापरतात. चांडाळ तेवढें शिकार करतात व मांस विकतात.
१९१. “तहत बुद्धाच्या परिनिर्वाणापासून या देशांत राजे लोकांनी व श्रीमंत लोकांनी भिक्षूंसाठीं विहार बांधून दिले आहेत; आणि माणसें व गाईबैल यांच्यासह जमिनी, घरें व बागबगीचे इनाम देऊन त्यांची तरतूद केली आहे. कोरीव लेख परंपरेनें चालू ठेवण्यांत आले आहेत. आजपर्यंत त्या लेखांचा भंग झाला नाहीं. कां कीं, कोणीहि ते लेख माघारे घेण्यास समर्थ नाहीं. जे भिक्षु विहारांत रहातात, त्यांच्यासाठीं बिछाने, सतरंज्या, अन्न, पान व वस्त्र हे सर्व पदार्थ काटकसर न करतां देण्यांत येतात. सर्व ठिकाणीं हा प्रकार चालू आहे. भिक्षु आपल्या शीलाचे नियम पाळण्यांत, स्वाध्याय करण्यांत, किंवा ध्यानसमाधींत दक्ष असतात.”१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ Buddhist Rocords, Introduction , pp. xxxvii – xxxviii.

१९२. याप्रमाणें भिक्षूंचा योगक्षेम उत्तम रीतीनें चालला होता. विहारांना शेतें, घरें, बगीचे, माणसें, गाईबैल इत्यादिक इनामाच्या रुपानें मिळत असतां तक्रार करण्यास जागा कोणती होती? पण ह्याच वेळीं इतर संप्रदायांचेंहि प्रस्थ कसें माजत चाललें होतें तें पहा. फाहियन् म्हणतो, “मध्य हिंदुस्थानांत २ शाण्णव मिथ्या दृष्टि संप्रदाय आहेत. ते आत्म्याची नित्यता मानतात. प्रत्येक संप्रदायाच्या शिष्यपरंपरा आहेत. ते भिक्षा मागतात; पण भिक्षापात्र ठेवीत नाहींत. वस्ती नसलेल्या ठिकाणीं ते देखील पांथस्थांच्या सोईसाठीं धर्मशाळा बांधतात; व त्यांमधून पांथस्थांच्या विश्रांतीची, निजण्याची, खाण्यापिण्याची वगैरे व्यवस्था करण्यांत येते. प्रवासांत बौद्ध लोकांचीहि या धर्मशाळांतून सोय होते; त्यांच्या आवडीप्रमाणें रहाण्याची निराळी व्यवस्था करण्यांत येते.”३

२ सरासरी विंध्य, हिमालय, बंगाल व पंजाब यांच्या मधला प्रदेश.
३ Buddhist Rocord, p. X|viii

१९३. हे शाण्णव संप्रदाय कोणते, तें फाहियननें कोठें सांगितलें नाहीं. त्यालाहि त्यांची माहिती क्वचितच असेल, व केवळ लोकांच्या सांगण्यावरून ही संख्या त्यानें दिली असेल. तथापि इतिहासाच्या इतर साधनांवरून असें दिसून येतें कीं, त्या काळीं पाशुपतांचा पंथ सारखा बळावत चालला होता. ते निरनिराळ्या ठिकाणीं धर्मशाळा वगैरे बांधून लोकांची व्यवस्था लावीत होते असें दिसतें. जैन श्रमण अस्तित्वांत होतेच. परंतु ते धर्मशाळा बांधून लोकांना वळवीत असण्याचा संभव नाहीं. कां की, तें त्यांच्या नियमाविरुद्ध आहे. बौद्धांच्या विहारांत बौद्ध भिक्षूंची तेवढी व्यवस्था होत असे. परंतु पाशुपतांसारखे दुसर्या संप्रदायांचे बैरागी लोक सामान्य लोकांचीहि व्यवस्था लावीत होते असें दिसतें; व त्यामुळेंच ते बौद्ध भिक्षूंपेक्षांहि सामान्य जनतेला प्रिय झाले असावेत.