विभाग पहिला - वैदिक संस्कृति 4
आर्यांचें स्थळ व काळ
१२. या केशी लोकांशीं आर्यांचा निकट संबंध असला पाहिजे. कां कीं, आर्य देखील घोड्यावर बसण्यांत पटाईत होते. तेव्हां आर्यांचें स्थळ एलाममध्यें, व आर्यांचा उदयकाळ इ० स० पूर्वीं दोन हजार पासून सतराशें वर्षांपर्यंतचा धरावा लागतो. केशींच्या व आर्यांच्या भाषेमध्यें बरेंच साम्य होतें अशी एक कल्पना प्रचलित आहे. परन्तु केशी बाबिलोनियन लोकांमध्यें पूर्णपणें मिसळून गेल्यामुळें त्यांच्या कांहीं राजांच्या नांवांशिवाय त्यांची भाषा कशा प्रकारची होती हें समजण्याचा मार्ग राहिला नाहीं.
१३. ऋग्वेदांत अनेक ठिकाणीं इंद्राच्या घोड्यांना केशी हें विशेषण लावण्यांत आलें आहे. त्याचा अर्थ सायणाचार्यांनी आयाळ असलेले असा केला आहे. पण घोड्यांना आयाळ असते हें सांगणाची जरूर कां असावी ? केशी लोकांनी शिकवून तयार केलेले किंवा केशींच्या देशांतून आणलेले असा याचा अर्थ असावा. हिंदुस्थानांत मध्ययुगांत सिंधच्या घोड्यांची ( सैन्धवांची ) जशी ख्याति होती, तशी वैदिक काळीं केशी घोड्यांची होती असें वाटतें. ‘ अवावचीत्सारथिरस्य केशी’ ऋ० १०।१०२।६, यावरुन केशी सारथिहि सारथ्यांत पटाईत होते असें दिसतें.
१४. शूष आणि शुष्म हे दोन शब्द ऋग्वेदामध्यें बलवाचक दिसतात. पण ‘प्र मन्महे शवसानाय शूषमाङ्गूषं’ ऋ० १।६२।१ इत्यादि ठिकाणीं शूष हें इंद्राचें विशेषण दिसतें. शुष्म शब्दाची व्युप्तत्ति बरोबर समजत नाहीं. शुषन् ( Shushan ) ही एका काळीं एलामची राजधानी होती. तेहां त्या शब्दाचा आणि या दोन शब्दांचा कांहीं संबंध असावा असें वाटतें. इंद्र हा शूष म्हणजे शुषन् येथील रहाणारा. शुष्म म्हणजे शुषन् चें सामर्थ्य, अर्थात् बळ. तेव्हां आर्यांचें मूळ स्थान शुषाच्या आसपास असावें; व तेथेंच त्यांनी प्रथमत: इंद्राच्या नेतृत्वाखालीं आपलें वर्चस्व स्थापन केलें असावें.
१५. मितज्ञूचा उल्लेख ऋग्वेदांत चार ठिकाणीं आला आहे. या शब्दाचा अर्थ सायणाचार्य मितजानुक किंवा संकुचितजानुक असा करतात. परन्तु एलामच्या वायव्येस असलेल्या मितन्नि
( Mitanni ) लोकांचा हा उल्लेख असावा असें दिसतें. हे लोक आर्यांचे दोस्त. त्यांच्या राजांचीं नांवेंहि आर्यन् होतीं. बोघझ्-कोई ( Boghaz-Koi ) येथें सांपडलेल्या एका मितन्नि राजाच्या लेखावरून असें दिसतें कीं, हे लोक आर्यांप्रमाणेंच मित्र, वरुण, इंद्र व नासत्य या देवतांची पूजा करीत असत.
१६. येथें असा प्रश्न उपस्थित होतो कीं, आर्य अतिप्राचीन काळीं उत्तर ध्रुवाकडे किंवा मध्य एशियांत रहात असून नंतर एलाममध्यें आले नसावे कशावरून ? गोष्ट संभवनीय आहे. परंतु आर्यांच्या ऐतिहासिक काळांतील निवासस्थानाचा आम्हांस विचार कर्तव्य आहे; मूळ स्थानाचा नव्हे. त्यांच्या घोड्यावर बसण्यांत पटाईतपणामुळें व केशी आणि मितज्ञु या लोकांशीं त्यांचा जो संबंध दिसतो त्यामुळें ऐतिहासिक काळीं त्यांचें वसतिस्थान एलाममध्येंच धरणें सोइस्कर आहे.