स्वभावाशीं परिचय 3
ज्ञानार्जनांतील निरनिराळया क्षेत्रांत धडाडीनें उडी घ्यावी व तेथें चमकून देशाचें व स्वत:चे नांव चिरस्मरणीय करावें असें कोणाच्याही ध्यानी मनी येत नाही. निरनिराळया ललितकलांत प्राविण्य मिळवावें हें पण त्यांस पसंत नसतें. व्यापारवृध्दि करून संपत्ति घरास आणण्याचा विचारहि अंत:करणात उदय पावत नाही. ही सर्वस्वी निरुत्साही वृत्ति पाहून राजवाडे संतापत यांत नवल नाही. महाराष्ट्रांत धडाडीनें काम करणारे पुष्कळ लोक नाहीत म्हणून ते निराश होत. परंतु स्वत:च एकटे एकान्तिक निष्ठेनें ते पुढें पाऊल टाकीत होते.
ज्वलज्जहाल वृत्तीनें कार्यास आजन्म वाहून घेणारे कामसू लोक आढळत नाहीत म्हणून ते चिडखोर व रागीट बनले. 'पुरतें कोणाकडे पाहेना, पुरतें कोणाशी बोलेना' अशा बेदरकार वृत्तीचे ते बनले. कार्य करावयास नको. फुकट मोठाल्या गप्पा मात्र मारावयास पाहिजेत-असें लोकांचें खरें स्वरूप पाहिल्यामुळें ते त्यांच्याजवळ तिरस्कारानें व तुच्छतेनें वागत; कधी कधी केवळ लहरीपणा पण असे. त्यास कोणी कांही विचारावयास गेलें तर प्रथम त्यास उडवाउडवीची, तुसडेपणाची उत्तरें ते देत. परंतु जर त्यांनां असें दिसून आलें की आलेला इसम खरोखर विचार ग्रहण करण्याच्या हेतूनें आला आहे, तो तुच्छ व हीनवृत्तीचा नसून उत्कटता त्याच्या ठिकाणी आहे, तर मग ते त्या गृहस्थाजवळ नीट दोन दोन तासही मनमोकळेपणानें व हास्ययुक्त मुद्रेनें बोलत मग त्यांच्या कपाळावरच्या आंठया मावळत व भालप्रदेश प्रशांत दिसे. विद्येचें व विद्वत्तेचें मंगल गांभीर्य व तेज त्यांच्या मुखावर दृग्गोचर होई. गाईचा खरा वत्स पाहिजे; नाही तर ती लाथच मारावयाची. तसें खरा ज्ञानोत्सुक गृहस्थ पाहिला म्हणजे राजवाडे यांचें होई. एकदां आपल्या तिरसट वागणुकीचें रहस्य सांगतांना ते म्हणाले 'अहो, मी लोकांजवळ आधीच शिव्या शाप देऊन बोलूं लागतों; म्हणजे मागून त्यांची भीड पडावयास नको. आधी जर गोडी गुलाबीनें, मृदु स्वभावानें लोकांजवळ आपण वागलों तर त्याच लोकांजवळ प्रसंग विशेषी नि:स्पृहपणें बोलता येत नाही. मनांत येतें, काल आपण यांच्याजवळ साळसूदपणानें बोललों, चाललों, मग आतां यांचें मन कसें दुखवावयाचें - अशी भीड - जी भिकेची बहीण म्हणतात- ती पडूं नये व निर्भीडपणें व सडेतोडपणें सर्वांजवळ बोलतां चालतां यावें म्हणून मी कोणास जवळ करीत नाही. नि:स्पृहस्य तृणं जगत्- या न्यायानें मी वागतों.' राजवाडे स्वतंत्र वृत्तीचे होते. कधीं कोणाची पै मी लागत नाही या अभिमानानें ते वागले व राहिले. राजा असो रंक असो सर्वांशीं त्यांचा खाख्या सारखाच.
राजवाडे यांच्यामध्यें मनाची एकाग्रता हा गुण फार उत्कृष्टपणें होता. कनक व कांता या मनास व्यग्र व लोल करणा-या दोन वस्तुंपासून तर ते दूर होते. या वस्तूंचा त्यांनी संपूर्णत: त्याग केला होता. त्यामुळें त्यांच्या मनाची एकाग्रता सहजतेनें होई. दहा दहा बारा बारा तास ते मांडी घालून झपाझप बोरुनें कधीं कधी टाकानेंही बंदावर बंद लिहून काढीत. ते मोडीत लिहीत व त्याचें छापण्यासाठीं बालबोध कोणाकडून करून घेत. त्यांचें मोडी अक्षर गोलबंद मोत्यासारखे होतें. त्यांच्या अक्षरास सुंदर वळण असे व ते सहज भासे. असें लिहित असतां आजुंबाजूंचा सावळा गोंधळ त्यांस संत्रस्त करूं शकत नसे.