स्वभावाशीं परिचय 1
राजवाडे यांची राहणी साधी व स्वच्छ असे. त्यांचा आहार शुध्द व सात्त्वि असे. ते बहुतेक हातानें स्वयंपाक करीत, कधी कधी ते भात दुधांत शिजवीत. मग त्या भातावर पुष्कळसा मध व तूप ओतून ते जेवीत. त्यांस मध भातावर फार आवडे. जेवणांत दूध तूप वगैरेंचा ते फार उपयोग करीत. परंतु नेहमीच असा आहार घेतां येत नसे. वाईस प्रथम ते दप्तर शोधावयास गेले, त्या वेळेस एक चिपटे तांदुळ घेऊन त्याचा भात करून नुसता खात; आणि ते म्हणत 'रोजच्या खर्चास मला तीन दिडक्यांचे तांदुळ असले म्हणजे झालें. तीन पैशांत मला जगांत धडधाकट राहतां येईल.' नेहमीच अशा दरिद्रावस्थेंत त्यांस रहावें लागे असें नाही. परंतु सर्व प्रकारच्या परिस्थितींत रहावयास ते तयार असत. महिन्याचा त्यांचा भोजन खर्च कधी कधी कमीत कमी १० रुपये तर जास्तीत जास्ती ३० रुपये पर्यंत जाई. त्यांचा सर्व खर्च त्यांच्या पुस्तक प्रकाशनांतून बाहेर पडत नसे; त्यांना इतर मदत घ्यावी लागे. त्यांच्या वडील भावांची-वैजनाथपंत राजवाडे- यांची त्यांस मदत होत असे. इतरांजवळून होतां होई तों त्यांनी कधी पै घेतली नाही. कारण दुस-यांचें मिंधे राहणें हें त्यांस कधी खपत नसे. मिंधेपणा म्हणजे मरण असें ते म्हणावयाचे.
त्यांची प्रकृति दणगट असल्यामुळे त्यांचा आहार चांगला असे. अपचनासारख्या रोगांनी ते कधीं आजारी पडले नाहीत. कधी कधी अटीतटीस पडून ते वाटेल तेवढया अन्न सामग्रीचा फन्ना उडवीत. एकदां अशीच पैज लागली व राजवाडयांनी १५० केळयांचा घड व ५ । ६ रुपयांची द्राक्षें यांचा फडशा पाडला. त्यांना फळें फार आवडत. विशेषत: संत्री व केळी यांची त्यांस मोठी आवड होती. भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगावर त्यांची भक्ति फार होती. या शेंगा, त्याप्रमाणेच संत्री व केळी ते किती खातील त्याचा नेम नसे.
ते स्वच्छतेचे फार भोक्ते. गलिच्छपणा व गबाळपणा त्यांस तिळभरहि खपावयाचा नाही. त्यांचा पोषाख साधा व नीटनेटका असे. एक पंचा ते नेसत. अंगांत एक सदरा व कोट असे. डोक्याला फेटा असे. बरोबर कांबळें अंथरावयास घ्यावयाचें. त्यांच्याजवळ कोट एकच असावयाचा. एखादें वेळी कोट धुवून वाळलेला नसावयाचा-मग ते बाहेर जात नसत. ते स्वत: आपले कपडे पुष्कळ वेळां धुवीत. क-हाडास ज्या ज्या वेळेस असत, तेव्हां कृष्णेवर जाऊन ते आपले कपडे धुवून आणीत. ते हातानें स्वयंपाक करण्याचें पत्करीत. यांत स्वच्छता हाच त्यांचा मुख्य हेतु असे. खानावळीचें अन्न त्यांस पसंत नसे; त्याची त्यांस खंत येई. खानावळी म्हणजे कितपत स्वच्छ असतात हें त्यांत जाणारांस तरी सांगण्याची जरुरी नाही. पुण्यात असतां अलीकडे अलीकडे अगदी फार थोडे दिवस त्यांनी एक स्वयंपाक्या ठेविला होता. त्याचे हात वगैरे ते आधी पहात. खरुज वगैरे दिसली तर त्यास ते दूर करीत. त्यांची स्वयंपाकाची भांडी महाराष्ट्रांत अनेक ठिकाणी ठेवलेली असत. ठिकठिकाणी त्यांच्या उतरण्याच्या जागा ठरल्यासारख्या होत्या. ते फिरावयास जातांना सुध्दां शेतांभातांतून जाणें पसंत करीत. कारण रस्त्यांतून भयंकर धूळ असते. ते म्हणत 'जोपर्यंत आपल्याकडील म्युनिसिपालटयांस रस्ते शिंपण्याची अक्कल आली नाही व आवश्यकता वाटत नाही तोंपर्यंत अशा धुळीच्या लोटानें भरलेल्या रस्त्यांतून चालणें व नासिकारंध्रें भरुन घेणें म्हणजे क्षय रोगानें मरण ओढवून घेण्याप्रमाणें आहे.' पुण्यातील रस्ते किती घाणेरडे व मलमूत्रक्लिन्न असतात याविषयी ते पुण्यांतील एका व्याख्यानांत म्हणाले 'मला या सभास्थानी येईपर्यंत वाटेंत घाणीत पाय भरल्यामुळें १०-१२ वेळां पाय नळावर धुवावें लागले.' त्यांना आंघोळ वगैरे करण्यासही पुष्कळ पाणी लागे. एका बादलीभर पाण्यांत काकस्नान करणें त्यांस आवडत नसे. ५-६ घंगाळें पाणी असल्याशिवाय त्यांची आंघोळ व्हावयाचीच नाही.