Get it on Google Play
Download on the App Store

स्वभावाशीं परिचय 2

त्यांची शरीर प्रकृति निकोप होती. कॉलेजमध्यें भरपूर व्यायाम घेतलेला असल्यामुळें त्यांची शरीरयष्टि कणखर लोखंडाच्या कांबीसारखी झाली होती. मोठेपणी कधी कधी ते नमस्कारांचा व्यायाम घेत. चहा वगैरे अग्निमांद्य आणणा-या पदार्थांचा ते तिरस्कार करीत. ते खेदाने म्हणत 'अलीकडील लोकांच्या खिशांत चहा घेण्यास दोन आणे खुळखुळतात; परंतु तेवढयाच पैशांत अर्धा मूठ बदामगर, दोनचार खडीसाखरेचे खडे, १० । १२ काळी द्राक्षें-असा माधवरावी मेवा घेतां येईल. (माधवरावी म्हणजे न्या.माधव गोविंद रानडे- यांचा मेवा. रानडे यांच्या खिशांत बदाम, पिस्ते वगैरे असावयाचे) मी हा मेवा घेतों म्हणून तर माझे दंड पीळदार व डोळे पाणीदार आहेत.

राजवाडे यांचें मुखमंडल पाहून आपणांस इटालियन देशभक्त मॅझिनी यांची आठवण होत असे, असें नरसोपंत केळकर यांनी लिहिलें आहे. राजवाडे हे मॅझिनीप्रमाणेंच विचार क्रांति घडवून आणणारे व देशभक्त होते. राजवाडे यांची हनुवटी लांब व निश्चय दर्शविणारी होती. डोळे कोठें तरी दूर गेले आहेत असे दिसत. डोळयांत एकप्रकारची नि:स्पृहता होती. नाक स्वतंत्र वृत्तीचे व तीक्ष्ण बुध्दीचें दर्शक होतें. त्यांचें कपाळ भव्य होतें. ते मध्यच उंचीचे होते. एकंदरीत त्यांचें शरीर भक्कम व जोरदार, स्फूर्तीचें घर होतें. या जोरदारपणांतच त्यांच्या आशावृत्तीचें बीज आहे. त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता. आपण म्हणूं तें करूं असें त्यांस वाटे. अजरामरवत् संकल्प करून ते कार्यास प्रवृत्त झाले होते. आपण पूर्ण शतायुषी होऊन मगच मरुं असें ते म्हणावयाचे. ८० । ८५ वर्षे पर्यंत काम करून मग १० । १५ वर्षे एकांतांत विश्रांति घ्यावयाची असें त्यांनी ठरविले होतें. केवढा हा आत्मविश्वास ! निरुत्साही व रडक्या लोकांची त्यांस चीड येत असे. मी आजारी आहें, कपाळ दुखतें आहे, कसें काम करावें- असें रडगाणें गाणा-या लोकांस उद्देशून ते म्हणत 'मरा लेको आजच मरा; तुम्ही जितके लौकर मराल तितकें चांगलेंच. कारण आपल्या रडगाण्यांनी तुम्ही दुस-यासही नाउमेद करतां. आत्महत्या व परहत्या अशी दोन्ही पातकें तुम्ही त्यामुळें करीत आहांत' राजवाडे म्हणजे मूर्तिमंत उत्साह व आशा होय.

ध्येयशून्य व परप्रत्यनेयबुध्दि अशा लोकांचाही त्यांस संताप येई. एकदां व-हाडांत एका विद्वान् गृहस्थानें त्यांस विचारलें 'मी काय करावें असें तुमचें मत आहे ? मी कोणत्या कार्यास लायक आहें असें आपणास वाटतें ?' राजवाडे रागानें म्हणाले 'तुम्ही मरावयास मात्र लायख आहांत.' ज्या गृहस्थास इतके दिवस जगांत राहून आपण कोणत्या कार्यास लायक आहोंत हें, समजलें नाही, तो दुस-यानें सांगितलेल्या गोष्टीवर श्रध्दा ठेवून काय कार्यांचे दिवे लावणार हें त्यांस दिसतच होतें. आपली बुध्दि, आपली कुवत, आपली हिंमत ओळखून ज्यानें त्यानें आपलें कार्यक्षेत्र ठरविलें पाहिजे. दुस-यानें सांगून काय होणार ? आपल्यांतील पुष्कळ तरुण लोक असेच असतात. कॉलेजमध्यें ऐच्छिक विषय कोणता घ्यावा हें ते प्रोफेसरास जाऊन विचारतात ! निरनिराळी कार्यक्षेत्रें त्यांच्या डोळयांसमोर उभी नसतात; व उभी राहिली तरी आपण कोणत्या कार्यक्षेत्रांत काम करण्यास लायक आहोंत हें त्यांचें त्यांस समजत नाही. एक नोकरीचें क्षेत्र वगळलें म्हणजे अन्य क्षेत्र पांढरपेशांस दिसतच नाही.

इतिहासाचार्य राजवाडे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सदिच्छेचे सामर्थ्य 1 जन्म, बाळपण व शिक्षण 1 जन्म, बाळपण व शिक्षण 2 जन्म, बाळपण व शिक्षण 3 जन्म, बाळपण व शिक्षण 4 जन्म, बाळपण व शिक्षण 5 जन्म, बाळपण व शिक्षण 6 जन्म, बाळपण व शिक्षण 7 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 1 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 2 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 3 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 4 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 5 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 6 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 7 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 8 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 9 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 10 भाषाविषयक कामगिरी 1 भाषाविषयक कामगिरी 2 भाषाविषयक कामगिरी 3 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 1 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 2 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 3 राजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष 1 राजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष 2 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 1 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 2 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 3 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 4 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 5 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 6 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 7 स्वभावाशीं परिचय 1 स्वभावाशीं परिचय 2 स्वभावाशीं परिचय 3 स्वभावाशीं परिचय 4 स्वभावाशीं परिचय 5 स्वभावाशीं परिचय 6 स्वभावाशीं परिचय 7 स्वभावाशीं परिचय 8 अंत व उपसंहार 1 अंत व उपसंहार 2 अंत व उपसंहार 3 अंत व उपसंहार 4 अंत व उपसंहार 5 अंत व उपसंहार 6 अध्याय अठरावा