इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 9
रा.ब.रानडे यांनी अनेक संस्था निर्माण केल्या. परंतु त्यांनी आपल्या मंडळासारखी संस्था निर्माण केली नाही हें खरोखरीच आपलें, आपल्या देशाचें दुर्दैव होय. अशी जर एकादी संस्था त्यावेळी निर्माण झाली असती व जर अशा संस्थेच्या कृपेच्या छत्राखाली माझ्या सारख्यास काम करावयास मिळून जितकें जरुर तितकें स्वास्थ्य असतें तर आपणांस अतिशयोक्ति वाटेल म्हणून सहस्त्रपट म्हणत नाहीं पण शतपट काम मी सहज उरकलें असतें. यद्यपि आपण आजवर केलेलें काम अति अल्प आहे, तरी संशोधकांनी आपली जबाबदारी ओळखून सुव्यवस्थितपणें काम केलें तर आपण खचित हें कार्य लवकरच चांगल्या नांवारुपास आणूं. यद्यपि माझी प्राप्ति अति अल्प आहे. वस्तुत: कांही नाही म्हटलें तरी चालेल. परंतु माझ्या बंधूंच्या कृपेनें मला जो अल्पस्वल्प पैसा मिळतो त्यांतून माझ्या पाठीमागून होणा-या संशोधकांचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून मी सालीना २५ रुपये ह्या कार्यास देतों.' याच संमेलनासमोर यांनी आणखी एक ठराव मांडला. 'भारतेतिहास, भारतीय अर्थशास्त्र, भारतीय राजधर्मशास्त्र, भारतीय समाजशास्त्र, भारतीय भाषाशास्त्र वगैरेंच्या अध्ययन अध्यापनाची व्यवस्था भरतखंडांत, तेथील विश्वविद्यालयादि संस्थांच्याद्वारां होणें अत्यवश्यक आहे असें या मंडळाचें मत आहे व या आशयाची सूचनापत्रें, विनंतिपत्रें वगैरे निरनिराळया विद्यमान नामांकित शिक्षणसंस्थांकडे पाठवावी.'
रा. मेहेंदळे यांनी याप्रसंगी राजवाडे यांच्या हातून मराठी भाषेंचे ऐतिहासिक व्याकरण व्हावें असें सुचविलें व म्हणाले, 'तें छापून काढण्याची जबाबदारी मी आपल्या एकटयांचे शिरावर घेतों' या गोष्टीस राजवाडे यांनी जवळ जवळ संमति दिली होती. मराठयांचा इतिहासही राजवाडे यांनी लिहावा, मी तो छापण्याची जबाबदारी घेतों असें पुनरपि त्यांनी सुचविलें तेव्हां राजवाडे म्हणाले 'पेशवाईंचा इतिहास लिहिण्याजोगी सामग्री आता खरोखरीच झाली आहे. तरी मजपेक्षां दुस-या कोणी तरी हें काम करावें. विद्यापीठांतून शिकविणा-या विद्वान लोकांनी आतां आळस झाडून सर्व इतर अडचणीना न जुमानतां हें काम अवश्य करावें; असले प्रयत्न १० । १२ निरनिराळे झाले तरी दृष्टिभेदामुळें इष्टच असल्याचें सांगून या बाबतींत सक्ति न करितां खुषीवरच सोंपविणें बरें.'
अशाप्रकारें हें पहिलें संमेलन पार पडलें. भारतइतिहास संशोधक मंडळाचीं इतिवृत्तें प्रसिध्द होऊं लागली. सभासद वाढूं लागले. १८३९ पर्यंत मंडळाचें काम जोराने चाललें. राजवाडे कोठेंही असले तरी पदरचे पैसे खर्चून मंडळाच्या सभांस होतां होईतों हजर राहत. कित्येक दिवस मंडळाचें अपत्याप्रमाणें त्यांनी संगोपन केलें. परंतु शके १८३९ नंतर त्यांचें मन या संस्थेवरुन उठलें व त्यांनी आपला ति-हाइतपणा पुन्हा पत्करिला. पुढें धुळें येथें जी सत्कार्योत्तेजक सभा स्थापन झाली होती, त्या बाजूस ते जास्त रमूं लागले. तेथील प्रभात मासिकांत त्यांनी लेख लिहिले. नंतर अमळनेर येथेंहि एक इतिहास संशोधक मंडळ स्थापन करण्यांत आलें. अमळनेर येथें त्या वेळेस प्रो.भानू हे होते. अमळनेरचे सुप्रसिध्द वकील विष्णु काशिनाथ भागवत ह्यांचा उत्साह या बाबतींत फार. राजवाडे येथील सभांस नेहमीं येत व कांही उद्बोधक निबंध, टांचणे वगैरे वाचीत. पुढें हें अमळनेरचें मंडळ बंद पडलें. पुण्याचे मंडळ मात्र आतां मोडण्याच्या भीतीच्या पलीकडे गेलें आहे. स्वत:ची सुंदर इमारतही मंडळानें आतां बांधली आहे व राजवाडे यांनी ती आपल्या ह्यातींत पाहिली पण होती.