इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 10
पुण्यास जी ही इतिहाससंशोधक संस्था स्थापन झाली, तिच्या कार्याची रुपरेखा ठरविण्यांत आली होती. (१) सर्व पक्षांच्या लोकांस मंडळ खुलें असावें. (२) मंडळांत जें बोलणें अगर लिहिणें तें लेखी असावें. (२) Fact finding वर भर असावा. मतप्रकाशन त्यावेळेस बाजूस ठेवून दिलें होतें. मंडळांत मनमिळाऊ माणसें सामील झाल्यामुळें जहाल, मवाळ उभय पक्षांतील मंडळीही या संस्थेच्या वाढीस हातभार लावीत.
इतिहास साधनें प्रसिध्द करण्यासाठी अशी आटाआटी या महापुरुषानें केली. सतत श्रम करून २२ पत्र खंड त्यांनी छापले व कांही भागांस सागराप्रमाणें गंभीर व भारदस्त प्रस्तावना लिहिल्या. या पत्रखंडांशिवाय महिकावतीची बखर, राधामाधव विलासचंपू या दोहोंचा या इतिहास शोधनांतच समावेश करणें इष्ट आहे. महिकावतीची बखर यास त्यांची फारच गुंतागुंतीच्या प्रश्नांवर प्रकाश पाडणारी प्रस्तावना आहे. गुजराथ, कोंकण, वगैरेंचा इतिहास, रामदेवराव जाधव यांच्या पूर्वीचा व तदुत्तर इतिहास यांसंबंधी राजकीय सामाजिक विवेचन या प्रस्तावनेंत आलें आहे. राधामाधवविलासचंपूची प्रस्तावना म्हणजे फारच मोठें काम आहे. महाराष्ट्रभूषण शहाजीच्या कर्तबगारीचें सुंदर व भव्य चित्र येथें राजवाडे यांनी रेखाटलें आहे. शहाजीच्या पराक्रमाचे पवाडे वाचतांना मनास आनंद होतो. लढायांची वर्णनें वाचतांना तन्मयता होते. 'पाखरांच्या पाखांवर पावसाळयांत जेथें शेवाळ उगवतें' असें सुंदर वर्णन वाचून सार्थकता वाटते. मराठयांच्या गुण दोषची चर्चा येथेंही आहे. पहिल्या १२५ पानांत शहाजीसंबंधी, रामदासासंबंधी वगैरे सूक्ष्म व गंभीर चर्चा आहे. पुढें पाणिनीय कालापासून शहाजी कालापर्यंतच्या भारतीय क्षात्रांचा परंपरित इतिहास देण्याची प्रतिज्ञा करुन तत्सिध्यर्थ उरलेली ७० पानं खर्ची घातली आहेत. यांचे परीक्षण करणें म्हणजे प्रतिराजवाडे-दुसरे गाढे पंडित पाहिजेत. आम्ही नुसता उल्लेख करणें हेंच योग्य.
राजवाडे यांच्या या इतिहास विषयक कामगिरीचा हा इतिहास. याशिवाय इतिहासासंबंधी शेंकडों टांचणें, टिपणें मंडळाच्या इतिवृत्तांतून प्रसिध्द झालेलीं जमेस धरलीं, म्हणजे केवढें प्रचंड कार्य या थोर पुरुषानें केलें हें दिसून येईल. या प्रस्तावनांतून जे मननीय विचार त्यांनी प्रगट केले आहेत ते स्वत: वाचावे आम्ही पुढें त्यांची मतें वगैरे सांगतांना थोडा फार त्यांचा उल्लेख करूं. ऐतिहासिक काम पाहिल्यानंतर आपण त्यांच्या भाषाविषयक कामगिरीकडे वळूं या.