इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 3
जोरदार भाषा, समर्पक सिध्दांत, इतिहासतत्वविवेचनाचे गाढें ज्ञान हें सर्व पाहून महाराष्ट्रीय विद्वान् लोक चकित झाले. ज्ञानकोशकार विद्यासेवकांत लिहितात “खरोखर पाहता साहित्यशोधन, बारीक शोध, आणि इतिहास-विकासविषयक विचार या दृष्टीनी पाहतां अर्वाचीन इतिहासाच्या क्षेत्रांत राजवाडे यांच्या पहिल्या खंडाच्या योग्यतेचा दुसरा ग्रंथ गेल्या ५० वर्षांत हिंदुस्थानांत झालाच नाही. या ग्रंथामुळें त्यांस इतिहास संशोधक हें नांव मिळालें तें कायमचें टिकलें.” या ग्रंथाची प्रस्तावना इतकी गहन व गंभीर आहे की, ती प्रथम वाचतांना वाचक गोंधळून जातो. प्रसिध्द रियासतकार सरदेसाई म्हणाले 'ही प्रस्तावना मी सात वेळां वाचली, तेव्हां कोठें मला त्यांतील म्हणजें सर्व यथार्थपणे समजलें.' याच प्रस्तावनेंत इतिहासाचें आत्मिक व भौतिक विवेचन म्हणजे काय हें त्यांनी विशद केले आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय याची फोड याच प्रस्तावनेंत त्यांनी प्रथम केली व मागून तत्संबंधी अनेक ठिकाणी उहापोह केला. इतिहासाचें क्षेत्र किती विस्तृत आहे, इतिहास सर्वांगीण होणें म्हणजे कसा करावा, किती गोष्टीचा त्यांत अंतर्भाव होतो हें या प्रस्तावनेंत त्यांनी सांगितले आहे. हे सर्व सांगून मग या खंडांत प्रसिध्द केलेल्या पत्रांच्या अनुरोधानें त्यांनी पानपतच्या लढाईसंबंधी सुंदर खोल विवेचन केलें आहे. पानिपतच्या लढाईत पराभव होण्यासंबंधीची १८ कारणें जीं आजपर्यंत इतरांनी कल्पिली ती मांडून मग कागदपत्राच्या आधारें त्या मुद्यांचे त्यांनी सप्रमाण व बिनतोड खंडन केलें आहे. लढाईच्या ख-या यशापयशाची कारणें म्हणजे मल्हारराव होळकर यांची कुचराई व द्रोह, तसेंच गोविंदपंत बुंदेला यांची कार्यासंबंधीची उदासीनता ही मुख्य होत असें त्यांनी दाखविलें आहे. या तात्कालीन कारणांशिवाय मराठयांच्या राज्य प्रसाराबरोबर उदार विचार प्रसाराचें रामदासी कार्य कोणी केलें नाही. यामुळे नवीन मिळविलेल्या साम्राज्यांतील जनतेचीं मनोगतें हाती घेतां आली नाहींत; हें महत्वाचे अपजयाचें कारण आहे. मराठयांनी साधी राहणी सोडली नाहीं. परंतु उच्च विचार सरणी व तिचा प्रसार हें सोडलें. मराठे अर्बुज व धिप्पाड अफगाणासमोर लढाईस टिकत नव्हतें वगैरे कारणांचा राजवाडे यांनी नुसता धुव्वा उडविला आहे. रशियाबरोबर जपानी लोकांची जी लढाई झाली तींत प्रचंड काय रशियनांचा लहान जपानी वीरांनीच नक्षा उतरला व जगास चकीत केलें. देह केवढा कां असेना, देहांतील देशभक्तीची ज्योत दिव्य असली म्हणजे झालें. पानिपतच्या लढाईसंबंधी त्यावेळच्या उपलब्ध तुटक साधनांच्या जोरावर राजवाडे यांनी जे सिध्दांत प्रस्थापित केले, ते आजहि बहुतेक अबाधित आहेत. या प्रमाणे हा अलौकिक पहिला खंड प्रसिध्द झाला व राजवाडे यांची कीर्ति अक्षय्य उभारली गेली.
या नंतर आणखी दप्तरें शोधण्याच्या नादास ते लागले. आता तें त्यांचे पवित्र कार्यच झालें. प्रयत्न केला तर सर्व मराठयांचा व पर्यायानें हिंदुस्थानचा इतिहास तयार करतां येईल असें त्यांस वाटूं लागलें. मेणवली येथील दप्तराचा शोध लागला. एके दिवशीं राजवाडे एकटेच मेणवलीस जाऊन आले. परंतु त्यांस दप्तर दाखविण्यास हरकती घेण्यांत आल्यामुळें ते संतप्त झाले. शेवटी एकदांचे दप्तर पाहण्याची त्यास परवानगी मिळाली व त्यांचे काम सुरु झालें. या ठिकाणी राजवाडे यांच्या श्रमसातत्याची व उद्योगाची पराकाष्ठा झाली. पहांटे पांच वाजता ते उठत. प्रातर्विधी आटोपून जे कामास लागत ते मध्यंतरीचा वाडयांत जेवणास वेळ लागेल तेवढाच खर्च करून, कोणाशीही न बोलतां रात्री १०। ११ वाजेपावेतों दप्तर पहाणीचें काम करीत. मेणवली दप्तराचें काम चालूं असतां 'मी १०० वर्षे वर्षे लगलों व हें मेणवली दप्तर प्रकाशनाचें काम सुरुं केलें, तर माझें सर्व आयुष्य खर्च झालें तरी हें काम तडीस जाणार नाही' असे उद्गार काढीत.