Get it on Google Play
Download on the App Store

समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 1

इतिहास-शास्त्रविवेचक व इतिहास संशोधक, महान् व्याकरणशास्त्रज्ञ आणि शब्दसंग्राहक, त्याप्रमाणेंच राजवाडे हे समाजशास्त्रज्ञपण होते. महाराष्ट्रात समाजशास्त्राचा अभ्यास करणारे जवळ जवळ फारसे कोणी पंडित झाले नाहीत. राजवाडे यांच्या पूर्वी या शास्त्रास महाराष्ट्रांत प्रथम हात घालणारा विद्वान पुरुष म्हणजे राजाराम शास्त्री हे होत. हे स्पष्टवक्ते अतएव विक्षिप्त म्हणून गाजले. स्वतंत्र विचाराचे व स्वतंत्र प्रतिभेचे असे हे पुरुष होते. राजारामशास्त्रांचेच काम राजवाडे यांनी पुढे चालविलें.

समाजशास्त्र हें मानवशास्त्रांत अंतर्भूत होणा-या अनेक शास्त्रापैकी एक शास्त्र आहे. भाषाशास्त्र, प्राणिशास्त्र, शरीरशास्त्र, समाजशास्त्र वगैरे गोष्टीचा अंतर्भाव मानवशास्त्रांत होतो. अशा या अनेक शास्त्रांत वाहिलेलं लोक आपणांकडे नाहीत. राजवाडे यांनी या शास्त्राचा अभ्यास केला होता; व भाषाशास्त्र आणि मस्तिष्कशास्त्र यांच्या साहाय्यानें ते यांत सिध्दांत मांडू पाहात असत. 'हिंदुसमाजांत हिंद्वितरांचा प्रवेश, भारतीय विवाहपध्दति, चातुर्वर्ण्य, चित्पावनांचा इतिहास, वगैरे त्यांचे लेख समाजशास्त्रविषयक विवेचनानें भरलेले आहेत. चातुर्वर्ण्याच्या उत्कर्षाअपकर्षासंबंधीचें त्याचें विवेचन मार्मिक व अभ्यसनीय आहे. असिरिया व असुर लोक यासंबंधी पण अलिकडे ते जास्त विवेचन करण्याच्या विचारांत होते. ग्राम नांवाचा अभ्यास करून त्यावरुन महाराष्ट्रीय वसाहत कालाची निश्चिति करावयाची असें त्यांचें मनांत होतें. त्याप्रमाणेंच सर्व आडनांवांची यादी करून त्यांच्या विभागणीनें महाराष्ट्राच्या वसाहतीच्या स्वरुपावर कांही प्रकाश पडतो की काय हें त्यास पहावयाचें होतें यासाठी ते प्रयत्न करूं लागले होते व निरनिराळया क्षेत्री जाऊन तेथील बडवे, पंडये यांच्या वह्या तपासण्याचा त्यांनी उपक्रम सुरुं केला होता. मध्यें मध्यें त्यांस हें तर वेडच लागलें होते. अमळनेरची त्यांची गोष्ट सांगतात की बाहेर ओटयावर बसून येणा-या जाणा-यास आडनांव, गोत्र वगैरे विचारुन ते टिपून घेत. या मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी महाराष्ट्र वसाहतीचा इतिहासकाल हा निबंध प्रसिध्द केला आहे; व त्यापेक्षां व्यापक ग्रंथ लिहिण्याचा त्यांचा उद्देश होता.

समाजशास्त्राचा अभ्यास करितांना अनेक गोष्टी जनमनास न आवडणा-या लिहाव्या लागतात. प्राचीन विवाहपध्दति हा चित्रमय जगत् मध्यें प्रसिध्द झालेला त्यांचा लेख पाहून पुष्कळ जुन्या लोकांस वाईट वाटलें. प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करून भाऊ बहिणीजवळ विवाह करीत असलीच तत्त्वरत्नें बाहेर काढावयाची असतील तर तो अभ्यास न करणें बरें असे उद्गार मी पुष्कळांच्या तोंडून त्यावेळी ऐकिलें होते. महाराष्ट्रीय समाजांत नाग समाजाचें बरेंच मिश्रण आहे वगैरेही त्यांची मतें असेंच वरवर पाहाणा-यास कशीशीच वाटतात; आणि समाजशास्त्र मानवशास्त्र इत्यादिकांचा कांही अभ्यास न केलेले बेजबाबदार लोकही बारीक सारीक लेखांत राजवाडे यांच्या मतावर हल्ले करितात. राजवाडे यांचे सिध्दांत चुकले असतील; पाली हा शब्द 'प्रकट' पासून आला असावा हा त्यांचा सिध्दांत किंवा नागसंस्कृति महाराष्ट्रांत आली वगैरे सिध्दांत चुकीचेही ठरतील. परंतु अभ्यासु लोकांनी त्यांच्यावर टीका लिहिली तर शोभेल तरी. वाटेल त्यानें एकाटया मताच्या अभिनिवेशानें त्यांच्यावर तुटून पडणें हें चांगलें नाही. राधामाधव विलासचंपु, महिकावतीच्या बखरीची प्रस्तावना वगैरे मध्येंही त्यांनी समाजविषयक निरनिराळया अंगांची चर्चा थोडीबहुत केली आहे.

इतिहासाचार्य राजवाडे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सदिच्छेचे सामर्थ्य 1 जन्म, बाळपण व शिक्षण 1 जन्म, बाळपण व शिक्षण 2 जन्म, बाळपण व शिक्षण 3 जन्म, बाळपण व शिक्षण 4 जन्म, बाळपण व शिक्षण 5 जन्म, बाळपण व शिक्षण 6 जन्म, बाळपण व शिक्षण 7 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 1 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 2 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 3 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 4 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 5 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 6 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 7 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 8 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 9 इतिहास संशोधन व इतिहास मंडळ 10 भाषाविषयक कामगिरी 1 भाषाविषयक कामगिरी 2 भाषाविषयक कामगिरी 3 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 1 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 2 समाजशास्त्रविषयक व इतर निबंध 3 राजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष 1 राजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष 2 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 1 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 2 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 3 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 4 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 5 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 6 राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 7 स्वभावाशीं परिचय 1 स्वभावाशीं परिचय 2 स्वभावाशीं परिचय 3 स्वभावाशीं परिचय 4 स्वभावाशीं परिचय 5 स्वभावाशीं परिचय 6 स्वभावाशीं परिचय 7 स्वभावाशीं परिचय 8 अंत व उपसंहार 1 अंत व उपसंहार 2 अंत व उपसंहार 3 अंत व उपसंहार 4 अंत व उपसंहार 5 अंत व उपसंहार 6 अध्याय अठरावा