Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात

अभिजीत मायदेशी येतोय ही बातमी भारतापर्यंत पोहोचते. कॅरेबियन मंडळी एकत्रपणे भारत दौरा करतात. स्टिफन आणि अभिजीत त्यांच्या कुटूंबीयांसह दोन आठवड्यांच्या मोठ्या सुट्टीसाठी भारतात जात असल्याने तेथील काही महत्त्वाची कामे पूर्ण करुन घेतात. दोघांना एकत्रपणे रजा मंजूर होते. खेडेगावातून अभिजीतचे वडील प्रसादच्या घरी पोहोचतात, अजयदेखील नम्रतासोबत तेथे पोहोचतो. सगळे एकत्र मिळून कॅरिबियन पाहुण्यांना घेण्यासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जातात.

शरद, "किती वेळ लागेल त्या दोघांना?"

अजय, "येतीलच थोड्या वेळात."

प्रसाद, "अज्या, कॅमेरा आहे ना तुझ्याकडे? अशोक, हार आणला आहेस ना!"

अशोक, "मी पाच हार आणलेत."

शरद, "पाच हार? कुणासाठी?"

अशोक, "एक अभिजीतसाठी, एक गौरीसाठी, एक रुपालीसाठी, एक स्टिफन आणि एक त्याच्या बायकोसाठी."

अजय, "बायको नाही, पत्नी म्हण. तुम्हा दोघांना  कॉमन्सेन्स शिकवणारा तुमचा बाप येतोय सहा वर्षांनंतर."

प्रसाद वरिष्ठ मंडळींकडे जातो. अभिजीतचे आईवडील, गौरीची आई, प्रसाद, अशोक, शरद यांच्या घरातील काही मंडळी आणि नम्रताचे वडील अशी मोठी फौजच आलेली असते.

प्रसाद, "अजय विचारायला गेला होता. फक्त थोडा वेळ थांबा. येतीलच ते."

पुन्हा एकदा घोषणा होते, विमान विमानतळावर उतरलं आहे.

सगळ्यांच्या नजरा बाहेर येत असलेल्या पॅसेंजर्स (प्रवासी) यांच्याकडे लागलेल्या असतात. त्यांच्या डोळ्यासमोरची व्यक्ती तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा येत होती. गर्दीच्या दिशेने बघून शरद मोठ्याने ओरडतो,

शरद, "पॅडी ते बघ. मला स्टिफन दिसला."

प्रसाद, "कुठे?"

शरद, "ते बघ तिकडे मोठी बॅग हातात घेऊन येतोय."

प्रसाद, "अरे तो दुसराच कोणीतरी आहे."

शरद, "साले, सगळे फॉरेनर सारखेच दिसतात."

अभिजीतची आई पुढे येते, "तो बघा, माझा मुलगा आला."

सगळ्यांच्या नजरा दुसरीकडे वळतात. बाहेर निघण्याच्या दुसऱ्या द्वारामधून अभिजीत, गौरी, रुपाली, स्टिफन, मारिया एकामागोमाग एक येतात. स्वागतासाठी आलेल्या सर्वांचे डोळे पाण्याने भरुन येतात. जवळ येत असताना अभिजीत गौरीच्या कानात काहीतरी सांगतो. ती आपल्या गळ्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ डोक्यावर घेते. मग ते दोघेही अभिजीतच्या वडीलांच्या पाया पडतात. त्यानंतर एक-एक करुन सर्व थोरामोठ्यांच्या पाया पडतात.

अभिजीत जरा पाठीमागे बघतो. प्रसाद, अजय, अशोक, शरद उभे असतात. सहा वर्षांपूर्वी भारत सोडण्याआधी अभिजीत ज्या पध्दतीने गालातल्या गालात हसून प्रेक्षकांना घायाळ करायचा. त्याच प्रमाणे तो गालातल्या गालात हसत आपले दोन्ही हात मिठीत येण्यासाठी पूढे करतो. मित्राची एक झलक पाहण्यासाठी वेडे झालेले ते चौघेही डोळ्यातलं पाणी पूसत त्याच्या मिठीत जातात. गौरी मिनाक्षीची मुलगी अनामिकाला कडेवर घेते आणि मनसोक्त पाप्या घेते. काजल, नम्रता, मिनाक्षी, मारिया, रुपाली सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. मुंबईतील  आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सहा प्रशस्त गाड्या नाशिकच्या दिशेने रवाना होतात. तत्पुर्वी विमानतळावरील एवढी मोठी गर्दी लक्ष वेधून घेणारी होती. आणि तिथे असलेल्या काही जिज्ञासू व्यक्तींनी अभिजीत भारतात पुन्हा आल्याचे काही फोटो काढतात. नाशिक येथील खेडेगावी पोहोचण्याआधीच अभिजीत भारतात आल्याची बातमी संपूर्ण भारतभर पसरलेली असते. खेडेगावामध्ये  पोहोचल्यानंतर  सगळे  अभिजीतच्या  घरी  थोडावेळ  विश्रांती  करतात.  त्याआधी  पारंपारिक  विधीप्रमाणे अभिजीत आणि गौरी यांचा गृहप्रवेश केला जातो.

प्रसाद, "बरं झालं आलास. खूप बरं वाटलं."

अभिजीत, "यायचं तर होतंच. नाही आलो असतो तर..."

अजय त्याला अडवत, "ओ भाई, बंद करा तुमचा इमोशनल ड्रामा. आलोत ना आता सोबत. बी हॅप्पी मॅन."

अभिजीत, "शरद आणि अशोक गप्प का बसलेत?"

अजय, "त्या दोघांनी ठरवलंय. तुझ्यासोबत इंग्रजीमध्ये बोलायचं."

अभिजीत, "काय बोलतोस? चल त्यांची जरा मस्करी करु."

अजय, "चल."

तिघेही बाहेर उभ्या असलेल्या गाडीच्या दिशेने जातात. अशोक आणि शरद गाडीमध्ये बसून गावच्या मुली पाहत असतात.

अभिजीत, "Hi Friends."

अशोक आणि शरद यांचा गोंधळ होतो.

अशोक, "Hi."

शरद, "Hello."

अभिजीत, "How are you?"

शरद, "Totally fit and fine. What are you also? Many years ago, you no forget us."

अभिजीत, "तुला  remember म्हणायचंय का?"

अजय आणि अभिजीत हसू लागतात.

शरद, "साल्या, इतक्या वर्षांनंतर आलास आणि आम्हाला चिडवतोस? तुला नसेल, पण गर्व आहे आम्हाला मराठी असल्याचा."

अभिजीत, "खरं सांग, इंग्रजी येत नाही म्हणून मराठीचा गर्व वाटतोय ना!"

शरद, "You feel what you want. I love my bhasha, my sanskruti. Not only Garv, but also Maaj having me to making Maratha."

अजय, "मेकिंग मराठा? हा... हा... हा..."

प्रसाद आणि अभिजीत देखील हसतात. अभिजीत पूढे काही बोलणार इतक्यात समोरुन पत्रकारांच्या गाड्या येताना दिसतात.

अभिजीत, "अरे बापरे! यांना कोणी बोलावलं?"

अजय, "माहित नाही. आता काय करायचं?"

अभिजीत, "चला आता, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरं द्यायला तयार व्हा."

गाड्यांचा आवाज ऐकून घरामधून स्टिफन, काजल बाहेर येतात. पत्रकार तयारीतच असतात. गाड्या थांबल्यानंतर सगळे पत्रकार रीतसर अभिजीतकडे जाऊन प्रश्न विचारु लागतात. अभिजीत सर्वांना थांबायला सांगतो. प्रश्न विचारायचे असतील तर संध्याकाळची वाट पहा. नुकताच प्रवास करून आलो आहे, आता मी काही बोलू शकणार नाही.

पत्रकार सहमती दर्शवतात. दुपारी जेवण झाल्यानंतर अभिजीत अनामिकासोबतच असतो. गौरी, मारिया, काजल, नम्रता, मिनाक्षी यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतात. मोठी मंडळी देखील आपल्या मुलांना आनंदी पाहून खूश असते. संध्याकाळी वडाच्या झाडाखाली पत्रकार परिषद सुरु होते.

पत्रकार, "आपण अचानक भारतात कसे आलात?"

अभिजीत, "काही वर्ष घरच्यांपासून दूर होतो. आठवण आली आणि घरी आलो."

पत्रकार, "तुम्ही असे अचानक कुठे गेला होतात?"

अभिजीत, "मला परदेशात नोकरी लागली आणि मी गेलो. अचानक नाही गेलो. दोन महिने भारतातूनच काम करायचो. तेव्हा तुम्ही माहिती घेतली की नाही, आठवत नाही."

पत्रकार, "बदमान ग्रुप सुरु झाला आहे. गाणं गाणार का?"

अभिजीत, "बदमाश ग्रुप म्हणजे कोणता म्युझिक अल्बम नाहीये. आमच्या ग्रुपचं नाव बदमाश ग्रुप आहे. तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे."

पत्रकार, "याचा अर्थ तुम्ही गाणे गाणार नाही."

अभिजीत, "अर्थातच नाही. मी गाणं गायलं याचा अर्थ बदमाश ग्रुप एकत्र आला, असा चुकीचा अर्थ काढू नका."

पत्रकार, "सलग सहा वर्ष आपण भारताबाहेर होतात. एकदाही आपण भारतात नाही आलात."

अभिजीत, "आत्तादेखील आलो नसतो. मी भारतात आलो याचं श्रेय दोन व्यक्तींना जातं. माझी मेव्हणी रुपाली आणि बदमाश ग्रुपमधील नवा चेहरा स्टिफन."

पत्रकार, "स्टिफनबद्दल काही सांगा."

अभिजीत, "स्टिफन हा माझ्यासोबत काम करतो. लवकरच त्याची तुम्हा सर्वांशी ओळख होईल."

पत्रकार, "आता काय करायचं ठरवलं आहे?"

अभिजीत, "दोन आठवड्यांची सुट्टी घेतली आहे. भारतात राहून थोडा आराम करायचं ठरवलंय. आणखी काही प्रश्न?"

पत्रकार, "बदमाश फ्रेंडस् एज्युकेशनल ट्रस्टमध्ये काही सहभाग?"

अभिजीत, "बरं झालं हा प्रश्न विचारला. मी तर विसरलोच होतो. बदमाश फ्रेंडस् एज्युकेशनल ट्रस्ट बंद होऊन नवीन संस्था सुरु होत आहे."

पत्रकार, "कोणती संस्था?"

अभिजीत, "मैत्र जीवांचे एज्युकेशनल ट्रस्ट."

पत्रकार आणि अभिजीतच्या सभोवताली असलेले सर्वजण टाळ्या वाजवतात.

शरद, "हा असा अचानक कसा काय नाव चेंज करत असतो प्रत्येक वेळी?"

अशोक, "सोड ना, चांगलं नाव आहे. मैत्र जीवांचे....."

पत्रकार परिषद संपते. दुसऱ्या दिवशी सागर आणि वृषालीदेखील येतात. दूर ऑस्ट्रेलियावरुन  अभिजीत  मित्रांसाठी भारतात येऊ शकतो तर आपण का नाही? असं म्हणून ते दोघेही मैत्र जीवांचे संस्थेमध्ये सामिल होतात. दरम्यानच्या दोन आठवड्यांमध्ये बदमाश फ्रेंडस् एज्युकेशनल ट्रस्टचं नाव बदलून मैत्र जीवांचे एज्युकेशनल ट्रस्ट करण्यात येतं.

त्या दिवसानंतर अभिजीतने स्टेजवर जाऊन गाणं गावं यासाठी कोणीही जबरदस्ती करत नाही. सागरचं सेमिनार घेणं सुरूच असतं, वृषाली त्याला साथ देते. अजय त्याच्या बिझनेसमध्ये पूर्ण लक्ष देतो. काजल आणि रुपाली एकत्र शिक्षण घेतात. शरद आणि अशोक प्रसादसोबत ट्रस्ट सांभाळतात. मिनाक्षी घर सांभाळते. अभिजीत आणि स्टिफन दोघे गौरी आणि मारियाला घेऊन पुन्हा ऑस्ट्रेलियाला जातात. घरी बसून काही न काही करणारी गौरी ऑस्ट्रेलियामध्येच फॅशन डिझायनिंगची अॅकॅडमी सुरु करते. करते ते ठिक. पण अभिजीत देखील तिने निवडलेले आणि डिझाईन केलेले कपडे घालत असते. ती जसं बोलेल, जसं सांगेल अगदी तसंच राहत होता तो. अभिजीत, अजय, स्टिफन, सागर चौघेही ट्रस्टला पैसा उपलब्ध करुन देण्याचं काम करतात. आता तो ग्रुप महिन्यातुन एक दिवस तरी एकत्र येऊन तीच जुनी मस्ती करत होता. स्टिफनदेखील एकदा गरिबाच्या वाड्यावर जाऊन येतो.

स्टिफनने दाखवलं होतं एका ठिकाणी काम करुन थोडं थोडं गोड बोलून मैत्री होत नसते. ते तर सोबतीने काम करत असताना वातावरण व्यवस्थित असावं यासाठी एक तात्पुरतं नातं तयार होत असतं. जसं ते लिझाचं स्टिफन आणि अभिजीतसोबत होतं. स्टिफनने देखील अभिजीतसोबत कामापुरतंच नातं ठेवलं असतं तर रुपाली तिच्या आईला पुन्हा भेटली नसती. अभिजीतचे आईवडील अभिजीत आणि गौरीला त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी आशिर्वाद देऊ शकले नसते. अनामिका अभिजीतच्या खांद्यावर खेळली नसती. लहानपणी एकमेकांसोबत शाळेत जाणारे आणि प्रत्येक सुख-दुःखात एकमेकांसोबत असणारे अभिजीत-प्रसाद-अजय पुन्हा एकत्र आलेच नसते. मैत्रीची व्याप्ती किती मोठी आहे हे स्टिफनने दाखवून दिलं. स्टिफनच्या मैत्रीने सुवर्णाच्या प्रेमावर मात केली.

उन्हाळ्यानंतर पावसाळा येत होता, पावसाळ्यात पाण्याचे थेंब जमिनीवर येत होते, थंड हवेची झुळूक स्पर्श करत अंगावर शहारा आणत होती, तुळशीतलं रोप वाढत होतं, पक्षी आकाशात उडत होते, घड्याळाचा काटा पुढे सरकत होता आणि जुने मित्र एकमेकांसोबत खूश होते. पुढे अनेक वर्ष निघून जातात. गुगलमधून निवृत्त होऊन अभिजीत आणि गौरी त्यांच्या दोन मुलांसह भारतात कायमच्या वास्तव्यासाठी नाशिक येथे त्यांच्या मुळ गावी येतात.

एके दिवशी सहजच अभिजीत त्याच्या अलिबागच्या नव्या फार्महाऊसवर जातो. साठ वर्षांच्या त्या अभिजीतच्या डोक्यावरचे केस पिकले होते, तरीही काळ्या केसांचा छोटासा पट्टा त्याच्या डोक्यावर शिल्लक होता. आता त्याने फ्रेंच कट मिशी ठेवली होती. डोळ्याला सतत चश्मा असायचा. पांढरा शर्ट, त्यावर निळ्या रंगाच्या बारीक रेषा, काळ्या रंगाचा लेंगा आणि त्यावर अगदी जुन्या काळात घालत तसा लांबलचक काळा कोट घालून तो घरात आरामखुर्चीवर बसून तिथल्या म्युझिक प्लेयरवर स्वतः गायलेले गाणे ऐकत होता. घरात इतर कोणीही नसल्याने त्याने सर्व दिवे बंद केले होते. त्याच्यासोबतचे इतर सर्वजन दोन दिवसांनंतर येणार होते. गौरीने भारतामध्ये देखील फॅशन डिझायनिंगचं काम सुरु केलेलं असल्याने ती त्यांच्या मुलांसह नाशिक येथेच थांबलेली होती. दोन दिवसांनंतर ती देखील अभिजीतला भेटायला येणार होती. अलिबागच्या त्या फार्महाऊसवर स्वतःला प्रकाश मिळावा यासाठी अभिजीतने एक छोटासा बल्ब पेटत ठेवलेला असतो. गाणे ऐकत असताना त्याचे डोळे भरुन येतात. अचानक दरवाजा वाजू लागतो. अभिजीत उठतो आणि दरवाजा उघडतो. समोर एक वीस-बावीस वर्षांचा तरुण मुलगा उभा असतो.

अभिजीत, "बोल बाळा..."

आदित्य, "नमस्कार सर, मी आदित्य. आमच्या एका मैत्रिणीने इथे समोरच्या हॉटेलमध्ये रुम बूक केला होता. हॉटेलमधल्या मालकाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही पहिल्यांदाच अलिबागला आलो आहोत. आपण आम्हाला काही मदत करु शकता का?"

अभिजीत, "सोबत कोण कोण आहे?"

आदित्य, "आम्ही पाच मुलं आणि चार मुली आहोत."

अभिजीत, "आजची रात्र इथेच थांबा. आपलंच घर समज. मी एकटाच होतो म्हणून दिवे बंद केले होते. घरी राहण्याची, जेवणाची सगळी सोय आहे."

आदित्य, "धन्यवाद! धन्यवाद काका."

एवढं बोलून तो आपल्या मित्रांना फोन करतो.

आदित्य, "हॅलो प्रेम, समोर प्रकाश दिसतोय ना! तिथे सगळ्यांना घेऊन ये. राहण्याची व्यवस्था झालीये."

प्रेम, "अरे मुली आहेत आपल्यासोबत."

आदित्य, "इथे ये. काकांना भेट. सगळ्यांना बरं वाटेल."

प्रेम फोन ठेवतो आणि सर्वांना गाडीमध्ये बसायला सांगतो. तिथून पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या अभिजीतच्या घरात ती मुलं शिरतात. अंधार असून देखील ते घर भिती वाटण्यासारखं नव्हतं. आदित्यसोबत अभिजीत बाहेर आलेला असतो.

सुनिता, "कुठे आलोय आपण? मला तर भितीच वाटते."

प्रेम, "हो. ते बघ. घराला नाव काय दिलंय? गरिबाचा वाडा २. हे काय नवीन?"

आदित्य, "नाव सोडा रे. नावात काय आहे? ही खूप मोठी व्यक्ती आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गुगल वेबसाईटवर जॉबला होते हे. एकटेच आहेत म्हणून त्यांनी बल्ब चालू ठेवला होता. घाबरण्याचं काही कारण नाहीये."

प्रेम, "सर, बाकीचे बल्ब चालू केले तर मुलींना जरा बरं वाटेल."

अभिजीत, "नक्कीच. वीज आहे. गरज असेल तेव्हा मी ती वापरत असतो. तुम्ही सगळे आलात. माझ्या मुलांसारखेच आहात तुम्ही. या, बसा. आपलंच घर समजा." एवढं बोलून तो स्वीच ऑन करतात. घरी सर्व दिवे प्रकाशित होतात. उजेड पाहून मुलींना बरं वाटतं.

अभिजीत, "बसा मुलींनो. पाणी हवं का तुम्हाला?"

सुनिता, "नको."

आदित्य, "तुम्ही एकटेच राहता का?"

अभिजीत, "नाही तर, मी नाशिकला माझी पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. इथे कधीतरीच येतो. आणि इथे आल्यानंतर हे बघा. माझं पुस्तकांचं कपाट. हे सगळे पुस्तकं आहेत ना माझ्या सोबतीला."

सुनिता, "तो फोटो कुणाचा आहे?"

अभिजीत, "ती माझी पत्नी आहे. गौरी."

सुनिता, "गौरी? म्हणजे गौरी देशमुख का?"

अभिजीत, "हो."

सुनिता, "सर, मी जो ड्रेस घातलाय ना! तो यांनीच डिझाईन केला आहे."

अभिजीत, "अरे वा! ती खुप हुशार आणि समजूतदार आहे. घरातील आणि मनातील प्रत्येक गोष्ट सांभाळून ठेवते ती.माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटात ती नेहमी माझ्यासोबत होती आणि आहे."

सुनिता, "आत्ता कुठे आहेत त्या?"

अभिजीत, "आमच्या मुलांना सांभाळतेय ती. खुप काळजी घेते. म्हणून तर बघा, किती निश्चींत आहे मी इथे."

सुनिता, "खुप प्रेम आहे वाटतं तुमचं त्यांच्यावर."

अभिजीत हसतो, "दोन दिवसांनी येईल ती इथे."

सुनिता, "मग दोन दिवस तुम्ही काय करणार?"

अभिजीत, "दोन दिवस मी एकटाच."

सुनिता, "तुम्हाला खरंच भिती नाही वाटत का? तुमचे कोणी मित्र नाहीत का?"

अभिजीत, "जगातील सर्वांत चांगला मित्र आहे माझ्याकडे. आणि ते म्हणजे पुस्तकं. खरा मित्र तोच असतो जो आपल्याला सतत काही ना काही शिकवत असतो, आपल्या चुका, कमतरता आपल्याला समजावून त्यांवर मात करायला शिकवतो. आईवडील आपल्याला लाहानाचं मोठं करतात, शिक्षक ज्ञान देतात पण मित्र आपल्याला जगायला शिकवतो. एक बळ मिळतं, एक विश्वास मिळतो आपल्याला आपल्या मित्राकडून. काही गोष्टी आपण फक्त मित्रांजवळच मांडू शकतो. मला खरंच माझ्या सर्व मित्रांवर गर्व आहे. आजदेखील ते सगळे माझ्यासोबत आहेत. तुम्ही सर्वजण आज रात्री इथे आहात. दोन दिवसांनंतर ते सर्वजण इथे असतील. मग आम्ही देखील तुमच्यासारखीच मस्ती करु. एक गंमत सांगू?"

सगळे उत्सूकतेपोटी होकारार्थी मान हलवतात.

अभिजीत, ‘मी जिच्याशी लग्न केलं ती माझी पत्नी गौरी, तीदेखील अगोदर माझी मैत्रिणच होती."

सगळे हसू लागतात.

आदित्य, "तुम्ही तर खूप गंमतशीर आहात काका."

अभिजीत थोडं थांबतो आणि स्वतःशी हसत म्हणतो,

"तुम्ही मला अन्ना म्हणू शकता."

- समाप्त -

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका मनोगत मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’ प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात प्रकरण २ : विरहातील पहिला भाग प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने प्रकरण ७: अंधूक आशा प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात प्रकरण १३: विवाहाचं रहस्य प्रकरण १४: वडीलांचा आधार प्रकरण १५: देशप्रेम प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात