Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये

गौरी, "कुणाचा फोन होता?"

अभिजीत, "स्टि.चा"

गौरी, "शी बाबा. सुट्टीच्या वेळी सुध्दा कामाच असतं तुमचं."

अभिजीत, "नाही गं. त्याचा काहीतरी पर्सनल होतं. त्याला मानसिक धीर हवा होता."

गौरी तोंड वाकडं करते आणि गॅलरीमधून उठून बेडरुममध्ये जाऊन बेडवर पडते. अभिजीत तिची समजूत काढण्यासाठी तिच्या मागे जातो. तिला बेडवर पडलेलं पाहून त्याच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. छातीचे ठोके वाढायला लागतात. श्वास जरा जड होतो. त्या दोघांशिवाय तिथे कोणीही नसतं. त्याने काहीही केलं तरी त्याला अडवायला कोणीही नसतं. अभिजीत हळूच तिच्याकडे सरकतो. तो जवळ आला आहे हे ती ओळखते आणि गालातल्या गालात हसते. पण तीचे डोळे बंद असतात. तो आणखी जवळ सरकतो, तिचे केस कानावरुन बाजूला सरकावतो. मग ती त्याच्याकडे वळते. दोघेही थोडा वेळ एकमेकांकडे बघत राहतात. नजर एकमेकांत इतकी गुंतते की, लाजतच ती डोळे बंद करते. तो आणखी पुढे सरसावतो आणि दोघेही प्रणयाला सुरुवात करणार इतक्यात अभिजीतला काहीतरी आठवतं आणि तो लगेच मागे होतो.

ती डोळे उघडते आणि नजरेने त्याला कारण विचारते. तो काही बोलत नाही आणि तसाच बेडरुममधून बाहेर निघून जातो. गौरी त्याला काही बोलत नाही. तो तिच्या जवळ का येत नाही याचं कारण तिला माहित असतं, तो जितका तिच्या जवळ येतो तितकाच जास्त त्रास त्याला होत असतो. त्याच्या भुतकाळातील आठवणी एकदम जिवंत होतात. तिने जर त्याला जबरदस्तीने जवळ आणलं तर, त्याच्यामध्ये झालेला हा बदल जास्त दिवस राहणार नाही. तो स्वतःचं काहीही करुन घेईल. भुतकाळातील आठवणी ताज्या करत ती तशीच गुडघ्यांवर डोकं टेकवून बसते.

दोन तासांनंतर अभिजीत परत येतो. तेव्हा,

गौरी, "आपण परत जाऊ ऑस्ट्रेलियाला."

अभिजीत, "अगं पण आपण आठवडाभरासाठी इथे आलोय."

गौरी, "....." तीने काही बोलण्याची आवश्यकता नव्हतीच. तिचा चेहरा स्पष्टपणे बोलत होता. त्याला वाटलं, 'ठिक आहे, परत जाऊ आपण' पण नंतर विचार केला, लग्नानंतर पहिल्यांदाच कुठेतरी बाहेर आलोय. उगाचच एका गोष्टीमुळे आनंद कमी होता कामा नये, असे त्याला वाटले आणि तो तिच्या शेजारी जाऊन बसला,

अभिजीत, "थांबूया ना थोडं. जर्मनीला बघण्यासारखं खूप काही आहे. तुझ्यामुळे मी सुध्दा पहिल्यांदाच आलोय इथे. थोडं बाहेर फिरुया. वाटल्यास दोन दिवस अगोदर निघू. पण आत्ता नको."

ती पुन्हा त्याच्याकडे बघते.

अभिजीत, "मगाशी जे काही झालं त्यासाठी सॉरी."

गौरी, "सॉरी कशाला? मी समजू शकते."

अभिजीत, "खूश आहेस ना माझ्यासोबत?"

गौरी, "हो..."

अभिजीत, "खरंच...?"

गौरी, "हो. खरंच."

माझ्या मनाचं समाधान व्हावं यासाठी ती 'हो' म्हणतेय हे तो लगेच ओळखतो. आणि त्याच्या मनात आलेली शंका ती देखील ओळखते. मग ती त्याच्या जवळ हळूच सरकते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याला समजावत म्हणते,

"खरंच मी खूप खूश आहे तुमच्यासोबत. तुमच्याकडे पाहिलं की मला जुन्या गोष्टी आठवाव्याशा वाटत नाही. मागे तुमच्यासोबत जे काही वाईट झालं याची पूर्ण जाणिव मला आहे. आणि कधी कधी माझ्या अशा वागण्याने तुम्हाला तिची आठवण येते, हे देखील मला माहित आहे. तरीही का ते कळत नाही. पण...." तिच्याजवळचे शब्द संपतात. ती त्याच्या हाताला घट्ट पकडते. तो फक्त तिच्या हातावर हात ठेवतो आणि मग तिच्या डोळ्यात बघत म्हणतो,

"सॉरी."

गौरी, "आता प्लिज मागच्या गोष्टी काढू नका."

अभिजीत, "मग असा चेहरा करु नकोस ना! मला सुध्दा त्रास होतो."

गौरी, "ठिक आहे. नाही करत. मग आता?"

अभिजीत, "आता काय?"

गौरी, "फिरायला कुठे जायचं?"

अभिजीत, "तू बोलशीत तिथे जाऊ."

गौरी, "मला इथले चांगले स्पॉट्स दाखवायचे. सगळेच्या सगळे."

अभिजीत, "सगळे?"

गौरी, "होऽऽ..."

अभिजीत, "ठिक आहे. चल मग..."

गौरी, "कुठे?"

अभिजीत, "नॉयश्वानस्टाइनचा राजवाडा पहायला."

काहीतरी वेगळं पहायला मिळतंय हे पाहून ती लगेच तयार होते. दोघे हॉटेलमधून बाहेर निघतात. नॉयश्वानस्टाइन हे जर्मनीतील बायर्न राज्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. हे स्थळ जर्मनी व ऑस्ट्रिया यांच्या सीमेलगत असून आल्प्स पर्वताच्या पायथ्याच्या डोंगररांगामध्ये आहे. गाडी ह्योहेनश्वांगाउ गावाजवळ थांबते. तेथून राजवाड्याकडे पायी अथवा बग्गीचे जावं लागतं.

अभिजीत, गौरी आणि दोघांना घेऊन जाणारा त्या गावातील एक मुलगा राजवाड्याच्या दिशेने जाऊ लागतात. तो राजवाडा म्हणजे स्थापत्यातील एक उत्कृष्ट आविष्कार आहे. त्याची सौंदर्यता इतकी प्रभावशाली होती की लांबूनच गौरी त्याच्या प्रेमात पडली.

गौरी, "वॉव.... काय हॉरिबल राजवाडा आहे हा!"

अभिजीत, "हॉरिबल? खूप दिवसांनी हा शब्द ऐकला तुझ्या तोंडून."

गौरीचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे नसतं. ती फक्त तो राजवाडा पाहत असते. दोघे राजवाड्याजवळ पोहोचतात. तो प्रशस्त राजवाडा पाहून ती थक्कच होते. मग अभिजीत तिला त्या राजवाड्याची माहिती सांगतो.

अभिजीत, "ही जागा केवळ एकाच कारणासाठी प्रसिध्द आहे. ते म्हणजे हा राजवाडा बव्हेरियाचा राजा लुडविग याने महान जर्मन संगीतकार रिचर्ड वागनर याला सन्मानित करण्यासाठी आणि विश्रामस्थळ म्हणून बांधला होता. पण राजा लुडविगचं निधन हा राजवाडा बांधण्याअगोदरच झालं. म्हणून या राजवाड्याचा वापर खराखूरा राजवाडा म्हणून कधीच झाला नाही. या राजवाड्याचं स्थापत्य सर्वांना आकर्षित करतं. काहींच्या मते आधुनिक काळातील बांधलेला हा 'परी-महाल' आहे. २०११ साली इंटरनेटवर झालेल्या जागतिक आश्चर्यांच्या यादीमध्ये जर्मनीतर्फे या राजवाड्याला नामांकन मिळालं होतं."

गौरी, "तुम्हाला कसं माहित?"

अभिजीत, "मघाशी तो मुलगा मला म्हणाला."

गौरी, "मी पण तर तिथेच होते. इंग्रजीमध्ये तर बोलत नव्हता."

अभिजीत, "आम्ही जर्मन भाषेत बोलत होतो."

गौरी त्या मुलाला म्हणते, "It's very nice place in this world. I feel like heaven here."

मुलगा, was sagen Sie?  (आपण काय म्हणाल्यात मला समजलं नाही.)"

गौरी अभिजीतकडे बघते.

अभिजीत, "Sie sagen, es ist sehr schöner Ort." (ती म्हणते, तिला ही जागा आवडली.)"

मुलगा स्मितहास्य करत, "Dank verpassen." (आपला आभारी आहे.)"

गौरी अभिजीतकडे बघत तोंड वाकडं करते. नंतर ती त्या राजवाड्यात मनसोक्त फिरते. अभिजीतने खूप वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहिलेला असतो. राजवाड्यातील कोरीव काम बघत असताना त्या राजवाड्यातील राणीप्रमाणे ती वावरत होती आणि हे पाहून अभिजीत गालातल्या गालात हसत होता. हसत कुठे होता? तो खऱ्या अर्थाने तिच्या प्रेमात पडू लागला होता.

दुसऱ्या दिवशी दोघे म्युन्शेन शहरात जातात. जर्मनीतील बर्लिन आणि हॅंम्बर्गनंतर ते तिसरे मोठे शहर आहे. बव्हेरियन आल्पस्च्या पायथ्याशी हे शहर वसलेल आहे व इसार नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या म्युनिक जवळ अनेक पर्यटन स्थळं आहेत. तसेच हे शहर संग्रहालयाचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ड्यॉइचे म्युझियम, विमानांचे संग्रहालय अशी ठिकाणे दोघेही फिरतात. बी.एम.डब्ल्यु. या वाहन निर्मिती करत असलेल्या कंपनीचा कारखाना बघून गौरीच्या डोळे दिपून जातात. पुढचे दोन दिवस ते दोघं ऑलिंपिक पार्क, अलायंझ अरेना, श्लिसहाईमचा राजवाडा, बव्हेरियाचा पुतळा, राठ हाऊस (टाऊनहॉल) अशी ठिकाणं फिरतात. दरम्यान गौरी हरवते सुध्दा, पण नंतर ती अभिजीतला सापडते. म्युन्शेन परिसर फिरत असताना गौरी मनसोक्त खरेदी करते.

गौरी, "शी बाबा. मी काय बोलते कुणालाच काही कळत नाही. मी इंग्रजीतच तर बोलते, ते सुद्धा इथल्या लोकांना कळत नाही. मला वाटायचं आपल्या भारतातच लोकांना इंग्रजी येत नाही. इथे तर सगळेच अडाणी आहेत."

अभिजीत, "इथल्या लोकांना इंग्रजी येत नाही. सगळे व्यवहार जर्मन भाषेतच होतात. बाहेरच्या व्यक्तीला इथे यायचं असेल तर जर्मन भाषा यायलाच हवी. नाहीतर त्या व्यक्तीचं काही खरं नाही."

गौरी, "उगाच आलो आपण इथे."

अभिजीत, "जागा तूच निवडलीस. आणि दुसऱ्या कोणत्याही देशात गेलो असतो तरी हाच प्रॉब्लेम आला असता. इथले सगळे देश आपापल्या देशांच्या राष्ट्रभाषेवर प्रेम करतात. तरी तुला काही बोलायचं असेल तर मला सांग. मी त्यांना सांगेन."

गौरी, "आता मला जे त्यांना सांगायचंय ते मी तुम्हाला का सांगू?"

अभिजीत तोंड वाकडं करतो. थोडा विचार करतो आणि आपला टॅब काढतो.

अभिजीत, "हे घे. तुला जे काही बोलायचंय ते इथे इंग्रजीमध्ये टाईप कर आणि 'डन' ऑप्शनला क्लिक कर. मग जे शब्द येतील ते समोरच्या व्यक्तीला बोल. त्यांना कळेल ते."

एका लहान मुलीप्रमाणे ती अभिजीतच्या हातून टॅब हिसकावून घेते. मग दिवसभर त्यावर काही ना काही टाईप करुन तिथल्या लोकांशी ती संवाद साधायची. स्थानिक लोकांशी तीचं बोलणं पाहून अभिजीतला देखील बरं वाटतं. मग तिला आणखी काही लोकांशी बोलावसं वाटलं. ती अभिजीतला गाडी न घेता पायी चालायला सांगते. दोघेही जर्मनीच्या रस्त्यांवरुन चालू लागतात. मग एका लांबलचक भिंतीच्या अवशेषाजवळ येऊन दोघेही थांबतात.

गौरी, "हे काय आहे?"

अभिजीत, "काही वर्षांपूर्वी इथे बर्लिन वॉल होती."

गौरी, "चायना वॉलसारखी?"

अभिजीत, "चीनची भिंत देशाच्या संरक्षणासाठी होती आणि ही भिंत देशाच्या विभाजनासाठी होती."

गौरी, "म्हणजे?"

तो तिला तेथे असलेल्या एका बाकावर बसवतो आणि तिच्या बाजूला बसून बोलतो, "बर्लिन भिंत ही बर्लिन या शहराच्या विभाजनासाठी बांधली होती. दुसऱ्या महायुध्दात जर्मनीचं खूप नुकसान झालं.  नंतर जर्मनीचा भूभाग ४ देशांनी व्यापला होता. त्यांपैकी तीन भाग जे ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या ताब्यात होते ते एकत्र करुन २३ मे १९४९ रोजी त्याचे पश्चिम जर्मनी (Federal Republic of Germany - FRG) असे नामकरण करण्यात आले, तर ७ ऑक्टोबर १९४९ रोजी सोव्हिएत संघाच्या ताब्यातील भाग पूर्व जर्मनी (German Democratic Republic - GDR) म्हणून जाहीर करण्यात आला. पश्चिम जर्मनीने अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सच्या संयुक्त मदतीने महायुध्दानंतर झपाट्याने आर्थिक प्रगती केली, तर पूर्व जर्मनीने सोव्हिएत महासंघाच्या पावलावर पाऊल टाकून आर्थिक व सामाजिक वाटचाल केली. शेवटी पूर्व आणि पश्चिम जर्मनीदरम्यान ४० वर्षांत खूप मोठा आर्थिक फरक निर्माण झाला. पूर्व जर्मनीमधील कम्युनिस्ट राजवटीने १९६१ साली पश्चिम बर्लिनला पूर्णपणे वेढून टाकणारी ही भिंत बांधली. पूर्व जर्मनीमधून होणारे जर्मन नागरिकांचे पलायन थांबवणे ह्या भिंतीचा मुख्य उद्देश होता. बर्लिनची भिंत बांधण्यापूर्वी १९४५ ते १९६१ दरम्यान अंदाजे ३५ लाख पूर्व जर्मन नागरिकांनी पश्चिम जर्मनीमध्ये स्थलांतर केले होते. ही भिंत बांधल्यानंतर ते बंद झालं. मग ९ ऑक्टोबर १९८९ रोजी पूर्व व पश्चिम जर्मनीमधील करारानुसार नागरिकांना सीमा ओलांडून जाण्याची परवानगी देण्यात आली. मग ही भिंत टप्प्याटप्प्याने पूर्णपणे पाडली गेली."

"किती बारिक अभ्यास आहे हो तुमचा...!" डोळ्याची पापणी न हलवत, भुवया उंचावत गौरी म्हणते.

अभिजीत, "अभ्यास कसला? समोर त्या बोर्डावर जे लिहीलंय ते तूला वाचून सांगतोय."

गौरी चिडते, "जाऽऽ... बोलूच नका माझ्यासोबत. कट्टी." आणि निघून जाते.

अभिजीत हसतच तिच्या पाठीमागे जातो. हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत तो तिची समजून काढत असतो. तरीही ती काही बोलत नाही. रागातच ती रुममध्ये जाते आणि दरवाजा बंद करते. अभिजीत समोरच्या रुममध्ये डोक्याला हात लावून बसतो. नंतर स्वतःशीच हसतो. थोडा वेळ स्वस्थ बसतो आणि स्वतःशीच म्हणतो, 'गौरीने खरंच सुवर्णाची जागा घेतली.'

त्याला जुने दिवस आठवतात. कोणत्या परिस्थित लग्न झालं हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर येतं. मग मनाशी पक्क करुन तो गौरीच्या मनाप्रमाणे वागण्याचा निर्धार करतो. थोड्या वेळाने ती बाहेर येते आणि कान पकडून त्याला 'सॉरी' म्हणते. जूने दूःख विसरुन आता पुढचं आयुष्य तिच्यासोबत जगायचं हा विचार करुन तो सोफ्यावरुन उठतो. तिच्याजवळ जाऊन तिला आपल्या दोन्ही हातांनी उचलून बेडरुममध्ये घेऊन जातो. दरवाजा बंद करुन तो आपल्या  नवीन आयुष्याला सुरुवात करतो.

दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये मित्राच्या आयुष्यात तोच बदल करण्यासाठी स्टिफन रुपालीकडून अभिजीतच्या भुतकाळाची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण ती कोणत्याही गोष्टीचा खुलासा करत नाही. खूप विनवण्या केल्यानंतर ती फक्त अभिजीतच्या मित्रांची नावं सांगते. स्टिफनसारख्या कुशाग्र बुध्दिच्या व्यक्तीमत्वासाठी त्या सर्वांची नावं मिळणं हेच खूप मोठं असतं.

घरी गेल्यानंतर तो अभिजीतच्या नावाने सर्च करतो (शोध घेतो) तेव्हा 'झिरो रिझल्ट' येतो. ऑफिसमध्ये रात्रीदेखील काम चालत असल्याने तो आपल्या घरातून निघतो, गाडी काढतो आणि ऑफिस गाठतो. तो सरळ अभिजीतच्या कॅबीनमध्ये जातो. तिथे अभिजीतने त्याला सांगितलेला पासवर्ड टाकून त्याला अभिजीतबाबत थोडीफार माहिती मिळते. कुणीही त्याला न शोधावं यासाठी त्याने आपल्या नावाचा सर्च ब्लॉक केलेला असतो. स्टिफन ते अनब्लॉक करतो आणि अभिजीतच्या नावाने पुन्हा एकदा सर्च करतो. स्टिफनला त्याच्या अपेक्षेपेक्षा मोठा रिझल्ट मिळतो.

एकूण ७,४३,२८,९१८ रिझल्टस् (निकाल) त्याच्या समोर येतात. तो एक-एक पान व्यवस्थित वाचतो. त्याला कळतं. आठ वर्षांपूर्वी अभिजीत आणि त्याच्या मित्रांनी एका म्युझिक बॅंण्डची स्थापना केली होती. पाच वर्षांपूर्वी तो मोठ्या वादामुळे बंद झाला. अभिजीतच्या मद्यपानाच्या बातम्यादेखील त्याने वाचल्या. इंटरनेटच्या माध्यमाने त्याला एक गोष्ट कळली. बदमाश ग्रुप नावाचा एक नावाजलेला ग्रुप होता ज्यामध्ये अभिजीत, गौरी त्यांचे मित्र अशोक, अजय, शरद, प्रसाद, वृषाली यांच्यासोबत खूश होते. त्यांनी परिस्थितीवर मात करुन बेरोजगारी वाढत असलेल्या, नोकऱ्यांना मुकणाऱ्या देशात संगीताच्या आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमाने तरुणाईच्या हृदयात घर केलं होतं. पुढे अचानक अभिजीत वेगळंच वागू लागला, अजयने ग्रुप सोडला, वृषाली आणि गौरीचं भांडण झालं, प्रसाद खूप महत्वाकांक्षा आणि आशा बाळगून होता. पण त्याची देखील निराशा झाली. अभिजीतची लोकप्रियता कमी झाली. त्यांच्या ग्रुपचे फोटो फाडण्यात आले, देशाबाबत वाईट शब्द वापरल्याने आणि सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याने अभिजीतच्या विरोधात अनेक आरोप दाखल करण्यात आले, मग ग्रुप बंद झाला, ग्रुपच्या माध्यमातून होणारे समाजकार्य बंद झालं. सगळेच अचानक गायब होतात. कोण कुठे आहे याची कल्पना नसते. अजय दिल्ली येथे स्थायिक होतो. पण तो ग्रुप बद्दल बोलायला नकार देतो. त्याच्या व्यतिरीक्त कुणाचीही माहिती इंटरनेटवर उपलब्ध नसते.

तर एवढं सगळं इतकं भयानक आणि मोठ्ठं घडलं याची स्टिफनला काही माहिती नव्हती. पाच वर्षांत अभिजीत सुध्दा त्याच्याशी या गोष्टीवर काही बोलला नव्हता. तो असं वागत होता, जसं की काही झालेलंच नाही. थोडं थांबून स्टिफन अभिजीतचा अनब्लॉक केलेला आय. डी. पुन्हा ब्लॉक करतो. कंप्युटर बंद करुन तो ऑफिसमधून निघतो. गाडी चालवत पुन्हा घरी जातो. बाल्कनीमध्ये जाऊन तो पुन्हा विचारात पडतो.

भुतकाळात अभिजीत आणि गौरीच्या आयुष्यात जे काही झालं हे त्याचा ते दोघेही वर्तमानावर काही परिणाम करुन घेत नाहीत. तर मग आपण कशाला त्यांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करायची? जे काही चाललंय ते तसंच चालू देऊया. अभिजीतचा भुतकाळ माहित करुन घ्यायचा होता ना! झाला माहित. मग आता त्याच गोष्टीचा विचार का म्हणून करत बसू? नाही, विचार करावा लागेल. पुर्वी तो त्याचं आयुष्य जगत होता आणि खूप चांगलं जगत होता. त्याचा चेहरा म्हणजे एक सकारात्मक विचारांचं चिन्हच होतं. ईश्वराने मानवाची निर्मीती केली तेव्हा माणूस हा त्याच्यासारखाच असावा असेच ईश्वराच्या मनात आले असेल आणि अभिजीत त्या विश्वासावर योग्य उतरला होता. त्याचे मित्र त्याला प्राणापेक्षाही प्रिय होते. मित्र गेले आणि त्याच्या आयुष्यातील रंगच निघून गेले. मला जर त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा रंग आणता आले तर नक्कीच माझ्या हृदयाला बरं वाटेल. पाच वर्षांच्या मैत्रीवर मी खरा उतरलोय, असंच माझ्या मनाला वाटेल. त्याच्या अडचणींच्या वेळेला कायम त्याच्यासोबत असलेले मित्र त्याच्यासोबत पुन्हा एकत्र आले तर त्याला नक्कीच आनंद होईल. यासाठी मी काहीतरी नक्की करायला हवं. हो, मी करणारच. अभिजीतच्या मित्रांचा शोध घेण्यासाठी मला भारतात जायला हवं. मी जाणार भारतात. माझा आवडता देश आहे तो.

स्टिफन हे लहानपणापासूनच मेहनतीवर विश्वास ठेवणारं आणि सकारात्मक विचार घेऊन जगणारं व्यक्तिमत्व असतं. त्याचे वडील शाळेत शिक्षक होते. साहाजिकच त्याच्यावर चांगले संस्कार झाले होते. गुगलमध्ये रुजू झाल्यानंतर काही महिन्यांतच तो विवाहबध्द झाला. नोकरी करत असताना तो आपलं घर व्यवस्थितपणे सांभाळत होता. तो आठवड्यातून एक दिवस तरी चर्चमध्ये जात असे. त्याच्या पत्नीला लहानपणीच शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागल्याने त्या दोघांना मुल होऊ शकणार नव्हतं. पण या गोष्टीमुळे स्टिफनने आपल्या पत्नीवरील प्रेमात कोणतीही कसर सोडली नाही. त्याने तिला इतकं प्रेम दिलं की, त्या दोघांनाही मुल नसण्याचा कधी त्रास झाला नाही. त्याचप्रमाणे त्याने आपल्या कामात देखील विशेष प्राविण्य मिळवलं होतं. त्याला इंग्रजीबरोबरच स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तूगीज, हिंदी, तमिळ भाषा समजत होती. अभिजीतच्या सहवासात राहून त्याला मराठी समजू लागलं होतं. कधी कधी ते दोघे मराठीतच बोलत. जेव्हा अभिजीत ऑस्ट्रेलियाला आला तेव्हा स्टिफन हाच त्याचा पहिला मित्र होता आणि बहूतेक 'शेवटचा देखील. स्टिफनने अभिजीतसोबत कामाव्यतिरीक्त मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्याच्या मैत्रीत इतकं प्रेम होतं की, मैत्रीसाठी अभिजीतला ऑस्ट्रेलियामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याची गरज भासली नाही. आणि आज जेव्हा त्याला अभिजीतच्या भुतकाळाबाबत समजलं तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्याने अभिजीतला आणि त्याच्या मित्रांना पुन्हा एकत्र आणण्याचा निश्चय केला. ह्या कामासाठी रुपालीची मदत घ्यावी असं त्याला सुरुवातीला वाटलं. पण नंतर त्याने थोडा वेगळा विचार केला. रुपाली त्याला म्हणाली होती, 'एक वेळ जगातील सर्व भेद, युध्द, कलह संपतील. पण अभिजीत आणि गौरी पुन्हा त्या देशात जाणार नाहीत.'

स्टिफन स्वतःसमोर आव्हान ठेवतो की, रुपालीचा तो शब्द खोटा ठरवायचा. भुतकाळात विभक्त झालेले मित्र पुन्हा एकदा एकत्र आणायचे. रात्रभर तो झोपत नाही. तो प्रसाद, अजय, शरद, अशोक आणि वृषाली यांच्याबाबत बरीच माहिती मिळवतो. बराच वेळ कंप्युटरसमोर बसल्यानंतर पहाटे तो झोपतो. सकाळी लवकर उठून तो ऑफिसला जातो. ऑफिसमध्ये किती काम बाकी आहे हे तो पाहतो. अभिजीतला यायला एक दिवस शिल्लक असतो. त्यामुळे त्याला भरपूर कामं करायची असतात. संध्याकाळपर्यंत त्याची कामं पूर्ण होतात. त्याच वेळी ऑफिसमध्ये बसून त्याने भारत दौरा करण्याचं नियोजन तयार केलेलं असते.

मध्यरात्री अभिजीत आणि गौरी जर्मनीवरुन घरी येतात. रुपाली तिची मैत्रिण सेरेना सोबत विमानतळावर आलेली असते. जर्मनीमध्ये मिळालेला एकांत त्या दोघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दोघांच्या आयुष्यात पुन्हा नव्याने रंग भरले होते. ह्या क्षणाला स्टिफन तिथे असायला हवा होता, अभिजीतचा प्रसन्न चेहरा पाहून त्याने भारत दौरा रद्द केला असता. पण सुदैवाने तो त्यावेळी तिथे नव्हता. मुद्दाम त्याने अभिजीतला न भेटताच भारतात जाण्याचा निर्णय घेतला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अभिजीत ऑफिसमध्ये जातो तेव्हा त्याला कळतं की, दोन तासांपूर्वीच स्टिफन भारत दौऱ्यावर कार्यालयीन कामासाठी गेला आहे. जवळजवळ दोन आठवडे तो तिथेच असेल. ही गोष्ट अभिजीतला वाईट वाटते. स्टिफन भारतात गेला यापेक्षा तो मला न भेटता गेला, ही गोष्ट त्याला सतत वेदना देते. 'मी आता माझ्या पत्नीसोबत पूर्णपणे खूश आहे आणि आता मी माझ्या भुतकाळातील गोष्टींमुळे वर्तमान खराब करणार नाही. आता मी सर्वांशी प्रेमाने वागेन.' एवढंच स्टिफनला सांगायचं असतं. पण ते राहून जातं. अभिजीत आपल्या कॅबीनमध्ये जात असताना, तिथली सुपरवायझर लिझा फ्रेड्रिक चुकून त्याला आदळते.

ऑफिसमधलं सगळं काम थांबतं. कारण आता मॅडमचं काही खरं नाही, तिला आता खूप लेक्चर पडणार, असंच सर्वांना वाटतं. पण होतं भलतंच,

अभिजीत, Leeza, where are you looking? "लक्ष कुठे असतं लिझा?"

लिझा, Leeza, where are you looking? "सॉरी... सॉरी सर. खरंच चुकून धक्का लागला. माझं लक्ष नव्हतं सर."

अभिजीत, Not noticed…? Ok. Same here. So this has to be happened. "लक्ष नव्हतं...? ठिक आहे. माझं पण लक्ष नव्हतं. म्हणूनच तर धक्का लागला."

लिझाला आता भलताच धक्का बसला. अभिजीत पहिल्यांदा तिच्यावर ओरडला नव्हता. उलट स्वतःची चूक दाखवत होता.

अभिजीत, Now, I must say sorry to you! "मग आता मी सुध्दा सॉरी बोलायला पाहिजे ना!"

लिझा, No sir. "नाही सर..."

अभिजीत, No need to say sorry? "सॉरी नाही बोललो पाहीजे?"

लिझा, No sir. "नाही सर."

अभिजीत, Then why you say sorry? मग तू सॉरी का म्हणालीस?"

लिझा, "Sorry Sir."

अभिजीत, See, again you said sorry. "बघ. परत सॉरी म्हणालीस."

लिझा आणखीच दचकते. तिचा चेहरा पाहून अभिजीत त्याच्या स्टाईलने गालातल्या गालात हसतो. त्याचं हसणं पाहून तीलादेखील बरं वाटतं. तो इतका प्रभावीपणे हसतो की, ती दबक्या आवाजात त्याला म्हणते,

Sir, your smile is so cute. "सर, तुम्ही खूप गोड हसता."

I know it. Tell me something new. "माहितीये मला. काहीतरी नवीन सांग." अभिजीत हसतच तिचे गाल पकडतो आणि म्हणतो आणि तो कॅबीनमध्ये जाऊ लागतो.

जाताना तो लिझाला म्हणतो, Are you working on something? "काही काम करतेस का?"

लिझा, No sir. "नाही सर."

अभिजीत, You are in Office and there is no work? "ऑफिसमध्ये आहे आणि काम नाही?"

लिझा, No, I means is there any urgent work of yours? "नाही. म्हणजे काही काम होतं का?"

अभिजीत, Yes. Give me a report of work done in a week by my friend Stee. हो, माझ्या मित्र स्टी.ने आठवडाभर काय काय केलं त्याचा रिपोर्ट देशील."

लिझा, Yes Sir, please wait. "हो सर, लगेच देते."

अभिजीत तीला समजावत म्हणतो, Relax, there is no hurry… "आरामात. सावकाश दे. मला घाई नाहीये."

एवढं बोलून तो कॅबीनमध्ये जातो. लिझा त्याच्या कॅबीनकडे आश्चर्याने पाहत तशीच उभी राहते. नंतर ती मागे वळते तेव्हा तिथं उपस्थित सगळं ऑफिस आपलं काम बाजूला ठेवून तिच्याकडे पाहत असतं. थोड्या वेळाने ती निःशब्द होऊन स्टिफनच्या कॅबीनमध्ये जाते. त्याने आपला रिपोर्ट आपल्या टेबलावरच ठेवलेला असतो. तो रिपोर्ट घेऊन ती अभिजीतच्या कॅबीनमध्ये जाते. बाहेरुनच ती दरवाजावर थाप मारते तेव्हा,

अभिजीत, "Come inside."

लिझा, Thanks Sir, this is Steafen Sir's Report. He already completed his work. "धन्यवाद सर. हे घ्या स्टिफन सरांनी त्यांचा रिपोर्ट अगोदरपासूनच तयार करुन ठेवला होता."

अभिजीत, After all whose friend he is? "शेवटी मित्र कुणाचा?"

लिझा, Sir can I ask you something? "सर, एक विचारु?"

अभिजीत, Yes why not? "यस, विचार."

लिझा, You are totally changed after returning from Germany. "जर्मनीवरुन आल्यापासून तुम्ही खूप चेंज झालात."

अभिजीत, Oh really? "खरंच..."

लिझा जरा घाबरते.

अभिजीत, Well, Thanks at least you noticed me that otherwise I thought that I am still as it is as I was before. "बरं झालं तू सांगितलंस. मला वाटलं अजूनही मी तसाच आहे." तेव्हा लिझाच्या चेहऱ्यावरची भिती थोडीफार कमी होते.

सर आज आमच्यासोबत प्रेमाने बोलताय, वागताय. त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं झालं असेल, पण राहू दे. आपल्याला काय? आता ते व्यवस्थित आहेत ना! एवढा विचार करुन लिझा आपल्या कामाला लागते.

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका मनोगत मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’ प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात प्रकरण २ : विरहातील पहिला भाग प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने प्रकरण ७: अंधूक आशा प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात प्रकरण १३: विवाहाचं रहस्य प्रकरण १४: वडीलांचा आधार प्रकरण १५: देशप्रेम प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात