Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग

भारत (उत्तर प्रदेश): 'बुध्दा' ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेसिंग कोचवर फोर्मुला वनची शर्यत लागलेली असते. मोठमोठे उद्योगपती तेथे आलेले असतात. फेरारीपासून ते सहारा इंडियापर्यंतच्या सगळ्या वेगवान गाड्या स्पर्धेत उतरलेल्या असतात. श्रीमंतांच्या मनोरंजनासाठी असलेल्या त्या स्पर्धेच्या व्ही.आय.पी. रुममध्ये मोठमोठाल्या उद्योगधंद्यांचे व्यवस्थापक, प्रसिध्द क्रिकेटपटू, स्थानिक आमदार, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मालक आणि हिंदी सिनेमासृष्टीतील मोठमोठे कलाकार उपस्थित असतात. व्ही.आय.पी. लाईनमध्ये जरा व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला लगेच समजेल, तिथे अजय बसलेला आहे. अंगात काळा कोट आणि हातात सिगार असलेला. डोळ्यावर गॉगल आणि दाढी वाढवलेला अजय एका अस्थायी भारतीय नागरिकाप्रमाणे दिसत होता. त्यातच त्याच्या डोक्यावर असलेली हॅट, तो भारतीय नाही असे जणू काही अप्रत्यक्षपणे सांगत होती.

शर्यतीतील शेवटची फेरी अतीटतीची होते. सहारा इंडिया, किंगफिशर फास्ट आणि फेरारी एकमेकांपासून काही सेकंदांच्या अंतरावर असतात. सहारा इंडियाच्या गाडीमधील इंजिनमध्ये बिघाड झाल्याने फेरारी तिला ओव्हरटेक करते. आणि सामना रंगतदार अवस्थेत येतो, जेव्हा फाईनल लाईनजवळ पोहोचताना फेरारी आणि किंगफिशर फास्ट एकाच वेगाने धावतात. निवेदकाला देखील समजत नाही की, नक्की आता काय होणार. शेवटचे दहा सेकंदांचं अंतर बाकी असतं आणि फेरारीचा वेग ०.०१ सेकंदांनी कमी होतो. किंगफिशरची गाडी थोडक्यात पुढे जाते आणि शर्यत संपते. किंगफिशरची गाडी स्पर्धा जिंकते. सगळे उभे राहून किंगफिशरच्या संघाचे आभार मानतात. इतर गाड्यांचे प्रायोजक थोडे निराश असतात कारण त्यांना तेवढा तोटा झालेला असतो.

अजय तिथून उठून निघू लागतो. जाताना तो रेसकोर्सवर असलेल्या पत्रकारांकडे एक नजर फिरवतो, ते सर्वजण विजेत्याचे फोटो काढण्यात मग्न असतात. अजय दुसरीकडे प्रेक्षकांकडे पाहतो तर त्याला विजेत्यापेक्षाही चांगल्या प्रकारचे फोटो मिळतील अशा काही हालचाली दिसतात. पण अजय त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि तेथून निघतो.

'बुध्दा' रेसकोर्सच्या बाहेर येऊन तो पार्किंगच्या ठिकाणी जातो आणि त्याची गाडी बाहेर काढून तिथून निघून जातो. गाडी चालवत असताना अजय एफ.एम. सुरु करतो, दिल्लीतील आर.जे. नवीन सिनेमांचा रिव्युव्ह (समिक्षा) सांगत असतात. अजय दोन-तीन एफ.एम.चे स्टेशन बदलतो. गाडी चालवत असताना मध्येच सिगारचा धूर खिडकीतून बाहेर सोडतो. एकही चांगलं गाणं लागत नाही म्हणून अजय एफ.एम. बंद करतो आणि एम.पी.थ्री प्लेअर वर,

'रुठके हमसें कभी... जब चले जाओगे तुम...

ये ना सोचा था कभी... इतने याद आओगे तुम...'

गाणे ऐकू लागतो. थोड्याच वेळात तो आपल्या दिल्लीतील घरी पोहोचतो. घरी नम्रता तिच्या मैत्रिणींसोबत इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी करत असते. फ्रेश होऊन आल्यावर तो बेडरुममध्ये जाऊन त्याच्या लॅपटॉपवर व्हिडीयो चॅट सुरु करतो आणि त्याच्या कंपनीचं काम करत बसतो. रात्री नम्रता बेडरुममध्ये येते तेव्हा अजयने सिगरेटची दोन पाकीटं रिकामे केलेले असतात. तरीही तो कामातच असतो. ती त्याला जेवायला विचारतो तेव्हा तो लॅपटॉप बंद करतो आणि डायनिंग रुममध्ये जेवायला जातो.

घर तसं मोठं असतं, पण घरात ते दोघेच असल्याने, त्याहीपेक्षा त्यांच्यात व्यवस्थित सुसंवाद नसल्याने ते घर त्या दोघांनाही खायला उठतं. दोघेही शांतपणे जेवण करतात आणि काहीही न बोलता अजय परत बेडरुममध्ये जातो. रात्रभर काम करुन अजय साडेतीन वाजता झोपायला जातो तेव्हा नम्रता एका कुशीवर झोपलेली असते. तिच्याकडे थोडं पाहून अजय तिच्या बाजूला जाऊन उशीवर डोकं ठेवून थोडा वेळ विचार करत राहतो. पंधरा मिनिटांनंतर अजय झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नम्रता ऑफिसला जायची तयारी करत अजयला झोपेतून उठवते. दोघेही नाश्ता करायला पुन्हा त्याच डायनिंग टेबलवर बसतात.

नम्रता, "आज रात्री घरी यायला उशीर होईल मला."

असेच ते दोघे अधूनमधून एकमेकांशी काही कारण असेल तेव्हा बोलायचे.

"का?"

"ऑफिसमध्ये पार्टी आहे. बॉसला मुलगी झालीये म्हणून."

"गुड, विश कर त्याला माझ्याकडून सुध्दा."

"करते, प्रोजेक्ट झाला का फायनल?"

"नाही. But work in progress. I will complete my work in next two weeks."

"That's called my man. बाय द वे, एक विचारायचं होतं."

अजय टोस्ट खात, "विचार."

"बॉसला तुझ्याबद्दल माहितच आहे. त्याने जस्ट विचारलं, संध्याकाळी तू फोटो काढायला येशील का त्यांच्या मुलीचे?"

अजय तिच्याकडे रागाने बघतो. ती गप्प बसते आणि थोड्या वेळाने म्हणते, "जस्ट विचारलं त्यांनी. मी अगोदरच नाही म्हणाली त्यांना."

ज्युस पिऊन झाल्यावर अजय आणि नम्रता घरातून बाहेर निघतात. अजय गाडी बाहेर काढतो, नम्रता आपली पर्स सांभाळत गाडीत बसते. गांधीनगर येथे अजय तिला तिच्या ऑफिसजवळ सोडतो आणि त्याच्या ऑफिसला निघतो. पुन्हा अजय तेच त्याचं आवडतं जुनं गाणं ऐकतो. गाडी हायवेजवळून जात असते तेव्हा तिथे लागलेलं मोठं होर्डिंग त्याचं लक्ष वेधून घेतं. ४८ फूट उंची असलेल्या त्या होर्डिंगवर प्रसाद, अशोक आणि शरद यांचा फोटो असतो. प्रसाद मधोमध उभा असतो. काळं फॅशनेबल जॅकेट, काळा गॉगल, सेक्सी हेअरस्टाईल असा लूक असलेला प्रसाद त्या होर्डिंगवर हातात माईक घेऊन, त्याच्या डाव्या बाजूला अशोक हाताची घडी घालून त्याच प्रकारच्या पोशाखात उभा आणि उजवीकडे शरद चेक्सचं शर्ट घालून हातात गिटार घेऊन उभे होते. अजय गाडी चालवत पुढेच जात होता. त्याचं रस्त्यावर लक्ष नसतं. होर्डिंगवरील चेहऱ्याचा आत्मविश्वास फोटोग्राफरला व्यवस्थित टिपता आला नाही हे अजय लगेच ओळखून घेतो.

अर्जंट ब्रेक लागतो आणि गाडी थांबते.

अभिजीत, "काय झालं? मस्त झोपलो होतो."

अशोक, "गौरीचं घर आलं."

गौरी डोळे उघडते, "कुठे आलोय आपण?"

अजय, "या बेवड्याने एका गरीब माणसाला उडवलं, पोलिस स्टेशनला आलोय आपण."

गौरी, "सो फन्नी, माझ्या घराजवळ आलोय ना आपण?"

प्रसाद, "काय कंफ्युजन आहेस तू. माहितीये मग विचारते कशाला?"

गौरी, "तुला काही प्रॉब्लेम?"

अभिजीत, "यार, गप्प बसा. झोप येते तुमचं भांडण ऐकून. तू पण काय प्रसाद कुणाच्याही नादी लागतोस."

गौरी, "कुणाच्याही म्हणजे...?"

अजय, "म्हणजे विचार करुन भांडत जा, असं म्हणतोय तो. तुझ्याशी भांडण्याची रिस्क कोण घेणार?"

गौरी, "मग ठिक आहे."

गौरीला सोडल्यानंतर अभिजीत, अजय, प्रसाद आणि शरदला घेऊन अशोक गरीबाच्या वाड्यावर जातो. शरद गाडीत झोपलेलाच असतो. गाडी थांबल्यावर सगळे मिटींग हॉलमध्ये  जातात. वृषाली आणि सागर तिथेच हॉलमध्ये खुर्चीवर बसून गप्पागोष्टी करत असतात.

अभिजीत आतमध्ये येत, "सागर ना...!"

सागर लगेच वृषालीच्या हातून स्वतःचा हात बाजूला काढत, "हो. आणि तू अभी."

अभिजीत, "वृषालीने ओळख करुन दिली वाटतं आमची."

सागर, "हं.... बोलता बोलता विषय निघत असतो तुमचा."

वृषाली, "अरे काय रे यार... किती वेळ वाट बघत होतो आम्ही."

प्रसाद, "जेवढा आम्हाला उशीर झाला तेवढा तुला फायदाच झाला ना!"

वृषाली, "म्हणजे...?"

अजय, "सोड. जरा कामाचं बोलूया..." अभिजीत सहजच त्यांच्या मिटींगला आला होता. मिटींगला सुरुवात होते.

वृषाली, "बरं तर मी तुम्हाला माझ्या फ्रेंडसोबत इंट्रोड्युस करुन देते." सागरकडे हात दाखवत, "हा माझा फ्रेंड सागर." सागर सगळ्यांकडे बघून स्मितहास्य करतो आणि "हाय" असं म्हणतो.

अजय, "अजय."

प्रसाद, "हाय सागर, प्रसाद."

अभिजीत, "अभिजीत, नाईस टू मिट यू."

शरद, "शरद, भेटून आनंद झाला."

अशोक, "अशोक."

वृषाली, "सो... गाईज... आज आपल्या ग्रुप डिस्कशनमध्ये अभी आणि सागर आपल्यासोबत नवीन आले आहेत. त्यांना आपल्या ग्रुपबद्दल माहिती सांगायची तर, 'श्रीगणेश कला मंच' असं आपल्या बॅनरचं नाव आहे. ज्याचा अध्यक्ष प्रसाद, उपाध्यक्षा मी वृषाली परब, संगीतकार शरद-अशोक, आणि फोटोग्राफर अजय अशी आमची टीम आहे. कोरिओग्राफीचं काम मी स्वतः करते. आपण सार्वजनिक ठिकाणी असलेले स्टेज शो, सणांमध्ये असलेले कार्यक्रम, दिवाळी पहाट, शाळेतील गॅदरिंग असे कार्यक्रम घेऊन लोकांचं मनोरंजन करत असतो."

सागर, "ग्रुप तर चांगला आहे तुमचा. तुम्ही तुमचं बॅनर रजिस्टर केलं आहे का?"

अशोक, "नाही रे, द्यायचं आहे रजिस्टर करायला. थोडे पैसे कमी पडतायेत."

अजय, शरद आणि प्रसाद रागाने अशोककडे बघतात. अशोकला त्याची चुक कळते आणि तो गप्प बसतो.

अभिजीत, "चुकीचं काय बोलतोत तो? तुमचा ग्रुप रजिस्टर नाही. तुमच्या मिटींग अशा ठिकाणी होत असतात. तुमच्या ग्रुपमध्ये मेंबर बघायला गेलं तर मोजून तुम्ही फक्त पाचच जण आहात. नक्की तुम्हाला इन्कम तरी मिळते की नाही यातून."

प्रसाद, "सुरुवातीला सगळ्यांनाच स्ट्रगल करावा लागतो. एकदा आपली किंमत समोरच्याला कळली की, बघ समोरचे कसे ऑर्डर्स घेऊन स्वतः येतात. अजय-अतूल तरी कुठे संगीताचा वारसा घेऊन आले होते? मा.राजसाहेबांनी त्यांच्यातलं टॅलेंट ओळखलं आणि त्यांना प्लॅटफॉर्म दिला..." दोन तास महत्त्वाकांक्षी व्यक्तीमत्त्व असलेल्या प्रसादचं डोकं दुखवणारं भाषण सुरु राहतं.

सागर प्रसादला काम करण्याच्या बाबतीत काही प्रोटोकॉल व्यवस्थित समजावतो. सर्वात शेवटी अभिजीत उठतो आणि उठताना म्हणतो,

"सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये एक सिंगर घ्या. बाहेरुन आलेला सिंगर तेच तेच सिनेमातले गाणे गातो आणि तुमच्या इन्कममधलं अर्ध्यापेक्षा जास्त मानधन घेऊन निघून जातो. थोडं तरी फ्युचरचं प्लॅनिंग करा. आणि प्रसाद, तु असताना बाहेरुन सिंगर आणण्याची गरजच काय?"

शरद, "बरोबर आहे रे. मला तर पटलं अभीचं बोलणं. प्रसाद असताना आपण कशाला बाहेरच्यांना पैसे द्यायचे?"

 अजय, "हं.... पॅडी, गाणं गायला स्टार्ट कर. मी बघ कशा धडाधड ऑर्डर्स घेऊन येतो."

प्रसादलासुध्दा अभिजीतने सांगितलेली कल्पना आवडते. अभिजीत आणि सागर त्यांच्या म्युझिक ग्रुपमध्ये नसतानाही त्या दोघांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल पाचही जण त्या दोघांचं आभार मानतात.

सागर, "असं नाही. आज रात्रीचं डिनर माझ्याकडून घ्यायचं."

शरद, "अरे मित्रा, तू आज आम्हाला एवढा वेळ दिलास, ओळख नसतानाही. उलट आम्ही तूला पार्टी द्यायला पाहिजे."

अभिजीत तोंडातल्या तोंडात, "अशोकने मघाशीच तुमचं बजेट सांगितलं ना!"

वृषाली, "काही म्हणालास?"

अभिजीत, "नाही तर? बरं, जायचं ना पार्टीला?"

तेव्हा रात्री पार्टी झाल्यानंतर प्रसाद गाणे गाण्याचा भरपूर सराव करतो. त्याचा कलामंच अर्थातच वृषाली, शरद, अशोक, अजय आणि जवळचे मित्र अभिजीत, गौरी. वृषालीचा मित्र सागर. प्रसादची बहिण काजल सगळेच त्याला भरपूर प्रोत्साहन देतात. प्रसाद आता चांगला गाऊ लागला होता. अजय आणि वृषाली चांगल्या ऑर्डर्स घेऊन येत होते. 'श्रीगणेश कला मंच'ला आता थांबायला वेळ नव्हता. स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक, समाजसेवी संस्था, मोठमोठ्या सोसायट्या त्यांना कार्यक्रम देऊ लागले. वेळ असेल तेव्हा अभिजीत, गौरी, काजल आणि सागर सुध्दा त्यांना मदत करायचे. वृषाली आता खूप खुश होती. त्यांना आता इतके कार्यक्रम मिळत होते की, तारखा नसल्याने अनेकांना ते नाही म्हणत होते.

एकदा कार्यक्रम चालू असतो. सगळे कामात व्यस्त असतात. अभिजीत सहजच त्यांचा कार्यक्रम पहायला आलेला असतो. मराठीतील काही श्रेष्ठ कवितांच्या रसग्रहणाचा कार्यक्रम तेथे चाललेला असतो. अजयच्या कॅमेऱ्याची बॅटरी संपते म्हणून तो ड्रेसिंगरुममध्ये बॅटरी बदलायला जातो तर त्याला अभिजीत काहीतरी वाचत असलेला दिसतो.

अजय आतमध्ये येत, "इथे काय करतोस? बाहेर बघ काय मस्त कार्यक्रम चाललाय."

"नाही रे, मुड नाहिये."

"काय वाचतोस?"

"सांगू नकोस कुणाला, प्रसादची डायरी वाचतोय."

"येड्या, अशी कुणाची पर्सनल डायरी वाचायची नसते."

"दुसरा कोणी असता तर वाचली नसती, प्रसाद आहे म्हणून वाचतोय."

"का?"

"तो जरा थांबायचं नाव घेत नाहीये. सतत कार्यक्रम करतोय. घरी लक्ष नाही, कुठेच काही नाही. आपल्या अड्ड्यावर सुध्दा मी आणि गौरीच असतो. दोघं भेटून तरी काय करणार? म्हणून आम्ही सुध्दा खूप कमीच भेटतो."

अजय, "म्हणायचं काय आहे तुला?"

अभिजीत, "म्हणायचं नाही, सांगायचंय, दरवाजा बंद कर" अजय दरवाजा बंद करतो आणि अभिजीतच्या बाजूला जाऊन बसतो, अभिजीत डायरीत लिहीलेलं एक पान वाचायला घेतो,

"माझ्या ईश्वरा । ऐक रे जरा ।

झेप ही माझी मोठी झेप ही माझी ।।

आशेच्या किरणी । ख्वाब उड गये ।

झेप ही माझी मोठी झेप ही माझी ।।

नभ उतरु सांगे हे मला ।

झेप ही माझी मोठी झेप ही माझी ।।

चालत राहिलो पथी । कारवां बनता ही गया ।

मंझील पे मुझको नही । था थोडासा भी ऐतबार ।

जिंकू दाही दिशा... ही दिशा ती दिशा ।।

वाटेवर होती वळणे नागमोडी । लाव्हाची होती ही जमीन ।

पडलो धडपडलो तरी । हौसलों में नहीं थी कमी ।

आता आलो मी इथे । जिंकूनी जग इथे ।

झोकून टाकूनी स्वतः । जिंकूनी घेतला प्रकाश ।

माझीच आहे ही सकाळ । माझीच आहे ही जमीन ।

जिंकू दाही दिशा... ही दिशा ती दिशा ।।"

दरवाजा वाजू लागतो, नाही दरवाजा नाही. मोबाईल वाजू लागतो. अजय गाडी थांबवतो. नम्रताचा फोन असतो. अजयने गाडी हायवेच्या बाजूला थांबवलेली असते, फोन रिसिव्ह करुन, "हा, बोल नमू."

नम्रता, "पोहोचलास ऑफिसला?"

अजय, "नाही."

नम्रता, "का?"

अजय, "मला खूप आठवण येतेय त्यांची."

नम्रता, "ऑलरेडी आपलं त्या विषयावर बोलणं झालं आहे. मला नाही वाटत की आपण त्या विषयावर आणखी काही बोलावं. ते सोड, आमच्या ऑफिसमधले सगळे कोटला थिएटरमध्ये चाललोय. यायला जमेल?"

"नाही, सॉरी." अजयचं उत्तर ऐकूण नम्रता तो फोन तसाच कट करते.

अजय गाडीचा दरवाजा उघडतो आणि बाहेर निघतो. तो एका डोंगराच्या टोकावर आलेला असतो. नम्रतासाठी त्याने मित्रांना नाकारलं असतं. मैत्रीचे ते क्षण अजयला आता एकदम आठवू लागतात. पाच वर्षांपूर्वी त्याने केलेली चूक त्याला आठवते. त्यासाठी त्याने अभिजीतच्या डोक्यावर ट्युब लाईट फोडलेली, सगळ्यांसमोर मंचावर प्रसादच्या कानाखाली वाजवलेलं, तो गरीब परिस्थितीत असताना वाढदिवसाला सर्व मित्रांनी पैसे जमा करुन त्याला गिफ्ट दिलेला महागडा कॅमेरा, तो भिंतीवर आदळून फोडून टाकतो. असे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागतात. डोंगरावरुन तो खाली तरंगत असलेली धूके पाहत असतो, पण ती सुध्दा त्याच्या मनाचं समाधान करत नाही.

अजयच्या डोळ्यात पाणी येतं. तो आपला तोल गमावतो आणि आपले डोळे पुसत गुडघ्यांवर पडून मोठमोठ्याने जीवाच्या आकांताने "आऽऽ..." करुन रडू लागतो. त्याच्या कपाळावरील शिरा बाहेर येतात. चेहऱ्यावर घाम येतो. तो जमिनीवर मातीत लोळू लागतो. स्वतःच्या गालात मारतो, त्याला प्रेमासाठी नकळत घडलेल्या चूकांची जाणीव होते, गाडीच्या पुढच्या चाकाजवळ तो रडत बसतो. रात्री पार्टी करुन झाल्यावर नम्रता घरी येते तेव्हा ती अजयला बॅग भरताना पाहते.

"काय झालं? कुठे चाललास?"

"मुंबईला."

"अचानक?"

 "हं... अगं कामच तसं आहे. बॉसचा फोन आला होता. फक्त एवढंच सांगितलं, मुंबईला जायचंय."

"ठिक आहे, जा. मी जरा थकलेय. झोपते मी."

"कधी येशील हे विचारणार नाहीस?"

"अरे हो. विचारायचंच राहून गेलं. कधी येशील?"

"काम झालं की लगेच निघेन. झोप तू, मी निघतो."

"हं..."

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका मनोगत मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’ प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात प्रकरण २ : विरहातील पहिला भाग प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने प्रकरण ७: अंधूक आशा प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात प्रकरण १३: विवाहाचं रहस्य प्रकरण १४: वडीलांचा आधार प्रकरण १५: देशप्रेम प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात