Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग

भारत (महाराष्ट्र): हिंदी सिनेमातील मोठा निर्माता सिध्दार्थ चोप्रा आपल्या नवीन सिनेमामध्ये संगीत देण्यासंदर्भात प्रसादला फोन करतो. प्रसाद सिनेमाला संगीत देण्यासाठी होकार दर्शवतो.

त्याच मिटींगमध्ये,

सिध्दार्थ, "आप हमारे 'अनोखा प्यार' फिल्म का संगीत कर रहे है, इस लिए हमारी टिम की तरफ से ये छोटासा तोहफा स्विकार किजीये।"

"आपने हमें इस फिल्मका संगीत करने दिया, यह हमारे लिए तोहफे से कम नही।"

सिध्दार्थ चोप्रा वेगळ्याच मुद्रेत प्रसादकडे पाहत, "एक बात बतानी थीं। शायद आपको बुरा लगेगा, फिल्मके डायरेक्टरको अपने फिल्ममें आपका संगीत तो चाहीये, साथ ही उन्हें सिंगर के तौर पर अभिजीत भी चाहिये। अगर आपको ऐतराज ना हो तो।"

"मुझे कुछ ऐतराज नही। कोशीश कर लो, अभिजीत जैसा सिंगर आपके फिल्मसे अगर कमबॅक करता है तो तुम्हारे और मेरे लिये इससे ज्यादा खूशीकी कोई बात नाहीं।"

"आपको पता है अभिजीत कहां है।"

"अभिजीत कहां है, ये बाद में सोचो, पहले ये सोचो, अभिजीत अब गा सकेगा?" सिध्दार्थ चोप्रा गप्प बसतात. प्रसाद तसाच जागेवरुन उठत म्हणतो, "गलती आपकी नहीं है, आपकी सोच की है। जब वो सच्चे दिल से गा रहा था तब आप जैसे लोगोंने उसका गला दबाना चाहा। तब आपको उसे अपने फिल्ममें लेनेका खयाल नहीं आया।" चोप्रा त्याच्याकडे बघतच राहतात पण ते काही बोलू शकत नाही. कारण त्यांना बदमाश ग्रुपचा भूतकाळ माहित असतो. प्रसाद टेबलवर ठेवलेल्या कागदाची घडी घालतो व दरवाज्याच्या दिशेने जातो.

नऊ वर्षांपूर्वी-

दरवाजा उघडून प्रसाद सगळ्यांना सलामी देत मंचावर येतो, सगळे प्रेक्षक त्याला पाहून आनंदाने शिट्या वाजवायला सुरुवात करतात. प्रसाद कि-बोर्डच्या दिशेने जातो. थोड्या वेळात शरदसाठी अशोक गिटार घेऊन येतो. प्रेक्षकांमधून मध्येच एकजण त्याला आवाज देतो, "ए नौटंकी, इकडे बघ."

अशोक प्रेक्षकांकडे रागाने बघतो आणि अजय त्याची रागात असलेली पोझ आपल्या कॅमेऱ्याने टिपतो. अशोक, "साल्या, नौटंकीवाला दिसतो का मी तुला?"

प्रेक्षक, "पहिल्यांदाच आलोय तुमच्या शो ला. जरा चांगल्या भाषेत बोल."

बराच वेळ झाला तरी गायक येत नाही म्हणून प्रेक्षक रागाने आरडाओरड करायला सुरुवात करतात. अभिजीत आईस्क्रिम खात स्टेजच्या मागे वृषालीला विचारतो, "काय झालं? सगळे का ओरडत आहेत?"

वृषाली, "अरे 'आय एम मराठी'चा सिंगर येणार होता. अजून आला नाहीये. फोन पण उचलत नाहिये तो."

अभिजीत, "बापरे...! शो तर सुरु झालाय... आता...."

प्रसाद स्टेजवरुन लांबून वृषालीकडे पाहत असतो, वृषाली नाराज होऊन नकारार्थी मान हलवते. प्रसादचा चेहरा उतरतो. अचानक प्रेक्षकांकडून शिव्या सुरु होतात, "हरामखोर, साले आम्ही इथे फुकटचा टाईमपास करायला आलो आहोत का?"

प्रसाद पुढे जाऊन, "रसिक मायबाप, उशीर होत आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. गैरसोयीसाठी माफी असावी, आम्ही गायकाला संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. थोड्या वेळात येईल तो."

प्रेक्षक, "अबे हिजडे, दो घंटे से खडे है यहां। पैसा कमाना है तो भिक माग साले।"

स्टेजच्या पाठीमागे अभिजीत आपल्या मुठी आवळत म्हणतो, "शिव्या का देतोय तो?"

वृषाली, "सगळे स्वप्नील गुप्तेला पहायला आलेले. प्रसादला सांभाळायला हवं. नाहीतर त्यांचं काही सांगता येत नाही." वृषालीचा फोन वाजतो, "हॅलो... हा.... क्या....? लेकीन यहॉ तो सभी टिकीट बाट चूके है, लोग अंदर आए है, प्लीज, आप जरा जल्दी आईये ना...। हा... हा... ठिक है।"

वृषाली ब्लूटूथ हेडसेटने प्रसादला सांगते, "दहा मिनिटं हॅन्डल कर. पोहोचतोय तो."

प्रसाद अशोकला इशारा करतो, अशोक ड्रम वाजवायला सुरुवात करतो, तेव्हा प्रेक्षकांचा राग जरा शांत होतो आणि प्रेक्षक हळूहळू पुन्हा जल्लोष करु लागतात. पंधरा मिनिटांनंतर गायक स्वप्नील गुप्तेचं मंचावर आगमन होतं. तोपर्यंत शरद आणि अशोकने संगीतमय वातावरण तयार केलेलं असतं. मंचावर स्वप्निल गुप्ते, समोर प्रेक्षक आणि स्टेजच्या पाठीमागे पहिल्यांदाच प्रसादचा शो पहायला आलेले अभिजीत, थोड्या उशीरा आलेले गौरी आणि सागरसुध्दा मनापासून त्या संगीताचा आनंद घेतात.

गिटार वाजवत शरदच्या हातून रक्त येतं, पण संगीतात तो इतका गुंग झालेला असतो की, त्याला त्याची जाणीव होत नाही. स्वप्नील गाणे गायला सुरुवात करतो.

"माय मराठी मातीचा लेक...

घेई नव्या क्षितीजी झेप... सह्याद्री कृष्ण कोयना... होई जिवाचं रान...

घे नवी झेप हे... नवी शान हे... लोककलेचं... नव गाण हे...

मराठी मातीचा लेक... तू जातपात ही फेक... नव आव्हानांची कास...

माता जिजाऊंची ही आस... शक्य होई हा ध्यास...

जव असे माझा हा श्वास... माय मराठी मातीचा लेक..."

प्रेक्षक टाळ्या वाजवतात, वन्स मोअर... वन्स मोअर... असं ओरडतात. पुन्हा फक्त एकच कडवं गाऊन स्वप्नील आपलं गाणं संपवतो.

कार्यक्रम संपल्यानंतर गौरी, "मस्त दिसत होता ना तो स्वप्नील? मी फोटोपण काढले."

अभिजीत प्रसादला घेऊन जरा बाजूला होतो, "ही अशी कामं का करतोस? ते सगळे तुला बोलत होते तेव्हा मला त्यांना मारावसं वाटत होतं."

प्रसाद त्याची समजूत काढत, "या लाईनमध्ये अशा गोष्टी येतच असतात. जोपर्यंत लोकांना आवडेल असं तू देशील तोपर्यंत तूला डोक्यावर घेतात. थोडासा पाय घसरला की, दुसऱ्याला डोक्यावर बसवतात."

अभिजीत, "मग बाकीचे ऑप्शन्स सुध्दा आहेत ना...! फायदा तरी काय झाला तुम्हाला? तिकीटातून सुध्दा तुम्हाला पैसे कमी पडलेत त्या बेसूर, बकासूर गुप्तेला द्यायला. आणि याच्यासाठी ते सगळे तुझ्याशी असं बोलत होते?"

अभीला आलेला राग प्रसाद ओळखतो. स्मितहास्य करत त्याच्या खांद्यावर हात ठेवत, "तुमच्यासारखे मित्र असताना मला कसली काळजी? मला तर प्रेक्षकांचं टेन्शन आलं होतं. चुकून कोणी मला जास्तच बोललं असतं तर मागे जसं तु त्या वेटरला मारलं होतंस, तशी त्याची वाटच लावली असती तू."

अजय दोघांना धक्का देऊन पुढे धावत जातो, त्याच्या मागे वृषाली धावत धावत ओरडते, "दाखव ना अज्या फोटो. किती मस्का मारावा लागतो तूला?" अजय पुढे निघून जातो.

प्रसाद, "सोड ते सगळं, चल गरीबाच्या वाड्यावर जाऊ. सगळयांचा मुड फ्रेश होईल." अभिजीत जरा शांत होतो. प्रसाद आणि अभिजीत मागे वळून बघतात. गौरी शरदच्या हाताला बॅंडेज बांधत असते. वृषाली अजयच्या खांद्यावर हात ठेवून फोटो बघत असते, सागर आणि अशोक गाडी आणायला गेलेले असतात.

अशोक आणि शरद गाडी घेऊन येतात. प्रसादला पाहून शरद विचारतो, "काय झालं? काय बोलला सिध्दार्थ चोप्रा?"

प्रसाद, "त्याला आत्ता जाग आलीये. सगळं संपल्यानंतर त्याला आता अभी पाहिजे सिंगर म्हणून."

शरद, "मग, नाही म्हणालास ना!"

प्रसाद, "आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? अशोक, गाडी माझ्या घरी ने. काहीतरी सांगायचंय."

अशोक प्रसाद आणि शरदला घेऊन प्रसादच्या घरी जातो. घरी गेल्यावर तिघंही सोफ्यावर थकल्यासारखे आडवे पडतात. टेबलावर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीचं झाकन उघडून प्रसाद पाणी पितो, थोडं पाणी स्वतःच्या तोंडावर सुध्दा ओतून घेतो आणि डोळे बंद करुन म्हणतो, "अभी ऑस्ट्रेलियाला आहे."

अशोक शरदच्या मांडीवर डोकं ठेवून पडलेला असतो, प्रसादचं वाक्य ऐकताच तो आणि शरद खाड्कन जागे होतात.

शरद, "तुला कसं कळलं?"

प्रसाद, "रुपालीचा फोन आला होता."

अशोक, "रुपाली कोण?"

शरद, "अरे ती, गौरीची छोटी बहिण."

अशोक, "अच्छा, हा... ती रुपाली...? तिने बरा फोन केला तूला? म्हणजे एक गोष्ट स्पष्ट झाली. वृषाली बरोबर बोलली. गौरी आणि अभिजीतचं लफडं होतंच."

प्रसाद, "सोड तो विषय. आपल्या आयडीयाचा काहीतरी फायदा झाला. अभी आणि गौरीचं  तरी  कळलं.  दोघे  खूश  आहेत ऑस्ट्रेलियाला. फक्त आपली रुपा कंटाळलीये तिकडे."

शरद, "नाहीतरी त्या तिघांनाच आणायचंय ना इथे.."

प्रसाद, "नको शरद, रुपालीने मला त्या दोघांचे फोटो मेल केले नंतर. अजूनही खूप काही सांगितलं. अभीला मस्त जॉब मिळालाय, त्याच्या आवडीचा. आपण गुगलवर त्याच्या नावाने सर्च करत होतो. ऑस्ट्रेलियामध्ये गुगलची डेव्हलपमेंट आणि अॅडव्हर्टायझिंग डिपार्टमेंट तो सांभाळतो."

अशोक, "मग आपल्याला कसा नाही सापडला तो गुगलवर?"

प्रसाद, "त्यानेच स्वतःच्या नावाचे सर्च ब्लॉक केलेत. लहानपणापासुनचा मित्र आहे तो माझा. त्याला माहितीये त्याचे मित्र किती करामती आहेत ते."

शरद, "काय फालतूगिरी आहे? कमबॅकचा फालतू आयडीया काहीच कामाचा नव्हता. मिळून मिळून आपल्याला शोध लागला तो अभी आणि गौरीचा. जे स्वप्नात सुध्दा परत येणार नाही. अजून अजय, सागर, वृषाली बाकी आहेत."

मिनाक्षी आतमधून नाश्ता घेऊन येते, "तुम्ही तिघे इतक्या मेहनतीने शोधताय, नक्कीच भेटतील तुम्हाला सगळे." मिनाक्षी ही प्रसादची पत्नी असते. सात वर्षांपूर्वी दोघे विवाहाच्या बंधनात अडकले असतात. त्या दोघांना अनामिका नावाची पाच वर्षांची एक छानशी मुलगी असते.

प्रसाद, "आपली अनामिका कुठे आहे?"

मिनाक्षी, "गार्डनमध्ये गेलीये तिच्या काजल दीदी सोबत."

प्रसादच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या उद्यानामध्ये हिरव्यागार गवतांवरुन फुलपाखरांच्या मागे एक पाच वर्षांची मुलगी धावत जात असते. एखाद्या बाहुलीप्रमाणे ती दिसत होती. लहान असल्याने ती खूपच सुंदर आणि गोड मुलगी तिच्या गुबगुबीत गालांमुळे आणि चेहऱ्यावरच्या हास्यामुळे उद्यानातील सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत होती. काजल तिच्यामागे धावत होती. संपुर्ण उद्यानात धावून झाल्यावर काजल अनामिकाला उचलते आणि गालावर पाप्या घेत, "आता घरी जायचं आपण, बाबा आले असतील." असं म्हणते.

उद्यानात नेहमी येणाऱ्या वयोवृध्दांची ती लाडकी झालेली असते. सगळे आजी-आजोबा खास तिच्यासाठी उद्यानात नेहमी येत. निघण्याआधी काजल अनामिकाला त्या आजी-आजोबांकडे घेऊन जाते तेव्हा उद्यानात पहिल्यांदाच आलेली एक आजी अनामिकाचे गाल पकडून काजलला विचारते,

"खूप गोड होय गं पोर तुझी. नाव काय तुझ्या लेकीचं." काजल आपला अपमान झाल्याप्रमाणे श्वास मोठयाने आत घेत 'ऑ...' करते आणि त्या आजींना म्हणते,

"कुठल्या अॅंगलने मी तुम्हाला हिची मम्मा वाटते?" स्वतःच्या केसांवरुन हळूच हात फिरवत, "अजून माझं लग्नपण नाही झालंय." मग तोंड वाकडं करुन सांगते, "माझ्या दादाची मुलगी आहे ही. अनामिका."

आजी, "चुकलं हा पोरी माझं."

काजल तशी खोडकर असते आणि मनाने चांगलीही, ती त्या आजींना पाहून हलकेच डोळे मिचकावत, "इट्स ओके." म्हणते.

घरी आल्यावर-

"वहिनी...!!"

मिनाक्षी, "आले आले. काय झालं?"

"वहिनी.... कोणत्या अॅंगलने मी अनुची मम्मा दिसते? ती म्हातारी मला अनूची मम्मा म्हणाली. वाटलं तिचे सगळे दात तोडूनच टाकू."

अनामिकाला कडेवर घेत मिनाक्षी, "आणि तिला दात होते?"

काजल, "नव्हते, पण असते तर नक्कीच तोडले असते. वहिनी, दादाला सांग ना! माझं लग्न लावून द्यायला, इथली सगळी मुलं मरतात माझ्यावर."

मिनाक्षी, "ते तू तूझ्या दादालाच सांग. मी तुम्हा बहिण-भावांच्या मध्ये पडली की नंतर तेच मला ओरडतात, मध्ये का आलीस म्हणून"

काजल, "मग एखाद्यं अफेअर करु का? माझ्या सगळया मैत्रिणींची अफेअर्स आहेत."

मिनाक्षी अनामिकाला घेऊन किचनमध्ये जात म्हणते, "कर."

काजल एकटीच समोरच्या हॉलमध्ये उभी असते. नंतर तिच्या लक्षात काहीतरी येतं. आणि ती ओरडून सांगते, "प्रसाद दादाची बहीण आहे असं सांगितलं की सगळी मुलं पळून जातात. इस नन्ही सी नादान लडकीका हाथ थमाने के लिये, (वर बघत) ओ उपरवाले, तुझसे बात कर रही हूं। इस नन्ही सी नादान लडकीका हाथ थमाने के लिये कोई राजकुमार तुझे मिला नही क्या?"

शरद बेडरुममधून बाहेर येत, "ये शरद भी किसी राजकुमार से कम नही।" काजल लाजते आणि खोडकरपणे त्याला विचारते, "इथे कसा? दादा आहे का?"

शरद तिच्याकडे वळून तिचा हात पकडत तिला बाहेर घेऊन जातो.

काजल, "काय झालं?"

"गौरी.... ऑस्ट्रेलियाला आहे."

"काय बोलतोस? तुला कसं कळालं?"

"गौरीची लहान बहीण माहितीये ना, रुपाली. तिने प्रसादला फोन केला होता."

"जियो मेरे शेर, म्हणजे तुमची आयडीया सक्सेसफूल झाली."

"रुपालीचं काय? ती येईल. पण अभी आणि गौरी. त्यांचं काय?"

"अभी? तो काय करतोय ऑस्ट्रेलियाला?"

"त्या दोघांनी लग्न केलं."

"बाप रे! म्हणजे खरंच त्या दोघांचं अफेअर होतं?"

"पाच वर्ष झाले त्यांच्या लग्नाला. प्रसाद म्हणत होता, ते दोघं खूश आहेत तिथे. अभी गुगलमध्ये मोठ्या पदावर आहे. गौरी घरीच असते. रुपाली एस.वाय.ला आहे."

"ए, आपण जाऊया का तिकडे? मला पण ऑस्ट्रेलिया बघायचा आहे."

"इथे आम्ही त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करतोय आणि तूला फालतूची ऑस्ट्रेलिया ट्रीप सुचतेय, मंद."

"सॉरी. मला तसं म्हणायचं नव्हतं. काही ठरलं का?"

"त्याच गोष्टीवर आम्ही बेडरुममध्ये बोलत होतो."

"मग...?"

"मग काय...?"

"अरे डफ्फर, मग काय ठरलं तुमच्यात?"

"पैसे कमी पडताहेत."

"किती कमी पडताहेत?"

"अडीच लाख."

"बापरे ऽऽ... अडीच ऽऽ... लाख ऽऽ... नाही जमणार मग तुम्हाला."

"प्रसाद बघतोय. मी सुध्दा काहीतरी प्रयत्न करतोय."

"अरे पण त्या दोघांना एवढ्या लांब शोधण्यापेक्षा बाकीच्यांना शोधा ना!"

"आम्हाला आधी वृषाली मिळाली असती तर तिला शोधलं असतं! आता हे दोघे मिळालेत तर या दोघांना आणावचं लागेल. भले कितीही पैसे जाऊ दे."

"पैशांचं नाही बोलतेय मी. पण ते दोघं?"

"काजू, हर एक फ्रेंड जरुरी होता है।" एवढं बोलून शरद निघू लागतो.

त्याचा हात पकडून दिर्घ श्वास घेत काजल म्हणते, "आणि आपल्या लग्नाचं...? दादासोबत कधी  बोलणार माझ्याबद्दल?"

"तुला माहितीये, माझी अट काय आहे ते!"

"समजत का नाहीयेस? सहा वर्ष झाले आपल्याला, कोणी सिरियसली घेतयं का?"

"मला माझ्या मित्रांवर विश्वास आहे."

काजलला रडू येतं, "शरद प्लीज रे. यायचं असतं ना, तर तू फोन करत होतास तेव्हाच अभी आणि अजय आले असते. आता कोणीच येणार नाही. एकाला पैशांनी दूर केलं आणि दुसऱ्याला प्रेमानं."

शरद, "पैसा आज आहे, उद्या नाही. प्रेम मैत्रीत सुध्दा असतं. रुपालीने फोन केला होता. म्हणजे अभी आणि अजयपर्यंत थोडीफार तरी ही गोष्ट पोहोचली असेलच. आणि काजल विश्वास ठेव. मी तुझ्यावरच प्रेम करतोय आणि तुझ्याशीच लग्न करेन."

एवढं बोलून तो काजजला मिठीत घेतो. वर असलेल्या खोलीमधून प्रसाद हे सगळं पाहत असतो. खिडकी बंद करुन तो आपले पाणावलेले डोळे पुसतो. मागे वळून बघतो तर मिनाक्षी त्याला आधार देते.

प्रसादला काय बोलावं सुचत नाही. तो तसाच मिनाक्षीला घट्ट पकडतो आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागतो. अशोक रुमचा दरवाजा वाजवतो,

मिनाक्षी, "कोण...?"

अशोक, "अशोक."

"एक मिनिट थांब, दरवाजा उघडते." प्रसाद स्वतःचे डोळे पुसतो आणि बाथरुममध्ये जाऊन चेहरा धुवून घेतो. बेसिंगसमोरील आरशामध्ये स्वतःचा चेहरा फक्त बघत राहतो. मोबाईल वाजतो, त्याने मोबाईल बेडरुमच्या सोफ्यावर ठेवलेला असतो म्हणून बाथरुममधून बाहेर निघतो.

अशोक, "मीच मिस कॉल दिला होता. वहिनी, रडत होता ना हा!"

मिनाक्षी गप्प असते, ती होकारार्थी मान हलावते. अशोक प्रसादकडे रागाने बघतो. प्रसादचे डोळे पुन्हा पाण्याने भरतात.

अशोक, "कशाला असा हार मानतोस? होईल सगळं व्यवस्थित. मी आणि शरद आहे ना सोबत!"

प्रसाद स्वतःच्या डोळ्यातले अश्रु आवरत होकारार्थी मान हलवतो.

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका मनोगत मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’ प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात प्रकरण २ : विरहातील पहिला भाग प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने प्रकरण ७: अंधूक आशा प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात प्रकरण १३: विवाहाचं रहस्य प्रकरण १४: वडीलांचा आधार प्रकरण १५: देशप्रेम प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात