Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

श्री च्यवनेश्वर महादेव

पौराणिक कथांनुसार प्राचीन काळी महर्षी भृगु यांचा पुत्र च्यवन याने पृथ्वीवर कठोर तपश्चर्या केली होती. वितस्ता नावाच्या नदीच्या काठी त्याने अनेक वर्ष तप केले. तपश्चर्येत लीन असल्यामुळे त्याच्या संपूर्ण शरीराला धूळ आणि माती यांनी झाकून टाकले आणि त्याच्यावर वेली लागल्या. एक दिवस राजा शर्याती आपल्या परिवार समवेत वनविहार करत तिथे पोचला. राजाची कन्या सुकन्या ही आपल्या मैत्रिणींसोबत च्यवन ऋषींच्या तपस्येच्या जागी पोचली. तिथे धूळ माती यांनी बनलेल्या ढिगात तिला दोन चमकणारे डोळे दिसले. कुतूहल म्हणून सुकन्याने त्या चमकणाऱ्या डोळ्यांत काड्या खुपसल्या. तेव्हा त्या डोळ्यांतून रक्त येऊ लागले. या कृत्यामुळे च्यवन ऋषी अतिशय दुःखी झाले. त्यामुळे राजा शार्यातीच्या सैन्यात रोग पसरू लागले. सर्व गोष्ट समजल्यानंतर राजाच्या लक्षात आले की त्याची कन्या सुकन्या हिने च्यवन ऋषींच्या डोळ्यात काटे खुपसले आहेत. तेव्हा राजा शर्याती च्यवन ऋषींकडे गेला आणि आपल्या कन्येच्या कृत्याची माफी मागितली. त्याने सुकन्याला महर्षींची पत्नी म्हणून त्यांच्या हाती सुपूर्द केले. सुकान्याला आपल्या पत्नीच्या रुपात स्वीकारून महर्षी अत्यंत प्रसन्न झाले, आणि राजाच्या सैन्यात पसरणारे आजार देखील बंद झाले.काही काळानंतर च्यवन ऋषींच्या आश्रमात दोन अश्विनीकुमार आले. तिथे सुकन्याला पाहून मंत्रमुग्ध झाले. त्यांनी सुकन्याला विचारले की तू कोण आहेस? सुकन्या म्हणाली की ती राजा शार्यातीची मुलगी अन च्यवन मुनींची पत्नी आहे. तेव्हा अश्विनीकुमार तिला म्हणाले की तू एका म्हाताऱ्या पतीची सेवा कशाला करते आहेस? आमच्या दोघांपैकी एकाची आपला पती म्हणून निवड कर. सुकन्याने नकार दिला आणि ती तिथून जाऊ लागली. तेव्हा अश्विनीकुमार म्हणाले की आम्ही देवतांचे वैद्य आहोत. जर तू आपल्या पतीला इथे घेऊन आलीस तर आम्ही तुझ्या पतीला यौवन देऊ शकतो. सुकन्याने ही गोष्ट जाऊन महर्षी च्यवन यांना सांगितली. महर्षींनी हे मान्य केले आणि ते अश्विनी कुमारांकडे आले. तेव्हा अश्विनीकुमार म्हणाले की तुम्ही आमच्या सोबत या पाण्यात स्नान करण्यासाठी उतरा. मग दोन्ही अश्विनी कुमारांसोबत महर्षींनी पाण्यात प्रवेश केला. काही वेळानंतर जेव्हा ते पाण्यातून बाहेर आले तेव्हा तारुण्याने भरलेले आणि रूपवान झाले होते. एवढे उत्तम रूप आणि तारुण्य मिळालेले पाहून महर्षी अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी दोन्ही कुमारांना सांगितले की तुम्ही मला पुन्हा तरुण बनवलेत, तेव्हा मी तुम्हाला इंद्राच्या दरबारात अमृत पान घडवेन. हे ऐकल्यानंतर दोन्ही अश्विनीकुमार स्वर्गाला निघून गेले आणि महर्षींनी त्यांना अमृतपान घडावे यासाठी यज्ञ प्रारंभ केला. इंद्राला हे सर्व निंदनीय वाटले. त्याने महर्षींना सांगितले की मी माझ्या वज्राने तुमचा नाश करेन. इंद्राचे हे बोल ऐकून भयभीत झालेले महर्षी च्यवन महाकाल वनात गेले आणि इथे येऊन त्यांनी एका दिव्य शिवलिंगाचे दर्शन पूजन केले. त्यांच्या या अराधनेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी च्यवन ऋषींना इंद्राच्या वाज्रापासून अभय मिळण्याचे वरदान दिले. तेव्हापासून हे शिवलिंग च्यवनेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते.असे मानले जाते की च्यवनेश्वर महादेवाच्या दर्शनाने मनुष्याची सर्व पापे धुतली जातात आणि सर्व प्रकारचे भय नाहीसे होते. अशी देखील मान्यता आहे की यांच्या दर्शनाने शिवलोकाची प्राप्ती होते. श्री च्यवनेश्वर महादेवाचे मंदिर इंदिरा नगर मार्गावर ईदगाह च्या जवळ वसलेले आहे.