Get it on Google Play
Download on the App Store

श्री आनंदेश्वर महादेव

पौराणिक कथांनुसार प्राचीन काळी एक अनमित्र नावाचा राजा हूऊन गेला. तो प्रजेचा उत्तम पालनकर्ता होता. तो महापराक्रमी आणि धर्मात्मा होता. त्याच्या राणीचे नाव गिरीभद्रा होते. ती अत्यंत सुंदर होती आणि राजाला प्रचंड प्रिय होती. राजाला आनंद नावाचा एक पुत्र झाला. जन्माला येताच आपल्या मातेच्या कुशीत तो हसू लागला. आईने आश्चर्याने त्याला हसण्याचे कारण विचारले. त्याने सांगितले की त्याला पूर्वजन्माच्या आठवणी आहेत. पुढे तो म्हणाला की ही सारी सृष्टी स्वार्थाचे आहे. पुढे बालक म्हणाला की एक मांजराच्या रूपातील राक्षस स्वतःचा स्वार्थासाठी मला उचलून घेऊन जाऊ इच्छित आहे. तुम्ही देखील माझे पालन पोषण करून माझ्याकडून काही अपेक्षा ठेवता आहात. तुम्ही स्वतः देखील स्वार्थी आहात. मुलाचे असे बोलणे ऐकून राणी गिरिभद्रा नाराज होऊन सुतीकागृहातून बाहेर निघून गेली. तेवढ्यात त्या राक्षसीने बालकाला उचलून नेले आणि विक्रांत नावाच्या राजाची राणी हैमिनी हिच्या शयन कक्षात नेऊन ठेवले. राजा विक्रांत त्या बालकाला आपलेच बालक समजून खूप आनंदित झाला आणि त्याने त्या बालकाचे नाव आनंद ठेवले. त्याचबरोबर राक्षसीने विक्रांत राजाच्या खऱ्या पुत्राला उचलून नेले आणि बोध नावाच्या एका ब्राम्हणाच्या घरात ठेवले. ब्राम्हणाने त्याचे नाव चैत्र रथ ठेवले.


इकडे विक्रांत राजाने पुत्र आनंदचा यज्ञोपवित संस्कार केला. तेव्हा गुरूने त्याला आईला नमस्कार करायला सांगितले. प्रत्युत्तरात आनंदने विचारले की मी कोणत्या आईला नमस्कार करू? मला जिने जन्म दिला तिला, की जिने माझे पालन पोषण केले तिला? गुरु म्हणाले की राजा विक्रांत ची राणी हैमिनी तुला जन्म देणारी माता आहे, तिला नमस्कार कर. तेव्हा आनंद म्हणाला की मला जन्म देणारी माता गिरिभद्रा आहे. हैमिनी ही चैत्र ची माता आहे, जो बोध ब्राम्हणाच्या घरी आहे. आश्चर्य वाटून सर्वांनी त्याला खरे काय तो वृत्तांत सांगण्यास विनंती केली. तेव्हा त्याने सांगितले की दुष्ट राक्षसीने दोघांची घरे बदलली होती. तेव्हा माझ्या दोन माता आहेत. या जगात मोह हाच सर्व समस्यांचा पाया आहे. तेव्हा मी आता सर्व मोह मायेचा त्याग करून तपश्चर्या करण्यास जात आहे. आता तुम्ही तुमचा पुत्र चैत्र याला घेऊन या. त्याच्या सांगण्यावरून राजाने बोध ब्राम्हणाकडे जाऊन चैत्रला घरी आणले आणि आपल्या राज्याचा उत्तराधिकारी बनवले. राजाने आनंदला सन्मानपूर्वक निरोप दिला आणि आनंद तपश्चर्या करायसाठी महाकाल वनात गेला. त्याने इंद्रेश्वर महादेवाच्या पश्चिमेला असलेल्या शिवलिंगाचे पूजन केले. त्याच्या तपाचे फळ म्हणून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिले की तू यशस्वी सहावा मनू होशील. आनंदने पूजन केल्यामुळे शिवलिंग आनंदेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.असे मानले जाते की आनंदेश्वर महादेवाच्या दर्शन पूजनाने पुत्र प्राप्ती होते. श्री आनंदेश्वर महादेवाचे मंदिर चक्रतीर्थ मध्ये विद्युत शवदाहगृहाच्या जवळ वसलेले आहे.