गावठी गाढव आणि रानगाढव
एका माणसाचे एक धष्टपुष्ट गाढव कुरणात चरत होते. इतक्यात एक रानगाढव तेथे आले व म्हणाले, 'मित्रा, तुझी अगदी मजा आहे.' आणि ते रानात निघून गेले.
नंतर एके दिवशी त्या गाढवाच्या मालकाने त्याच्या पाठीवर भले मोठे ओझे लादले. आणि ते गाढव चालेना तेव्हा त्याला तो चाबकाने मारु लागला. इतक्यात ते रानगाढव तेथे आले व ते हळूच म्हणाले, 'तुझी स्थिती मला वाटत होतं तितकी चांगली खचित नाही हे आता माझ्या लक्षात आलं आहे. असली ओझी वाहून आणि इतका मार खाऊन थोडंस सुख मिळवण्यात काय अर्थ आहे?'
तात्पर्य
- गुलामगिरीतल्या सुखापेक्षा स्वातंत्र्यातले दुःखही चांगले.