०९ अरुंधती ३-३
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
मुकुंदाशी लग्न करण्याचा आपला हट्ट सोडायला परी तयार नव्हती .
मुकुंदाला ती विसरेल, तिच्या डोक्यातील वेड जाईल, या आशेने शेवटी आईने तिला तिच्या आजोळी वर्षभरासाठी पाठवून दिले.
पूर्वीं परी आजोळी कोल्हापूरला आनंदाने जात असे .लहानपणी तर आजोळी मामाकडे, आजोबा आजींकडे ,जाण्यासाठी ती हट्ट धरत असे .आतांची वेळ वेगळी होती .मुकुंदाला सोडून कोल्हापूरला किमान एक वर्ष राहायचे होते .कदाचित तिला आणखीही जास्त काळ रहावे लागले असते .कोल्हापूरला कॉलेजात अॅडमिशन मिळू नये म्हणून परी देवाची प्रार्थना करीत होती . देवाने तिची प्रार्थना ऐकली नाही .तिला कोल्हापूरला अॅडमिशन मिळाली.परीला नाईलाजाने का होईना मामाकडे यावे लागले .
मुकुंदा दुसऱ्या जातीचा होता .मत्स्याहारी होता.दिसायला परीला शोभेल असा नव्हता.परी रेखीव देखणी सुंदर होती. तिने सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला असता तर ती सहज प्रथम क्रमांकाने निवडून आली असती . अरुंधतीच्या दृष्टीनेसुद्धा एवढे न्यून जर सोडले तर तो मुलगा काही वाईट नव्हता. श्रीमंत होता. शिक्षित होता.कॉलेज सांभाळून तो त्याच्या वडिलांच्या व्यवसायात त्याना समर्थपणे मदत करीत होता. अरुंधती पक्की शाकाहारी होती .मत्स्याहारी मांसाहारी मुलगा तिला जावई म्हणून पसंत पडणे शक्यच नव्हते . याबाबतीत तिची मते कर्मठ होती.
मुकुंदा सधन कुटुंबातील होता .त्याचे वडील लहानसे का होईना पण उद्योगपती होते .मुकुंदला त्यांनी हौशीने मोटार घेऊन दिली होती .मुकुंदाच्या आता कोल्हापूरला चकरा सुरू झाल्या होत्या.कॉलेजला म्हणून जाण्यासाठी परी बाहेर पडे . कॉलेजला जाई पण जेव्हा मुकुंदा आलेला असेल तेव्हा ती त्याच्याबरोबर शहरभर उंडारत असे .उंडारत हा शब्द माझा नाही तो अरुंधतीचा आहे .~जनार्दननें बोलता बोलता पुस्ती जोडली. ~ सबंध दिवसभर फिरून संध्याकाळी परी वेळेवर घरी येत असे.
थोड्याच दिवसांत ही गोष्ट परीच्या मामांच्या कानी गेली.त्यानी ती त्यांच्या बहिणीच्या अरुंधतीच्या कानी घातली.
परीला कोल्हापूरला पाठवून काही उपयोग नाही असे लक्षात आल्यावर दुसऱ्या वर्षी परी पुन्हा पुण्याच्या कॉलेजात आली .अरुंधतीची व परीची आता वारंवार भांडणे वाद होऊ लागले.
आपली एकुलती एक मुलगी आपले ऐकत नाही असे पाहून अरुंधती वारंवार खिन्न होत असे.तेव्हापासूनच ती मधून मधून डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात झाली होती. तेव्हापासूनच तिचे मनोसंतुलन ढळण्याला सुरुवात झाली होती. परी दिवसेंदिवस बेलगाम होत चालली होती .हल्ली रात्री मुकुंदाबरोबर फिरण्याचे तिचे प्रमाण वाढले होते . हल्लीं केव्हाही खालून रस्त्यावरून शीळ येत असे.काहीनाकाही कारण सांगून परी बाहेर जात असे.
एक दिवस रात्री एक वाजता अरुंधतीला अकस्मात जाग आली होती.परीच्या खोलीत डोकवावे असे तिला वाटले.ती पाहते तो खोलीत परी नव्हती .तिच्या काळजात चर्रर्र झाले.परी रात्रीची पळून गेली होती .किंवा मुकुंदाबरोबर फिरायला गेली होती.दोन्ही गोष्टी वाईटच होत्या .अरुंधतीने परीची बॅग व कपडे पाहिले .ते जाग्यावर पाहून तिच्या जिवात जीव आला .
दुसऱ्या दिवसापासून तिने बाहेरच्या दरवाजाला कुलूप लावायला सुरुवात केली .त्यांचा फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे गॅलरीतून उतरून जायची शक्यता नव्हती.चार पाच दिवस असेच गेले .एके दिवशी सकाळी पहाटे बेलच्या आवाजाने अरुंधती जागी झाली. कुणीतरी बेल पुन्हा पुन्हा घाईघाईने वाजवीत होते. तिने दरवाज्याचे कुलूप काढले.तुमची मुलगी गॅलरीतून खाली फुटपाथवर पडली आहे असे कुणीतरी तिला सांगत होते.तिचा सांगणाऱ्यावर विश्वास बसत नव्हता .
अरुंधती परीला पहायला खोलीत गेली.खोलीत परी नव्हती .गॅलरीचा दरवाजा उघडा होता .ती कदाचित गॅलरीमध्ये असेल म्हणून पाहायला अरुंधती गॅलरीत गेली .परी गॅलरीत नव्हती .खालून माणसांचा गलका ऐकायला येत होता .तिने खाली वाकून पाहिले. वाईट बातम्या सहसा खोट्या ठरत नाहीत. रक्ताच्या थारोळ्यात परी फुटपाथवर पडली होती.
झाडाची एक खांदी गॅलरीजवळ आली होती.कुलूप लावल्यापासून त्या खांदीवरून उतरून बहुधा परी रोज बाहेर जात असावी.आज तशीच जात असताना तिचा पाय घसरला असावा.आणि ती खाली पडली असावी .
आपल्यामुळे परी मेली.परीचा आपण खून केला.आपण परीला लग्नाला परवानगी द्यायला हवी होती.मुकुंदा कसाही असला तरी त्याचा परीसाठी जावई म्हणून स्वीकार करायला हवा होता.जिच्यावर आपल्या आशा आकांक्षा अवलंबून होत्या.जी आपल्या काळजाचा तुकडा होती.जी आपले सर्वस्व होती.जिच्यासाठी आपण जगत होतो .ती आपल्याला कायमची सोडून गेली .केवळ हे आपण तिला लग्नाची परवानगी न दिल्यामुळे झाले .जर आपण बाहेर दरवाजाला कुलूप लावले नसते तरीही परी वाचली असती .हा धक्का अरुंधतीच्या अगोदरच कमकुवत असलेल्या मनाला सहन झाला नाही .ती स्वतःला कायमची हरवून बसली .परीच्या वयाची कुणीही मुलगी दिसली की अरुंधती तिला मिठ्या मारू लागली.माझ्यामुळे तू मेलीस .मी अपराधी आहे .मी तुला लग्नाला संमती द्यायला हवी होती.जा तुझ्या मनासारखे तू लग्न कर . मुकुंदा कसाही असला तरी मला मान्य आहे .मुकुंदा माझा जावई आहे .त्याच्याकडे परी असेल मला तिला भेटवा.इत्यादी तिची बडबड सुरू होई.एरव्हीही घरात ती स्वतःशीच बडबड करत बसू लागली.शाळेत तर जावून तिला शिकविणे शक्यच नव्हते.शाळेतील प्रत्येक मुलीत ती परी पहात होती. ती भावनावेगाने वारंवार बेशुद्ध पडू लागली.तिची शाळेतील नोकरी सुटली. ती परीसारख्या दिसणाऱ्या मुलीला,किंबहुना परीच्या वयाच्या कोणत्याही मुलीला इतकी घट्ट मिठी मारी कि ती सोडवणे कठीण होई.दिवसेंदिवस तिचा भावनावेग, तिचा बेभानपणा वाढतच चालला होता. अरुंधतीच्या वहिनीचे माहेर या गावात होते.या रुग्णालयाचा चांगला लौकिक ऐकून,शेवटी तिच्या भावाने तिला या रुग्णालयात आणून सोडले .तो वेळ मिळेल तेव्हा अधूनमधून येत असतो.आज ना उद्या ती बरी होईल अशी तिच्या भावाला आशा आहे .
अौषध, संमोहन, सूचना, यामुळे ती जवळजवळ साठ सत्तर टक्के सुधारली आहे .एरवी ती नेहमीच नॉर्मल असते.परीच्या वयाची एखादी मुलगी जेव्हा दिसते तेव्हा ती फक्त अस्वस्थ होते .पूर्वीसारखी बेभान होत नाही. परी आपल्यामुळे गेली ही भावना जर तिच्या मनातून पूर्णपणे काढून टाकण्यात कुणी यशस्वी झाला तर ती पूर्णपणे बरी होईल .
मनोरुग्णालयाचा परिसर पाहून झाला होता .आम्ही आता परत जनार्दनच्या ऑफिसकडे जात होतो.अकस्मात जनार्दन थांबला . तो म्हणाला माझ्या मनात एक कल्पना आली आहे .ती कदाचित यशस्वी होईल .तुझी मुलगी कुसूम परीच्याच वयाची आहे.ती तयार असली तर काय बोलावे,काय करावे , अरुंधतीची कशी समजूत घालावी,ते मी तिला समजून सांगेन.त्यासाठी तिला येथे महिनाभर राहावे लागेल .तिच्या कॉलेजला तूर्त सुटी आहे.ती हुषार आहे, स्मार्ट आहे, कदाचित ही योजना यशस्वी होईल.परीच्या वयाच्या मुलीने अरुंधतीच्या सहवासात राहणे, तिला समजून घेणे,आणि तिला समजावून सांगणे ,अरुंधतीच्या अंत:करणाला जावून स्पर्श करील. तिचे परिवर्तन शक्य होईल.
कुसुमला जनार्दनने सर्व योजना समजावून सांगितली.कुसुम जनार्दनच्या प्रयोगामध्ये सहभागी होण्यास तयार झाली. कुसुमला अरुंधती प्रथम दुरूनच दाखवण्यात आली.तीन चार दिवस कुसुम तिचे दुरून निरीक्षण करीत होती.जनार्दन रोज कुसुमला काय करावे, काय करू नये, कसे बोलावे, ते सर्व सांगत होता.कुसुमचे एक प्रकारे प्रशिक्षण चालले होते .कुसुम तिथे राहिली . आम्ही सर्व जनार्दनचा निरोप घेऊन परत आलो.
कुसुम अरुंधतीला भेटली.तिने अत्यंत प्रेमाने तिच्याजवळ गप्पा मारल्या .जनार्दनने सांगितलेल्या पद्धतीने , मार्गदर्शक तत्वांप्रमाणे, कुसुम अरुंधतीशी वागत होती. आपल्यामुळे परी मेली,आपण तिचा खून केला, हा अरुंधतीच्या मनातील सल दूर करण्यात कुसुम यशस्वी झाली.जनार्दनचे अौषध,संमोहन, सूचना व कुसुमची वागणूक,सहवास, गप्पा,कौशल्य यामुळे अरुंधती पूर्णपणे बरी झाली.
सुदैवाने तिच्या शाळेने तिला शिक्षिका म्हणून पुन्हा कामावर घेतले आहे .शाळेतील मुली पाहून किंवा इतर कुठेही परीच्या वयाच्या मुली पाहून अरुंधती अस्वस्थ होत नाही .
*तिला पूर्णपणे बरी करण्यात कुसुमचा वाटा आहे हे पाहून मला अत्यंत समाधान वाटते.*
*जनार्दन कमालीचा उत्कृष्ट मनोरोगतज्ज्ञ आहे .*
*मनोरुग्णांच्या बाबतीत केव्हा काय केले पाहिजे हे त्याला अंत:प्रेरणेतून उमजते.*
(समाप्त)
२८/५/२०२०©प्रभाकर पटवर्धन