Get it on Google Play
Download on the App Store

०२ काळेशार पाणी २-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )

.पोहण्याची सोय बघून आई बाबा व संवाद अतिशय आनंदित झाले होते.पोहणे हाच त्यांचा विश्रांतीचा व करमणुकीचा एक भाग होता  .इथेच आमचा घात होणार होता परंतु आम्हाला ते माहित नव्हते. 

त्यानंतर पुढे हौशी लोकांसाठी फिशिंगचीही व्यवस्था आहे.तलावाकाठी किंवा होडी घेऊन तलावाच्या मध्यभागी जाऊन फिशिंग करता येते .

सर्व तलावाभोवती रस्ता खेळवलेला आहे.पायी चालण्याच्या रस्त्यावरून चालत, किंवा वाहनातून रस्त्यावरून प्रदक्षिणा मारता येत होती.

अरण्यात पायवाटांवरून इतस्ततः फिरता येते . पक्षी निरीक्षण, वृक्ष निरीक्षण, जंगलातील प्राणी निरीक्षण,करीत ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्हाला फिरता येते .जवळच एक मध्यम उंचीचा डोंगर आहे .ज्यांना पर्वतारोहण करण्याची आवड आहे त्यांना तीही सोय आहे .अरण्यात तुम्ही एकटे फिरू शकता किंवा बरोबर गाईडही घेऊ शकता .अरण्यात खेळविलेल्या रस्त्यांवरून वाहनातून,किंवा हत्तीच्या पाठीवरून तुम्हाला फिरता येते.

येथे एक क्लब सारखी इमारत आहे .तिथे तुम्हाला बैठे खेळ व बॅडमिंटन, टेबल टेनिस,यासारखे खेळ खेळता येतात . 

थोडक्यात निवांतपणे राहण्यासाठी ,ज्याच्या  त्याच्या आवडीनुसार वेळ घालविण्यासाठी, सर्व सोयी उपलब्ध आहेत.

तर या ठिकाणी जाऊन दहा दिवस राहण्याचे आम्ही(आई बाबांनी ) ठरविले. आमच्या मोटारने आम्ही तिथे पोहोचलो .बाबांनी संपूर्ण बंगला आरक्षित केला होता .हत्तीच्या पाठीवरून सफारी, जीपमधून सफारी, पायी पक्षीनिरीक्षण, पर्वतारोहण ,बोटिंग, फिशिंग,स्विमिंग , बॅडमिंटन ,टेबल टेनिस वगैरे गोष्टीत  आमचा वेळ आनंदात चालला होता .

अर्थात स्वीमिंगच्या वेळी आई बाबा व संवाद तिघेही पोहत असत .मी काठावरून फक्त पाहात असे.हा भाग निराळा .त्या तिघांचे स्विमिंग काठावरून पाहण्यात मला आनंद वाटत असे.

असेच मजेत आनंदात दिवस चालले होते.आणि तो काळाकुट्ट दिवस उजाडला .आई बाबा त्या दिवशी पक्षी निरीक्षणाला जाणार होते .आम्हा दोघांना मला व संवादला त्यामध्ये विशेष गोडी नसल्यामुळे आम्ही घरीच राहण्याचे ठरविले .

आई व बाबा पक्षीनिरीक्षणाला भल्या पहाटे निघून गेले.आम्ही दोघे त्यावेळी साखर झोपेत होतो .सकाळी नाष्टा झाल्यावर काय करावे असा आम्हा दोघांनाही प्रश्न पडला .संवादने स्विमिंगला जाण्याची टूम काढली .मी त्याला विरोध केला .बरोबर आई बाबा यापैकी कुणीतरी एक असल्याशिवाय तू पाण्यात जाता कामा नये असे मी त्याला सुनावले.त्याने पोहायला जाण्याचा हट्ट धरला . त्याने मला पटवायला, माझी आराधना करायला, सुरुवात केली.

मी किती चांगला पोहतो तुला माहीत आहेच .

मी पोहण्याची कितीतरी बक्षिसे मिळविलेली आहेत.    

माशापेक्षा जास्त कुशलतेने मी पोहतो म्हणून तुम्हाला माझा गर्व आहे. 

मी पाण्यात  काठापासून दूर जाणार नाही .

कडेकडेला पोहेन.ताई मला जाऊ दे ग !मला काही होणार नाही. 

त्याने अगदीच हट्ट धरला .तो अगदी काकुळतीला आला होता .

तो केविलवाणा झाला होता .तो काकुळतीला आलेला मला पाहावत नव्हते .

मी जर त्याला निर्णायकपणे नको म्हटले असते तर तो गेला नसता .जाऊ शकला नसता.परंतु त्यांच्या हट्टापुढे,त्याच्या लडीवाळपणापुढे, त्याच्या विनवणीपुढे, त्याच्या इवल्याशा झालेल्या हिरमुसल्या चेहऱ्यापुढे, मला त्याला  नाही म्हणता आले नाही .

कडेलाच पोहेन, खोल पाण्यात जाणार नाही, अर्धा तासापेक्षा जास्त पोहोणार नाही असे कबूल करून घेऊन , आम्ही दोघे स्विमिंग एरियामध्ये जाण्यासाठी निघालो.

कबूल केल्याप्रमाणे तो कडेकडेलाच पोहत होता.मी घडय़ाळाकडे पाहात होते .अर्धा तास पूर्ण झाल्यावर मी त्याला परत बोलावणार होते.मी त्याच्याकडे पाहात असताना तो तलावाच्या  काठापासून दूर दूर पोहत जात आहे असे माझ्या लक्षात आले .ते पाहताच मी जोरात ओरडले .संवाद तू कबूल केले आहेस काठाजवळच पोहशील.तू दूर जात आहेस.लगेच मागे फीर .तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.त्याचा चेहरा वेडावाकडा झाला होता .त्याला कसल्यातरी  तीव्र वेदना होत असाव्यात. तो आटोकाट प्रयत्न करून डोके पाण्यावर ठेवण्याचा प्रयत्न करीत होता .एवढ्या अट्टल पोहणार्‍याला, कितीतरी पदके मिळवणाऱ्याला,डोके पाण्याबाहेर ठेवणे जमत नव्हते.कांहीतरी कुठेतरी बिघडले होते. बहुधा कुणीतरी त्याचे पाय खाली ओढत असावेत .एकदा त्याचे डोके पाण्याखाली गेले. पुन्हा त्याचे डोके पाण्यावर दिसले .त्याचा चेहरा केविलवाणा दिसत होता .तो बहुधा  वाचवा वाचवा म्हणून ओरडत होता .कदाचित त्याच्या दोन्ही पायांत वांब(पायात गोळे) आले असावेत . 

नंतर त्याचे डोके पाण्याखाली गेले ते गेलेच .

फक्त काळेशार पाणी डचमळत होते .

नंतर तो पुन्हा जिवंत दिसला नाही .मी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारण्याच्या बेतात होते .मला पोहता येत नाही हे मला आठवले .मी पोहायला का शिकले नाही म्हणून मला पहिल्यांदाच तीव्र दुःख झाले .मला पोहता येत असते तर मी कदाचित त्याला वाचवू शकले असते.

दुसऱ्याच क्षणी मी वाचवा वाचवा माझा भाऊ बुडत आहे म्हणून सैरावैरा धावत होते.त्या वेळी आसपास कुणीही नव्हते .सर्वत्र भयाण स्मशानशांतता पसरलेली होती .

आई बाबा तर पक्षी निरीक्षणासाठी अरण्यात गेले होते.  मी तशीच धावत जाऊन रिसॉर्टमधील वॉचमनला बोलवून आणले .तो माझ्याबरोबर धावत धावत आला .त्याने मी दाखवलेल्या जागेवर पाण्यात जाऊन तपास केला .खाली वाकून त्याने संवादला वर उचलले.

वॉचमन पोहत नव्हता .तो दोन पायावर उभा होता .काळे शार पाणी जेमतेम त्याच्या कंबरेपर्यंत आले होते.पाण्याची खोली  जेमतेम तीन फूट होती .मी जरी पाण्यात गेले असते तरी मला पोहायला येत नसूनही  मी त्याला वाचवू शकले असते.

पाणी खोल आहे .मी बुडेन. मी मरेन.अशी माझी समजूत होती.

मी जिवाची पर्वा न करता संवादला वाचवण्यासाठी पाण्यात जायला हवे होते.

*मी त्याला वाचवू शकले असते .*

त्याच्या लाघवीपणामुळे मी विरघळले ती माझी मोठी चूक होती .

त्याने कितीही हट्ट केला तरी  मी त्याला पोहायला  जाऊ नको असे कठोर होऊन सांगायला हवे होते.

*मला कुणीही काही बोलले नाही .*

*माझी मन:स्थिती आईबाबा पूर्णपणे ओळखत होते.*

*मी पाण्यात गेले नाही त्यासाठी मी दोषी नव्हते हे मला पूर्णपणे माहीत आहे .*

* तरीही जन्मभर मी मला माफ करणार नाही .*

(समाप्त)

२३/२/२०२०©प्रभाकर