Get it on Google Play
Download on the App Store

०७ अरुंधती १-३

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

जनार्दन व मी कॉलेजपर्यंत एकाच वर्गात होतो .तेव्हापासूनची आमची मैत्री आजतागायत  पूर्वीएवढीच दृढ आहे .सुखदुःखाच्या प्रसंगात आम्ही एकत्र येत असतो. कॉलेजमध्ये माझा मित्र जनार्दन  सायन्स शाखेकडे गेला व मी कॉमर्सकडे गेलो. मी एमबीए झालो. मी माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.

जनार्दन डॉक्टर होऊन( सायकॅट्रिक ) मनोचिकित्सक, मनोविकारतज्ज्ञ झाला.त्याने सरकारी नोकरी स्वीकारली .सरकारी नोकरी करीत असताना  काही वेळ खाजगी प्रॅक्टिस करता येते अशी सवलत त्याला आहे. त्याच्या अधूनमधून बदल्या होत असतात .सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (सायकॅट्रिक वॉर्डला) मनोरुग्ण विभाग किंवा  सर्वस्वी स्वतंत्र असलेल्या मनोरुग्णालयामध्ये तो काम करीत असतो.नुकतीच त्याची बदली एका मनोरुग्णालयात समुद्रकिनाऱ्याला शांत ठिकाणी असलेल्या गावात झाली होती .

आम्ही मित्र जनार्दनाला   फक्त मित्र असतानाच वेडा डॉक्टर म्हणून हाक मारतो .त्याला राग येत नाही .उलट तो खळखळून हसतो.  

आपण सर्वच कमी जास्त प्रमाणात वेडे आहोत असे त्याचे म्हणणे आहे.बहुसंख्य लोक ज्याला शहाणपणा समजतात तसे जे असतात ते  शहाणे,उरलेले वेडे असेही  तो म्हणतो .शहाणपणाला वेडाची किनार असते तर वेडेपणाला  शहाणपणाची किनार असते असेही  त्याचे म्हणणे आहे .शहाणपणा व वेडेपणा यांच्या सीमा निश्चित करणे कठीण आहे.सामान्यांच्या पलीकडचे आणि सामान्यांच्या अलीकडचे असे काही लोक असतात .बरेच जण पलीकडच्याना व अलीकडच्याना वेडे म्हणतात.

वेड्या लोकांनीच मोठी मोठी कार्ये केली आहेत. अचाट शोध लावले आहेत .मानव आज जो काही आहे तो वेड्या लोकांमुळेच  असे जेव्हां आपण म्हणतो तेव्हा पलीकडच्या लोकांचा उल्लेख आपण करीत असतो. 

हिशेबापेक्षा जास्त अासक्ती एखाद्या  विषयाकडे असणे यालाही वेड म्हणता येईल.जगी हा खास वेडय़ांचा पसारा माजला सारा .हे नाट्यगीत सर्वांना आठवत असेलच .

थोडक्यात वेडाची निश्चित व्याख्या करणे कठीण आहे असेही म्हणता येईल .कसलाही मागचा पुढचा व्यवहारी विचार न करता एखाद्या गोष्टीत संपूर्णपणे झोकून देणे यालाही वेड म्हटले जाते.

वेडासंबंधी जास्त विचार पुरे.नाहीतर एक मला वेड लागले आहे असे तुम्ही म्हणाल किंवा वाचता वाचता ऐकता ऐकता तुम्हालाही एखाद वेळ वेड लागण्याचा संभव आहे.असेही जनार्दन म्हणत असतो .

तर हा जनार्दन मला त्याच्या नवीन गावी बोलवीत होता .मला अर्थातच कुटुंबासह येण्याचे आमंत्रण होते .माझी पत्नी व जनार्दनची पत्नी  या दोघी लग्नाअगोदरपासूनच मैत्रिणी होत्या .

माझ्या कामाच्या व्यापातून वेळ काढून शेवटी आम्ही एकदा जनार्दनकडे जाण्यासाठी निघालो. 

जनार्दनचा गांव,(गाव कसला लहानसे शहरच ते होते .) समुद्रकाठी होता .गावाला दोन समुद्र होते .काळा समुद्र व पांढरा समुद्र .समुद्र एकच होता परंतु एका डोंगराच्या अलीकडे वाळू काळी होती .तर त्याच डोंगराच्या पलीकडे वाळू पांढरी होती .अशी रचना कशी काय झाली होती ते निसर्गच जाणे.काळ्या समुद्रावर पर्यटकांची व गावातील लोकांचीही संध्याकाळी गर्दी असे .पांढऱ्या समुद्रावर विशेष कुणी नसे.एक नदीही येऊन समुद्राला मिळत होती .नदीकाठी व समुद्रकाठी गाव वसलेले होते .डोंगर उतरून गेल्यावर नदीकाठी व समुद्राकाठी हे गाव होते.

गावाचे रूपांतर शहरात व शहराचे रूपांतर  हळूहळू मोठ्या शहरात होत होते.डोंगराला तीव्र उतार नव्हता.  उतारावर वस्ती हळूहळू  विस्तारत होती .शहरातून थोडासा चढ चढून आल्यावर तिथेच मनोरुग्णालय होते .या मनोरूग्णालयावरून जाणारा रस्ता  मुंबई पुणे या मोठ्या शहरांना या शहराला जोडत असे .

मनोरुग्णालयाचा परिसर विस्तृत होता. मनोरुग्णालयाला दहा फूट उंच भिंत बांधलेली होती .त्यावर काचा बसवलेल्या होत्या .मोकळे सोडलेले रुग्ण पळून जाऊ नयेत यासाठी ही व्यवस्था होती . त्याचप्रमाणे बाहेरील शहाणे कोणत्याही कारणाने आत येऊ नयेत हाही त्यामागे हेतू होता. रस्त्याला लागूनच मनोरुग्णालयात प्रवेश करण्याचा दरवाजा होता .रुग्णालयाला तो एकच दरवाजा होता .तो नेहमी बंद असे .तुरुंगाला असतो त्याप्रमाणे आत बाहेर जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा होता .तुरुंगाप्रमाणे तिथे पाहारेकरी असत .परवानगी घेऊन आत प्रवेश करावा लागेल .मोटार, अॅम्ब्युलन्स, ट्रक, टेम्पो ,इत्यादी  वाहने काही कारणाने आत जाणार असतील तर मोठा दरवाजा उघडला जाई.

दरवाजातून आत शिरल्यावर जनार्दनचा बंगला उजव्या हाताला होता.बंगल्याभोवती छानपैकी छोटीशी बाग होती. बागेमध्ये सकाळ संध्याकाळ  माळी राबत असे . भिंतीच्या अांत सर्वत्र लहान लहान बैठी घरे होती .त्यामध्ये निरनिराळया  प्रकारचे रुग्ण ठेवलेले होते.तशाच कर्मचाऱ्यांच्या क्वार्ट्सही होत्या. सकाळ संध्याकाळ जनार्दन  रुग्णालयात त्याच्या दैनंदिन  कामासाठी जात असे .

रोज संध्याकाळी चार वाजता जनार्दन त्याच्या मोटारीतून अाम्हा सर्वांना कुठे तरी फिरण्यासाठी नेत असे .   

स्वच्छ शुद्ध  परंतु खारी हवा,खेडेगाव वजा शहर, निरनिराळी निसर्ग रम्य प्रेक्षणीय ठिकाणे ,रम्य परिसर, निरनिराळी देवस्थाने, हे सर्व पाहताना अनुभवताना आमचे सुटीचे दिवस आनंदात चालले होते.

एक दिवस मी जनार्दन बरोबर रुग्णालय पाहायला जाऊ या असे सर्वाना सुचविले. वेड्यांच्या इस्पितळात पहाण्यासारखे काय असणार? वेड्यांना काय पाहायचे ?असा पत्नीचा व मुलांचा एकूण मतप्रवाह दिसला .काहीना बांधून ठेवलेले असेल, काहींना कोंडून ठेवलेले असेल ,सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे काही जण वेड्यासारखे चाळे करत असतील ,आपल्या अंगावर कदाचित काही जण धावून येतील ,स्वत:चे कपडे फाडत असतील, त्यांचे केस अस्ताव्यस्त असतील, कांहीजण  किंकाळ्या मारीत असतील, कांहीजण परस्परात मारामारी करीत असतील ,तीव्र वेड असलेल्या स्त्री पुरुषाना सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे विजेचा शॉक देण्याचे काम चाललेले असेल , याशिवाय वेगळे कोणते चित्र दिसणार आहे. सर्वांचे एकूण असे मत होते .जे पुरुषांच्या विभागात असेल तेच कमी जास्त प्रमाणात स्त्रियांच्या विभागात असेल असाही सर्वांचा कयास होता . सिनेमात वेड्यांचे इस्पितळ व वेडे पाहिलेले आहेत.आता आणखी काय पहायचे असा सर्वांचा प्रश्न होता .त्यांना पाहून उगीच डोक्याला त्रास मात्र व्हायचा. रात्री नीट झोप लागायची नाही.झोपेत त्यांचे वेडेवाकडे चेहरे व चाळे दिसायचे व   दचकून जागे व्हायचे.नकोच ते असे सर्वांचे म्हणणे होते.

सर्वांचे निरनिराळे (कॉमेंट्स) शेरे ऐकताना जनार्दन  मात्र हसत होता .तो म्हणाला ,केव्हा केव्हा काही वेडे तुम्ही म्हणता तसे असतातही परंतु सर्वच वेडे तसे असतात असे नाही . काही वेडे तर इतके सामान्य असतात की सांगून सुध्दा तुम्हाला ते वेडे आहेत असे वाटणार नाही. कांही वेडे त्यांचा वेडेपणाचा भाग सोडला तर शहाण्याहून शहाणे असतात. प्रत्येकाची एखादी दुखरी नस असते तिला धक्का पोचला की तो बेभान होतो. तथाकथित शहाणे लोकही असेच असतात .बेभान होण्याचे प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त झाले आणि जर तो पुन्हा पूर्वस्थितीला आला नाही तर त्याला आपण वेडा म्हणतो.

शेवटी मी एकट्यानेच मनोरुग्णालय पहायला जायचे ठरविले.दुसऱ्या दिवशी सकाळी मी तयार होउन जनार्दन बरोबर निघालो. 

सुरुवातीला जनार्दनाचे ऑफिस होते .तिथे तो बाहेरुन जे मनोरुग्ण येत असत त्यांना तपाशीत असे.  त्यांचे समुपदेशन करीत असे .शिवाय औषधे वगैरे लिहून देत असे .नंतर पुढे एक विशिष्ट हेतू ठेवून मुद्दाम तयार केलेली छान बाग होती .तिथे पुष्करणी होती . वर्तुळाकार फिरण्याची, जॉगिंगची,  सोय  होती.हिरवळीवर अधूनमधून बाके ठेवलेली होती.काही रुग्ण जॉगिंग करीत होते, काही नुसतेच चालत होते, तर काही बाकावर नुसते बसून होते.बाग पाहून मन प्रसन्न होत होते.आपण मनोरुग्णालयात आलो आहोत ही भावना आपोआपच लय पावत होती . रखवालदार सर्वत्र लक्ष ठेवून होते .

जनार्दन म्हणाला,हे सर्व मनोरुग्ण जवळजवळ बरे होत आलेले आहेत .आम्हाला पूर्ण बरे झाले असे वाटले तर त्यांना डिस्चार्ज देतो .घरची मंडळीही त्यांना बऱ्याच वेळा प्रेमाने घेऊन जातात. अाकस्मिक आघाताने काही लोकांचे मनोसंतुलन बिघडते. अशा बिकट वेळी त्यांना समजून न घेता , काही वेळा नातेवाईकांकडून, खुद्द घरच्या मंडळीकडून, समाजातून, अवहेलना  टीका चेष्टा सहन करावी लागते .त्यामुळे त्यांचे मनोसंतुलन आणखीच बिघडते .इथे आल्यावर समुपदेशन ,गरज पडल्यास संमोहन ,औषधोपचार,प्रेमळ वर्तणूक,त्यांचे बिघडलेले मनोसंतुलन  जाग्यावर आणण्यास मदत करते.ते बरे होऊन घरी जातात .इथे आम्ही त्यांना ते मनोरुग्ण(वेडे) आहेत असे कधीही जाणवू देत नाही.शहाणी व्यक्ती,फार भावनाप्रधान असेल तर ,त्याला अनेक दिशांनी वेडा वेडा म्हटल्यामुळेसुध्दा तो कदाचित वेडा होऊ शकतो.

अत्यंत भावनाप्रधान व्यक्ती काही कारणाने त्यांचे नियंत्रण हरवून बसतात .अत्यंत प्रिय व्यक्तीचा मृत्यू, काही कारणाने निर्माण झालेला तीव्र क्षोभ,कोणत्याही स्वरूपाचा अकस्मात बसलेला तीव्र मानसिक धक्का, यांमुळे मनोसंतुलन हरवून बसतात.

काही केवळ येथील शांत वातावरणाने, काही समुपदेशाने,विशिष्ट औषधाने लवकर बरे होतात.अशा लोकांनाच आम्ही या विभागात ठेवतो .

एका मागून एक  मनोरुग्णालयातील निरनिराळे विभाग जनार्दन दाखवीत होता .डॉक्टर म्हणून त्याला सर्वांकडून मानवंदना मिळत होती .काही मनोरुग्णही त्याला नमस्कार करीत होते.सर्वांच्या नमस्कारातून, सर्वांच्या चेहऱ्यावरून, सर्वांच्या प्रतिसादावरून, जनार्दनबद्दल किती आपुलीक आदर व प्रेम कर्मचाऱ्यांच्या आणि मनोरुग्णांच्या मनात आहे ते लक्षात येत होते

पुरुषांचा व स्त्रियांचा विभाग वेगवेगळा होता.

दोन्ही विभागांच्या मध्ये एक विशेष इमारत होती .तिथे  विजेचा शॉक,समुपदेशन,संमोहन, इत्यादीसाठी निरनिराळ्या खोल्या व व्यवस्था होती  

जिथे विजेचा शॉक दिला जातो तोही विभाग मी पाहिला .जनार्दनने सांगितले, कमी जास्त व्होल्टेजचे, कमी जास्त कालावधीसाठी, कमी जास्त अंतराने, विजेचे शॉक दिले जातात .येथे पूर्ण काळजी घ्यावी लागते .फक्त अपवादात्मक स्थितीत पेशंटसना शॉक द्यावे लागतात .

*सिनेमा पाहून काहीजणांची अशी कल्पना झालेली असते की मनोरुग्णालयात विजेचे शॉक नेहमी दिले जातात .*

*शॉक ही मनोरुग्णालयात  सामान्य गोष्ट आहे.प्रत्यक्षात तसे नाही.* 

*फक्त अपवादात्मक स्थितीत पेशंटसना शॉक द्यावे लागतात .*

*नंतर आम्ही स्त्रीविभाग असलेल्या कक्षाकडे जाण्यासाठी निघालो . *

(क्रमशः)

२६/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन