Get it on Google Play
Download on the App Store

०५ मनाची शक्ती १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. ) 

पराग, स्नेहा व त्यांची मुलगी ज्योती  हे एक आदर्श कुटुंब  होते.त्यांचा दादरला एक छोटासा ब्लॉक होता .पराग सचिवालयात नोकरी करीत होता.स्नेहा दादरला एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करीत होती.ज्योती बालवाडीमध्ये होती.स्नेहाची शाळा जरी दहावीपर्यंत असली तरी त्या शाळेचेच, त्याच आवारात माँटेसरी स्कूलही होते.स्नेहा बरोबरच तिची मुलगी ज्योती बालवाडीत जात असे .बालवाडीची वेळ दहा ते चार एवढीच होती .त्यानंतर ज्योती आईच्या शाळेत येऊन कॉमनरुममध्ये थांबत असे.किंवा तिच्या आईच्या शाळेत इकडे तिकडे फिरतही असे . आईबरोबरच ती घरी येत असे .तिघांचेही  कोणत्याही समस्यांशिवाय आनंदात दिवस चालले होते .स्नेहाचे आई वडील पुण्याला असत तर परागचे आईवडील कोकणात रहात असत.

परागचा स्वभाव अतिशय काळजीखोर होता.त्याला काळजी करायला कोणतेही कारण पुरत असे . किंबहुना कारणाशिवायही काळजी करण्यात तो पटाईत होता.समजा त्याचा डावा खांदा दुखू लागला किंवा पाठ दुखू लागली तर त्याला आपल्याला हृदय़विकाराचा झटका तर येणार नाही ना अशी शंका येई .कारण त्याने कुठे तरी हृदय विकाराचा झटका येण्यापूर्वी पाठ खांदा दुखतो असे वाचलेले असे .समजा डोके दुखू लागले तर आपल्या डोक्यात रक्ताची गाठ झाल्यामुळे तर डोके दुखत नाही ना अशी शंका त्याला येई.त्यामुळे पुढे आपल्याला पक्षाघाताचा झटका तर येणार नाही ना असे विचार त्यांच्या मनात येत .बराच वेळ एकाच जागी बसल्यामुळे डाव्या पायाला मुंग्या आल्या तो बधीर झाला तर त्याला लगेच पक्षाघाताची शंका येई.कुठेही काहीही त्याने एखाद्या रोगाबद्दल वाचले किंवा ऐकले की त्याला लगेच आपल्याला तर तो रोग होणार नाही ना अशी शंका येई.इतकेच नव्हे तर त्याला आपल्याला तो रोग झाला आहे असे वाटू लागे.त्याची लक्षणे त्याला स्वतःमध्ये दिसू लागत.त्यावरच्या  वाचलेल्या उपाययोजना तो लगेच करू लागे .

अधूनमधून तो आपल्याला कोणता ना कोणता रोग झाला आहे या आशंकेने  डॉक्टरांना भेटण्यासाठी जात असे .आपल्याला तो रोग झालेला नाही ना याची त्याला खात्री करून घ्यायची असे. त्याच्या निरनिराळ्या शंकांनी  डॉक्टर हैराण होत असत.डॉक्टर त्याचे स्नेही होते .दोघेही बालमित्र होते .आणि म्हणूनच डॉक्टर त्याचे सर्व बोलणे ऐकून घेत असत.डॉक्टरांचे हॉस्पिटलही होते. त्यांच्या शंकेखोर स्वभावाबद्दल डॉक्टर त्याला कानपिचक्याही देत असत.परंतु त्याच्या स्वभावात काही फरक पडत नव्हता . त्याचे मित्रमंडळ त्याला चिंतातूर जंतू सी.जे. म्हणून संबोधित असे. 

ज्योती खेळण्यासाठी  कोणाबरोबर तरी बागेत गेली असेल आणि तिला घरी यायला उशीर झाला तर लगेच त्याची चिंता-मालिका सुरू होई.ती बागेत नीट पोचली असेल ना ?रस्ता क्रॉस करताना काही अपघात तर झाला नसेल ना ?रस्त्याच्या कडेने जाताना मागून एखाद्या वाहनाने तिला धक्का तर दिला नसेल ना?ती वाहनाखाली तर आली नसेल ना ?बागेत पाय घसरून पडल्यामुळे तिची कुठे मोडतोड तर झाली नसेल ना ?एक ना दोन अनेक शंकांनी  तो  चिंतातूर झालेला असे .

त्याची पत्नी स्नेहा,भाजी बाजारात भाजी आणायला गेली असली आणि समजा तिला उशीर झाला तर लगेच त्याची काळजी सुरु होई.अपघात, अपहरण, दंगा धोपा, यामध्ये आपली पत्नी किंवा मुलगी सापडली तर नसेल ना अश्या शंका त्याला ग्रासित असत.

त्याचा हा काळजीखोर  स्वभाव लहानपणापासूनच होता.तो घालविण्याचा आटोकाट प्रयत्न त्याच्या आईवडिलांनी केला होता .त्यामध्ये त्यांना संपूर्ण अपयश आले होते.त्यांच्या या स्वभावापुढे सर्वांनी हात टेकले होते.

त्याच्या पत्नीनेही त्याचा हा स्वभाव बदलण्याचा खूप प्रयत्न केला होता .शेवटी तिच्या पदरी अपयशच आले होते .घरी दारी शेजारी पाजारी मित्रांमध्ये तो एक चेष्टेचा विषय झाला होता .आपण उगीचच काळजी करतो .आपण फार काळजी करतो. आपण निष्कारण रिकाम्या डोक्यात काळजीचे मनोरे उभे करतो .हे सर्व त्याला समजत असे .परंतु उमजत नसे.स्वभावापुढे इलाज नाही हेच खरे .पुढे पुढे सर्वांचे त्याच्या या स्वभावाकडे दुर्लक्ष  होऊ लागले .कुणीही त्याला गंभीरपणे घेत नसे .

अर्थात आपल्यापैकी प्रत्येकाचा स्वभाव थोडीबहुत चिंता काळजी करण्याचा असतो .भविष्याची चिंता हा मनुष्याचा स्वभावच आहे .आपण म्हणजे आपल्या सभोवतालच्या माणसांबरोबर असलेले आपले संबंध होत. त्याला कुठेही धक्का लागला तर तो आपल्यालाच लागलेला धक्का असतो.हा धक्का लागू नये यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो .त्यामुळेच चिंता केली जाते. याची मर्यादा जेव्हा ओलांडली जाते तेव्हा तो एक मानसिक विकार, मानसिक विकृती बनते.                

एके दिवशी तो ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याचे डोके खूप दुखत होते .आपली लोक चेष्टा करतात हे त्याला माहित असल्यामुळे त्याने त्याच्या मनातील चिंता मोठ्याने व्यक्त केल्या नाहीत .तरीही आतल्या आत  त्याच्या चिंता चालूच होत्या .रात्री त्याला सडकून ताप भरला .दुसऱ्या दिवशी त्याला  दवाखान्यातही जाणे मुष्किल झाले .डॉक्टर त्याचे स्नेही असल्यामुळे ते त्याला घरी तपासायला आले .अन्यथा त्याला कोणत्याही परिस्थितीत दवाखान्यात जावे लागले असते .हल्ली फॅमिली डॉक्टर व होम व्हिजिट हे प्रकार जवळजवळ नाहीसे झालेले आहेत.

कदाचित याच्या पाठीमागे शास्त्रीय कारणे असू शकतील .निरनिराळ्या सर्वांगीण तपासण्या  आणि त्यावर उपचार हे हॉस्पिटलमध्येच व्यवस्थित होऊ शकतात .अश्या  परिस्थितीत घरी जावून तपासून योग्य निष्कर्ष काढता येत नाहीत .योग्य निर्णय घेता येत नाहीत.योग्य औषध योजना करता येत नाही .त्यामुळे डॉक्टर घरी तपासायला जात नसावेत .

पेशंट व त्यांचे नातेवाईक यांची डॉक्टराशी होणारी वर्तणूकही कदाचित याला कारणीभूत असू शकेल .

काहीही कारण असो, फॅमिली डॉक्टर ही संस्थाच हल्ली दिसत नाही .

विशेषीकरणाने जरा जास्तच गंभीर स्वरूप घेतलेले आहे.

डॉक्टर परागचे स्नेही होते. काट्याचा नायटा करण्याचा त्याचा स्वभाव त्यांना माहिती होता .त्यांनी त्याला संपूर्ण धीर दिला .काळजी करण्याचे काहीही कारण नाही .तू चार दिवसांत ठणठणीत बरा होशील म्हणून सांगितले. याचे विचारचक्र चालूच होते .टायफाईड, नवज्वर, यापासून ते ब्लड कॅन्सर पर्यंत सर्व शंका त्याच्या मनात येत होत्या .परागला डॉक्टरांनी जरी कितीही धीर दिला असला तरी त्याना हा ताप  थोडा वेगळा वाटत होता .  त्यानी ताप चढू देऊ नका, काळजी घ्या,म्हणून स्नेहाला सांगितले .तीन साडेतीनपेक्षा ताप वाढता कामा नये .हा ताप अकस्मात वाढतो .जर ताप एकदा डोक्यात गेला तर डोक्यावर कायमचा परिणाम होऊ शकतो .रात्री गजर लावून मधून मधून उठून ताप पहा आणि  डोक्यावर कपाळावर बर्फ ठेवा .वेळ प्रसंगी गार पाण्याची आंघोळ घातली तरी चालेल .परंतु ताप चढू देऊ नका म्हणून त्यांनी स्ट्रीक्ट सूचना दिल्या होत्या .अंगाभोवती गार पाण्यात भिजवून टॉवेल गुंडाळण्यास सांगितले होते.   

*स्नेहालाही हा ताप साधा वाटत नव्हता .*

(क्रमशः)

३/३/२०२०©प्रभाकर  पटवर्धन