Get it on Google Play
Download on the App Store

०८ अरुंधती २-३

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

बऱ्याच जणांची अशी समजूत असते कि विजेचे शॉक ही मनोरुग्णालयात  सामान्य गोष्ट आहे.प्रत्यक्षात तसे नाही.

फक्त अपवादात्मक स्थितीत पेशंटसना शॉक द्यावे लागतात .

नंतर आम्ही स्त्रीविभाग असलेल्या कक्षाकडे जाण्यासाठी निघालो . 

आम्ही स्त्रियांच्या कक्षाकडे जाण्यासाठी निघणार तेवढय़ात मला एक आठवण झाली .ज्याप्रमाणे  विजेचे शॉक देतात असे ऐकले होते, त्याप्रमाणेच काही जणांना निरनिराळ्या कारणांसाठी खोलीत बंद करून ठेवावे लागते असेही ऐकले होते.अशा प्रकारचे काही रुग्ण आहेत का असे मी जनार्दनला विचारले.त्याने हो असे म्हटल्यावर मी रुग्ण बघण्याची इच्छा प्रकट केली .

जनार्दन मला त्या विभागाकडे घेऊन गेला .कांही खोल्यांना कुलपे होती तर कांही उघडय़ा होत्या .एका  कुलूपबंद खोलीत एक माणूस कॉटवर बसलेला होता. आम्ही खिडकीतून पहात होतो.त्याचा चेहरा विमनस्क दिसत होता .त्याची नजर शून्यात लागलेली होती. अत्यंत गरीब साधा बापुडवाणा असा तो दिसत होता . त्याच्यामध्ये हिंस्र  असे काहीच दिसत नव्हते .त्याला खोलीत कां कोंडला असावा असा मी विचार करीत होतो.

आमची चाहूल लागताच त्याच्या चेहऱ्यात विलक्षण फरक पडत गेला.त्याचा चेहरा अत्यंत  हिंस्र  क्रूर खुनशी दिसू लागला.त्याला स्ट्रेट जॅकेटमध्ये,( एक प्रकारच्या विशिष्ट जॅकेटमध्ये) बंद केलेला होता.तो अंगावर खूनकरण्यासाठी  धावून येईल की काय असे वाटत होते . जनार्दन म्हणाला त्याच्या भाउबंदानी त्याला फसविले.हा मुंबईला नोकरीला होता .भाऊबंदांवर विश्वास ठेवून त्याने सह्या दिल्या . नोकरी सुटल्यानंतर घरी आला त्यावेळी भाऊबंदांनी त्यांचे घर जमीन सर्व ताब्यात घेतली होती .

तेव्हापासून हा असा आहे .कुणीही खोली उघडून आत गेला की तो आलेल्याला भाऊबंद समजतो आणि त्याच्या अंगावर त्याचा गळा दाबण्यासाठी धावून जातो.म्हणून त्याला असा बंदिस्त ठेवला आहे .

आम्ही पुढच्या एका कुलूपबंद खोलीकडे गेलो .खोलीला असलेल्या खिडकीतून निरीक्षण करण्यास सुरुवात केली .आत बसलेला माणूस उदासीन दिसत होता .तो इतका गरीब दिसत होता की त्याला खोलीत कुलूप लावून का ठेवले आहे तेच लक्षात येत नव्हते .

आमची चाहूल लागूनही त्याच्यात काहीच फरक पडत नव्हता.

हा तर गरीब दिसतो .हा कुणालाही काहीही करील असे वाटत नाही .याला खोलीत कां ठेवला आहे ?त्यावर जनार्दन म्हणाला.याचे त्याच्या पत्नीवर अतिशय प्रेम होते.  त्याची पत्नी प्रियकराबरोबर पळून गेली .त्याचा त्याला इतका धक्का बसला की तो अकस्मात प्रचंड  डिप्रेशनमध्ये गेला .त्यातून सावरल्यानंतर  केव्हातरी त्याला आपली पत्नी प्रियकराबरोबर एका मॉलमध्ये दिसली. त्याबरोबर तो बेभान झाला. त्याने मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेला एक सुरा घेऊन त्या दोघांचाही खून केला.तो इतका बेभान झाला होता की ती दोघे मेल्यानंतरही तो त्यांच्या प्रेतांवर सपासप वार करीत होता.रक्ताच्या थारोळ्यात त्या दोघांवर सपासप वार करताना त्याला पोलिसांनी पकडला .त्याने वेडाच्या  भरात हे सर्व कृत्य केले असे कोर्टात शाबित झाले.तेव्हापासून गेली दहा वर्षे इथे तो आहे .तसा तो नॉर्मल असतो.जेव्हा एखादी तरुणी त्याच्या पत्नीशी साधर्म्य असलेली दिसते त्या वेळी तो तिचा खून करण्याचा प्रयत्न करतो.

आपल्या नातेवाईकांची हालहवाल विचारण्यासाठी ,त्यांची प्रगती पाहण्यासाठी ,त्यांना  भेटण्यासाठी त्यांचे  नातेवाईक स्त्री पुरुष येथे येतात .हा केव्हा व्हायोलंट  होईल बेभान होईल ते  सांगता येत नाही म्हणून त्याला असा कोंडून ठेवला आहे .

एका कक्षात कांही मनोरुग्ण ठेवलेले होते . त्यातील काही नुसते बसून होते .काही स्वतःशीच पुटपुटत होते .काही स्वतःशीच रडत किंवा हसत होते.प्रत्येकात काही ना काही बिनसलेले होते .त्यांची  व्यथा दूर होण्यासारखी नव्हती.त्यांचे मनावरील सुटलेले नियंत्रण परत आणण्याचा प्रयत्न केला जात होता .ते सामान्य होण्याचा संभव होता. ते नॉर्मल झाले तर त्यांना सोडून देण्यात येईल.त्यांच्याकडून कुणाला त्रास होण्याचा संभव नव्हता . 

अशा अॅबनॉर्मल व्यक्ती ज्या कुणालाही त्रास देत नाहीत किंवा ज्यांची वर्तणूक विशेष त्रासदायक नसते असे समाजात मोकळे फिरत असतात .बऱ्याच वेळा त्या व्यक्ती कुटुंबात सामावून घेतल्या जातात .काही वेळा कुटुंबातील नातेवाईक  त्यांना योग्य उपचार करून नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतात .तर कांही नातेवाइक अशा लोकांना इथे सोडून जातात .

एवढे नमुने पुरे आता आपण पुढे जाऊ या असे मी म्हटले आणि आम्ही स्त्री कक्षाकडे जाण्यासाठी निघालो .

स्त्रियांना स्त्रियांचे म्हणून काही प्रश्न असतात .त्यामुळे त्यांचा समतोल ढळतो .मोनोपॉजच्या वेळी,मूल होत नाही म्हणून ,लग्न होत नाही म्हणून ,लग्न झाल्यावर नवरा कोणत्याही प्रकारचा भयंकर त्रास देतो म्हणून,मुले विचारीत नाहीत म्हणून ,काही वेळा साध्या साध्या कारणाने सुद्धा काहींचा तोल ढळतो.

मनाची म्हणून एक स्थितिस्थापक यंत्रणा आहे .ती बहुतेक वेळा योग्य प्रकारे कार्य करीत असते . त्यामुळे बहुसंख्य लोकांचा ढळलेला तोल सावरला जातो .अपवादात्मक स्थितीत तोल न सावरल्यामुळे मंडळी येथे येतात.योग्य औषध योजना, योग्य निदान, योग्य वातावरण, योग्य समुपदेशन, संमोहन व सूचना , यामुळे असे लोक काही काळात बरे होऊन आपल्या कुटुंबीयात परततात . ते येथे थोड्या दिवसांचे पाहुणे असतात .कांही जणांचा तोल कधीच न सावरल्यामुळे त्यांना इथेच कायम राहावे लागते.

बोलत बोलत आम्ही स्त्री कक्षात येऊन पोचलो .इथेही पुरुष कक्षाप्रमाणे एक सुंदर बाग,कुलूप बंद खोल्या ,इत्यादी व्यवस्था होती .इथे वॉर्डन रक्षक इत्यादी सर्व स्त्रिया होत्या .

इथेही स्त्रिया येण्याची कारणे पुरुषवर्गाप्रमाणेच बर्‍याच केसेसमध्ये होती.काही केवळ स्त्रियांच्या खास कारणामुळे येथे आल्या होत्या .  

एका झाडाखाली सुमारे चाळीस वर्षांची एक स्त्री बसलेली दिसली .तिचा पोषाख नीटनेटका होता .तिच्या चेहऱ्यावरील भाव शांत सोज्वळ प्रेमळ दिसत होते .मनोरुग्णतेचे कोणतेही चिन्ह तिच्यामध्ये दिसत नव्हते.ती एक पुस्तक वाचत होती.वाचनामध्ये ती पूर्णपणे बुडून गेलेली होती .आतापर्यंत मी कितीतरी निरनिराळ्या प्रकारचे मनोरुग्ण पाहिले होते .नॉर्मल किंवा अॅबनॉर्मल मनोरुग्णांमध्ये चेहऱ्यावर कमीजास्त प्रमाणात विशिष्ट भाव आढळून येतात .यांचे काहीतरी बिनसले आहे असे लक्षात येते .ही स्त्री मॉलमध्ये थिएटरवर,रस्त्यावर ,बागेत सोसायटीत, कुठेही दिसणाऱ्या एखाद्या प्रौढ स्त्री सारखी दिसत होती .

जनार्दनाला पाहताच एखाद्या ओळखीच्या माणसाप्रमाणे लगबगीने उठून ती पुढे आली . जनार्दनला तिने नम्रपणे अभिवादन केले .जनार्दननेही तिची तुम्ही कश्या काय आहात? म्हणून चौकशी केली.तिनेही सर्वकाही ठीक म्हणून उत्तर दिले .तिचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो.

मी जनार्दनला विचारले,हिच्यात तर कोणत्याही प्रकारचे वेडेपणाचे लक्षण दिसत नाही.जनार्दनने तिची व्यथा सांगण्याला सुरुवात केली.

हिचा संसार व्यवस्थित चालला होता. अरुंधती एका शाळेत शिक्षिका होती.पती सरकारी ऑफिसर होता.एक पांच वर्षांची लहान मुलगी "परी"होती .सर्व काही छान चालले होते.जग सुंदर वाटत होते .कुठेही खाचखळगे नाहीत सर्व काही सरळ साधे सोपे आहे असे वाटत होते .अकस्मात आकाशांतून आघात  झाला .हिच्यावर वीज कोसळली .लहानसे निमित्त होऊन तिच्या पतीचे निधन झाले .मुलीकडे परीकडे बघून तिने हा आघात सहन  केला.आता परी हे तिचे  जीवनसर्वस्व होते.तिचे सर्व जीवन तिच्या भोवती फिरत होते.  तिला शिकवायचे, तिचेही  जीवन परिपूर्ण करायचे,आपल्याला परिस्थितीमुळे जे जे मिळू शकले नाही ते ते तिला द्यायचे ,या प्रेरणेने ती जगत होती.हळूहळू परी मोठी झाली.कॉलेजात जाऊ लागली.तिच्यात तारुण्य सुलभ भावना निर्माण होऊ लागल्या.तिच्या वर्गातील एका मुलाच्या प्रेमात ती पडली .परीने त्या मुलाची आईशी ओळख करून दिली .अरुंधतीला तो मुलगा कोणत्याही दृष्टिकोनातून आवडला नाही . रूप जात तिला काहीच आवडले नाही .तिने आपले स्पष्ट मत तिला बोलून दाखविले .हा तुला फसवील. हा तुला दगा देईल. हा आंतल्या गाठीचा आहे.वेळीच तू याचा नाद सोड असे अरुंधतीने परीला सांगितले.

परीला आईचे बोलणे मुळीच आवडले नाही .परी त्या मुलासाठी वेडी झाली होती.त्या मुलाने परीवर काय जादू केली होती ते देव जाणे .तिला आईचा एक शब्दही पटला नाही .ती त्या मुलाबरोबर दिवसरात्र हिंडू फिरू लागली .अरुंधतीच्या शाळेतील मैत्रिणी सांगत आज परी आणि मुकुंद आम्ही सिनेमाला गेलो होतो तिथे दिसले तर परवा सारस बागेत दिसले .अरुंधतीचे नातेवाईक,परी आणि मुकुंद पेशवे पार्कमध्ये  दिसले,बंडगार्डनवर दिसले, सारस बागेत दिसले, कॅम्पमध्ये दिसले, असा रिपोर्ट देऊ लागले .मुलगी हाताबाहेर जाण्याच्या अगोदर तिला आवरा असे त्यांचे सांगणे होते.

अरुंधतीने तिला निरनिराळया प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. प्रेमाने चुचकारून, डोळ्यात अश्रू आणून,रागावून तिला सुधारण्याचा प्रयत्न केला .परी प्रेमाने आंधळी झाली होती .

अरुंधतीला तिच्या सासरचे विशेष कुणी नव्हते. माहेरचे बरेच नातेवाईक होते .तिचा मामा अरुंधतीचा थोरला भाऊ परीचा फार लाडका होता.

त्यानेही तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.   

*मुकुंदाशी लग्न करण्याचा  आपला हट्ट सोडायला परी तयार नव्हती .*

*मुकुंदाला ती विसरेल, तिच्या डोक्यातील वेड जाईल, या आशेने शेवटी आईने तिला तिच्या आजोळी वर्षभरासाठी पाठवून दिले.*

(क्रमशः)

२७/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन