Get it on Google Play
Download on the App Store

०३ दैवदुर्विलास १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )

लग्न मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. सत्यभामाबाईंचा आनंद गगनात मावेना.सत्यभामाबाईंना सर्व माई म्हणून म्हणत असत.सौ.माईना नटण्या मुरडण्याची मिरवण्याची भपकेबाजपणाची खूप हौस होती.

त्यांना दोन मुलगे होते. मोठा अविनाश व धाकटा मधुकर .मुलांचे लग्न थाटामाटात होईल आपल्याला व्याही मंडळींकडून मानपान होईल.आपणही त्यांचा मानपान करू.सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी, यांना लग्नाला बोलवू. लग्न असे करू की पंचक्रोशीत असे लग्न अजून आपण बघितले नाही असे सर्वजण म्हणतील. अशी स्वप्ने  माई नेहमी बघीत असत .त्यात त्यांचे काही चूकही नव्हते .मुलांच्या मुंजीही त्यांनी थाटात केल्या होत्या .त्यानंतर घरच्या समारंभाचा योग मुलांच्या लग्नातच येणार होता .

थाटात लग्न करावे .दणकेबाज स्वागत समारंभ करावा . दोनचार दिवस आप्तेष्ट जमवून पंगती उठवाव्यात.अंगभर दागदागिने घालून मिरवावे .निरनिराळ्या कार्यक्रमांच्या वेळी उंची पातळे नेसावीत.असे त्यांना वाटत असे.  

मोठय़ा मुलाने अविनाशने लव्हमॅरेज केले .लग्नात उगीचच खर्च करण्याच्या तो विरुद्ध होता .ते पैसे बँकेत ठेवावेत किंवा त्या पैशातून घर सजवावे किंवा ते पैसे  अनाथाश्रम, एखादी धर्मादाय संस्था, सामाजिक संस्था, याला द्यावेत असे त्याचे मत होते .लग्नात केला जाणारा खर्च वायफळ असे त्याला वाटत असे .

अापण सर्व गोष्टी समाधान आनंद यासाठी करीत असतो . प्रत्येकाचा आनंद  निरनिराळ्या गोष्टीत असू शकतो .जोपर्यंत सामाजिक स्वास्थ्याचा भंग होत नाही ,कोणतीही अनैतिक गोष्ट होत नाही ,तोपर्यंत आनंद मिळवण्याचा हा मार्ग चांगला व तो वाईट असे आपण म्हणू शकत नाही .

अविनाशचा आनंद रजिस्टर मॅरेज करण्यात, पैसे त्याच्या मताप्रमाणे अन्य योग्य ठिकाणी खर्च करण्यात, होता .तर माईंचा आनंद  लग्नासाठी पैसे भरपूर प्रमाणात खर्च करण्यात, डामडौलात, मिरवण्यात  होता.

अविनाशने आपला हेका चालविला.रजिस्टर मॅरेज केले. भटजी बोलवून  घरच्या घरी आईच्या समाधानासाठी  लग्न संस्कार केले . माई हिरमुसल्या झाल्या.अविनाशच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही .तात्या त्यांचे यजमानही, अविनाशच्या मताशी पूर्ण सहमत होते.माईंच्या मनाचा,त्यांच्या आनंदाचा, कुणी विचारच केला नाही.जो तो आपला हेका चालविण्यात मश्गुल होता .माई हिरमुसल्या झाल्या होत्या.     

अविनाशची पत्नी सुधा स्वभावाने अतिशय चांगली होती .ती माईंचे व्यवस्थित करीत असे.त्यांना वेळोवेळी  योग्य तो मानही देत असे. घरही चांगल्या प्रकारे सांभाळीत असे . माईंची सुधाबद्दल काहीही तक्रार नव्हती .केव्हाही थाटामाटात झालेल्या लग्नाबद्दल बोलणी निघाली की माई अविनाशकडे बघून आपलेच नाणे खोटे असे म्हणत असत .त्यावर अविनाश एक भिवई उडवून हसून चालायचेच असे म्हणत प्रतिसाद देत असे.

आता माईंच्या सर्व आशा मधुकरवर केंद्रित होत्या.एक दिवस मधुकरने  घरातील सर्वांची  ओळख करून देण्यासाठी एक मुलगी,घरी आणली.मुलगी चांगली होती. शिक्षण उंची वय रंगरूप यांनी मधुकरला अनुरूप होती .ती त्याच्याच ऑफिसमध्ये नोकरी करीत होती .नाव ठेवण्याला कुठेही जागा नव्हती .हाही अविनाश प्रमाणेच लग्न करणार म्हणून त्या हिरमुसल्या झाल्या होत्या. त्यांनी मधुकरला विचारले काय रे ,तूही दादाच्या पावलावर पाऊल ठेवून जाणार  काय ?

मधुकर म्हणाला  बिलकूल नाही .तुझी सर्व हौस मौज या लग्नात पुरी होणार  आहे. एवढेच काय अविनाशच्या लग्नात राहिलेली कसरही भरून निघणार आहे. सविताच्या आईला तुझ्यासारखीच समारंभाची हौस आहे.तुमचे दोघींचे छान जमेल . 

मधुकरने म्हटल्याप्रमाणेच झाले .सविताच्या आई वासंतीताई यांनी लग्नात काहीही कमी ठेवले नाही.माईंच्या कल्पनेपेक्षा जास्त मानपान केला .भरपूर खर्च केला.रुखवत, दागदागिने, उंची पातळे, जेवण, कुठेही काहीही कमी पडू दिले नाही.माईनीही त्यांच्या बाजूने कुठेही काही उणे पडू दिले नाही.माईंची नटण्यामुरडण्याची, उंची पातळे नेसण्याची, दागदागिने घालून मिरविण्याची, सर्व हौस पूर्णपणे भागली .सर्व समारंभात त्या इकडून तिकडे फिरत होत्या .समारंभाचा आनंद घेण्यात मश्गुल होत्या .

या सर्वात पती तात्यासाहेब यांच्याकडे त्यांचे थोडे दुर्लक्ष झाले. या बाबतीत तात्यांचा स्वभाव माईच्या बरोबर विरुद्ध होता.माईना मिरवण्याची खूप हौस तर तात्यांना समारंभात मिरवणे बिलकुल आवडत नसे. लग्न वैदिक पद्धतीने होते .विवाहाचे सर्व संस्कार सकाळपासून चालले होते .तात्या आपल्या खोलीत आराम करीत होते .त्यांना या सर्व गोष्टीत काहीही रस नव्हता .त्यांची प्रकृती सकाळपासून थोडी नरमच होती .त्यांना नक्की काय होत आहे ते कळत नव्हते परंतु आतून अस्वस्थ वाटत होते.

एक दोनदा माईनी  खोलीत येऊन तात्यांना अहो बाहेर चला, नुसते तिथे बसा, असे सुचविले.तात्यानी तुमचे चालू द्या .मी इथेच सुखात आहे म्हणून किंचित कसेनुसे हसत सांगितले.समारंभाच्या गर्दीत व तात्यासाहेबांचा स्वभाव लक्षात घेता माईना त्यांची प्रकृती ठीक नाही हे  लक्षात आले नाही .

जरी लग्न  वैदिक पद्धतीने होत असले तरी सर्वांच्या समाधानासाठी  हौशीने वैदिक पद्धतीमध्ये नसलेले अनेक कार्यक्रम होत असतात.झाल देण्याचा कार्यक्रम आला .

*मोठा मुलगा अविनाश त्यांना बोलावण्यासाठी गेला .*

*त्याला तिथे आक्रीतच पाहायला मिळाले.*

*तात्या गादीवर आडवे झाले होते .*

* त्यांचा चेहरा विचित्र दिसत होता .*

* त्याने जवळ जाऊन नाकाजवळ बोट धरून पाहिले. *

* त्यांचा श्वास चालत नव्हता.?

*ते हे जग सोडून केव्हाच निघून गेले होते .*

(क्रमशः)

२५/२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन