Get it on Google Play
Download on the App Store

९ स्टफ्ड् पेंढा भरलेले २

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

पकडून आणलेल्या प्राण्याला डोक्यामध्ये तो एक इंजेक्शन देत असे.

इंजेक्शनमुळे त्याचा लगेच मृत्यू होई.नंतर तो व त्याचे नोकर त्या प्राण्याची कातडी काळजीपूर्वक दूर करीत व आंतील मांस इत्यादी सर्व भाग काढून टाकीत.

हे मांस ते पाळलेल्या गिधाडे कावळे वगैरे प्राण्यांना खायला देत असत.

हाडे एका खड्ड्यात पुरून टाकीत.बऱ्याच वेळा त्यांचा वापर स्टफिंगसाठी केला जाई.  स्वच्छता उत्तम ठेवीत असत.

तिथे गेल्यावर मांसाचा रक्ताचा कसलाही घाणवास येत नसे.

नंतर कांही रासायनिक द्रव्यांच्या मार्फत त्या कातड्याचे ते पूर्णपणे संरक्षण करीत असत.त्यामध्ये कापूस आणि इतर वस्तू भरून तो प्राणी जसाच्या तसा करीत असत.अशा तऱ्हेने पेंढा भरलेले, स्टफिंग केलेले, प्राणी हुबेहूब जसेच्या तसे दिसत अगदी जिवंत आहेत असे वाटत असे.

एकेका प्राण्याला स्टफिंग करण्यासाठी कित्येक दिवस लागत.तो व त्याचे नोकर पेंढा भरण्याच्या कलेत अत्यंत पारंगत होते.त्यांच्या वाड्यात गेल्यास घुबड, गिधाड,गरूड, कावळा, चिमणी, असे पक्षी व वाघ,लांडगा, कोल्हा, हरीण, असे प्राणी मांडून ठेवलेले दिसत.ते हुबेहूब खरेच आहेत असे वाटे. पेंढा भरलेले निरनिराळे प्राणी मुंबईला नेऊन तो विकत असे.त्यामधून त्याला चांगला नफा होत असे.   

जिवंत प्राणी पकडून जर त्यांच्याकडे नेला तर तो त्याला चांगली किंमत देत असे.जाळी लावण्याचे ,रानात फिरण्याचे, खड्डा खणून सांपळा तयार करण्याचे,  प्राण्याला पकडण्याचे,त्याला व्यवस्थित बांधून वाड्यावर आणण्याचे, सर्व श्रम वाचत असत.

अशा प्रकारे जंगलातून प्राणी पकडणे व ठार मारणे   वनसंरक्षक कायद्यानुसार गुन्हा आहे.परंतु तो वनाधिकारी, मंत्री, सरकारी अधिकारी, इत्यादींना व्यवस्थित मॅनेज करीत असे. त्यांना खूष ठेवीत असे.कदाचित त्याने रेग्युलर परवाना काढलेला असेल.कदाचित ती गोष्ट कुणाच्या लक्षात आली नसेल.अधूनमधून कांही प्राणी मारले तरीसुद्धा त्याच्यावर कधीही गुन्हा दाखल झाला नाही एवढे मात्र खरे.

श्रोत्यांपैकी एक जण म्हणाला,हे सर्व ठीक आहे परंतु मनुष्येतर प्राणी भूतयोनीत जातात.त्यांची कमी जास्त ताकदीची भुते होतात याची गोष्ट तुम्ही सांगणार होता त्याचे काय झाले.

रमाकांत, तो प्राध्यापक, काटकुळा मनुष्य, पुढे बोलू लागला.त्या संबंधीच तुम्हाला सांगणार आहे.मी सांगितली ती पार्श्वभूमी आहे.  प्राण्यांच्या भुतांचे अस्तित्व व त्यांचा प्रताप कळण्यासाठी ती आवश्यक आहे.  

असेच दिवस चालले होते.लहान मोठय़ा प्राण्यांच्या हत्या होत होत्या.ते पेंढा भरून विक्रीसाठी पाठविले जात होते.मुख्य रस्त्यापासून वाड्यापर्यंत कच्चा रस्ता केवळ टेम्पो जावा म्हणून करण्यात आला होता.टेम्पोतूनच पेंढा भरलेले निरनिराळे प्राणी  खोक्यात व्यवस्थित पॅक करून  पाठवले जात असत. 

वाड्यावर भरपूर प्रकाशासाठी जनरेटर बसवलेला होता.रात्री पेंढा भरण्याचे काम करताना भरपूर प्रकाश अत्यावश्यक होता. रात्री वाडा प्रकाशाने उजळून निघालेला असे.एके रात्री वाडा प्रकाशाने उजळून निघाला नव्हता.पाड्यावरील लोकांना ही गोष्ट जरा विचित्र वाटली.आतापर्यंत   असे कधीच झाले नव्हते .जनरेटर   बिघडला असावा असा लोकांचा समज झाला.दुसऱ्या दिवशी वाड्यावर सामसूम होती.कदाचित अरण्यात सर्व गेले असतील,कदाचित कांही कामासाठी  शहरात गेले असतील,असे लोक समजले.परंतु आतापर्यंत कांही ना क़ही नोकर वाडय़ात कामासाठी नेहमी रहात असत. वाडा बंद करून सर्व निघून गेले असे आतापर्यंत कधीच झाले नव्हते.  

दुसर्‍या  रात्रीही सर्वत्र काळोख होता. लोकांनी आता मात्र उद्या सकाळी जावून वाड्यावर काय होत आहे ते पाहायचे असे ठरविले.सर्व जण वाडा सोडून कायमचे शहरात तर निघून गेले नाहीत ना?असेही लोकांना वाटले.

दुसऱ्या दिवशीही सर्वत्र सामसूम होती.काही लोक बिचकत बिचकत वाड्यावर गेले.पाड्यावरील लोकांचे वाड्यावर विशेष येणेजाणे नसे.वाड्यातील सर्वांना लागणार्‍या  सर्व गोष्टी ते शहरातून अाणत असत.पाड्यावर व्यवस्थित दुकानही नव्हते.दूधही ते शहरातून मागवीत असत. त्यामुळे त्यांचा पाड्याशी संबंध येत नसे.  

वाडा सताड उघडा होता.सर्वत्र सामसूम होती.लोक वाडय़ांत शिरले.बाहेरच्या दिवाणखान्यात  पेंढा भरण्यात कुशल असलेले  स्टफिंग एक्स्पर्ट जयवंतराव सोफ्यावर बसलेले होते.आपण वाड्यात आल्याबद्दल जयवंतरावांकडून आपल्याला दाट बसणार असे सर्वांना वाटले.जयवंतराव आलेल्या मंडळींकडे रोखून पाहत आहेत असे वाटत होते.जयवंतराव कांहीही बोलत नव्हते.जवळ गेल्यावर त्यांचा कुणीतरी पेंढा भरून पुतळा बनविलेला दिसला.हा पुतळा अगदी हुबेहूब होता.

लोक दिवाणखान्यातून वाड्यातील अंतर्भागात बिचकत बिचकत गेले. सर्व नोकरांचेही कुणीतरी पेंढा भरून पुतळे बनविले होते.हे पुतळे नोकर काही ना काही काम करीत आहेत अशा स्थितीत सर्वत्र होते.जयवंतरावांनी पेंढा भरलेले प्राणीही वाडयात एका दालनात होते.

शहरात पोलिसांना कळवण्यात आले.पोलीस येऊन त्यांनी सर्वत्र शोध घेतला.पंचनामा   करण्यात आला.पेंढा भरताना  सर्वांच्या शरीरातील बाहेर काढलेल्या   रक्त मांस इत्यादी गोष्टींचा कुठेही   मागमूसही नव्हता.जयवंतराव यांचा मुलगा आला.त्याने सर्व पेंढा भरलेले   प्राणी शहरात नेहमीच्या दुकानात विक्रीसाठी ठेवले.

पोलिसांनी जयवंत व त्यांचे नोकर याना कुणी ठार मारले? त्यांचे स्टफिंग करून पुतळे कसे बनविण्यात आले?याचा तपास केला.पोलीसाना कांहीही धागेदोरे मिळाले नाहीत.कसलाही तपास   लागला नाही. उलगडा झाला नाही.न सुटलेली केस म्हणून चौकशी बंद करण्यात आली.

पोलिसांनी सर्व चौकशीअंती पेंढा भरलेले पुतळे जयवंतरावांच्या मुलाच्या ताब्यात दिले.त्यांच्या मुलाने जयवंतराव यांचा पुतळा त्यांची स्मृती म्हणून आपल्या घरात ठेवला. नोकरांचे पुतळे त्या त्या नोकरांच्या घरी त्यांची स्मृती म्हणून दिले.   

*जयवंतराव व नोकर यांना कुणी ठार मारले?*

*कौशल्यपूर्वक   काळजीपूर्वक त्यांचे पेंढा भरलेले पुतळे कुणी केले?*

*जे पुतळे बनवायला  कित्येक दिवस लागले असते ते एका रात्रीत कसे बनवले गेले?*  

*हे गूढ आजपर्यंत उलगडलेले नाही .*   

*त्यानी ज्या प्राण्यांची हत्या केली त्यातील काही प्राणी भुते झाले.*

* प्राण्याना जिवंत असताना जयवंतरावानी ठार मारल्यामुळे प्राण्यांची भुते सूडभावनेने प्रेरित होती*

*त्यांनीच पेंढा भरून सर्वांचे पुतळे बनविले याशिवाय दुसरे काही स्पष्टीकरण देता येत नाही.* 

* ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांना मी जयंतरावांच्या मुलाचा पत्ता देतो.स्वतः जाऊन पेंढा भरलेल्या जयवंतरावांचा पुतळा पाहून त्यांनी खात्री करून घ्यावी*  

*पोलिस स्टेशनला जावून वाड्याची चौकशी बंद केलेली फाईलही पाहावी.*  

*जयवंतरावांकडे त्यांच्या नोकरांचे पत्ते मिळतील तेथे त्यांचे पुतळे बघता येतील.*    

*तुम्ही तुमचा निष्कर्ष काढू शकता.एवढे बोलून ते प्राध्यापक बोलायचे थांबले.*  

(हळूहळू बरेच सभासद रमाकांत सांगत असलेली गोष्ट ऐकण्यासाठी गोळा झाले होते.क्लबमध्ये टाचणी पडली तरी तिचा आवाज ऐकू यावा एवढी शांतता पसरली होती.)  

(समाप्त)   

७/१२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन