Get it on Google Play
Download on the App Store

३ विचित्र स्वप्न १-२

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

स्वप्न पडले नाही अशी व्यक्ती सापडणार नाही.प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा स्वप्ने पडत असतात.  या माझ्या मताशी तुम्ही सर्व सहमत व्हाल याची मला खात्री आहे .सर्वानाच नेहमी स्वप्ने पडत असतात असे शास्त्रज्ञही म्हणतात.मला कधीच स्वप्न पडले नाही माझी झोप एकदम शांत असते असे कदाचित कांही जण म्हणतील परंतु प्रत्यक्षात त्यांना स्वप्ने पडतात परंतु ते जागे होतात तेव्हा त्यांना त्यांची स्मृती नसते.असे बऱ्याच शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.पडलेल्या स्वप्नामधील फक्त कांहीच स्वप्ने लक्षात राहतात.जी स्वप्ने आठवणीत रहात नाहीत, ती पडली काय किंवा न पडली काय, आपल्याला त्यांच्याशी काही देणे घेणे नाही.केवळ त्यांच्यात शास्त्रज्ञांना रस असतो असे फार तर आपण म्हणूया.जर स्वप्ने पडली नाहीत तर झोप शांत नसते असेही म्हणणारा एक गट आहे.लक्षात न राहणार्‍या स्वप्नांमुळे आपली झोप शांत असते असेही म्हणणारा एक गट आहे. स्वप्नामुळे झोप विचलित होते, अस्वस्थ झोप लागते,असे म्हणणाराही एक गट आहे .आपल्यापुरता विचार केला तर लक्षात राहणारी स्वप्नेच विचारात घेतली पाहिजेत.कांही स्वप्ने आनंददायी असतात.अशी स्वप्ने वारंवार पडावी असे वाटते.स्वप्नातून जागे झाल्यावर आणखी काही काळ स्वप्न तसेच सुरू राहायला हवे होते असेही वाटते.स्वप्न तुटल्याचा जागे झाल्याचा रागही येतो.अर्थात दिवास्वप्ने म्हणूनही एक भाग आहे मी त्याबद्दल बोलत नाही. स्वप्ने आनंददायी असतात  त्याचप्रमाणे भीतिदायक असतात याचा अनुभव सर्वांनाच असणार.अर्थात अपवादात्मक स्थितीत काहींना केवळ आनंददायी स्वप्ने पडत असतील,तर कांहींना केवळ भीतिदायक स्वप्ने पडत असतील.परंतु सामान्यतः सरमिसळ स्वरुपाची स्वप्ने पडतात.आपल्या ओळखीचे मन, (बहिर्मन) हे समुद्रासारख्या विशाल असलेल्या अंतर्मनावरील केवळ लहानसा थर आहे असे म्हटले जाते.अंतर्मनातील खळबळ स्वप्नरूपाने प्रगट होते असेही काही जण म्हणतात.  

आपल्या सुप्त किंवा प्रगट इच्छा आकांक्षा स्वप्नामार्फत पूर्ण  केल्या जातात असेही कांही जणांचे म्हणणे आहे.

या संदर्भात एक गमतीदार गोष्ट मला सांगायची आहे. माझे वडील प्रत्यक्ष जीवनात घाबरट होते.त्यांना जी स्वप्ने पडत त्यात ते  कधीही हार मानीत नसत.ते स्वप्नात कधीही घाबरले नाहीत.शत्रूला पिटाळून लावून विजयी झाल्यावरच त्यांना जाग येत असे.

याउलट माझी आई.प्रत्यक्ष जीवनात ती अतिशय धीट  होती.परंतु स्वप्नात ती भीत असे.स्वप्नात हमखास ती ओरडत राही.ती पटकन जागीही होत नसे.हलवून हांका मारून तिला जागी करावी लागे.असो.            

स्वप्ने व आपण, यावर मला कांही संशोधनात्मक, विचारपरिप्लुत,किंवा केवळ माहिती देणारा लेख लिहायचा नाही.माझ्या स्वप्नांबद्दल लिहावे असे वाटले,आणि सुरुवातीलाच असंख्य विचारानी,असंख्य आठवणीनी माझ्या मनात गर्दी केली.त्यांतील कांही विचार,काही आठवणी लिहिल्याशिवाय चैन पडत नव्हते म्हणून कांही विचार लिहिले  एवढेच.

मला लहानपणापासून भविष्यदर्शी स्वप्ने पडत आलेली आहेत.ती कां पडतात?त्यांचा उगम कसा होतो ? याची कारणे शास्त्रज्ञांनी शोधून काढायची आहेत.त्यानांही ती सापडतील असे मला वाटत नाही.नेहमीप्रमाणे केवळ चर्चा चर्चा आणि चर्चा, सिद्धांत सिद्धांत आणि सिद्धांत, मांडले जातील.असो.   

पडणारी स्वप्ने व त्यातून आलेले अनुभव हे लिहिण्यापूर्वी, थोडी पार्श्वभूमी देणे आवश्यक आहे.त्यामुळे माझी कथा जास्त चांगल्याप्रकारे समजून घ्यायला वाचकांना मदत होईल.               

माझे लहानपण कोकणात गेले आहे.मी जिथे राहत होतो तिथे, कातकरी नावाची एक आदिवासी जमात होती. खायच्या  पानामध्ये जो कात लावला जातो तो तयार करणारी जात ती कातकरी होय.या कातकऱ्यांचा त्या वेळी आणि त्या प्रदेशात आणखी एक उद्योग होता.तो म्हणजे वानरांना  तीरकमठ्ठ्याद्वारे ठार मारणे हा होय .गावात एखादा वांदर कातकर्‍यानी मारला म्हणजे वर्षभर तरी वांदर त्या गावाकडे फिरकत नसत. काळ्या तोंडाच्या माकडांना वांदर म्हणतात हे आपल्याला माहीत असेलच.या वांदरांची टोळी असते.भाजीपाला, फळभाज्या,आंबे,( विशेषतः आंबे) तयार होतात तेव्हा ही टोळी रानातून अकस्मात गावात येत असे.आंब्यांबरोबरच तयार भाजीपाला, फळभाज्या, याही खाऊन किंवा नास करून उद्ध्वस्त केल्या जात असत.खाणे कमी आणि उद्ध्वस्तता जास्त असा वांदरांचा खाक्या असे.

ही कातकरी जमात आपल्याला एकलव्याचा वंशज समजते.तीरकमठ्याचा वापर अत्यंत सफाईने हे लोक करीत असत .अत्यंत अचूकपणे नेम धरून हे बाण सोडत. बाण सोडताना हे हाताच्या अंगठ्याचा वापर करीत नसत. अंगठ्याचा वापर केल्याशिवाय बाण अचूक मारण्यात हे वाकबगार होते. वानरांची टोळी आली की या लोकांना बोलावण्यात येत असे.त्यासाठी त्यांना गांवकऱ्यांकडून मोबदलाही दिला जाई.गावचा खोत पाटील असा जबाबदार मनुष्य त्यांना बोलावणे पाठवीत असे.मोबदल्यापरी मोबदला, आणि भोजनासाठी वानराचे चविष्ट मांस,असा त्यांचा दुहेरी फायदा होत असे.कांही वेळा ते  बोलाविल्याशिवायही येत असत .वर्गणी गोळा करून लोक त्यांना मोबदला देत असत. खोत जमीनदार यांचा वानरापासून पीक वांचल्यामुळे जास्त फायदा होत असे .ते स्वतःसुद्धा खुशीने कातकऱ्यांना बक्षिसी देत असत. 

कातकर्‍याना पाहिल्याबरोबर वांदर अस्ताव्यस्त धावू लागत.कसे कोण जाणे पण हे आपल्याला मारणार हे त्यांना बरोबर समजत असे.घाबरून वांदर उंचावर झाडाच्या टोकाला जाऊन पाल्यांमध्ये छपून बसत.त्यांतील एखादा हे कातकरी अचूक हेरत असत.आम्हाला झाडावर वांदर किंवा आणखी कुणीही दिसत नसे.कातकर्‍यांना मात्र तो बरोबर दिसत असे. त्याला बरोबर हेरून ते बाण मारीत आणि वांदर अचूक बाण लागून एखाद्या फळाप्रमाणे  झाडावरून खाली पडत असे.वांदर जिवंत असताना त्याचे चार पाय बांधून त्याला काठीला लटकवून ते नेत असत.कांहीवेळा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडय़ा मारीत वांदर जात असतानाही ते बरोबर वेध घेऊन बाण मारीत असत. नंतर त्याला नेऊन ते भाजून खातात असे लोक म्हणत असत.मी रत्नागिरीपासून दक्षिणेला पंधरा वीस मैलांवर रहात होतो.तिथे वांदरांचा उपद्रव भरपूर असे.तिथे हे कातकरी वांदरांना मारताना मी माझ्या लहानपणी सुमारे ऐशी वर्षांपूर्वी पाहिलेले आहेत.माझ्या लहानपणीच मी ते गांव सोडले. नंतर परिस्थिती कोणती आहे ते मला माहीत नाही.कातकरी जमात आहे की नाही.ते वांदर मारतात की नाही .मारले तरी खातात की नाही कांहीही माहीत नाही.

लहानपणी सहा सात वर्षांचा असताना  पाहिलेल्या त्या दृश्यांचा अतिशय खोल परिणाम माझ्या बालमनावर झाला असावा.

तेव्हापासून मला एक विचित्र स्वप्न पडू लागले.

हे स्वप्न मी आज वृद्ध झालो तरीही केव्हा केव्हा पडते .   

स्वप्नाची रूपरेखा साधारणपणे पुढीलप्रमाणे असते.

मी, माझे मित्र, आईवडील, नातेवाईक, ओळखीची इतर मंडळी, कित्येकवेळा अनोळखी व्यक्ती, यातील सर्व किंवा कांही वांदराप्रमाणे झाडावरून उडय़ा मारीत पळत असतात .

कित्येक वेळा वांदरांप्रमाणेच जमिनीवरूनही धावत असतात. आमच्या मागून कातकरी प्रत्यंचा ताणून धावत असतात.आणि मी घामाघूम होऊन घाबरून जागा होतो.

जागा होतो त्यावेळी माझे अंग घामाने निथळत असते.

कोणत्याही प्रकारची हालचाल मला पंधरा वीस मिनिटे करता येत नाही.

मी जवळजवळ बेशुद्धावस्थेत असतो.एखादवेळी अशा अवस्थेतच माझा मृत्यू होणार आहे.एखादवेळी स्वप्न पहात असताना झोपेतच माझा मृत्यू होईल.

क्वचित केव्हांतरी कातकर्‍याने सोडलेला बाण माझ्या स्वप्नात आमच्यापैकी एखाद्याला लागतो.

तो मरतो आणि मी घामाघूम होऊन घामाने निथळत जागा होतो. 

अशावेळी मी अत्यंत अस्वस्थ असतो.

*मला त्या रात्री बहुधा पुन्हा झोप लागत नाही.*

* माझा रक्तदाब त्यावेळी निश्चित वाढलेला असणार.*

*हृदयाचे ठोकेही निश्चित वाढलेले असणार.*

* पुढे अनुभवाला येणारी आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला तो बाण लागलेला असतो त्याचा पुढील सहा महिन्यांमध्ये केव्हांतरी मृत्यू होतो.*

(क्रमशः)

२१/१२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन