Get it on Google Play
Download on the App Store

२ गढीतील म्हातारा २-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )      

सरपंचाने सरकार दरबारी पोलिसांत रीतसर तक्रार केली.

एक दिवस पोलिसांची एक तुकडी दोन तीन जीपमधून गढीवर येवून थडकली.

गढीच्या तटाचा दरवाजा उघडाच होता.पोलिसांच्या  जीप आत येऊन दरवाज्याजवळ थांबल्या .पोलिसांचे जीपमधून  उतरताना गच्चीवर सहज लक्ष गेले. गच्चीवर एक म्हातारा व त्याच्या शेजारी एक तरुणी उभी होती .सरपंचाने केलेल्या तक्रारीप्रमाणे तरुणी येथे आहे हे पोलिसांनी पाहिले .सरपंचाने अफवेवर विश्वास ठेवून तक्रार नोंदविली नव्हती याची पोलिसाना खात्री पटली. पोलिसांनी दरवाजा ठोठावला .बाहेर कोण आले हे पाहण्यासाठी दरवाजाला एक छिद्र  होते .छिद्रावर आतल्या बाजूने एक सरकती फळी असावी.ती फळी सरकवण्यात आली .आतून कुणीतरी छिद्राला डोळा लावून बाहेर पाहिले.दरवाजाचा अडसर काढण्यात आला.एका नोकराने, तोही वयस्कर होता, दरवाजा उघडला .तू कोण म्हणून त्याला विचारता त्याने मी बजाबा नोकर जी म्हणून उत्तर दिले  .मालक आहेत का म्हणून विचारता त्याने जी साहेब , बसा धन्यांना बोलावतो असे सांगितले  .

थोड्याच वेळात तो गच्चीतील म्हातारा हजर झाला .त्याने काय काम आहे म्हणून विचारता,  सब इन्स्पेक्टरने गढीची आम्हाला झडती घ्यायची आहे असे सांगितले. म्हाताऱ्याने का म्हणून विचारता, इन्स्पेक्टरने कडक स्वरात   इथे बेकायदेशीर व्यवहार चालतात अशी आम्हाला तक्रार आली आहे , त्याची चौकशी करावयाची आहे .असे सांगितले .सर्च वॉरंट आहे का म्हणून म्हाताऱ्याने चौकशी केली .

इन्स्पेक्टरने सर्च वॉरंट दाखविले .सर्च वॉरंट बघून म्हातार्‍याने गढीची खुशाल झडती घ्या. मी कायद्याच्या विरुद्ध काहीही करीत नाही आणि  मला कायद्याच्या विरुद्ध काही करायचेही नाही असे साळसूदपणे सांगितले .गढीच्या तपासाला सुरुवात झाली .दहा बारा पोलिस सर्वत्र फिरून तपास करू लागले. गढीचा काना कोपरा त्यांनी तपासला. त्यांना कुठेही काही बेकायदेशीर आढळले नाही .त्यांना ती तरुणी कुठेही आढळली नाही .जणू काही ती हवेत विरून गेली होती .कुठे तरी गुप्त खोली असली पाहिजे .कुठे तरी बाहेर जाण्याची गुप्त वाट असली पाहिजे .कुठे तरी तळघर असले पाहिजे.पोलीस संशय येईल त्या त्या ठिकाणी  काठीने पायाने ठोकून पाहात होते .कुठेही एखादी कळ, एखादा गुप्त दरवाजा, एखादा गुप्त जिना सापडत नव्हता. 

तो म्हातारा दिवाणखान्यात शांतपणे सोफ्यावर बसला होता .कुठेही काहीही संशयास्पद सापडणार नाही याची त्याला बालंबाल खात्री होती.आपल्या पिकल्या दाढीवर समाधानाने हात फिरवीत तो बसला होता . इन्स्पेक्टर सर्वत्र फिरून तिथे आल्यावर त्याने तुम्ही कोण म्हणून विचारले .मी गढीचा मालक म्हणून त्याने सांगितले. इन्स्पेक्टरने तुम्ही गढीचे मालक कशावरून? तुम्ही या गढीचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला आहे अशी तक्रार आहे असे सांगितले .

त्यावर तो म्हातारा शांतपणे उठला .एका कपाटातून त्याने गढीच्या दस्तऐवजाचे कागद काढून इन्स्पेक्टरला दाखविले .राजेंद्र महाले या नावाने ते कागदपत्र होते.इन्स्पेक्टरने तुम्हीच राजेंद्र महाले कशावरून असे विचारता त्याने आधार कार्ड काढून दाखविले .तुम्ही आतापर्यंत कुठे होता म्हणून चौकशी करता त्याने मी बुलढाण्याला होतो.  आता मी आमच्या मालकीच्या, पूर्वजांच्या, गढीत रहायला आलो आहे असे उत्तर दिले .वरती त्याने मिस्किलपणे इन्स्पेक्टरला तुमची काही हरकत आहे काय? म्हणूनही विचारले.

इन्स्पेक्टरला सर्व काही संशयास्पद वाटत होते .कागदोपत्री सर्वकाही बिनचूक व्यवस्थित काटेकोर दिसत होते.

आम्ही जीपमधून उतरलो त्यावेळी तुमच्याबरोबर गच्चीत एक मुलगी उभी होती .ती कुठे आहे असे विचारता राजेंद्र म्हणाला ,तुम्हाला भास झाला असेल. माझ्याबरोबर मुलगी वगैरे कुणीही नव्हते. मी गच्चीत एकटाच उभा होतो .इथे आम्ही फक्त दोघेच राहतो मी व माझा नोकर बजाबा.

यावर बोलण्यासारखे काहीही नव्हते .भास एकाला झाला असेल . सर्वांना कसा काय होईल ?सर्वांनीच ती मुलगी पाहिली होती .

ती मुलगी कुठेही नव्हती. ती जणू काही हवेत विरून गेली होती.

आम्हाला तळघर बघायचे आहे.तळघर दाखवा असे इन्स्पेक्टर म्हणाला.त्यावर म्हातारा उत्तरला ,येथे तळघर वगैरे काहीही नाही .निदान मला सापडलेले नाही. तळघर आहे असे मीही एेकले होते .एवढी जुनी गढी म्हणजे तळघर असणारच. एवढेच काय एखादा बाहेर जाणारा गुप्त मार्गही असणारच .असे तळघर आहे ,त्यात गुप्त धन आहे ,बाहेर जाणारी गुप्त वाट आहे, असेही मी ऐकले होते.म्हणून मी खूप तपास केला .मला तळघर सापडले नाही .बाहेर जाणारा गुप्त मार्ग तर नाहीच नाही .तुम्हीच तळघर असले तर हुडकून काढा .मलाही माहित होईल. असे तो म्हातारा, राजेंद्र महाले म्हणाला.हे सर्व म्हणत असताना तो मिश्किलपणे दाढीतल्या दाढीत हसत आहे असा इन्स्पेक्टरला भास झाला.

पोलिसांनी पुन्हा एकदा गढीचा कोपरा न कोपरा तपासला.काही खोल्यांना लाकडाची तक्तपोशी केली होती.  तीही त्यांनी ठोकून पाहिली .कुठेही त्यांना तळघरात जाण्याचा रस्ता सापडला नाही. कुठेही त्यांना गुप्त खोली सापडली नाही . 

एका तरुणीला पळवून आणले आहे .तिला जबरदस्तीने बंदिस्त केले आहे .गढीला तळघर आहे .असे खूप काही इन्स्पेक्टरने ऐकले होते.तक्रार देणाऱ्या सरपंचाने सांगितले होते .प्रत्यक्षात तरुणी दिसली परंतु सापडली नाही .तळघर आहे असे वाटत होते परंतु सापडले नाही .बेकायदेशीर व्यवहाराची तर नामोनिशाणही कुठे नव्हती.

नाउमेद होऊन नाईलाजाने सर्व पोलिसांचा ताफा हात हलवीत  परत फिरला.जीपमध्ये बसताना पोलिसांनी पुन्हा गच्चीत पाहिले . तो म्हातारा व ती तरुणी गच्चीत उभी होते.पोलिसांकडे बघून हसत हसत हात हलवीत होते .त्यांनी हात हलवून पोलिसांना निरोपही दिला . थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी दोन तीनदा गढीच्या कानाकोपऱ्यांत जंगजंग पछाडले तरीही त्यांना तरुणी  सापडली नव्हती आणि आता तीच तरुणी म्हाताऱ्यासह त्यांना टाटा करीत होती. ज्यअर्थी ती तरुणी म्हातार्‍याबरोबर होती, पोलिसांना टाटा करीत होती ,त्याअर्थी  तिला निदान पळवून तरी आणलेले नव्हते.ती स्वखुषीने तिथे राहत होती  .कदाचित ती म्हातार्‍याची मुलगी असू शकेल .

तळघरही असणार. कदाचित गैरव्यवहारही असणार. कदाचीत काहीही नसेल  परंतु पोलीस काहीही करू शकत नव्हते.त्यांना मुकाट्याने  परत यावे लागले.   

गढीमध्ये काहीही संशयास्पद नाही असा अहवाल इन्स्पेक्टरने वरती पाठवून दिला .केस बंद केली .

पोलिसांना तरुणी दिसली परंतु सापडली नाही. तळघर आहे असे वाटत होते पण सापडले नाही .ही बातमी सर्वत्र पसरली .गढीबद्दलचे गूढ आणखीच गडद झाले.

गढीमध्ये  कुठेतरी पूर्वजांनी सोने लपवलेले आहे अशी अफवा होती.कदाचित सोन्याबरोबरच इतरही मूल्यवान रत्ने असण्याचा संभव होता .शेजारच्या गावातील दोनअट्टल चोरांनी तो खजिना मिळविण्याचा पण केला.गढीमध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रवेश करावा. बुढ्ढ्याला जेरबंद करावा .सरळ मार्गाने त्याने खजिना कुठे आहे ते सांगितले तर ठीकच आहे .नाहीतर त्याचे हालहाल करावे .त्याच्याकडून खजिना कुठे आहे ते माहीत करून घ्यावे. खजिना घेऊन पळ काढावा .म्हातारा चोरीची तक्रारही करू शकणार नाही .कारण खजिना तळघरात असणार आणि तळघर त्याला सापडले  नाही,त्याला माहित नाही ,असे म्हाताऱ्यानेच पोलिसांना सांगितले आहे .आणि तक्रार केलीच तरीही आपण खजिन्यासह कुठच्या कुठे पळालेले असणार. 

रात्री सर्व तयारी करून ते दोघे निघाले .त्यांचा भुताखेतांवर विश्वास नव्हता.एका झाडावरून बिनधास्तपणे ते गच्चीत उतरले.त्याना कुणीही काहीही केले नाही . जिन्याने खाली उतरून त्यांनी राजेंद्र मोहिते व बजाबाला धरले. बजाबाचे हातपाय बांधून त्यांनी त्याचा बंदोबस्त केला.नंतर ते दोघे म्हाताऱ्याकडे वळले.  राजेंद्रला हे दोघे आपले हालहाल करणार आणि माहिती काढून घेणार हे लक्षात आले .

त्याने त्यांना तळघर व खजिना दाखवतो म्हणून सांगितले.म्हातारा गुपचूप तयार झाला त्याअर्थी कुठेतरी काहीतरी गोम असावी असा त्या दोघाना संशय आला.आपण फसणार नाही याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे याचा त्यांनी मनोमन निश्चय केला .  लाकडाची तक्तपोशी असलेल्या एका खोलीत त्याने, त्यांना नेले.त्याने कुठली तरी एक कळ दाबली .सलग असलेली तक्तपोशी कुठे तरी दुभंगली .खाली उतरण्याचा जिना दिसू लागला .  त्या दोन चोरांचे चेहरे आनंदाने उजळले .डोळ्यांमध्ये हर्षाची चमक दिसू लागली .म्हातारा आपल्याला तळघरात बंदिस्त करील याची त्यांना अगोदरच कल्पना होती .त्यांनी प्रथम म्हाताऱ्याला  जिना उतरण्यास सांगितले.म्हाताऱ्याची चोरांना तळघरात कोंडण्याची योजना फिस्कटली.म्हातारा मुकाट जिना उतरू लागला .सर्वजण खाली तळघरात आले . तळघरात कुठून तरी मंद नैसर्गिक प्रकाश येत होता.वायुवीजनाचीही छान सोय होती . तळघर प्रशस्त लांब रुंद होते.तळघराच्या एका भिंतींबरोबर सात रांजण होते .म्हाताऱ्याने तो पाहा खजिना म्हणून बोट दाखविले. तांब्याचे चकचकीत रांजण पाहताच दोघांचेही डोळे चमकले.म्हातारा  आपल्याला फसवील म्हणून आत्तापर्यंत घेतलेली काळजी दोघेही आनंदाच्या भरात विसरले.  

दोघांनीही त्या रांजणांकडे धाव घेतली.रांजणांची झाकणे काढली .शिवकालीन मोहरांनी रांजण भरलेले होते.दोन्ही हातांनी त्या सुवर्ण मोहरा उचलून ते दोघे चोर नाचू लागले.

म्हाताऱ्याने हळूच एक कळ दाबली .चोर व म्हातारा यांच्यामध्ये एक पारदर्शक भिंत तयार झाली .चोराना कसला तरी आवाज आला असे वाटले.ते वळून पाहतात तो म्हातारा हसत असलेला त्यांना दिसला.धांवत येऊन त्यांनी ती पारदर्शक भिंत उघडण्याचा प्रयत्न केला .ते कायमचे बंदिस्त झाले होते. त्यांचे लक्ष आजूबाजूला गेले .तिथे आणखी काही सापळे पडलेले होते.

अन्न पाण्याविना त्या दोन चोरांचीही तीच गत काही दिवसांत होणार होती.

*त्या चोरांना आपले दारूण भविष्य दिसत होते .* 

*त्यांच्या हातापायातील बळच निघून गेले .*

*तिथेच जमिनीवर निराश होउन ते मटकन बसले.*

*समाधानाने आपल्याशीच  हसत म्हातारा जिना चढत होता.*  

(समाप्त)

२/३/२०२०©प्रभाकर  पटवर्धन