७ जय श्री हनुमान
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )
विमल व कमल हे दोघे जुळे बंधू जिथे जिथे स्पर्धेसाठी जात तिथे केव्हां जिंकत तर केव्हां हरत असत .दोघांची नावे विमलचंद्र आणि कमलाकर अशी होती .परंतु सर्वजण त्यांना विमल व कमल असेच संबोधत असत .विमल ज्युडोमध्ये प्रवीण होता .तर कमल कराटेमध्ये प्रवीण होता.त्यांचे वडील काकासाहेब हे त्यांच्या काळात कुस्ती उत्कृष्ट खेळत असत . कुस्तीची अनेक मैदाने त्यांनी मारली (जिंकली) होती.एका काचेच्या कपाटात त्यांनी जिंकलेले पेले ढाली रांगेने मांडून ठेवलेल्या होत्या .कोणत्या वर्षी व कोणत्या स्पर्धेमध्ये पेला किंवा ढाल जिंकली तेही त्याच्या खाली सुवाच्य हस्ताक्षरात लिहलेले होते .
आपल्या मुलांनी आपल्या प्रमाणेच कुस्तीमध्ये प्रवीण व्हावे असे त्यांना वाटत होते .त्यांची आई का कोण जाणे कुस्तीच्या विरुद्ध होती.कुस्तीमध्ये एखादवेळ कायमचे जायबंदी व्हायला होते,अशी तिची कल्पना होती .कुस्ती रांगडा खेळ आहे असेही तिचे मत होते .शेवटी काकासाहेबानी पत्नीच्या मतापुढे मान तुकवून मुलांना ज्युडो व कराटे यामध्ये प्रशिक्षित करायचे ठरविले .त्यांच्या आईची या खेळाला काही हरकत नव्हती.
काकासाहेबानी लहानपणापासून दोघांनाही विमलला ज्यूडो क्लासमध्ये व कमलला कराटे क्लासमध्ये शिक्षण देण्याला सुरुवात केली .मुलांचे एकीकडे शालेय शिक्षण चालू होते .तर दुसरीकडे ज्युडो व कराटे यातही शिक्षण चालू होते .विमल व कमल दोघेही अगदी लहान असल्यापासून स्पर्धेत भाग घेत असत.मुलांनी आपापल्या खेळांमध्ये नाव कमवावे असे काकासाहेबांना वाटत होते . घरी पैशांची काही कमी नव्हती .खानदानी श्रीमंती होती.काकासाहेबांनी त्यामध्ये आपल्या कौशल्याने भर घातली होती.कॉलेज शिक्षण चालू असताना व शिक्षण पूर्ण झाल्यावरही स्पर्धेमध्ये दोघेही भाग घेत असत .जिल्हा पातळी राज्य पातळी अशी क्षेत्रे काबीज करीत करीत दोघेही राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले होते .
दोघांनाही एक विचित्र अनुभव मधूनमधून येत असे .ही गोष्ट ते अगदी लहान असल्यापासून सुरू होती .दोघांचीही खोली एकच होती .
विमल त्यावेळी सातवीत होता .शाळेतर्फे ज्युडोसाठी त्याची निवड झाली होती .दुसऱ्या दिवशी एका शाळेबरोबर त्याची लढत होती.आंतरशालेय स्पर्धा चालू होती.रात्री त्याला आपल्या डोक्याजवळ कुणीतरी बसला आहे आणि तो आपले केस कापत आहे असे स्वप्न पडले.सकाळी उठून तो आरशासमोर उभा राहून ब्रश करीत होता. आरशात पाहताना एक लहानशी किंकाळी त्याच्या तोंडातून बाहेर पडली.त्याच्या डोक्यावरील कपाळा जवळचे केस कुणीतरी कापले होते. तोंड धुता धुताच तो त्याच्या अंथरूणाजवळ गेला. तिथे उशाजवळ त्याचे कापलेले केस पडलेले होते .
आपली गंमत करण्यासाठी बहुधा कमलने हे केस कापले असावेत असे त्याला वाटले. यावरून त्यांचे कमलशी भांडणही झाले.कमलने शपथ घेवून त्याने हे काम केले नाही असे सांगितले .विमलचा कमलच्या बोलण्यावर थोडाबहुत विश्वासही बसला.स्वप्न पडले आणि प्रत्यक्षात केस कापलेले होते .याचा उलगडा कसा करावा ते त्याच्या लक्षात आले नाही.त्याने आपले स्वप्न काकांना सांगितले व कापलेले केस काकाना दाखविले.काकाही थोडे गोंधळात पडले . कमलने हे केलेअसावे म्हणून त्याला निष्कारण दाट खावी लागली .तरीही स्वप्न कसे पडले त्याचे स्पष्टीकरण देता येत नव्हते .
त्या दिवशीच्या स्पर्धेत विमलला हार खावी लागली.केस कापल्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली होती .आणि त्यामुळे स्पर्धेत विजय मिळाला नाही .अशी मनाची समजूत त्याने करून घेतली .
आणखी केव्हातरी कमलची कराटे स्पर्धा होती .आदल्या रात्री त्याला विमलसारखेच, कुणीतरी आपले केस कापत आहे असे स्वप्न पडले.सकाळी कापलेले केस अंथरुणावर पडलेले होते .त्या दिवशी कमलला कराटेमध्ये हार खावी लागली.आता कमलने विमलवर त्याने केस कापले असा आरोप केला. विमलनेही शपथ घेऊन त्याने केस कापले नाहीत असे सांगितले.विमलने केस कापले असे क्षणभर गृहीत धरले तरी कुणीतरी केस कापत आहे असे स्वप्न पडले त्याचे स्पष्टीकरण कसे द्यावे हा प्रश्न शिल्लक होताच .
नंतर कित्येक वर्षे पुन्हा तसा अनुभव आला नाही .अनेक स्पर्धामध्ये दोघेही भाग घेत होते.कधी हार कधी जीत चालूच होती .
कॉलेजमध्ये असताना पूर्वींच्या अनुभवाची पुनरावृत्ती झाली.रात्री कोणीतरी केस कापत असल्याचे स्वप्न, सकाळी काही कापलेले केस, व त्या दिवशी स्पर्धेमध्ये हार ,असे वारंवार होऊ लागले . केस फार कापले जात नसत . केवळ काही बटा कापलेल्या असत .हा अनुभव दोघांनाही येत होता .
केस कुणीतरी कापत असल्याचे स्वप्न, कापलेल्या बटा, व हार यांचा काहीतरी संबंध आहे असे दोघांच्याही लक्षात येऊ लागले.त्यांनी या दोहोंचा संबंध काकांना सांगितला .असे का होते ते कुणाच्याच लक्षात येत नव्हते.
कुस्तीगीर नेहमी हनुमानाचे उपासक असतात .हनुमान हा नेहमीच शौर्याचे ,ताकदीचे, विजयाचे, कौशल्याचे, बुद्धिमत्तेचे, निष्ठेचे प्रतीक राहिला आहे.विमल व कमल हे दोघेही हनुमानाचे जाज्वल्य उपासक होते.दोघेही शनिवारचा उपास करीत असत .कोणत्याही परिस्थितीत ते उपास सोडत नसत .रात्री हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय ते जेवत नसत.
एका शनिवारी ते त्यांच्या नेहमीच्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मनोभावे नमस्कार करून प्रार्थना करीत असताना त्यांना पुढील शब्द ऐकू आले ." कोणत्याही खेळामध्ये नेहमी सवय कौशल्य ताकद डावपेच आवश्यक असतातच. त्याबरोबरच दैवाची अनुकूलताही असावी लागते .तुम्हाला रात्री कुणीतरी केस कापत असल्याचे स्वप्न पडणे व सकाळी अंथरुणावर केस सापडणे, याचा अर्थ दैव तुम्हाला अनुकूल नाही असा होतो .खेळातील तुमच्या कौशल्याचे व दैव अनुकूलतेचे तुमचे केस हे प्रतीक आहेत. "
" एका वेगळ्या अर्थाने तुमची ताकद, तुमचे कौशल्य, तुमचे दैव तुमच्या केसांमध्ये आहे .तुम्ही केसांची काळजी घ्या .ते कापले जाणार नाहीत याची काळजी घ्या .यश तुमचेच आहे ."
तेव्हापासून रात्री झोपताना दोघेही आपले केस कापडामध्ये गच्च बांधून झोपत असतात.दोघांनीही सलूनमध्ये किंवा आणखी कोणत्या मार्गाने केस कापण्याचे सोडून दिले आहे .त्याचा ते चक्क अंबाडा घालतात . तेव्हापासून विजयाची एकेक पायरी सर करीत ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना जायचे आहे .
पाहूया काय होते ते !
* हल्ली आपले केस गळण्याचे प्रमाण वाढले आहे असे त्यांना वाटत आहे ! !*
*केस घट्ट बांधल्यामुळे ते गळतात असे तज्ज्ञ सांगतात .*
* केस मोकळे सोडले तर ते रात्री कुणीतरी कापील अशी भीती आहे. *
*दोघांचाही अनुभव एकच आहे .*
* दोघेही द्विधा मन:स्थितीत आहेत*
*त्यांचा हॅम्लेट झाला आहे.*
१२/३/२०२०©प्रभाकर पटवर्धन