Get it on Google Play
Download on the App Store

५ आकाशवाणी १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. ) 

निसर्गातीत शक्ती आहेत की नाहीत हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.काहींच्या मते त्या आहेत तर काहींच्या मते त्या नाहीत . असल्याच तर त्या शक्ती दोन प्रकारच्या असणार .चांगल्या व वाईट .सत्त्व रज तम  गुणांनी जग व्याप्त आहे.अदृश्य निसर्गातीत शक्तीमध्ये सत्त्वगुणाचे अाधिक्य असेल तर त्या शक्तींना आपण दैवी समजतो. जर तमोगुणाचे अधिक्य असेल तर आपण त्याला भूत असे संबोधतो .भूत ही  अनेक योनीतील एक योनी धरली तर त्यामध्येही चांगले व वाईट असणारच .

दैवी शक्ती आहेत असे समजले तर त्या आपल्याला दिसतात का? दर्शन देतात का?असे प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतात .दर्शन देत असल्यास कोणाला देतात? कां देतात? असाही प्रश्न निर्माण होतो . भुताबद्दलही तेच प्रश्न निर्माण होतात. आपल्याला पडलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे नेहमीच आपल्याला मिळतात असे नाही .

देवदर्शन किंवा भूतदर्शन हा मनाचा खेळ आहे .हे आपणच निर्माण केले आहे असंही म्हणणारे लोक आहेत .हा सर्व मानसिक रोग किंवा मानसिक अवस्थांचा भाग आहे असेही काही लोक समजतात.

माझा मित्र अरुण याने याबद्दल त्याच्या डायरीत काही लिहून ठेवले आहे . आज तो या जगात नाही .त्यात त्याने लिहिलेले अनुभव त्याच्याच्या शब्दात पुढे देत आहे.

अरुणच्या डायरीतील या कथेच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग .

मी पुण्याचा रहाणारा .पुण्याला मी एमकॉम व नंतर फायनान्समध्ये एमबीए केले . मला सरकारी खात्यात नोकरी मिळाली .माझे पोस्टींग रत्नागिरी येथे ऑफिसर म्हणून झाले. माझी क्वॉलिफिकेशनस् लक्षात घेतली तर  मला याहून चांगली नोकरी मिळायला हवी होती.सरकारी नोकरी,सुरक्षितता, प्रमोशनची शक्यता, या गोष्टी लक्षात घेऊन व स्टेपिंग स्टोन या दृष्टीने मी ती स्वीकारली .

पुण्याच्या कोरडय़ा हवेशी तुलना करता येथील हवा एखाद्याला फारच बेकार वाटण्याचा संभव आहे .दमट हवा घाम घाम आणि घाम .परंतु मला येथील एकूणच हवा पाणी निसर्ग आवडला .हल्ली पुण्याला फारच  प्रदूषण झाले आहे .जुने पुणे आता राहिले नाही,मुळामुठा काठचे पुणे आता राहिले नाही , पानशेत धरणफुटीबरोबर ते संपले असे सर्व म्हणतात.रत्नागिरीतील स्वच्छ, प्रदूषण नसलेली हवा,  वारा ,आसपासचे नैसर्गिक सौंदर्य, यांच्या मी मोहात पडलो .सडय़ावर एखादा प्लॉट घ्यावा तिथे मनासारखा बंगला बांधावा आणि निवृत्तीनंतर येथेच  सुखाने आपले जीवन व्यतीत करावे असे मला वाटू लागले .

सुट्टीच्या दिवशी जमेल तसे मी आसपासचे  प्रदेश पाहात होतो.

असेच वर्ष दीड वर्ष गेले .एक दिवस मला सरकारी ऑर्डर आली. राज्य सरकारची नोकरी म्हणजे  राज्यात कुठे बदली होईल ते सांगता येत नाही .माझी बदली प्रमोशनवर एकदम नागपूरला झाली होती .हे प्रमोशन आहे की शिक्षा आहे तेच मला कळेना .नागपूरच्या कमालीच्या विषम हवामानाबद्दल मी ऐकून होतो.जावे की न जावे हा यक्ष प्रश्न मला पडला होता .

त्याच वेळेला रत्नागिरीच्या एका मोठ्या खासगी उद्योगामध्ये माझा इंटरव्ह्यू  झाला होता . असिस्टंट मॅनेजर म्हणून माझी नेमणूक होण्याची शक्यता होती .खासगी क्षेत्रामध्ये जावे की सरकारी नोकरीमध्ये रहावे असे द्वंद्व माझ्या मनात सतत होते .प्रत्येकाचे आपापल्या परीने फायदे तोटे होते .

मला रत्नागिरीच्या किल्ल्यावर जायला आवडते .येथील भगवती मातेचे मंदिर ,किल्ल्याचा परिसर,तटबंदीच्या गवाक्षातून दिसणारा समुद्र,डोंगराच्या एका टोकावर असलेले दीपगृह  ( लाईट हाऊस)हा सर्व परिसर नागपूरला जाण्यापूर्वी एकदा पहावा म्हणून मी तिथे गेलो होतो.अर्थात माझ्या डोक्यात नागपूरला जावे की न जावे हा विचार होताच . अजून माझ्या इंटरव्य्हूचा निकाल मला कळला नव्हता.  मला एक दोन दिवसांत निर्णय घेणे आवश्यक होते .

विचार करीत भगवती मंदिर परिसरात फिरत असताना  माझ्यासमोर एक देवता उभी राहिली .तिची उंची दहा बारा फूट असावी .तिचे सर्वांग प्रकाशमान झाले होते.तिच्या दर्शनाने मी आनंदीत तर झालोच परंतु आश्चर्यचकितही झालो होतो.ती देवता  मला एवढेच म्हणाली तू नागपूरला जावू नकोस तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही होईल.

एवढे बोलून दुसऱ्याच क्षणी ती अदृश्य झाली .तिच्या दर्शनाने मला परम शांती प्राप्त झाली होती .माझ्या मनातील द्वंद्व संपले होते .बदलीची ऑर्डर आल्यापासून माझा हॅम्लेट झाला होता .आता मी चिंतामुक्त झालो होतो .मी सरकारी नोकरीचा राजीनामा पाठवून दिला .रत्नागिरीला नोकरी न मिळाल्यास मी परत पुण्याला निघून जाणार होतो .तिथेच पुढे नोकरीचे पाहता आले असते.

दोनच दिवसात मला येथे खासगी कंपनीचा कॉल आला .असिस्टंट मॅनेजर म्हणून चांगल्या पोस्टवर माझी नेमणूक झाली होती .फॅक्टरी परिसरात मला राहण्यासाठी बंगलाही मिळाला होता .आता माझ्या लक्षात आले की ती भविष्य देवता होती.

ती मलाच का भेटली?माझ्या मनातली द्वंद्व  तिला कसे कळले?मी काय करावे हे सांगण्यातील  तिचा हेतू कोणता?मला काहीच कल्पना नाही .

माझ्या मनाने ती देवता निर्माण केली. मला हवे असलेले उत्तर तिने दिले .हा सर्व सत्याचा आभास होता .असे एखादा म्हणेलही .मला काही माहित नाही .

तिने सांगितल्याप्रमाणे मी वागलो .माझे हित झाले. एवढे मात्र खरे.

अजून पर्यंत मी एकटाच होतो .माझा विवाह झाला नव्हता .मी लग्न करावे म्हणून माझे आईवडील मला आग्रह करीत होते .अजून मी त्याचा विचार केला नव्हता.जरा स्थैर्य आले की नंतर पाहू असा विचार होता.

एका रात्री माझ्या स्वप्नात ती देवता पुन्हा आली .मी तिला लगेच ओळखले.तिने मला उद्या तू थिबा पॉइंटवर जा तुझे कल्याण होइल असे सांगितले.आशीर्वचन देऊन ती स्वप्नातच अदृश्य झाली आणि मी जागा झालो .ही देवता मला पुन्हा पुन्हा का भेटते ?ती मला मार्गदर्शन कां करते ?मला काहीच कळत नव्हते .प्रत्येक वेळी तिच्या दर्शनाने मी इतका  गांगरून गेलो होतो की मला तिचा पोशाख चेहरा काहीच आठवत नव्हते .केवळ तेज:पुंज प्रकाश आणि शांत स्मितयुक्त आश्वासक  चेहरा एवढाच आठवत होता.  

वेळ मिळाला की मी थिबा पॉइंटवर नेहमीच जात असतो.माझ्या आवडत्या जागातील ती सर्वात जास्त आवडती जागा आहे .तिथून दिसणारा नजारा अलौकिक आहे.तुम्ही रत्नागिरीला कधी गेलात तर तिथे जायला विसरू नका.

समोर लांबवर दिसणारा अर्धवर्तुळाकृती समुद्र , त्या समुद्राच्या कडेने माडांचे दाट बन, त्याच्या अलीकडे दाट हिरव्या झाडीने व्यापलेला प्रदेश, समुद्राला मिळणारी काजळी नदी म्हणजेच भाट्याची खाडी,त्या नदीतील गर्द झाडीने व्यापलेले एक नैसर्गिक बेट,नदीकाठील राजिवड्यावरील असंख्य घरांचे दिसणारे माथे,त्याच्याही अलीकडे  थिबा पॉइंटच्या डोंगर उतारावरील झाडी,समोर भाट्ये येथील डोंगरावरचा वळणावळणाचा रस्ता,त्या रस्त्यावरून  चढ उतार करणाऱ्या  गाड्या,समोरच्या डोंगराच्या पठारावरील म्हणजेच सडय़ावरील  हॉटेल ,उजव्या बाजूचा रत्नागिरीचा किल्ला ,त्यावरील  दीपगृह व भगवती मंदिराचा कळस,किल्ल्याच्या पायथ्याला काळा समुद्र,मावळतीला जाणारा सूर्य ,सर्वत्र पसरलेली मावळत्या सूर्याची लाली, ढग नसतील तर समुद्रात हळूहळू बुडणारा सूर्य. बुडताना त्याची क्षणोक्षणी  पालटणारी रूपे,  ढग असतील तर ढगांवर  होणारी रंगांची उधळण, रात्र होऊ लागेल तसे सर्वत्र प्रकाशमान होणारे लुकलुकणारे दिवे .सर्वच पहात राहण्यासारखे क्षणोक्षणी बदलणारे रेखीव नीटनेटके चलत् चित्र.

तुम्ही केव्हाही थिबा पॉइंटला जा .सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री  प्रत्येक वेळी तुम्हाला तेथील सौंदर्य मोहून टाकील.विशेषत: सकाळी व संध्याकाळी निसर्ग सौंदर्याचा अपरिमित अनुपम खजिना तेथे उधळला जात असतो .

त्या देवतेने मला सुचविल्याप्रमाणे दुसऱ्या  दिवशी संध्याकाळी मी थिबा पॉइंटकडे निघालो होतो.काय होणार याची मनोमन उत्सुकता होती .आज माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळणार आहे याची मला कल्पना नव्हती.  थिबा पॉइंटच्या रस्त्यावर वाटेत एका वळणावर एक मुलगी स्कूटरसह माझ्या मोटारीला येऊन धडकली .

(क्रमशः)

८/३/२०२०©प्रभाकर  पटवर्धन