१ गढीतील म्हातारा १-२
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )
एके काळी ती गढी गावाबाहेर होती.काळाच्या ओघाबरोबर गावाचा हळूहळू विस्तार होत गेला .ती गढी गावांत आहे असे वाटू लागले .गढी निदान तीनशे वर्षांपूर्वीची असावी.पेशव्यांच्या पदरी एक सरदार होता .त्याने युद्धात खूप मर्दुमकी गाजविली .पेशव्यांनी उदार होऊन त्याला दहा गाव इनाम दिले . शेकडो एकर जमीन त्याच्या मालकीची होती.पूर्वीप्रमाणेच कुळे जमीन कसत असत.महसूल सरकारला देण्याऐवजी तो ते आता सरदाराला देत असत .सरदार म्हणेल ती पूर्वदिशा त्याकाळी होती.त्याच्या औदार्याच्या व क्रोर्याच्या कथा परंपरेने लोक अजूनही सांगत असतात .
पेशवाई गेली .इंग्रजांचे राज्य आले .एकामागून एक वतने खालसा करण्याचा इंग्रज सरकारने सपाटा लावला. गढीच्या मालकांचा दरारा नाहीसा झाला .त्याच्या अंमलाखालील सर्व जमीन कुळांच्या मालकीची झाली .गढी व त्याच्या सभोवतालचा तीन चार एकरांचा प्रदेश सरदाराच्या मालकीचा राहिला .हळूहळू गढीची दुरावस्था झाली.सरदाराचे वंशज परागंदा झाले .गढी ओसाड पडली.गढीचे बांधकाम मजबूत होते.तटबंदीही भक्कम होती .तटबंदी दहा फूट उंचीची होती .तटबंदीला दरवाजाही तसाच भक्कम होता .दरवाज्याला धारदार खिळे लावलेले होते .दरवाजा बंद केला की तो बाहेरुन हत्तीच्या धडका मारूनही उघडणे सोपे नव्हते. ती गढी म्हणजे एक छोटासा भुइकिल्लाच होता .
तटबंदीच्या आत विविध प्रकारची झाडे होती.मधून मधून टेहळणीसाठी तटबंदीवर बुरुज होते .हल्ली त्या गढीमध्ये कुणीही रहात नसे .कुणी येत जातही नसे.तो छोटा भुइकिल्ला पूर्णपणे ओसाड होता.सरदाराचा निर्वंश झाला असेही काही लोक म्हणत असत.
गढी ओसाड होती. दरवाजा उघडा होता.काळाच्या ओघाबरोबर तटबंदीही अधूनमधून ढासळली होती .तरीही आत जायला कुणीही धजावत नसे .झाडांवर निरनिराळी फळे हंगामाप्रमाणे येत असत.बंदर मोर पोपट चिमण्या विविध प्रकारची पाखरे यांना ती मेजवानीच असे .हंगामांमध्ये त्या परिसरात पाखरांचा कलकलाट ऐकू येई . झाडांवर पाखरांनी घरटी बांधली होती .सकाळी व संध्याकाळी तिथे एकच चिवचिवाट असे .सर्वत्र पालापाचोळा पसरलेला होता .तो तिथेच कुजत असे. त्यातूनच निरनिराळ्या झाडांची नवीन नवीन रोपे येत असत.काही जगत. काही मरत.परिसरात सर्वत्र वेली वाढल्या होत्या .त्या रानवेलीनी झाडानाही व्यापले होते .सर्वत्र कुजलेला पालापाचोळा, खुरटी झुडपे, रानवेली,तटबंदीमधून व भिंतीमधून उगवलेली लहान मोठी झाडे ,यानी ती जागा भयाण भकास भीतीदायक दिसत असे .थोडी बहुत अतिशयोक्ती केली तर आपण अॅमेझॉनच्या जंगलात तर आलो नाही ना असे वाटत असे .
गढीमध्ये किंवा परिसरामध्ये सोने पुरून ठेवलेले आहे अशी अफवा होती. सोने शोधण्यासाठी काही मंडळी अांत गेली होती.त्यांना पंचमुखी नाग पालापाचोळ्यात फिरताना दिसला.हा नाग, सोनेनाणे, हिरेमाणके, मूल्यवान रत्ने, खजिना, यांचे संरक्षण करीत आहे .तो आंत कुणालाही जाऊ देत नाही.असे सांगत पुठ्याला पाय लावून ही मंडळी परत बाहेर आली.
आंबे पेरू सीताफ़ळे खाण्यासाठी मुले आत जात नसत .त्यांना आंत जायला भीती वाटत असे.मोठी माणसेही आत जायला धजावत नसत .जे कुणी कधीकाळी धीर करून आंत गेले त्यांना विचित्र अनुभव आले होते .
झाडावर चढत असताना आपले पाय कुणीतरी खाली ओढत आहे असा भास त्यांना होत असे.ते झाडावर चढू शकत नसत .झाडाखाली पडलेली फळे उचलली तर त्यात कृमी आढळत. जागा शापित आहे असे गावकर्यांचे मानणे होते .सरदाराने जी पाप कृत्ये केली.त्यामुळे ती जागा शापित आहे असे समजले जात असे .पंचमुखी नाग कांहीना दिसत असे तर काहींना दिसत नसे.
पूर्वीच्या किल्ल्यांप्रमाणे गढीचे बांधकाम चुन्यात पक्के केलेले होते .तिचा एकही चिरा ढासळला नव्हता . काहीही देखभाल नसतानाही सर्व काही मजबूत जसेच्या तसे होते.
गढीच्या तळघरांमध्ये त्या त्या वेळच्या सरदारांनी काही अपराध्याना किंवा निरपराध्यानासुद्धा साखळदंडाने बांधून ठेवले होते .अन्न पाण्यावाचून ते तिथेच मेले.त्यांचे आत्मे, त्यांची भुते, त्यांची पिशाच्चे गढीभर वावरत असतात असा समज होता.जे अांत गेले त्यांना विचित्र दृश्ये दिसली होती. विचित्र भास झाले होते .तेव्हांपासून कुणीही आंत जाण्याला धजत नसे.खरे कोण, खोटे कोण, अफवा किती,सत्य किती, काहीच कुणाला कळत नव्हते.रिकामपणी चघळण्याची गढी ही एक गोष्ट होती .
कांही उपद्व्यापी लोकांनी ती गढी व परिसर कोणाच्या नावावर आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला .राजेंद्र महाले नावाच्या एका माणसाच्या नावावर ती होती .हा सरदाराचा वंशज असावा.तो कुठे राहतो ?काय करतो?जिवंत आहे की नाही?याची कुणालाही काहीही माहिती नव्हती .
रस्त्याने एक दिवस काही मुले जात होती .त्यांनी सहज त्या गढीकडे पाहिले. गढीच्या गच्चीत त्यांना एक म्हातारा दिसला.लांबलचक पिकलेली दाढी, तसेच वाढलेले केस ,खोल गेलेले डोळे,सुरकुत्यांचे चेहराभर पसरलेले जाळे ,पाहिल्याबरोबर भीती वाटेल असे ते ध्यान होते .तो म्हातारा त्या मुलांकडे रोखून पाहत होता .त्याच्या त्या रोखून पाहण्यांमध्ये असे काहीतरी होते की मुले घाबरून पळत सुटली.
गढीत कुणीतरी एक म्हातारा राहिला आला आहे अशी बातमी गावात सर्वत्र पसरली.तो म्हातारा, मालक आहे की रिकामी गढी पाहून त्याने त्यात ठाण मांडले आहे अशी चर्चा गावांत सुरू झाली.
हा मालक बिलक काहीही नाही. हा स्मगलर आहे. रिकामी गढी पाहून त्याने तिला आपला अड्डा बनविले आहे असेही काही जण म्हणू लागले.
हा दहशतवादी आहे .आजूबाजूच्या प्रदेशात झालेल्या निरनिराळ्या घटना,लूटमार, अपघात ,अपहरण, बॉम्बस्फोट, यांचा उगम इथे आहे असे काही जण म्हणू लागले .
एक दिवस काही जणांनी गच्चीत एक तरूणी पाहिली .म्हातार्याच्या टोळीने बहुधा तिला पळवून आणले असावे अशी चर्चा गावात सुरू झाली.
आता मात्र अती झाले .याचा छडा लावला पाहिजे .हा म्हातारा ही गावातील कीड आहे .कायदेशीर मार्गाने ती नष्ट केली पाहिजे .असे म्हणून काही लोक सरपंचांकडे गेले .सरपंचाने सरकार दरबारी पोलिसांत रितसर तक्रार केली.
एक दिवस पोलिसांची एक तुकडी दोन तीन जीपमधून गढीवर येवून थडकली.
(क्रमशः)
२९/२/२०२०©प्रभाकर पटवर्धन