Get it on Google Play
Download on the App Store

देव तारी त्याला कोण मारी

एकदा एका वयोवृद्ध साधू आणि त्यांचे शिष्य नदी नाले, डोंगर दऱ्या तुडवत खडतर प्रवास करत होते. तेव्हा त्या साधूंचा नदी पात्रामधून चालत असताना पाय घसरला. साधू नदीत पडले आणि नदीच्या जोरदार प्रवाहात वाहू जाऊ लागले.

त्त्यांचे शिष्य गर्भगळीत झाले आणि नदीच्या प्रवाहाबरोबर त्याच्या मागे धावू लागले. काही अंतरावर गेल्यावर, नदी धबधब्यात रुपांतरीत झाली आणि खोल दरीत कोसळू लागली. शिष्यांना वाटले की आता आपल्या गुरुंचा  मृतदेह डोहातून बाहेर काढावा लागेल.

साधू वेगवान पणे पाण्यातून वाहत वाहत धबधब्यातून खाली डोहात पडले. त्यांच्या मागे मागे त्यांचे शिष्य झपाझप खाली उतरून गेले. त्यांच्यातील एक दोघांना उत्तम पोहता येत होते त्यांनी भराभर डोहात उड्या टाकल्या. पण जेव्हा ते तळाशी पोहोचले तेव्हा त्यांना त्यांच्या गुरूंचे कलेवर मिळाले नाही.

तितक्यात त्यांना दिसले त्यांचे गुरु संथ पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काठावर आले होते. काठावर आल्यावर ते  सुहास्य वादनाने चालत त्यांच्याकडे येत होते.

त्यांना पाहून भयभीत झालेला शिष्य आश्चर्याने म्हणाला, "हा चमत्कार आहे, तुम्हाला काहीच झाले नाही?  इतक्या भयंकर पाण्याच्या प्रवाहातून तुम्ही सुरक्षितपणे कसे बाहेर आलात? "

संत म्हणाले, " मी स्वत:ला वाचवण्यासाठी एकच गोष्ट केली, मला जाणीव आहे मी पाण्याच्या प्रवाहाचा वेग मंद करू शकत नाही, म्हणून मी स्वतःला त्याच्याशी जुळवून घेतले. मी स्वतःला त्या प्रवाहात झोकून दिले. त्याच्याबरोबर वाहत गेलो, उडी मारली, गटांगळ्या खाल्ल्या, पडलो. मी पाण्याबरोबर गेलो आणि पाण्यामुळेच जिवंत बाहेर आलो. निसर्ग दैवी आणि अफाट आहे म्हणूनच आपण निसर्गाचे पूजन करतो. त्याला देव मानतो!”

शिष्यांनी त्या दिवशी त्या डोहाच्या काठावरच मुक्काम केला आणि परमेश्वराचे मनोमन आभार मानले.