साधूची कैफियत
एके दिवशी राजाचा एक दूत जगापासून दूर आपल्याच वेगळ्या विश्वात रमणाऱ्या एका साधूकडे आला. त्यावेळी साधू नदीच्या काठावर बसून भजन-संध्या करत होते.
दूत त्यांना म्हणाला, " साधू महाराज, राजाने आपली नेमणूक पंतप्रधान पदावर केली आहे. आपण माझ्याबरोबर चलावे."
साधूने त्याला विचारले, "मी असे ऐकले आहे की राजाकडे कासवाची खूप जुनी पाठ आहे, जी त्याने त्याच्या संग्रहालयात जतन करून ठेवली आहे."
नोकर म्हणाला, "होय, ती पाठ खूप मौल्यवान आहे."
साधू म्हणाले, "विचार कर, ते कासव जिवंत असते तर? तर त्याने काय पसंत केले असते राजाच्या संग्रहालयात पडून राहणे कि ते जिथे जन्माला आले होते त्या चिखलात लोळणे?"
"त्याने चिखलात लोळणे पसंत केले असते, " दूत म्हणाला.
साधू म्हणाले, "मग मी पण कासवाच आहे असं समज. मला इथे माझ्या झोपडीतच राहायला जास्त आवडते. एखादा माणूस मोठं पद मिळवल्यानंतर मानसिक शांती गमावतो, कधी त्याला त्याचा सन्मान गमवावा लागतो आणि कधी त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध जावे लागते. म्हणून म्हणतो जा आणि सम्राटाला आदरपूर्वक सांग की माझा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद, पण मी आहे तसा सुखात आहे.”
साधूची कैफियत ऐकून दूत विचारात पडला आणि आल्या पावली परत गेला.