प्रास्ताविक
आपला देश हा साधू -संत आणि ऋषी मुनींचा देश आहे. त्यांना ऐहिक गोष्टींची आसक्ती नसते. ते फक्त जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मर्यादित गोष्टी वापरतात. त्यांच्या जीवनात संताप, राग, गर्व, भ्रम आणि लोभ या गोष्टी असण्याचा कोणताही उद्देश नाही. त्यांचे जीवन प्रत्येकासाठी खरोखर अनुकरणीय आहे.
इतरांच्या कल्याणाची आणि उन्नतीची भावना त्यांना नेहमी सदाचारी कामात गुंतण्यास प्रवृत्त करते. संत त्यांच्या अंतर्मनातील दिव्य प्रकाशाने सामान्य लोकांना मार्गदर्शन करतात. आत्मपरीक्षण संताच्या जीवनाला अशी काही उंची प्राप्त करून देते, जिची आपण कल्पनाही करू शकत नाही.
संताचे जीवन जगणे ही सामान्य माणसांसाठीची गोष्ट नाही. संत जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ‘एकांत’ हा अशा व्यक्तीचा मित्र आहे जिचा गर्दीशी काहीही संबंध नाही. आत्म्याची शक्ती, त्याचे महत्त्व आणि त्याचे स्वतंत्र अस्तित्व चांगल्या प्रकारे परिचित आहे. सर्व काही गमावल्यानंतरही इतरांचे भले करण्यात त्यांना आनंद आणि अभिमान वाटतो. केवळ अशा महान आत्म्याला, ज्याला क्रोध, अभिमान, भ्रम, संघर्ष आणि आनंद यांचा स्पर्श झाला नाही, तो संत जीवन जगण्यास पात्र आहे.
या जगात संताचा पोशाख धारण करून या जीवनाचा स्वीकार करण्याची स्पर्धा असल्याचे दिसते, परंतु प्रत्यक्षात संत होण्याचा प्रयत्न करणारे खूप कमी लोकं आहेत. गृहस्थ धर्माचे आचरण करणारे धन्य आहेत यात शंकाच नाही. जे लोक कठोर परिश्रमाने, योग्य मार्गाने आपली उपजीविका करतात, ते कार्यक्षम, परोपकारी असतात, स्वतः जगतात आणि इतरांना जगू देतात, वास्तविक ते कोणत्याही साधूपेक्षा कमी नाहीत. अशा लोकांना शब्दश: संत म्हणता येत नाही, परंतु त्यांच्या जीवनात शांतीचे प्रमुख स्थान असल्यामुळे त्यांचे जीवन संतत्वाच्या कक्षेत येते. खरे पाहायला गेलं तर अशांतता मानसिक आरोग्य बिघडवते. अशा अवस्थेत कोणीही अर्थपूर्ण काम करू शकत नाही. खरोखर शांततेसारखे कोणतेही तीर्थक्षेत्र नाही किंवा दान नाही. म्हणून जर तुम्हाला संतांप्रमाणे जीवन जगण्यात अडचण येत असेल तर किमान शांत तरी रहा आणि स्वतःचे आणि इतरांचे भले करा.
पुस्तकात सादर केलेल्या संतांच्या प्रेरणादायी कथांचे प्रत्येक उदाहरण जीवनाबद्दल स्पष्ट दृष्टी देणारा अमूल्य संदेश देते. संसारिक व्यापाच्या गडबडीत ज्यांना सत्संगांचा लाभ घेता येत नाही त्यांना या पुस्तकातून बरेच काही शिकायला मिळेल. आमचा विश्वास आहे की यामुळे सर्व वाचकांना फायदा होईल.