Get it on Google Play
Download on the App Store

भाग-८

आमची सकाळ उगवली ती पोर्तुगालच्या 'लिस्बन' या शहरात. पोर्तुगाल हे स्पेन पेक्षा एक तासाने अजून मागे, म्हणजे आपल्यापेक्षा ५.30 तास मागे. (किमान घडाळ्याच्या वेळेच्या बाबतीत का होईना पण आपण युरोपच्या बरेच पूढे आहोत) 'लिस्बन' ही पोर्तुगालची राजधानी. स्पॅनिश मध्ये लिस्बन ला 'लिसबोआ' असे म्हणतात. ही स्पॅनिश भाषा इंग्लिशची जुळी बहीण वाटावी अशी भाषा. मुळाक्षरे तीच पण शब्द मात्र वेगळे. लेखी स्वरूपात काही शब्द समजतातही 'ENTRADA म्हणजे एंट्रन्स, SALIDA म्हणजे एक्झिट, SERVICIO म्हणजे सर्व्हिस, POLICIA म्हणजे पोलीस. पण ऎकताने मात्र बिल्कुलही कळत नाही. चार दिवस आमच्या बरोबर असलेला बस चा ड्राइवर मध्ये मध्ये काय बडबडायचा कुणाला काही कळायचे नाही. त्याच्या बोलण्यावर विनोद मात्र व्हायचे. स्पॅनिश ही जगात इंग्लिश नंतर बोलली जाणारी दुसऱ्या नंबरची भाषा आहे. 'र' या शब्दावर यांचा विशेष जोर असतो. त्यामुळे जरा अंगावर आल्यासारखे संवाद असतात. आपला कोल्हापुरी ठसका जसा असतो, साधारण तसा बाज...............

''लिस्बन'' ला उतरलो तेंव्हा इतक्या सकाळी आमचे नियोजित हॉटेल मिळणे मुश्किल होते. हॉटेल चेक-इन दुपारचे २ ला असते. म्हणून मग रेल्वेतच सर्वांनी बऱ्यापैकी आवरले होते. बाहेरचे बस स्टेशन फार मस्त दिसत होते. सोबत त्याचा फोटो आहे. स्टेशनच्या बाहेर पडलो तेंव्हा आमची बस हजर होती. आमचे मुक्कामाचे हॉटेल जवळच होते. नाश्ता करून लगेचच आम्ही सिटी टूर साठी बाहेर पडलो. नदीच्या कडेकडेने होणार प्रवास छान. आम्ही पोहोचलो त्या भागाला 'इस्टोरील' असे नाव होते. हा भाग एकदम शांत आणि सुंदर असल्याने युरोपातील राजघराण्यातील अनेक लोक इथे सुट्टीसाठी नेहमीच येतात. बसमधून उतरल्याबरोबर समोर दिसला तो भव्य 'कॅसिनो-इस्टोरील'. हा पश्चिम युरोपातील सर्वात मोठा कॅसिनो. उल्लेख करायचा उद्देश एवढाच कि याच 'इस्टोरील' ला 'जेम्स बॉण्ड' चे जन्मस्थळ म्हणतात असे गाईडने सांगितले. 'जेम्स बॉण्ड' ही कोणी खरी व्यक्ती नाही. ब्रिटिश लेखक 'इयान फ्लेमिंग' याने लिहिलेले हे एक काल्पनिक पात्र. हे इयान फ्लेमिंग महाशय ब्रिटिश नेव्हीत होते, त्यावेळी त्यांची बदली या इस्टोरील बंदरावर होती. तिथे ते संध्याकाळच्या निवांत वेळेला पत्ते खेळायला आणि ड्रिंक्स घ्यायला या कॅसिनो-इस्टोरील मध्ये जायचे. तिथे त्यांची ओळख एका खऱ्या इथिओपियन गुप्त-हेराशी झाली. बोलण्यातून त्यान्ना हेरगिरीच्या अनेक कथा कळल्या, आणि या इयान फ्लेमिंगच्या डोक्यात 'जेम्स बॉण्ड' नावाचा किडा वळवळला आणि त्यांनी 'जेम्स बॉण्ड-००७' या ब्रिटिश एजंटच्या नावे अनेक कथानके लिहिली. जेम्स बॉण्डच्या कथेत प्रत्येक वेळी नवीन काहीतरी अद्भुत उभे करण्याच्या नादात या इयान फ्लेमिंग यांच्या डोक्यावर परिणाम झाला आणि नंतर त्यांनी एकांतवासात असतानेच आत्महत्त्या केली असे मी वाचले आहे. असो.

समोरच बीच किंवा नदीकिनारा होता. इथे ती नदी समुद्राला मिळते. समोरच्या काठावर दुसरे एक टुमदार शहर दिसत होते. दूरवर आपल्या कलकत्त्याच्या हावडा ब्रिजसारखा खूप लांब हँगिंग ब्रिज दिसत होता. सुंदर देखावा. इथले किनारे आणि घरे बघून आपल्या आवर्जून गोव्याची आठवण येते. आणि येणारच. स्वातंत्र्यानंतरही आपला 'गोवा' याच पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. नंतर गोवा मुक्ती संग्राम होऊन त्या पोर्तुगीजांना हाकलून काढत १९ डिसेंबर १९६१ यादिवशी गोवा आपल्या भारताला जोडला गेला. त्या अगोदर गोव्यातून या लिस्बन मध्ये मोठा व्यापार चालत असे. त्यामुळे पोर्तुगालच्या उन्नतीमध्ये भारताचा हि हातभार होता असे म्हणायला हरकत नसावी. च्यायला आपल्या भारताला आतापर्यंत किती जणांनी लुटून आपली प्रगती साधलीय काय माहित? (अजूनही लूट थांबलेली नाहीच, पण आता लुटणारे मात्र भारतीयच आहेत, आणि लुटलेला पैसा घेऊन परदेशात जाताहेत).................

इथून बाहेर पडून पुढे समुद्र किनाऱ्याने सिन्ट्रा या हिल स्टेशनकडे जातानाचा समुद्री नजारा अतिशय सुंदर होता, निळा समुद्र, निळेच आकाश, हिरवेगार किनारे आणि लाल रंगाचे छत असलेली घरे एकदम लव्हेबल. आम्ही युरोपच्या अगदी पश्चिम टोकाला पोहोचलो होतो. इथून पुढे अटलांटिक महासागर सुरु होतो. त्याचा दुसरा किनारा म्हणजे कॅनडा. असो, जरा मागे येऊया.

हा समुद्र किनारा सोडून हिरवागार जंगल भाग सुरु झाला. हि जंगले 'कॉर्क' या झाडांची आहेत. आपण कॉर्क म्हणजे बाटलीचे झाकण म्हणतो पण खरेतर या कॉर्कच्या झाडापासून वाईनच्या किंवा शँम्पेनच्या बाटलीला सील बंद करण्यासाठी जो लाकडाचा तुकडा वापरला जातो तो कॉर्क वनस्पतीचा असतो. लिस्बन हा जवळ जवळ अर्ध्या जगाला या कॉर्कच्या लाकडाची निर्यात करतो. वळणावळणाचा प्रवास संपून लिस्बन पासून ३० कि.मी. वरील 'सिन्ट्रा' हे हिल स्टेशन आले. आपल्या महाबळेश्वर सारखे हे छोटेसे गाव. माथेरानला असते तशी छोटी ट्रेन होती, इलेकट्रीक वर चालणाऱ्या अनेक रिक्षाही होत्या. येथीलच एका हॉटेल मध्ये पोर्तुगीज स्टाईलचे लंच ठेवलेले होते. इथला एक वेटर अतिशय उत्साही होता. ग्लासमध्ये वाईन ओतण्याची किंवा डिश ठेवण्याचीही त्याची आपली एक बघणेबल स्टाईल होती. वाईनच्या बाटलीच्या बुचामध्ये टूथ पिक अडकवून तिच्या टोकावर दुसऱ्या टूथ पिक मध्ये दोन काटे(चमचे) अडकवून त्याने मस्त फिरवून दाखवले. फूड चांगले होते, सोबतीला वाइनही होती. सिन्ट्रा मधील हि छोटीशी सफर संपून आम्ही पुन्हा लिस्बन शहरात परत आलो. हॉटेल मध्ये चेक-इन करून रूम ताब्यात घेतल्या. थोडेसे आवरून शहराचा एक फेरफटका मारला. शहरातील रस्ते अतिशय भव्य, इमारती अतिशय सुंदर, अनेक ठिकाणी गार्डन्स, आणि प्रत्येक चौक हा टाईमपास करण्याचे मोठे साधन ठरावा असा. रात्रीच्या जेवनासाठी नेहमी प्रमाणे एक इंडियन रेस्टोरेंट ठरवलेले होते. कुठेही जा आपले भारतीय पसरलेले आहेत. अनेकदा एखाद्या दुकानात जावे आणि आपली भाषा ऐकून त्या दुकानदाराने हिंदीत आपल्याशी बोलावे असेही अनेक प्रसंग घडले. दुसरी एक सांगायची गोष्ट म्हणजे युरोप बघताने अनेकदा कुठेही प्रेमी युगुले 'किस' करताने दिसतील. रेस्टोरेंट मध्ये शेजारच्या टेबलवर, एस्कलेटर चढ़ताने, मॉल मध्ये, बागेतील बाकड्यांवर......... कुठेही, कधीही असे दृश्य दिसेल. त्यांना त्यात काही विशेष वाटत नसावे, अप्रूप (कि असूया) आपल्यासाठी. तिथल्या थंड वातावरणाचा परिणाम म्हणून युरोपात लोकसंख्या अतिशय कमी आहे. आणि हीच त्यांच्या जमेची बाजू. आपल्याकडे मात्र हा लोकसंख्येचा राक्षस आपल्या प्रगतीत अडथळा बनून राहिलाय. असो... जेवणानंतर पुन्हा हॉटेल वर परतलो, आणि लिस्बन मधील पहिला दिवस संपला ...........

अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)