भाग-२
स्पेनमधील एक महत्वाचे शहर आणि फुटबॉलची पंढरी असलेल्या `बार्सिलोना' ला आम्ही पोहोचलो तेंव्हा तिथे दुपारचे २ वाजले होते. आपल्याकडे त्यावेळी संध्याकाळचे ६.३० वाजले असतील. एअर पोर्टवरून बाहेर पडतानेच एक प्रॉब्लेम आला. मंगेश जाधवांचे लगेज आलेलेच नव्हते. मग शोधाशोध, धावपळ, तेथील लोकांना भेटणे वगैरे वगैरे. अर्थात हे मंगेश आणि अल्ताफ भाई करत होते, आम्ही फक्त वाट बघत होतो. बॅगेज आलेले नाही ते उद्या येईल आणि तुमच्या हॉटेलवर पोहोचवले जाईल असा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. हॉटेलवर जाऊन पटकन रूम ताब्यात घेऊन, थोडेसे आवरून सिटी टूर साठी बाहेर पडलो. लोकल गाईड आमच्या बरोबर होता. बार्सिलोनाचे वैभव आणि सौंदर्य बघत आम्ही पोहोचलो `मोंटूजीक हिल्स' ला. आमच्या साताऱ्यातील ऐतेहासिक चार भिंती सारखी एक टेकडी. बाहेर पडताने टेम्परेचर ५-६ डिग्री असल्याने फार काही थंडीचे कपडे कोणी बरोबर घेतले नव्हते. पण त्या टेकडीवर पोहोचताच थंडीचा कडाका जाणवला. थंडगार वारे अंगाशी झोंबत हाडांपर्यंत थंडी पोहोचवत होते. पण सौंदर्य खूपच मनमोहक होते. अतिशय सुंदर लॅण्डस्केप्स, ऐसपैस रस्ते, अनेक स्पोर्ट्स ग्राउंड आणि भव्य इमारती यांनी हि मोंटूजीक हिल्स सजलेली होती. तिथे पार्किंग लॉटला अनेक महागड्या उभ्या होत्या. त्यावरून हा एक उच्चभ्रू स्पोर्ट्स क्लब असावा असा मी अंदाज केला. काहीवेळाने जेंव्हा त्या टेकडीच्या दुसऱ्या टोकाला आम्ही चालत गेलो तेंव्हा डोळयांचे पारणे फेडणारा बार्सिलोना बंदर आणि शहराचा देखावा दिसत होता. असंख्य लाईट्सच्या झगमगाटात ते बंदर आणि दूरवर पसरलेले बार्सिलोना शहर अगदी उजळून गेले होते. थंडीमुळे फार वेळ थांबणे शक्य नव्हते, पण शक्य तेवढे बघून घेत आम्ही परत फिरलो. तिथून एका इंडियन रेस्टोरेंट ला रात्रीचे जेवण करूनच आम्ही हॉटेलवर पोहोचलो. प्रवासाने सगळे थकले होते आणि झोप घेऊनही ३० तासांपेक्षा जास्त वेळ झाल्याने सर्वांनी रूम मध्ये जाणे पसंत केले. आणि अशाप्रकारे बार्सिलोनातला पहिला दिवस संपला............
दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलच्याच रेस्टोरंटला काही जण ब्रेकफास्ट करत होते, ज्यांचा ब्रेकफास्ट झालाय ते हॉटेलच्या लॉबीत फोटो काढत होते, आणि त्याचवेळी आमच्या सयाजी चव्हाणांची हॅन्ड बॅग गायब झाली. खरेतर आमची प्री-टूर मिटिंग झाली होती, तेंव्हाच स्पेन मध्ये अशा भुरट्या चोऱ्या होतात अशी ऐकीव माहिती आमच्या सचिन देशमुखांनी सांगितली होती. पण त्यावेळी त्यात फार सिरीयस कोणी घेतले नाही. आणि दुसऱ्याच दिवशी हा चटका बसला. नंतर चौकशी करता असे कळले कि या चोऱ्या स्पेनमधील लोक करत नाहीत. पण सीरिया, इराक सारख्या काही युद्धजन्य देशांमधून अनेक जण चोरून या युरोपीय देशांमध्ये येतात. युरोपीय देशांमधील कायदे खूपच कडक असतात. त्यामुळे कागदपत्र नसल्यामुळे या निर्वासित लोकांना कुणीही काम देत नाहीत. त्यामुळे हे लोक पोटासाठी अशा भुरट्या चोऱ्या करतात. काहीजण तर जेल मध्ये जाण्यासाठी म्हणून चोरी करून मुद्दाम स्वतःला पकडवून घेतात. बाहेरच्या आश्रित जगण्यापॆक्षा इथल्या जेलमधील कैद त्यांना सुखावह वाटते. पण बऱ्याच देशातील पोलिसांना हेही माहित झाल्याने ते चोरीचा माल हस्तगत करून या लोकांना तसेच सोडून देतात. असो!...... त्या बॅग मध्ये सर्वात महत्वाचा असा पासपोर्ट होता. मग सगळी धावपळ, शोधाशोध. पण काही उपयोग झाला नाही. मग शेवटी पोलीस स्टेशनला कम्प्लेंट देणे, इंडियन एम्बॅसिच्या लोकांशी बोलणे या गोष्टी कराव्या लागल्या. `ग्लोबल' च्या अल्ताफ भाईंनी या प्रसंगात खूपच मोठा आधार देत गोष्टी मार्गी तर लावल्याच पण या गोष्टीचा आमच्या नियोजित प्रोग्रॅम वर काही परिणाम होणार नाही याचीही काळजी घेतली. दुपारच्या फ्री टाइम मध्ये सयाजी आणि अल्ताफ पोलीस स्टेशनला जातील, असे ठरवून आम्ही सिटी टूर साठी बाहेर पडलो. ...........
`बार्सिलोना' हे नाव ऑलम्पिक मुळे अनेकांच्या ऐकण्यात असेलच. आमचा पहिला स्टॉप होता `ला सेगरेडा फॅमिलीया' हे कॅथेड्रल. प्रसिद्ध युरोपियन आर्किटेक्ट `अँटोनी गावडी' या महान व्यक्तीने याचे डिझाईन केलंय ते १८३५ साली. कुठल्याही भूमितीय आकारात न बसणारी हि वास्तू म्हणजे एक अजुबा आहे. एखाद्या प्लास्टर ऑफ पॅरिसचे म्युरल करणाऱ्या कलाकाराने अनोखे फ्री हॅन्ड शिल्प करावे असे हे डिझाईन. इतके बारकावे त्यात आहेत कि ते शब्दात वर्णन करणेच शक्य नाही, त्यासाठी प्रत्यक्षच बघायला हवे. आतील हॉलची उंची किमान शम्भर फुटांपेक्षा जास्त असेल, पिळलेल्या खांबांवर ठेवलेले अर्धवर्तुळाकार छप्पर, उंच टॉवर, त्यावरील कलाकुसर, येशूच्या जीवनातील तीन महत्वाच्या प्रसंगांचे मूर्तिरूपात कोरलेली शिल्पे आणि असंख्य अतर्क्य गोष्टी बघून आपली बुद्धी कुंठित होऊन जाते, आणि आपल्या खुजेपणाची जाणीव करून देते. या कॅथेड्रेल साठी जो बेसिक कन्सेप्ट आर्किटेक्ट गावडी नि वापरला तो सगळ्या स्पेन मध्ये वापरला जातो. एक चौकोन काढून त्याच्या चारही कडा थोड्याशा ४५ अंशात कट केल्या आणि तो भाग रिकामा ठेवला. स्पेन मधला प्रत्येक चौक हा असाच आहे. चौकात कॉर्नरवर वर येणारी प्रत्येक इमारत रोडकडेंच्या बाजूला ४५ अंशात कट केलेली दिसेल. एकही इमारत ९० अंशात वळलेली दिसणार नाही. त्यामुळे प्रत्येक चौक हा रस्त्याच्या दुप्पट रुंदीचा झालाय. त्या ऐसपैस चौकात वाहतूक अतिशय सुरळीत चालते. स्पेन आणि इतरही ठिकाणी किंवा संपूर्ण युरोप मध्ये डोळ्यात भरण्यासारखी गोष्ट म्हणजे तिथली स्वच्छता. कागदाचा साधा बोळा कुठे पडलेला दिसणार नाही. कुठेही उघडे ड्रेनेज दिसणार नाही, ना कि कुठे ड्रेनेज चा वास येईल. सर्व शहर हे उत्कृष्ट प्रकारे अंडर ग्राउंड ड्रेनेज सिस्टिम ने सुसज्ज असते. ....................
यानंतर आमचा पुढचा स्टॉप होता तो `ऑलिम्पिक व्हिलेज' ऑलिम्पिक गेम्स साठी उभारलेले हे शहर मूळच्याच सुंदर असलेल्या बार्सिलोना ला नवीन झळाळी देऊन गेले. इथे आत जाता नाही आले, बाहेरूनच दर्शन झाले. कोलंबस जगाच्या शोधासाठी याच शहरातून बाहेर पडला, त्याच्या स्मरणार्थ बांधलेली एक कमान इथे उभी केलेली आहे. इथले बंदर खूप सुंदर होते. विशेष म्हणजे आपल्या प्रत्येक समुद्र किनारी येणारा खारा, ओशट, टिपिकल वास इथे बिलकुल येत नव्हता. पाण्यात उभ्या केलेल्या बोटी एखाद्या शोरूम मध्ये कार पार्क केलेल्या वाटाव्यात इतक्या शिस्तीत उभ्या केलेल्या होत्या. स्टीलच्या सांगाड्याने वेढलेली एक उंच इमारत आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तेवढयाच उंचीही पन स्टील फ्रेम नसलेल्या या दोन्ही इमारती जणूकाही रखवालदारासारख्या या ऑलिम्पिक सिटीच्या रक्षणार्थ उभ्या होत्या. मोकळ्या रस्त्यांवर अनेक जण सेगवे चालवत होते. तिथे एक चोवीस तास चालणार कसिनोही होता, अनेक रेस्टोरंट होती. बाकी परतीच्या प्रवासात शहर बघत बघत आम्ही पुन्हा हॉटेल गाठले. त्याच्यानंतर चा वेळ होता मुक्तपणे उधळण्याचा. मग आपापल्या सोयीने सगळेच जण खरेदीला, फिरायला बाहेर पडले. सयाजी आणि अल्ताफ यांनी त्या वेळात पोलीस स्टेशन आणि इंडियन एंबसी शी संधान बांधून नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी प्रयत्न केले होतेच. संध्याकाळी पुन्हा एक नवीन इंडियन रेस्टोरेंट आणि मग ``विश्रांती'. उद्या भेटू...................
अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)