भाग-६
माद्रिद मधील आमचा दुसरा दिवस सुरु झाला तो गायडेड सिटी टूरने. एव्हाना माद्रिद मधील 'इंडियन अँबेसि' ने सयाजीला १० दिवसासाठी टेम्पररी पासपोर्ट दिला होता. त्यामुळे सयाजी आणि आमचे टूर लीडर अल्ताफभाई फ्री झाले होते. पहिल्यांदा आम्ही पोहोचलो ते 'रॉयल पॅलेस ऑफ माद्रिद' ला. वेस्टर्न युरोप मधील हा सर्वात मोठा राजवाडा. नवव्या शतकात हा बांधला गेला होता, नंतर अरबांनी स्पेन चा कब्जा घेताने याची खूप हानी झाली. १७३४ ला तिसरा फिलिप राजाने जुना राजवाडा पूर्ण जाळून टाकून हा आताचा नवीन राजवाडा बांधला. अजूनही रॉयल फॅमिली चे ऑफिशिअल निवासस्थान म्हणून या राजवाड्याची ओळखआहे. खरेतर आत्ताचा राजपरिवार इथे राहत नाही सध्या पण विद्यमान राजे फिलिप (कितवे ते माहित नाही) अजूनही माद्रिद मध्येअसतील तेंव्हा दर दिवशी या राजवाड्यातील त्यांच्या कार्यालयात येतात असे गाईडने सांगितले. इतर कुठल्याही देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख स्पेनला आले तर त्यांचे स्वागत याच राजवाड्यात केले जाते. बऱ्याच वर्षांपूर्वी भारताचे उप-पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी स्पेनला गेले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत याच राजवाड्यात केले गेले होते आणि तिथल्या राज्यांनी त्यांना 'सो यु आर फ्रॉम प्लेस ऑफ शिवाजी महाराज' असे म्हणत त्यांचे आदराने स्वागत केले होते. अडवाणीजी हे ऐकून नक्कीच तीन ताड उडाले असतील. स्पेन च्या राज्यांकडून १६ व्या शतकातील 'शिवाजी राजांचा' उल्लेख होणे हे आपल्याला किती अभिमानास्पद आहे, पण हे कसे घडले ते पुढे येईलच. या राजवाड्यात अतिशय भव्य कलाकृती, पेंटिंग्ज, म्युरल्स पाहून झाल्यानंतर आम्ही पाहिला तो प्लाझा मेयर हा भव्य चौक. या चौकात एक भव्य पुतळा आहे. तिथून जवळच एक ४०० एकर मधील रॉयल फॅमिलीचे खाजगी गार्डन आहे. सध्या ते सरकारच्या ताब्यात असते. पुढे शहरातील अनेक भव्य इमारती बघत आम्ही पोहोचलो 'लास व्हेंटास-बुल फाईट एरिना' ला. मागच्या एका भागात व्हॅलेन्सीया मधील ७ मजली बुल फाईट एरिना चा उल्लेख केला होता. माद्रिद मधील हि इमारत चार मजली असून लाल विटांमधील हे अतिशय भव्य आणि आकर्षक बांधकाम आहे. इथेही बुल फाईट ला हळू हळू बंदी येऊ पाहतेय, पण ट्रॅडीशन म्हणून वर्षातील एक ठराविक उत्सवाच्या वेळी काही दिवस हा खेळ खेळला जातो. पूर्वीच्या वेळी जेंव्हा हा खेळ व्हायचा, तेंव्हा खेळाच्या शेवटी त्या बैलाला मारले जायचे आणि त्याचीच मेजवानी केली जायची असे ऐकून आहे. आता तसे होत नाही. हि इमारत आतून पाहायची खूप इच्छा होती पण तशी परवानगी सध्या मिळत नाही असे कळले. इथून पुढे जात आम्ही एका इंडियन रेस्टोरेंटला दुपारचे जेवण घेतले आणि पुन्हा त्या प्लाझा मेयर चौकात आलो. तिथेच आमच्यासाठी 'सेगवे' राईडची सोय केलेली होती. आमच्यातील बऱ्याच जणांनी सेगवे पूर्वीही चालवलेली होती. ४-५ जण नवीन होते. पण थोडयाशा प्रॅक्टिसनंतर सर्व जण तयार झाले. त्यात आमचे सांगलीचे ऍडव्होकेट किशोरभाईही होते. उमदा माणूस.बी.ए.आय. सातारा मधील नसूनही आमच्यात फार मस्त मिक्सप झाले होते. (पॅकेज साठी आम्हाला एक मेम्बर कमी असल्याने किशोरजींना आम्ही बरोबर घेतले होते) सेगवे टूर सुरु होऊन रॉयल पॅलेस चौकात आली. इथे मोकळे पटांगण असल्याने सर्वच जण उत्साहात हि सेगवे एन्जॉय करत होते. किशोरजीही जोरात होते. मी आणि सचिनने त्यांना 'जरा हळू' असा इशारा दिला होता. पण त्यांचा जोश काही कमी होत नव्हता. आणि तेच अंगाशी आले. सेगवे कंट्रोल न झाल्याने किशोरजी जोरात इथल्या दगडी पायऱ्यांना धडकले आणि पडले. रक्त आलेले कुठे दिसत नव्हते पण मुका मार लागलेला होता. तरी पण जिद्दीने त्यांनी उरलेली राईड कम्प्लिट केली.
सेगवे नंतर फ्री टाइम होता, मोठ्या गजबजलेल्या अनेक शॉपिंग मॉल आणि दुकाने असलेल्या भागात सर्वजण खरेदीसाठी उधळले. आमच्यातील काही जण तर 'दिसले दुकान कि घूस आत' इतके शॉपिंग क्रेझी होते. आणि काही जण 'दिसली जागा कि काढ फोटो (स्वतःचा)' असेही होते. सर्वजण आपापल्या पद्धतीने एन्जॉय करत होते. २-३ तासांनी सगळेजण परत आले तेंव्हा प्रत्येकाच्या हातात ३-४ पिशव्या वाढल्या होत्या. युरोपात सहसा गर्दी दिसत नाही, पण या मार्केट मध्ये मात्र गर्दीचा महापूर आलेला दिसला. कदाचित वीकएंड असल्याने स्थानिक लोक खरेदीसाठी बाहेर पडले असतील. जेवण करून आम्ही हॉटेलवर पोहोचलो. किशोरजींचे दुखणे वाढले होते. मग त्यांना घेऊन अल्ताफभाई आणि सलीम भाई तिथल्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेले. आणि त्यांच्या सांगण्यानुसार आपल्याकडच्या पंचतारांकित हॉस्पिटलसारखे सुसज्य असलेल्या त्या हॉस्पिटल मध्ये किशोरजिंचा एक्स-रे काढून, हाताला प्लॅस्टर बांधून वर आठ दिवसांचे मेडिसिन हे सर्व शुन्य (फुकट) पैशात झाले. दोन वर्षांपूर्वी प्राग ट्रिप मध्ये असाच एक अपघात झाला होता, एकाच्या छातीला झाडाची धडक बसून दुखत होते, तेंव्हा तेथील खाजगी हॉस्पिटलने ऍडमिट करून घ्यायलाच लाख रुपये मागितले होते. आकडा ऐकूनच बिचाऱ्याचे दुखणे गायब झाले होते. असो. असा आमचा माद्रिद मधील दुसरा दिवस मजेत, थोड्याशा कटू अनुभवात पार पडला...............
अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)